तिस-या दिवशीं श्रीमती रमाबाईंसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांची सभा लष्कर येथील शाळेंत भरली. सुमारें ५० वरिष्ठ वर्गांतील व सुमारें २०० अस्पृश्य समाजांतील स्त्रिया हजर होत्या. सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. सीताबाई भांडारकर, सौ. काशीबाई कानिटकर प्रमुखस्थानीं बसल्या होत्या. अध्यक्षीणबाई म्हणाल्या, “अशीं कामें आम्हा बायकांच्या अंगवळणीं पडलीं नाहींत, पण तीं पडेपर्यंत कामाला खरा जोर येणार नाहीं. निराश्रित वर्गाच्या स्त्रियांची सुधारणा करण्यासंबंधानें पुणें, मुंबई, यवतमाळ, अकोला, अमरावती वगैरे ठिकाणीं जे प्रयत्न होत आहेत ते सर्व मीं पाहिले आहेत. अकोला येथें श्रीमती बेन्द्राबाई यांनीं आपल्या महार जातींतील १४।१५ मुलांचें एक स्वतंत्र वसतिगृह चालविलें आहे. त्यांत इतकी स्वच्छता व टापटीप दिसली कीं, हीं मुलें निकृष्ट जातीचीं आहेत असें कोणालाहि ओळखता येत नाहीं.” नंतर मिशनच्या शाळेंतील शिक्षिका पार्वतीबाई जाधव या महारबाईचें भाषण झालें. ह्या बाई मिरजेहून आल्या होत्या. त्या म्हणाल्या – “ह्या परिषदेस येण्यापूर्वी आमची उतरण्याची सोय होईल काय याची पंचाईत आम्हास पडली होती. पण येथें आल्यावर ब्राह्मणादि वरिष्ठ जातीच्या बायकांनीं आमची उत्तम बडदास्त ठेवली. उलट महार, मांग, चांभार वगैरे आम्ही लोकच एकमेकांच्या पंक्तीस बसण्यास कुरकुरूं लागलों. तेव्हां तुम्हांस (महारांस) ब्राह्मणांच्या पंक्तीस बसण्याची हौस वाटते आणि मांगास पंक्तीस येऊं देण्यास तुम्ही नाराज होता ? हें कसें ?” असें विचारलें. ह्यावर सर्वांची समजूत पटून सुमारे ३०० महार-मांग एकत्र बसलेले पाहून सर्वांना मोठा आनंद झाला.
नंतर कु. शिंगणे व पुणें येथील अस्पृश्य पुढारी श्रीपतराव थोरात यांची कन्या. कु. लक्ष्मीबाई यांचें निबंधवाचन झालें. अकोल्याच्या श्रीमती इंदिराबाई परचुरे यांचें भाषण झालें. सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनीं अध्यक्षीणबाईंचे आभार मानले आणि सभेचा शेवट झाला.
महाराष्ट्र परिषदेस एकूण १७ जिल्ह्यांतील ५४ गांवच्या निरनिराळया १० जातींच्या २३० पाहुण्यांची सर्व त-हेची सोय परिषद कमिटीमार्फत करण्यांत आली होती. ह्याखेरीज इतर सभासद पुणें शहरांतील स्थानिक रहिवासी होते.
ह्या परिषदेचीं सर्व कामें अत्यंत उत्साहानें पार पडलीं; तरी दोन प्रकारें विघ्नें आल्यानें परिषदेला मोठी मनोरंजकता आली. दुस-या दिवशीं रविवारीं मोठया थाटाचें ४०० लोकांचें सहभोजन ठरलें होतें. परिषदेंतील पाहुण्यांचें तीन दिवस सहभोजन चाललेलें होतेंच ! दोन दिवस ब्राह्मण आचारी खुशीनें स्वयंपाक करीत होते. पण रविवारच्या मोठया सहभोजनाचे दिवशीं पुणें शहरांतील बरीच ब्राह्मण मंडळी जेवण्यास येणार होती, हें ऐकून सकाळीं दहा वाजतां स्वयंपाक्यांनीं संप करून मोठा अडथळा आणला. चालकांनीं लगेच त्यांना मंडपांतून जाण्यास सांगितलें. बाहेरून आलेल्या पाहुण्यामंडळीपैकीं ब्राह्मण बायकांनीं आणि स्वागत कमिटींतील अस्पृश्य सभासदांच्या बायकांनीं स्वयंपाकाचें सर्व काम एकदम अंगावर घेऊन ठरल्याप्रमाणें बरोबर १२ वाजतां सर्व तयारी केली. सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालीं बिनबोभाट सर्व तयारी झालेली पाहून सर्व पाहुण्यांना आश्चर्य व आनंद वाटला. दोन तासांत दोन पंक्ती उठून सर्व भोजनसमारंभ आटोपल्याबरोबर जोराची पर्जन्यवृष्टि एक तासभर झाली. लष्करांतील शाळेंतील पाहुणे मंडळींच्या उतरलेल्या ठिकाणाहून फर्ग्युसन कॉलेजचे सभागृह २ मैल लांब होतें. तरी स्वयंसेवकांनीं अपूर्व तसदी घेऊन सभेच्या कामांत कोणत्याहि प्रकारची उणीव भासूं दिली नाहीं. एक तासाच्या विलंबानें सभेचें काम सुरळीतपणें पार पडलें, देव तारी त्याला कोण मारी !
परिषदेकरितां जवळ जवळ २००० पत्रें बाहेर पाठवून त्यांचीं उत्तरेंहि आलीं. हें एक दीड महिन्याच्या आंतच करावें लागलें. बाहेर गांवांहून परिषदेसाठीं येणा-या मंडळींना रेल्वे तिकिटाची सवलत मिळावी म्हणून निरनिराळया रेल्वे कंपन्या व आगबोट कंपन्या यांच्याशीं मीं पुनः पुनः पत्रव्यवहार केला. तरी सर्वांकडून शेवटीं नकारार्थीच उत्तर आलें. स्वागत कमिटीचे दुय्यम चिटणीस रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनीं ही परिषद घडवून आणण्याचे जे अविश्रांत श्रम केले त्याचें वर्णन शब्दानें करवत नाहीं. रा. ए. के. मुदलियार यांचे हाताखालीं त्यांना दक्षतेचें आणि तत्परतेचें वळण लागलें होतें. परिषदेचें बहुतेक श्रेय त्यांनाच आहे. सुमारे पाऊणशें पानांचा परिषदेचा अहवाल पुस्तकरूपानें प्रसिध्द करून परिषदेच्या वाङ्मयांत त्यांनीं एक संस्मरणीय भर टाकली.
ही परिषद पुणें येथील इमारत फंडासाठीं मुख्यत्वेंकरून भरविण्यांत आली होती. परिषदेंत तो फंड न मिळतां उलट खर्चांतच २५९ रु. १४ आ. ३ पै तूट आली. पुणें शहराच्या दारिद्राचें याहून सुंदर प्रदर्शन दुसरीकडे कोठें दिसणार ! पण चिटणीस रा. पटवर्धनांचे सात्विक परिश्रमाला दुसरीकडूनच यश येणार होतें. परिषदेचा सुंदर अहवाल वाचून इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर यांना दयेचा पाझर फुटला आणि त्यांनीं पुढील महिन्यांतच जनरल सेक्रेटरी म्हणून माला ताजमहाल हॉटेलमध्यें बोलावून २०,००० रु. चा चेक माझे हातीं दिला. ह्यांतच पुढें मुंबई सरकारच्या ८७,००० रु. ची भर पडून पुणें शाखेसाठीं भोकर वाडींत “अहिल्याश्रम” या नांवाच्या सुंदर इमारतीचा आश्रम उघडण्यांत आला.