https://tyllcz.eu/rtp-live/
https://jdih.menlhk.go.id/slot-gacor/
https://chavancentre.org/slot-demo/

प्रकरण १३. कार्यांची सुरुवात (2)

अशा प्रकारचीं दर्याद्रतेची कामें करण्यास पुरुषांपेक्षां स्त्रियांच्या अंतःकरणाची जोड मिळविणें आवश्यक असतें. या सदनाच्या कामामुळें तेंहि लवकर घडून आलें. १९०८ सालीं खालील प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी नेमण्यांत आली. लेडी म्यूर मॅकेंझी, अध्यक्ष; सौ. चंदावरकर, उपाध्यक्ष; मिसेस स्टॅनले रीड, चेअरमन; सौ सीताबाई सुखटनकर आणि सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या जॉईंट सेक्रेटरी; मिस् एस्. के. काब्राजी खजिनदार. ह्यांपैकीं डॉ. वासुदेवराव ह्यांची पत्नी सौ. सीताबाई सुखटनकर ह्या पूर्वाश्रमींच्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे चालक रेव्हरंड बिशप ह्यांची कन्या. ह्यांनीं इंग्लंडमध्यें असतांना ह्या मिशनला तेथील युनिटेरियन लोकांची सहानुभूति मिळवून ७०० रु. पाठविले होते. त्या हिंदुस्तानांत आल्यावर त्यांनीं ह्या स्त्रियांच्या कमिटीच्या चिटणीसाचें काम पत्करलें. पण पुढें डॉ. सुखटनकरांना लवकरच मुंबई सोडून लाहोरला जावें लागल्यानें ह्या बाईंचा मिशनशीं फारसा संबंध उरला नाहीं. ह्या कमिटीवरच्या मोठमोठया घराणदार बायकांनीं व्यक्तिशः मिशची वेळोवेळीं फार काळजी घेतली आणि मोठेमोठे निधि जमवून मिशनला दिले. लेडी म्यूर मॅकेंझी यांनीं त्यांचे पती कांहीं दिवस ऑक्टिंग गव्हर्नर असतांना १९०९ सालीं महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यावर सभा भरवून प्रत्यक्ष मदत केली. १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यांत पुण्याच्या शाळेच्या बक्षिस समारंभांत अध्यक्षस्थानावरून लेडी म्यूर मॅकेंझीनें जोरदार भाषण करून श्रीमंत वर्गांचें लक्ष मिशनकडे वळविलें. मलबार हिलवरील आपल्या बंगल्यांत आपल्या कमिटीची सभा भरवून निधि मिळविण्यास नाना प्रकारचे उपाय सुचिवले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ कर्ते सर स्टॅनले रीड यांच्या पत्नीनीं १९०९ सालीं मिशनमधील सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वाटला. सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचें काम करण्यांत चूर असत. सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनांत समाचाराला येऊन खाऊच्या पाटयांच्या पाटया भरून विद्यार्थ्यांना वाटीत असत. प्रसिध्द दादाभाई नौरोजी यांची नात मिसेस पी. कॅप्टन, (मुंबईचे असि. पोस्टमास्तर जनरल यांची पत्नी) ह्या प्रसिध्द देशाभिमानी बाईनें मिसेस सुखटनकरांच्या पाठीमागें चिटणीसाचें काम पत्करलें. पुढें पुण्याची शाखा सुरू झाल्यावर तळेगांव दाभाडे येथें रात्रींची आणि दिवसाची शाळा मिशननें काढली. त्यांचा सर्व खर्च ह्या दंपतीनें दिला आणि पुण्याच्या शाखेला एक शिवण्याचें यंत्र व हार्मोनियन बक्षिस दिला.

ह्या सदनाच्या कार्यांतून मिशनच्या कामाच्या ज्या मुख्य मुख्य अंगाची निष्पत्ती झाली त्या सर्वांत महत्वाचें काम म्हणजे मुंबई शाखेचें परळ येथील वसतिगृह होय. अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणासाठीं कितीहि शाळा आणि उद्योगालयें काढलीं तरी त्यांची खरी उन्नति येवढयानेंच होणें शक्य नाहीं. अशा शाळेंतून अस्पृश्यांचीं मुलें दिवसांतून फार तर पांच तास राहून बाकीचा सर्व काळ आपल्या घरगुती वातावरणांतच आणि मागासलेल्या समाजस्थितींत घालवितात तोंपर्यंतत्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाहीं याची जाणीव पूर्वीपासून चालकांना होती. त्याच्यासाठीं स्वच्छ ऐसपैस जागेंत ह्या कामांत तयार झालेल्या कुलगुरूंच्या वैय्यक्तिक नजरेखालीं दिवसांतून चोवीस तास विद्यार्थ्यांची राहाण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृहाची जरुरी होती. पण हें ध्येय सुरुवातीपासूनच कसें गांठतां यावें. नुसते दिवसाच्या शाळेंत येण्यास ज्यांची तयारी नाहीं ते आपल्या गांवाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरांत कोठून राहायला येणार! पण निराश्रित सदनाचें तीन वर्षें कार्य चालल्यानें हें ध्येय साधण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. मिशनच्या शाळांची वाढ या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे इंग्रजी ४ इयत्ता चालविण्यापर्यंत झाली. ह्या अवधींत शाळांच्या आसपासच्या निवडक मुलांना फक्त जेवावयास घरीं दोनदां जाऊन बाकीचा वेळ सदनांतच घालविण्याची संवय करण्यांत आली. स्नानास घालणे, कपडेलत्ते, अभ्यासाचीं पुस्तकें, खेळांचीं उपकरणें आणि प्रशस्त पटांगण इत्यादि पुरवून घरापेक्षां शाळाच त्यांना अधिक प्रिय वाटेल असा हरएक प्रयत्न करण्यांत आला. शेवटीं ४ फेब्रुवारी १९०९ रोजीं रीतसर वसतिगृह उघडण्यांत येऊन पटावर ११ मुलें नमूद करण्यांत आलीं. सप्टेंबर १९०९ पासून त्यांच्या जेवण्याखाण्याची सुद्धां सोय करण्यांत आली. १९१० डिसेंबर अखेर पटावर ३६ मुलांची संख्या दाखल झाली. त्यांतून कांहीं जरी मुलें गेलीं तरी २१ मुलें कायमचीं शिल्लक उरलीं. त्यांपैकीं ३ मुली होत्या. मिशन जरी मुख्यतः अस्पृश्यांसाठीं काढलें आहे तरी पटावरील संख्येपैकीं निदान एक चतुर्थांशाहून जास्त नाहीं इतकी स्पृश्य वर्गीय मुलें घेण्याला मुभा ठेवली होती. ह्याचा उद्देश दुहेरी होता. स्पृश्य मुलांशीं मिळून मिसळून वागून त्यांच्याशीं अभ्यासांत चढाओढ करून त्यांच्या संवयीचें निरीक्षण करून अस्पृश्यांनीं आपला फायदा करून घ्यावा. उलटपक्षीं अस्पृश्यांविषयीं जो विनाकारण तिटकारा स्पृश्यांमध्यें असतो तो निराधार आहे, हें त्यांच्याशीं प्रत्यक्ष मिसळून पाहण्याची संधी ह्या स्पृश्यांना मिळाली. केवळ मुलांशींच वागण्यांतच नव्हे तर मोठया माणसांमध्यें प्रचार करतांनाहि पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशीं वागतांना व्यासपीठावरून बोलतांना प्रचारकांना हा दुहेरी हेतू सांभाळावा लागे. इतकेंच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षा स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचें काम कित्येक वेळां अधिक अवघड होत असे. वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचा दैनिक कार्यक्रम येणेंप्रमाणे-

 

५-०   सकाळीं उठणें.
५-३०  सकाळची प्रार्थना    
६-०   कांजी.
६-३०  बुक बाईंडिंगचें काम.
७-३०  शालेय अभ्यास    
९-०    स्नान व न्याहारी
१०-०   बुक बाईंडिंगचें काम.
११-१-० दिवसाची शाळा.
१-१-३० भोजन.
१-३०-५ दिवसाची शाळा
५-६ व्यायाम.
६-० भोजन.
७-३० - शालेय अभ्यास किंवा रात्रीची शाळा.
१०-० झोंपणें.

 

याखेरीज रविवारीं सकाळी नैतिक शिक्षण, तिसरे प्रहरीं विद्याथ्यांचें चर्चा मंडळ व सायंकाळीं साप्ताहिक उपासना होत असत. स्वयंपाकाकरतां एक बाई नेमलेली असे. घरकामाकरतां एकहि नोकर नसे. आपापलीं कामें करून सामान्य कामाची वांटणी मुलेंच बिनबोभाट करीत असत. कोणत्याहि प्रकारें कोणत्याहि प्रसंगीं जातिभेद पाळला जात नसे. याबाबतींत कोणीं कधीं तक्रारहि केली नाहीं. अन्न नेहमीं शाकाहारी असे आणि तें विद्यार्थ्यांना मानवलेंहि. स्वच्छता आणि नैतिक बंधनें ह्या दृष्टीनें विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे कसोशीनें पाहण्यात येई. पुरेशा जागेची मोठी उणीव भासत असे. मोफत औषध देण्याचें कामहि प्रयोगादाखल १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेर चाललें. उद्देश हा होता कीं, औषधाचे द्वारें मिशनचा संबंध या लोकांशीं जडावा. नवीन औषधोपचाराची या लोकांस संवय लागावी. नोव्हेंबर १९०६ पासून डिसेंबर १९०८ अखेर पर्यंत दोन वर्षें दवाखाना खुला राहून त्यांत १२३९ रोग्यांना दाखल करण्यांत आलें व ३४४४ वेळां औषधोपचार देण्यांत आले.

 जाती      पुरुष स्त्रिया. मुलें.    एकूण.
   मराठा 
 ६१      ९६    ८१      ३३८
महार २२२ ६४ १६० ४४६
मोची ४८ २२ ७५ १४५
मांग १७ २२ ४२
भंगी   १६
सुरती २७ २६ ८६ १३९
मुसलमान ३५ ४१ २१ ९७
ख्रिस्ती ११ १२ ३२
ज्यू १२ १८
एकूण    
५३५ २९६ ४४२ १२७३


ह्या सर्व कामाचा खर्च २३३ रु. ९ आ. ९ पै. आला त्यावरून किती काटकसरीनें काम करण्यांत येत होतें हें दिसून येतें.

शाळाखातें : राहतां राहिलेलें महत्वाचें काम म्हणजे शिक्षणाचे. यासाठी शाळाखातें पसंत करील अशा तज्ज्ञाची मोठी जरुरी होती. निराश्रित सेवासदनाचें हें चाललेलें काम पाहून आणि त्यासाठीं मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून रा. वामनराव सोहोनी या प्रार्थना समाजाच्या सभासदाला आपल्याला वाहून घेऊन काम करण्याची प्रेरणा झाली. ते ह्या कामाला सर्वतोंपरी पात्र होते. सदनांतील प्रचारक मंडळी सदनांतील कामें करूनच तयार झाली. रा. सोहोनी अगोदर बाहेर तयार होऊनच मिशनला १९०८ सालच्या आरंभीं येऊन मिळाले. ते आल्याबरोबर मिशनच्या परळ येथील शाळेचा दर्जा प्राथमिक शाळेंतून दुय्यम शाळांत वाढला. रा. सोहोनींचें काम मागें सांगितलेल्या दोन पध्दतींपैकीं सुवर्णकार पध्दतीचें (Intensive) होतें. शाळाखात्याचे सर्व नियम सांभाळून त्यांनीं फार चोखपणें हें काम केलें.

शाळाखात्याच्या इन्स्पेक्टरकडूनच नव्हे तर सर जमशेटजी जीजीभाई, बँ, एच्. डी. वाडीया, मि.
सुरेंद्रनाथ टागोर, मि. एफ् अंडरसन, मि. व मिसेस सेंट निहालसिंग अशा प्रसिद्ध व्यक्तिंकडून त्यांनी उत्तम शेेरे मिळवले.

ही शाळा ठाणें जिल्ह्यांतील चेंबूर येथें उघडण्यांत आली. ह्या शाळेचे कामीं  मुंबई कार्पोरेशनमधील इंजिनियर, रा. अमृतलाल ठक्कर यांचे अविश्रांत श्रम फार उपयोगी पडले.

(३) मदनपुरा-दिवसाची शाळा-पटावरील संख्या १२२, पैकीं ९७ मुलें आणि २५ मुली.

(२) कामाठीपुरा - भंगी लोकांसाठीं दिवसाची शाळा ही एका गुजराथी गृहस्थाच्या उदार आश्रयानें चालू होती. हिला प्रथम जागाच मिळेनाशी झाली. भंगी लोकांचा तिरस्कार इतर अस्पृश्यांनाहि वाटत असे. शिक्षक मिळण्याची मारामार पडूं लागली. त्यामुळें शाळा बंद पडते कीं काय असें वाटूं लागलें. शेवटीं बडोद्यास तयार झालेले एक घेड जातीचे गृहस्थ मिळाले. पटावरील संख्या ७६ होती. रोजची हजेरी ६६ होती. मराठी ४ इयत्तेपर्यंत शिक्षण दिलें जाई.