प्रकरण १६. महाराष्ट्र परिषद

मेघवृष्टीनें प्रचार करण्याचे तीन प्रकार आहेत - (१) ठिकठिकाणच्या हितचिंतक पुढा-यांचें मन वळवून त्यांच्याकडून लोकमत तयार करण्यासाठीं त्यांच्या त्यांच्या गांवीं प्रचंड सभा भरविणें. (२) अशा रीतीनें लोकमत अजमाविल्यावर जनरल सेक्रेटरीनें (मुख्य प्रचारकानें) प्रांताच्या एका मुख्य ठिकाणीं अंगभूत शाखा स्थापून तिच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याच्या ठिकाणीं उपशाखा स्थापण्यासाठीं प्रांताचें निरीक्षण करून आणि निधि मिळविण्यासाठीं दौरे काढणें. (३) तिसरा प्रकार मिशनचा खास परिषदा भरविणें. भारतीय राष्ट्रीय सभेची बैठक नाताळांत जेथें जेथें होत असे तेथें तेथें एकेश्वरी धर्माची परिषद भरविण्यास मला जावें लागत असे. त्याचवेळीं मी ह्या मिशनच्याहि परिषदा संघटित रूपानें भरवीत असें. १९०६ मध्यें मिशन स्थापल्यावर १९०७ मध्यें सुरत, १९०८ मध्यें मद्रास, १९०९ लाहोर, १९१० अलाहाबाद, १९१२ बांकीपूर, १९१३ कराची येथें काँग्रेसच्या वेळीं या परिषदा भरविण्यांत आल्या. बांकीपूर येथें काँग्रेसचे अध्यक्ष, अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हेच मिशनच्या परिषदेचे अध्यक्ष होते. कराचीच्या परिषदेंत लाला लजपतराय हे अध्यक्ष होते. ह्या परिषदांमुळें प्रांतांप्रांतातून आलेल्या पुढा-यांचें लक्ष ह्या मिशनच्या कार्याकडे लागत असे. त्या त्या प्रांतांत ह्या मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठीं माहिती आणि मदत मिळत असे. पण प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यांत ह्या अस्पृश्यांच्या प्रश्नाला शिरकाव होण्याला त्यावेळीं अनुकूलता मुळींच नव्हती. हा प्रश्न धर्माचा आहे त्याची भेसळ राजकारणांत नको अशी सबब सांगून त्यावेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुरुष हा प्रश्न सफाईदारपणें टाळीत असत.

१९०६ सालीं हें मिशन निघून त्याचें अर्धे तप १९१२ अखेर संपूर्ण झालें. ह्या राष्ट्रीय प्रश्नाच्या बाबतींत ह्यां अर्ध्या तपांत महाराष्ट्रीयांनीं उचल खाऊन सर्व प्रांतांत आघाडी मारली. मुंबई, मद्रास, मध्यप्रांत ह्या हिंदुस्थानांतील तीन इलाख्यांत ह्या मिशनच्या द्वारें व शासनाखालीं ह्या प्रश्नाची अपूर्व घटना केली. म्हणून मला असें वाटूं लागलें कीं, ह्या मिशनची खास महाराष्ट्रीय परिषद भरवून लोकमताचा आढावा घ्यावा. ह्या प्रयोगासाठीं पुणें शहर हेंच योग्य ठिकाणी असें ठरविलें. मुंबई हें पैशाचें केंद्र आणि पुणें हें चळवळीचें केंद्र हा आधुनिक महाराष्ट्राचा अनुभव आहे. पुणें शाखेचें वसतिगृह स्थापावें, सर्व मिशनचा एक मध्यवर्ती आश्रम स्थापावा, सनातनी पक्षाला हालवून पाहावें, भिन्न जातीय व भिन्न धर्मीय पुढा-यांची सक्रिय सहानुभूति कसोटीस लावून पहावी वगैरे इतर अनेक हेतू होतेच. ही परिषद वरिष्ठ वर्ग आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या सहकार्यावर घडवून आणण्यांत आली.

परिषद फर्ग्युसन कॉलेजच्या अँफि-थिएटरमध्यें सर रामकृष्णपंत भांडारकर यांचे अध्यक्षतेखालीं सन १९१२ ऑक्टोबर ता. ५, ६, ७ ह्या तीन दिवशीं भरली. परिषदेच्या कामाकरितां स्वयंसेवकांची जोरदार घटना केली. त्यांत विशेषतः पुणें येथील शेतकी कॉलेजचे व इतर कॉलेजांतील ब-याच तरुण स्वयंसेवकांनीं ऊन, वारा, पाऊस यांना न जुमानतां एकसारखी मेहनत केली. सर्व्हेट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद रा. वझे आणि इतरांनीं फारच श्रम घेतले. परिषदेकरतां आलेल्या सर्व जातींच्या दूरदूरच्या पाहुण्याची जेवण्याची व राहण्याची सोय मिशनच्या लष्करांतील शाळेंत करण्यांत आली. जेवणासाठीं भव्य मंडप घालण्यांत आला होता. सर्व जातींचे मिळून २६० पाहुणे आले होते. त्यांचीं एकत्र भोजनें तीन दिवस मिळून मिसळून होत होतीं. परिषदेच्या दुस-या दिवशीं म्हणजे रविवारीं परिषदेचे स्वयंसेवक, वरिष्ठ जातीचे हितचिंतक आणि निरनिराळया अस्पृश्य जातींचे पाहुणे मिळून सुमारें ४०० पानांचें थाटाचें प्रीतिभोजन झालें. ह्या भोजनांत ५० वरिष्ठ जातीच्या लोकांनीं भाग घेतला. कमिटीचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. मॅन यांनीं प्रीतिभोजनांत सर्वांत मिसळून भोजन केलें.

सर्व पाहुणेमंडळी पुण्यास आल्यावर त्यांचें नांव, गांव, जात ह्यांची नोंद होई. सकाळचा चहा झाल्यावर परस्पर परिचय होऊन भोजन होई. सभेचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणें उरकण्यांत येई. सर्व कार्यक्रमाला भजनानें व उपासनेनें आरंभ होई. पहिले दिवशीं रा. ब. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांनीं उपासना चालविली. दुसरे दिवशी परिषदेसाठीं प्रार्थना समाजाच्या हरिमंदिरांत परिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर यांनीं उपासना चालविली. त्यावेळीं परिषदेचे बाहेरगांवचे २५० पाहुणे हजर होते. तिस-या दिवशीं मिशनचे शाळेंत मीं स्वतः उपासना चालविली. त्यावेळी मुंबईहून आलेल्या परळ मिशनच्या मुलांनीं निरनिराळया व्यक्ति प्रार्थना केल्या.

दोनप्रहरीं अध्यक्ष भांडारकर स्थानापन्न झाले. जमलेल्या थोर मंडळींत सर चंदावरवर, डॉ. मॅन, भावनगर संस्थानचे दिवाण पट्टणी, नामदार मौलवी रफिउद्दीन, इचलकरंजीचे अधिपति श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, गोपाळराव देवधर, बी.एस्. कामत, प्रो. धोंडोपंत कर्वे, रेव्हरंड रॉबर्टन, तेलगू समाजाचे पुढारी डॉ. कोरेज, अस्पृश्यांपैकीं सुभेदार मेजर भाटणकर, नगरचे डांगळे, पुण्याचे कांबळे, भंग्यांचे पुढारी नाथामहाराज, सातारचे मातंग पुढारी श्रीपतराव नांदणे वगैरे अनेक पुढारी होते.

प्रथम मीं माझ्या भाषणांत ह्या चळवळीचा थोडक्यांत इतिहास सांगून मिशनच्या हल्लीच्या कार्याचा विस्तार पुढील कोष्टक देऊन सांगितला.

ठिकाणें            संस्था
१ मुंबई - ५ दिवसाच्या शाळा व १ रात्रीची शाळा. ५०० विद्यार्थी.
१ वसतिगृह व त्यांतील २६ मुलें, २ भजनसमाज, १ धंदेशिक्षणाची शाळा.
२. पुणें - एक २०० मुलांची शाळा, १ भजनसमाज, १ वाचनालय. क्रिकेट क्लब वगैरे.
३. हुबळी - १ दिवसाची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह.
४. सातारा - १ रात्रीची शाळा, १ भजनसमाज.
५. ठाणें - गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.
६. दापोली - गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.
७. मालवण - गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.
८. मंगलोर - १ दिवासची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह, १ हातमागाचा वर्ग.
९. मद्रास - २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, एकंदर मुलें १३०.
१०. अकोला - ३ रात्रीच्या शाळा, १ वसतिगृह.
११. उमरावती - २ रात्रीच्या शाळा.
१२. इंदूर -     १ रात्रीची शाळा.
१३. भावनगर - १ दिवसाची शाळा.
१४. कोल्हापूर - १ वसतिगृह.