प्रकरण १७. अंतर्बाह्य खळबळ

पहिल्या सहा वर्षांत मिशनची वरील वाढ झाली हें खरें ! पण ती होत असतांना अनेक अडचणी, विघ्नें, गैरसमज आणि परीक्षेचे प्रसंग आले हेंहि खरेंच. वाढ झपाटयानें होऊं लागली असतां पहिला प्रश्न असा उद्भवला कीं हें मिशन मुंबई प्रार्थना समाजानें आपल्या ताब्यांत आणि जबाबदारीखालीं आपलेंच एक अंगभूत काम अशा दृष्टीनें चालवावें कीं तें सर्व राष्ट्राचें काम आहे म्हणून सर्वांचें सहकार्य मिळवून शक्य तेवढी त्याला बाहेरूनच मदत करावी? डॉ. भांडारकरांचें मत पहिल्या बाजूनें पडलें. आरंभीं मिशनच्या मध्यवर्ती कमिटीवर सर्व अधिकारी आणि सभासद प्रार्थना समाजाचेच पुढारी होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या प्रोत्साहनानें आणि बळावरच मीं हें काम काढलें होतें. पुढें बरींच वर्षें समाजाची सहानुभूति आणि मदत मिशनला बिनतक्रार व आनंदानें मिळत होती. मिशनचा सामाजिक हेतू समाजाला पूर्णपणें मान्य होता.

इतकेंच नव्हे तर मिशनचें कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचें होतें. तो पायाहि समाजाला मान्य होता. मात्र अस्पृश्य वर्गांतून समाजाला सभासद मिळावे असा हेतू समाजानें कधींच बाळगला नाहीं आणि तशी तक्रारहि कधीं कोणी बाहेरच्यांनीं केली नाहीं. म्हणून साहजिकच डॉ. भांडारकरांना वाटूं लागलें कीं, प्रार्थना समाजानें हें काम आपल्याच जबाबदारीवर चालवावें. बंगाल्यांत ब्राह्म समाजानें आणि पंजाबांत आर्य समाजानें ह्या मिशनचें काम इतरांची मदत घेऊन पण स्वतःच्याच नियंत्रणाखालीं चालविलें होतें. म्हणून डॉ. भांडारकरांचे मतांत कांही वावगें होतें असें नाहीं. पण ह्या मिशनचें काम नेहमीं वाढतें राहणार. प्रश्न जरी हिंदुपुरता असला तरी अस्पृश्यतानिवारण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थानांत राहणा-या प्रत्येक जातींच्या आणि धर्माच्या माणसांवर पडते, हें आम्हीं वेळोवेळीं सर्वांना बजावूनच काम चालविलें होतें. पैशाची मदत जर सर्वांकडून घ्यावयाची तर त्याचा विनियोग आणि सर्व कामाच्या जबाबदारीचा वांटा खुशीनें घेतील त्यांना देण्यांतच शहाणपणा आहे, हें आम्ही जाणूनच होतों. म्हणूनच सर नारायणराव आणि इतर कमिटीचे सभासदांना मिशनच्या कामांत सर्वांना मोकळीक ठेवावी असें वाटलें. डॉ. भांडारकरांनाहि लवकरच तें पटलें आणि हा वाद फारसा माजला नाहीं.

काम झपाटयानें वाढूं लागल्यामुळें अर्थातच माझा वेळहि ह्या कामांत अधिक अधिक जाऊं लागला. मी मूळ प्रांतिक समाजाच्या कामाला वाहिलेला. अल्प कां होईना पण माझ्या योगक्षेमाची तरतूद समाजानें केलेली. अर्थातच समाजाच्या कळकळीच्या सभासदांना विशेषतः ज्यांनीं मला मदत केली होती त्यांना सहाजिकपणें ह्या बाबतींत वैषम्य वाटूं लागलें.

हळू हळू हा विषय वादग्रस्त होऊं लागला. आणि त्यांत कोणाचा काय इलाज ! जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असें ब्राह्म आणि प्रार्थना समाज नेहमीं ओरडून सांगत आहे. हरिजनसेवा करण्यांत प्रार्थना समाजाची सेवा मी विशेष उत्कटतेनें करीत आहे असेंहि मनःपूर्वक वाटत होतें. पण मी मिशनमध्यें वेळ न खर्चतां समाजालाच चिकटून रहावें असा व्यक्तिशः मजसंबंधीं वाद सुरू झाला; तेव्हां माझी स्थिति नाजूक झाली. मला दगदग, चिंता पडत होती; त्यांत आत्मसमर्थनाचा बोजा माझ्यावर येऊं लागला. तो जड वाटूं लागला. मिशनाचीं आणि समाजाचीं दोन्हीं कामें मी सांभाळीतच होतों.

माझ्या पाठीमागें माझे परममित्र वासुदेवराव सुखटणकर हे मँचेस्टर कॉलेजांत धर्मशिक्षणार्थ गेले. इंग्लंडांत दोन वर्षें राहून व जर्मनींत आणखी अधिक दोन वर्षें राहून १९०७ सालीं ते मुंबईस परत आले आणि प्रार्थना समाजाच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनीं अंगावर घेतली. पण योगायोग असा आला कीं त्यांनीं हें काम वर्ष सहा महिन्यांतच सोडून दिलें. म्हणून माझ्यावर प्रार्थना समाजाच्या कामाचा बोजा पडल्यानें मीं तिकडें अधिक लक्ष पुरवावें हें म्हणणें सकृद्दर्शनीं सयुक्तिक होतें. तरी पण समाजांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बहुतेक सभासद यांना कळून चुकलें होतें कीं, मिशनच्या कामांतून माझी सुटका होणें केवळ अशक्य होतें. म्हणून त्यांनीं कोणत्याहि प्रकारची हरकत घेतली नाहीं. इतकेच नव्हे तर सालोसाल अधिक नेटानें सहकार्य केलें.

वादाचें तिसरें एक कारण उद्भवलें. हिंदुस्थानच्या राजकारणांत राष्ट्रीय पत्र आणि प्रागतिक पक्ष असे दोन भेद पडून एकाचें लक्ष समाजसुधारणेकडे आणि सरकारशीं जुळतें घेऊन काम करण्याकडे अधिक तर दुस-याचें लक्ष राजकीय यशाकडे आणि तेंही सरकारशीं विरोध करून, निदान फटकून राहून, मिळण्याकडे होतें. आणि मला तर माझ्या कामांत मग तें प्रार्थना समाजाचें असो, मिशनचें असो कीं इतर कोणतेंही असो होतां होईल तों सर्वांचें सहकार्य मिळविणे अवश्य होतें. इतकेंच नव्हे तर माझेंहि मतस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य कोणतीहि आपत्ति आली तरी पूर्ण राखून ठेवण्याच्या हक्काला  मीं कधींहि बाधा येऊं दिली नाहीं. पडेल तो त्याग करणें, येतील त्या संकटांना तोंड देणें, ह्या बाबतींत घरादाराचाही मुलाहिजा न राखणें ही गोष्ट वेगळी. पण स्वतःचें व्यक्तिस्वातंत्र्य घालवून घेऊन, आपलें व्यक्तित्वच नष्ट करून घेणें ही गोष्ट वेगळी. राजकारणांत माझें मत आणि कल पूर्णतः राष्ट्रीय बाजूकडे होता. तथापि मी कोणत्याहि पक्षाशीं तादात्म्य पावलों नाहीं. पण मत स्पष्ट सांगावयाला आणि तदनुरूप वागावयला मी कधींहि कचरलों नाहीं. माझीं मतें प्रार्थना समाजावर लादण्याचा आणि प्रार्थना समाजाचीं राजकारणांतील प्रागतिक बाजूचीं मतें इतरांवर लादण्याचा मीं प्रयत्न कदापिही केला नाहीं.

पण एकदां एक चमत्कारिक योग आला. १९०७ च्या सुमारास लोकमान्य टिकळांनीं मद्यपाननिषेधाची प्रचंड दामधूम उठविली. तींत सर्व पक्षाचे आणि कांहीं ख्रिश्चन मिशनरीसारख्या लोकांनीं भाग घेतला. अशाच वेळीं सुरत येथें झालेलें काँग्रेस अधिवेशन लोकमान्यांनीं उधळून लावून काँग्रेसला आपल्या कक्षेंत खेंचले. त्यामुळें ते सरकारच्या विशेष डोळयावर आले. लवकरच त्यांच्यावर खटला होऊन सहा वर्षें कारावासाची त्यांना जबर शिक्षा झाली. शिक्षा फार निष्ठुर झाली म्हणून पुष्कळांना तिचा फार चटका लागला. मद्यपाननिषेधाची चळवळ आणि त्यांत कुठें कमीजास्त बोलल्याबद्दल ही शिक्षा. त्याबद्दल मलाहि फार वाईट वाटत होतें. शिक्षा झाल्यावर लवकरच रविवारचा दिवस आला.

त्या दिवशींच साप्ताहिक उपासना चालविण्याची माझी पाळी होती. प्रार्थनेच्या वेळीं मीं गंहिवरून लोकमान्यांचा उल्लेख केला. एवढया मोठया कारावासांत ह्या जनतेच्या पुढा-याला आयुरारोग्य लाभो, शरीराला विश्रांति आणि मनाला शांति मिळो, इतकेंच नव्हे तर त्याचें कोठें कांहीं चुकत असलें तर उच्च सत्याचा त्याला मार्ग दिसो अशी मीं स्पष्ट शब्दांत प्रार्थना केली. ह्याबद्दल समाजांत खळबळ उडाली. सर नारायणराव चंदावरकर व डॉ. भांडारकर वगैरे गुरुजनांनीं मला समक्ष बोलावून घेऊन खुलासा मागितला. मीं जबाबदारपूर्वक आणि नम्रतापूर्वक सांगितलें कीं, “मला आपण विश्वासानें आचार्य आणि प्रचारक नेमलें आहे. समाजांत सर्व प्रकारचीं, सर्व मताचीं आणि सर्व दर्जाचीं माणसें आहेत, हें मीं पूर्ण जाणून आहे. ईश्वरापुढें उभा राहून प्रार्थना करीत असतां भारताचें संकलित भवितव्य ओळखून प्रार्थना करणें माझें जरूर आणि पवित्र कर्तव्य आहे. ह्यांत ब्रिटिश सरकारची कदर ओळखून माझें आध्यात्मिक कर्तव्य करणें भाग आहे. ह्यांत मीं कच खाल्ली तर मी स्वतःशींच अपात्र ठरेन. आपला विश्वास असेल तर मला ह्या जागेवर ठेवा. पण माझ्या कामांत स्वतः मला आणि माझ्या ईश्वराला जबाबदार राहूं द्या.” हें निर्वाणीचें उत्तर ऐकून गुरुजनांनीं चांगला विचार केला आणि हें संकट तात्पुरतें मिटलें ह्याबद्दल मी गुरुजनांचा निरंतर आभारी राहिलों.

पण ह्यानंतर दुसरेंच एक प्रचंड काहूर अकस्मात् उठलें. १९०७ सालीं महाराष्ट्रांत एक अशांतीची वावटळ सुटली. ती वर्ष दोन वर्ष चालली. तींत १९०८ सालीं नाशिक जिल्ह्यांत एक अत्यंत खेदजनक प्रकार घडला. त्या जिल्ह्याचे उदार अंतःकरणाचे लोकप्रिय कलेक्टर  जॅक्सन ह्यांचा खून एका माथेफिरूनें केला. सरकारी अधिका-यांना आणि समंजस लोकपुढा-यांना मोठा धक्का बसला. थोडयाच महिन्यापूर्वी ह्याच कलेक्टरांच्या उदार सहाय्यानें नाशिक येथें आमच्या मिशनची स्थानिक कमिटी स्थापिली गेली होती. अमरावतीचे तरुण महार पुढारी यांनीं ह्या कमिटीच्या स्थापनेसाठीं नाशिक जिल्ह्यांत हिंडून व्याख्यानें देऊन लोकमत तयार केलें होतें. ह्यापूर्वी नामदार गव्हर्नरसाहेब सर जॉर्ज क्लार्क यांनीं आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांच्याकरवीं मोठा जाहीर जलसा भरवून मिशनला मोठी देणगी देऊन आपली सक्रीय सहानुभूति दाखविली होती. मोठमोठे संस्थानिक, हिंदु, पारशी, ख्रिस्ती वगैरे लोकांचे पुढारी ह्यांचें लक्ष मिशननें वेधलें होतें. इतकेंच नव्हे तर जिल्ह्याचे कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर वगैरे युरोपियन अधिकारी मिशनला मदत करूं लागले होते. डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, कर्नल स्टीन, मिस्टर सेज्वीक वगैरे सारखे मुलकी आणि लष्करी अधिकारी पुणें शाखेच्या कमिटीवर सभासद होऊन निधी जमविण्याच्या कामीं मदत करीत होते. अशा शुभवेळीं ह्या भयंकर खुनामुळें मोठा अपशकून झाला. वस्तुतः ह्या खुनाचा मिशनच्या कार्याशीं काडीमात्र संबंध नव्हता. तथापि स्थानिक अधिका-यांत खळबळ उडणें साहजिक होतें. पुणें शाखेकडून मला आणि अध्यक्ष चंदावरकरांना तांतडीचीं पत्रें आलीं. साहजिकच चंदावरकरांना चिंता लागली. त्यांना मीं समक्ष भेटून ताबडतोब पुण्यास जाऊन सर्व संशय निवारण करून येतों असें आश्वासन देऊन मी पुण्यास गेलों. त्यावेळीं सर जॉन म्यूर मॅकेंझी मुंबई सरकारच्या कार्यकारी मंडळाचे मुख्य सभासद होते. पुढें ते कांहीं वेळ तात्पुरते गव्हर्नरही झाले. त्यांची पत्नी लेडी म्यूर मॅकेंझी या आमच्या मिशनच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष होत्या. मी मिशनच्या सोज्वळपणाबद्दल ह्या दोघा नवराबायकोची खात्री पटविली होती. माझ्या मुलाखतींत सर जॉन यांनीं स्पष्ट सांगितलें कीं, सर नारायण चंदावरकरांचे नांवामुळें आणि तुमच्या कामाच्या तपशीलवार माहितीमुळें तुमच्याबद्दल तिळमात्रहि संदेह आमच्या मनांत येणार नाहीं हें पक्कें ध्यानांत ठेवा आणि तुमचें काम निर्वेधपणें पुढें चालवा. झालेल्या गुन्ह्याबद्दल सरकार योग्य तो बंदोबस्त करील. त्याची झळ तुम्हाला लागणार नाहीं. माझा जीव खालीं पडला. पुणें शाखेच्या कमिटीला नवीन धीर आणि नवीन जोम आला. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन हे दमदार कार्यकर्ते. सर नारायणरावप्रमाणेंच ते मिशनच्या कामीं जातीनें लक्ष्य घालीत. त्यांना कोणत्याच प्रकारचा संशय आला नव्हता. पण मी मुंबईस परत येऊन पाहतों तों सर नारायणराव यांच्या राजीनाम्याचें पत्र माझ्या टेबलावर आढळलें. मीं ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. अशा धामधुमीच्या वेळीं नामदार गव्हर्नरांची भेट घेणें उचित नव्हे; ही लाट उसळून गेल्यावर त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेऊन घडलेल्या शोचनीय प्रकारचा त्यांत संबंध न दाखवतां मिशनच्या अनेक गरजा त्यांचेपुढें ठेवून सरकारीरित्या त्यांची सहानुभूति मिळविण्याचा आम्हीं प्रयत्न करावा असा प्रेमळ आणि पोक्त सल्ला सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनीं दिला वगैरे मजकूरहि मीं सर नारायणरावांस सांगितला. मग त्यांनीं राजीनाम्याचा आग्रह धरला नाहीं.

पुढें १९०९ सालच्या आरंभीं मी मुंबईस असतांना मिस व्हायोलेट् क्लार्क ह्यांच्याकडून एक खाजगी पत्र आलें. ह्या उदार स्त्रीनें जलसा करून मिशनला देणगी दिल्यापासून मिशनचें कार्य प्रत्यक्ष पाहावें अशी इच्छा धरली होती. प्रतिष्ठित स्त्रियांच्या कमिटीकडून आणि निराश्रित सेवासदनाच्या प्रचारकांकडून अस्पृश्यवर्गाच्या कंगालखान्यांतून या गरीब लोकांची जी प्रेमळ शुश्रूषा व निस्वार्थ सेवा चालली होती तिचा तपशील ह्या उदार स्त्रीचे कानांवर गेला असला पाहिजे. म्हणूनच तिनें मजला खाजगी पत्र लिहून गरिबांच्या घरोघर जाऊन हीं सेवेचीं कामें आपल्या समक्ष पाहाण्यास मिळतील काय असा प्रश्न केला होता. अर्थात् मीं अनुकूल उत्तर दिलें. लवकरच १९०९ च्या मार्चमध्यें मिशनच्या शाळेचा बक्षिस समारंभाचा बेत ठरविण्यांत आला. एल्फिन्स्टन रोड जवळील मिशनच्या ठिकाणाच्या बाजूस एक विस्तीर्ण पटांगण होतें; तेथें भव्य मांडव घालण्यांत आला. सामाजिक मेळा, स्त्रियांची सभा, प्रीतिभोजन वगैरे पूर्वीचीं कामें देखील आटोपून घेण्यांत आलीं. मुख्य बक्षिसमारंभाचे दिवशीं अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या कन्येच्या हस्तें मुलांना बक्षिसें वाटण्याचें गव्हर्नरसाहेबांनीं कबूल केलें होतें. पण दैवदुर्विलास कांहीं निराळाच होता. आम्ही ह्या समारंभाची वाट पहात असतां त्याच दिवशीं एक अचानकपणें भयंकर व्याधी होऊन ही प्रेमळ तरुण कुमारी ख्रिस्तवासी झाली अशी दुष्ट वार्ता गांवभर पसरली. आश्चर्य आणि दुःख यांनीं आम्हां सर्वांस घेरलें आणि ईश्वरी इच्छेस मुकाटयानें मान द्यावा लागला. अर्थात् मिस क्लार्क यांना गरिबांचीं दुःखे समक्ष बघण्यास संधी मिळाली नाहीं. पुढें कांहीं दिवसांनीं सर जॉर्ज यांच्या पत्नीहि निवर्तल्या म्हणून रजा घेऊन कांहीं दिवस ते एडन येथें रहावयास गेलें. रीतसर त्यांच्याकडे मिशनचे दुखवटे गेले. त्यांच्या जागीं सर जॉन म्यूर हे तात्पुरते गव्हर्नर झाले. पुढें ढकलण्यांत आलेला बक्षिसमारंभ ता. १२ आक्टोबर १९०९ रोजीं श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांच्या हस्तें मुंबई येथील टाऊन हॉलमध्यें टोलेजंग सभा भरवून उरकण्यांत आला. त्याचें वर्णन मागें आलेंच आहे.

पुढें ना. गव्हर्नरसाहेब एडनहून आल्यावर त्यांचें पुन्हा लग्न झालें. त्यानिमित्त मुंबईच्या भायखळा येथील इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या पटांगणांत मुंबई अस्पृश्यवर्गीय स्त्रियांची जाहीर सभा भरली. ही सभा ता. ५ नोव्हेंबर १९१० रोजीं भरली. तिचें अध्यक्षस्थान मुंबईच्या सेवासदनाच्या कार्यकर्त्या सौ. यशोदाबाई ठाकूर यांनीं मंडित केलें होतें. ना. गव्हर्नरसाहेबांच्या लग्नाचा अभिनंदनपर ठराव पास होऊन त्यांच्याकडे पाठविण्यांत आला.

सर जॉन म्यूर मॅकेंझींनीं सुचविल्याप्रमाणें मिशनचें एक वजनदार शिष्ट मंडळ ता. २५ ऑगस्ट १९१० रोजीं मुंबईचे गर्व्हनर सर जॉर्ज क्लार्क यांचेकडे पुण्यांतील गव्हर्नमेंट हाऊसमध्यें गेलें. त्यांत सौ. सईबाई परांजपे-प्रि. र. पु. परांजपे यांच्या पत्नी, डॉ. हॅरोल्ड एच्. मॅन, बॅ. एच् .ए. वाडिया, दि. ब. गोडबोले, प्रो. धों. के. कर्वे, आणि मी इतकी मंडळी हजर होती. प्रथम सौ. सईबाईंनीं भाषण करून शिष्टमंडळाचे मुख्य सभासद लेडी म्यूर मॅकेंझी ह्या विलायतेला गेल्यानें त्यांना हजर राहतां आलें नाहीं याबद्दल खेद व्यक्त केला. नंतर मीं भाषण करून मिशनचा सविस्तर लेखी अर्ज सादर केला.