प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

 येथवर माझ्या प्रचारकार्याचें स्थानिक आणि प्रांतिक स्वरूपाचें वर्णन केलें, पण प्रथम सांगितल्याप्रमाणें माझें लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापकत्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमीं लागून राहिलेलें असें. या कार्याचें मुख्य अंग ही भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद होती. सन १८८५ सालीं हिंदी राष्ट्रीय सभेचें पहिलें अधिवेशन मुंबई येथें भरलें, त्यांत न्या. रानडे यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांची बुध्दि अष्टपैलू, भावना उदार व उच्च प्रतीची होती. पुढील दोन अधिवेशनें कलकत्ता व मद्रास शहरीं झाल्यावर अलाहाबादला चवथी बैठक भरली. आरंभापासूनच राजकारणास समाजसुधारणेचा बळकट पाठपुरावा होता. अर्थात् ह्या चौथ्या बैठकींत उदारधर्माचा पाठिंबा ह्या राष्ट्रीय चळवळीस मिळें क्रमप्राप्तच होतें. ह्या एकेश्वरी बैठकीचे अध्यक्ष न्या. रानडे झाले. कलकत्याचे मिस्टर आणि मिसेस आनंदमोहन बोस, लखनौचे बिपिनबिहारी बोस, बिहारचे बलदेव नारायण, लाहोरचे पं. शिवनारायण अग्निहोत्री यांनीं आपापल्या प्रांतांतील ब्राह्मसमाजाच्या कार्यासंबंधीं भाषणें केलीं. पुढें सालोसालीं राष्ट्रीय सभा जेथें जेथें भरेल त्या वेळीं तेथें ही धर्मपरिषदहि भरविण्यांत यावी आणि पुढील वर्षाचे चिटणीस म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना नेमावें असा ठराव करण्यांत आला. १८८९ सालीं मुंबईला ही परिषद मुंबई प्रार्थना समाजांत भरली, आणि त्या वेळीं प्रांतोप्रांतींच्या पुढा-यांनीं भाग घेतला.

कलकत्याहून नवविधान समाजाचे प्रतापचंद्र मुझुमदारहि हजर होते. तेव्हां ब्राह्मसंघ (Theistic Union) या नांवाची एक मध्यवर्ती संस्था स्थापून पुढील कार्याचा प्रयत्न करण्यांत यावा असें ठरलें. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे चिटणीस नेमले. कलकत्यास साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज व आदि ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या समाईक कार्यांत फूट पडली होती. ह्या वरील नवीन संघामुळें ही फूट भरून येण्याचा बराच संभव होता. आणि त्यांत आम्ही मुंबईकडील पुढा-यांनींच न्या. रानडे ह्यांच्या नेतृत्वाखालीं उचल खाल्ली असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. कारण पुढील दोनतीन सालीं न्या. रानडे ह्यांनाच परिषदेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें. चवथी बैठक नागपुरास १८९१ सालीं भरली. तेथें ब्राह्मसमाज नसल्यामुळें काम फारसें झालें नाहीं. पुढील सालाकरतां वामन आबाजी मोडक, पांडुरंग सदाशिव केळकर यांस चिटणीस नेमण्यांत आले. १८९४ सालीं मद्रासच्या बैठकीस डॉ. भांडारकर हे अध्यक्ष होते व पुढील सालीं म्हणजे १८९५ सालीं पुण्याच्या काँग्रेसचे वेळीं बैठक पुणें प्रार्थना मंदिरांत भरली. त्यावेळीं अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिध्द प्रचारक रेव्हरंड जे. टी. संडरलंड हे हजर होते. ह्यापुढें मधून मधून १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचें काम मंदावलें. पांचवी बैठक अलाहाबाद येथें भरली असतां मुंबईच्या ‘सुबोध-पत्रिकेनें’ लिहिले : “अशा प्रांतिक बैठकीचें महत्व राष्ट्रीय सभेच्या धामधुमींत भरणा-या भारतीय अधिवेशनापेक्षांहि किंबहुना अधिक आहे; कारण प्रांतिक बैठकीनें मिळविलेल्या माहितीवरून आणि अनुभवावरून राष्ट्रीय बैठकीचें काम अधिक पायाशुध्द व पध्दतशीर होण्याचा संभव आहे.”

“अशा मंदावलेल्या स्थितींत १९०३ च्या नाताळांत मद्रासेंत भरलेल्या अधिवेशनावरून ह्या परिषदेची झालेली विस्कळित स्थिति माझ्या मनांत भरली. आणि पुढील सालीं मुंबईला भरणा-या राष्ट्रीय सभेच्या वेळीं धर्मपरिषद संघटित स्वरूपांत बोलाविण्याचा मीं निश्चय केला हें मीं वर सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें हीं पुनर्घटित एक दोन अधिवेशनें सोडून कराचींत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत या कार्यांचा सर्व भार, चिटणीस या नात्याने मीं माझ्यावरच घेतला.

पुढील कोष्टकावरून ह्या एकेश्वरी धर्मपरिषदेच्या कार्याचें समालोचन नीट करण्यास बरे पडेल

तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

१९०३ सालच्या मद्रास-बंगालच्या सफरीवरून हिंदुस्थानांतील निरनिराळया ब्राह्मसमाजांची मला बरीच प्रत्यक्ष माहिती झाली होती. १९०४ सालीं मुंबईच्या परिषदेंत हिंदुस्थानच्या निरनिराळया प्रांतांतून पुष्कळसे प्रमुख पुढारी मुंबईस आल्यानें त्यांच्या समक्ष परिचयाची तींत भर पडली. आणि त्यांच्यावर ह्या नवीन संघटित परिषदेचा परिणाम घडला. इतकेंच नव्हे तर मुंबई प्रार्थना समाजांतील पुढा-यांनाहि ह्या नवीन प्रयत्नांचें महत्व कळून चुकलें. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थना समाजाचें महत्व असल्यानें येथील बैठक समाजाबाहेरील लोकांवरहि परिणामकारी झाली. यंदाच्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं स्वीकारल्यामुळें तो एक नवीनच विशेष घडला. म्हणून धर्म परिषदेंतहि महाराजांनीं प्रत्यक्ष भाग घ्यावा ही कल्पना मला सुचली. स्वतः मी त्यांस आमंत्रण करण्यास गेलों हें वर आलेंच आहे. स्वागताध्यक्षाचें काम सर नारायण चंदावरकरांनीं आणि अध्यक्षाचें काम गुरुवर्य डॉ. भांडारकरांनीं केल्यामुळें ह्या अधिवेशनास अधिक रंग चढला. रात्रीच्या शाळांचा बक्षिस समारंभ झाला. त्यांत अध्यक्षस्थान पत्करून त्याच रात्री राममोहन आश्रमांत जें थाटाचें प्रीतिभोजन झालें त्यांतहि महाराजांनीं प्रमुखपणें भाग घेतला. ह्या भोजनास मुंबईच्या आर्यसमाज आणि सामाजिक परिषदेचे प्रतिनिधी यांना आमंत्रण केलें होतें. आर्यसमाजाचे चिटणीसांनीं १५० सभासदांना घेऊन येण्याचें कबूलहि केलें होतें. प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष दानशूर दामोदरदास सुकडवाला यांनीं भोजनाचा सर्व खर्च भोगण्याची जबाबदारी घेतली होती, पण मुंबई प्रार्थना समाजानें कांही मुसलमान गृहस्थांना प्रार्थना समाजाची दीक्षा दिलेली होती म्हणून आयत्यावेळीं आर्यसमाजिस्टांनीं भोजनाला हजर राहण्याचें टाळलें. कृतीची बाजू आल्यावर केवळ ध्येयवादावर अकांडतांडव करणारे हे वाचीवीर कशी बगल मारतात ह्यांचें हें स्पष्ट उदाहरण आहे. शिवाय तो काळ १९०५ सालचा होता. आर्यसमाजांत बहुतेक गुजराथ्यांचाच भरणा होता. कृतीच्या सुधारणेला गुजराथ प्रांत त्याकाळीं तयार नव्हता त्याचें हें उदाहरण! पण महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं गुजराथ्यांना हें उदाहरण घालून दिलें ही गोष्ट मोठी संस्मरणीय झाली. परिषदेंत निरनिराळया ब्राह्मो पुढा-यांचीं भाषणें झालीं. तींहि नमुनेदार होतीं. पुढील परिषद बनारस येथें काँग्रेस भरत असल्यानें तेथें भरविण्याचें ठरलें. तेव्हांपासून अशा परिषदांच्या सरचिटणीसाचें काम मींच करावें असें सर्वानुमतें ठरविण्यांत आले.