https://tyllcz.eu/rtp-live/
https://jdih.menlhk.go.id/slot-gacor/
https://chavancentre.org/slot-demo/

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (७)

जे. टी. संडरलंडसाहेबाची व माझी पूर्वीपासून चांगली ओळख होती. कारण त्यांच्या शिफारशीनें ऑक्स्फर्ड येथील मँचेस्टर कॉलेजांत मला व अमेरिकेंतील मिडिव्हल थिऑलॉजिकल स्कूलमध्यें हिंदुस्थानांतील ब्राह्य विद्यार्थ्यांना पाठवून प्रचारक बनविण्याची योजना सुरू करण्यांत आली होती. संडरलंड यांनीं ह्यावेळीं आपल्याबरोबर आपल्या मुलीस आणले होते. संडरलंडसाहेबांची सोय कराचींतील एका युरोपियन हॉटेलांत करण्यांत आली होती. ते परिषदेचे नियोजित अध्यक्ष आणि मी चिटणीस म्हणून कांहीं महत्त्वाच्या कामासाठीं मी त्यांना हॉटेलांत भेटावयास गेलों असतां एक मासलेवाईक प्रकार घडला. नाताळच्या मोसमांत युरोपियन पाहुण्यांनीं हॉटेल गच्च भरलें होतें. हॉटेलच्या व्यवस्थापकांनीं संडरलंडसाहेबांस भेटण्यास मला मनाई केली. मला आंत जातां येत नसल्यास साहेब मजकुरांस मला भेटण्यास बाहेर आणले पाहिजे असा मीं आग्रह धरला. डॉ. संडरलंड बाहेर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनीं खेद प्रदर्शित केला. मीं त्यांना स्पष्ट बजावलें कीं, कामानिमित्त मला वेळोवेळीं भेटावें लागणार, ह्या प्रकाराची पुनरावृत्ति झाल्यास येथील पाहुणचार सोडून आम्ही व्यवस्था करूं तेथें साहेबांना अवश्य जावें लागेल. साहेब सध्यां अमेरिकेच्या स्वतंत्र वातावरणांत नाहींत. आमच्या देशांत आमच्या इतकेच परतंत्र आहेत. साहेब मजकुरांना हा व्यावहारिक प्रकार पाहून ख-या उदार धर्माच्या प्रसाराबद्दल पुन्हां एकवार विचार करावा लागला. मग पुढें मात्र ब्राह्म परिषदेचीं सर्व कामें रीतसर पार पडलीं.

सर नारायण चंदावरकर आणि इतर प्रांतांतील बडी बडी मंडळी ह्या बैठकीस हजर होती. पुढील वर्षी जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरावयाची तिच्या पूर्वतयारीचा विचारविनिमय करण्यासाठीं एक खासगी सभा बोलावली. हिंदुस्थान देश म्हणजे एक छोटा खंड. एका अधिवेशनानें ह्या नवीन चळवळीचें काम भागणार नाहीं, म्हणून १९१४ सालीं कलकत्ता, मद्रास, मुंबई, लाहोर या चार मुख्य ठिकाणीं चार अधिवेशनें भरविण्याची योजना ठरली. अमेरिका, युरोप, आणि हिंदुस्थान या तीन देशांतील उदार धर्मवाद्यांनीं पैशाचा निधि जमविण्याची जबाबदारी घेतली. कलकत्त्यांत हेमचंद्र सरकार, मद्रासेंत डॉ. व्यंकटरत्नम् नायडू, मुंबईस वि. रा. शिंदे, लाहोरास प्रो. रुचीराम सहानी या चौघांना आपापल्या प्रांताच्या अधिवेशनाचे चिटणीस नेमण्यांत आलें.

कराची येथील काम आटोपल्यावर बडोद्याचे श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांची डॉ. संडरलंडशीं समक्ष भेट करून देण्यासाठीं मीं महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला आगाऊ भेटून तयारी केली. डॉ. संडरलंड, त्यांची कन्या व मी महाराजांचे पाहुणे म्हणून बडोद्यास दोन तीन दिवस होतों. असा जागतिक परिषदेची महाराजांना हौस फार. त्यांची सहानुभूति आणि मदत मिळण्याची आम्हाला आशा होती. त्यांनी मदतीचें आश्वासन दिलें. राजवाडयांत डॉ. संडरलंडचें एक व्याख्यान त्यांनीं करविलें. विषय “इमर्सन” हा होता. व्याख्यान संपल्यावर लक्ष्मीविलास राजवाडा संपूर्णपणें फिरून दाखविण्यांत आला. वाडयाचें एकंदर काम व मांडणी पाहून डॉ. साहेबांनी संतोष व्यक्त केला आणि जगांतील उत्तमोत्तम वाडयांमध्यें ह्याचा नंबर बराच वर येतो अशा अभिप्राय दिला. हिंदुस्थानांतील प्रमुख शहरीं ह्या जागतिक परिषदेची ठरलेली योजना तेथील पुढा-यांस समक्ष समजावून सांगून डॉ. मजकूर अमेरिकेस परत गेले. लगेच मी ह्या नवीन कामास लागलों. एक जाहीर विनंतीचें लहानसें पुस्तक छापलें. आणि तें हिंदुस्थान, युरोप आणि अमेरिकेंतील परिचित गृहस्थांना पाठवून पत्र व्यवहार सुरू केला. बरींच समाधानकारक उत्तरें आलीं. युरोपांतील त्याकाळचे प्रसिध्द व अग्रगण्य जर्मन तत्वज्ञानी प्रो. रुडॉल्फ ऑयकेन यांचें परिषदेस हजर राहून भाग घेतो अशा अर्थाचें पत्र आलें. प्रो. मजकूर पुढील वर्षी जपानला जाणार होते म्हणून वाटेंत हा कार्यभाग उरकून घेण्यास त्यांना कठीण पडणार नव्हतें. पूर्वतयारीची ही धामधूम चालली असतांना विधिघटना निराळीच चालूं होती. १९१४ च्या ऑगस्ट महिन्यांत महायुध्द अकस्मात सुरू झालें. त्यांत ही परिषदच काय पण अनेक जागतिक महत्त्वाच्या गोष्टींची होळी झाली. महायुध्दानें सर्व जागाला त्राहि त्राहि करून सोडलें. मग पुढें भरणा-या परिषदेची काय कथा? गेल्या दहा वर्षांत अत्यंत श्रम करून ज्या एकेश्वरी धर्म परिषदेला आम्हीं नांवारूपाला आणलें होतें तिचासुध्दां ह्या खाईंत स्वाहा झाला.