२२-फर्ग्युसनमधील रोजनिशी

पांडवदरी
ता. २६ एप्रिल १८९९
सकाळी नऊ वाजता दसम्या वगैरे करून घेऊन जनाक्कासह चालतच आम्ही सर्वजण पांडवदरीस निघालो. दरी पन्हाळ्याचे पश्चिमेस सुमारे ५ पाच मैलावर आहे. दरम्यान म्हसाईचे मोठे पाठार ओलांडावे लागते. हे पाठार बहुतेक पन्हाळ्याइतकेच उंच असून वर आफाट सपाट मैदान आहे. पन्हाळ्याचा हांडा बुरुज आणि हे पाठार यास मध्ये एका उंच पातळ सुळकेदार नैसर्गिक भिंतीने जोडले आहे. ही भिंत सुमारे आर्धा मैल लांब असून हिच्या शिरोभागी १०।१२ फूट उंच अणकुचीदार दगड उभे आहेत. ते पांढरे असल्याकारणाने ही भिंत नुकतीच घासलेल्या करवतीप्रमाणे तीक्ष्ण व चमकदार दिसते. ह्या दगडातून वाघाला राहण्याला चांगले ठिकाण आहे. शिवाय ह्या उंच भिंतीमुळे पन्हाळ्याच्या दक्षिणेस रांगण्यास जावयाचे झाले तर पावन खिंडीतूनच वाट आहे. नाहीतर पावन गडास अगर म्हसाईच्या अवाढव्य पाठारास वळसा घालावा लागतो. म्हणूनच बाजी देशपांड्ये यांनी पावनखिंड आडविली होती. ह्या मनोहर कडप्यास घाटशिळ असे म्हणतात. पन्हाळा उतरून लगेच म्हसाईचे पाठार चढताना खंडाळ्यातील टायगर लीप नावच्या अती खोल खळीची आठवण झाली. ह्या बाजूवर एकसारखी दाट उंच झाडी आहे. मधून स्वच्छ गोड पाण्याचा मोठा झरा धो धो धावत आहे. वाट झीजली असल्याने मोठे मोठे दगड पायाला गुळगुळीत व थंड लागतात. हा प्रदेश केव्हाही फार रम्य दिसतो. वाटेत झ-याजवळ झाडाखाली कोकणी २।३ वर्षाची १०।१२ पोरे अगदी नैसर्गिक स्थितीत दिसली. मी जनाक्कास ओरडून सांगितले की `ही पहा माणसाची पिले` ! तीही आश्चर्यचकित दृष्टीने पाहू लागली. मुलापेक्षा पिले हेच नाव त्यांस अधिक शोभत होते. पाठारावर गेल्यावर जागोजागी रेड्याची लहान मोठी पावले खडकात खोल रुतलेली दिसली. ती बरीच हुबेहुब होती. महिषासुरमर्दिनीने महिषासुराबरोबर तुळजापुरापासून लढत येऊन येथे त्याचा वध केला असे सांगतात. चार मैल पाठार चालून गेल्यावर पांडवदरीजवळ म्हसाईचे लहानसे देऊळ लागते. येथे महिषासुराशी तुंबळ युद्ध झाले म्हण ! येथे रेड्याची माणसाची पुष्कळ पावले वीत वीतभर खोल उमटली आहेत ! आसपास ही देवी नवसास फार पावते ! हे नवस म्हणजे आमक्याने असे आमचे वाईट केले म्हणून म्हसाई तू त्याचे असे वाईट कर अशाच प्रकारचे रानटी असतात. नवसही क्रूरपणेच पुरविले जात असल्याने नेहमी पशूंचे ताजे रक्त पडते. आजच एका पशूचा वध होणार होता व झाला. नवसकरी आपला नवस दुस-यास सांगत नाहीत व सांगण्यासारखा नसतोच । १२ वाजता पांडवदरीत उतरलो. दरडीत ३।४ खोल्या कोरल्या आहेत. लहानशी दरी झाडांनी भरून गेली आहे. जेवल्यावर मी तासभर निजून उठलो. येथे मला व जनाक्कालाही अतिशय उदास वाटू लागले ! म्हणून चिंतामणराव, मी व जनाक्का झाडीत फिरावयास गेलो. एका जांभळीच्या झाडाखाली बसून जनाक्काने काही भक्तीपर पदे गाईली. झाडाच्या एका लांब जमीनीस टेकलेल्या फांदीवर बसून झोके घेतले. मग मला उल्हास वाटू लागला. पाचाचे सुमारास आम्ही घरी पोचलो.
२७ एप्रिल १८९९ गुरुवार
पन्हाळ्यास येऊन आज ६ सहा दिवस झाले. इतके दिवस अवश्य तितकाच वेळ घरी राहून बाकी सर्व वेळ डोंगरातून आम्ही सर्वजण हिंडत होतो. रोज निदान १५ पंधरा मैलाची तरी चाल पडत असे. जोतीबाच्या डोंगराच्या उत्तर बाजूचे दरडीत काही लेणी कोरली आहेच. एके ठिकाणी एक गुहा दिसली. तीत मी बसत बसत आत ५।६ हात गेलो. पुढे अखुड आणि अंधेरी दिसू लागली. काठीने चाचपून पाहिले तो ती सरळ पुष्कळ खोल असावी असे दिसले. पुढे जाववले नाही. वर येऊन एका शिपायाजवळ तिच्यासंबंधी विचारपूस करता असे कळले की तीत तरस असतात ! पावनगडावर एक लहानशी विहीर पाहिली तीत पूर्वी जुने तूप साठवून ठेवीत असत. ह्याचा उपयोग लढायीतील जखमाला लावण्याकडे होत असे. अद्यापि हीत तुपाचा वास येत आहे. आतील माती व चुना हातावर घासला असता मेणबत्तीसारखी मऊ पूड होते. मी काही माती बरोबर घेतली आहे.

वसंत ऋतूत पन्हाळ्याच्या बाजूवरून संध्याकाळी फिरावयाला जाण्याची मोठी बहार आहे. गर्द कोवळ्या पालवीची दाट झाडी आहे. सोनचापा, सुवर्णपुष्प, नेवाळी इत्यादी फुलझाडे मघमघीत फुलल्यामुळे सर्व वातावरण सूक्ष्मपणे परिमळले असते. बोरे, आंबे, जांभळे विपूल असतात. येथील करवंदे तशी सुपारी एवढी टपोरी असून सुंदर व गोड असतात. अनेक लहानमोठ्या पाखरास स्वतः निसर्गाने गायनकलेत निष्णात करून सोडले आहे. इतक्या सुंदर गोष्टींनी बाह्य जग खुलले असता अंतर्जगात आमच्या पूर्वजांनी येथे गाजवलेल्या पराक्रमाची आठवण होऊ लागली की पाहणारा सबाह्यआंतर आनंदमय होऊन आपल्या स्वतःला विसरून जातो. रसिक असून तो नास्तिक असेल तर त्याच्या मनाची मजल इतकीच होते; पण अस्तिक असेल तर ह्या सुंदर अंतर्बाह्य विश्वाच्या सच्चिदानंद परमात्म्याचे ठायी लीन होतो !