३-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. २९।४।९८ मंगळवार

.... प्रहरी ..... वाजले होते.  कॉलेजातून येत असता वाटेत .... चे वाड्याजवळ कृष्णाजी हरी पोटे यांची गाठ पडली.  क्वार्टर्सला जाणार होते.  त्यांची तेथे मुळीच ओळख नव्हती म्हणून संध्याकाळपर्यंत माझेच बिर्‍हाडी ठेऊन घेऊन क्वार्टर्समध्ये पोचविले.  शहर व कॉलेज त्यांनी कधीच पाहिले नसल्याने त्यांनी मला जे अनेक प्रश्न विचारिले त्याची भारी मौज वाटली.  कृष्णास पाठविण्यास त्याचा वडील भाऊ विष्णू आला होता.  कॉलेजातील काही ब्राह्मण विद्यार्थ्यांचे साहेबी थाटाचे केस पाहून विष्णूची कॉलेजातील नास्तिकपणाची खात्री होऊन चुकली.  येथे आलेल्या मुलांची शेंडी जबरीने काढितात काय असे त्याने गंभीरपणे विचारिले !  क्लब, मेंबर, जिमखाना वगैरे नवीन कल्पनांना त्यांच्या डोक्यात लवकर जागा होईनासे पाहून तर त्या मला तशाच खुपसण्याची मोठी मौज वाटू लागली.  पण मनातल्या मनात मी नवीन कॉलेजात येताना माझी स्थिती आठवीत होतो.
ता. ३०।४।९८ बुधवार

सावंताकडून कराचीहून पत्र आले.  त्याच्या मनाचा साधेपणा व शुद्धपणा पाहून फार बरे वाटते.  तो माझ्याशी मित्राचे नाते कबूल न करिता गुरु-शिष्याचे लावू पहात आहे, याचा साभिमान चमत्कार वाटला .....[मि]त्रत्वाची त्याची व्याख्या शुद्ध केली.  त्याचे बायकोस तिक[डे] पाठवण्यासंबंधी मी जी खटपट केली त्याचे तो वाजवीपेक्षा अधिक आभार मानीत आहे.  मला स्वतःला यात काही दगदग करून घेतली असे मला मुळीच वाटत नाही.

करमणूकीचे चालू अंकातले मायादेवीचे चित्र पाहिले.  सुंदर व लाडाने बहुतेक बिघडल्यासारखी दिसणार्‍या ह्या चिमुकलीचे चित्र माझे मनात फारच वात्सल्य उचंबळवीत आहे.  जसजसा तिच्या लाडाचा अतिरेक होत चालला आहे तसतशी तिच्या मोहकपणाची एकेक कला वाढत आहे.  आणि माझे मन वेधत आहे !  अहाहा !  रामदेवरावा, तुझा मला फार हेवा वाटत आहे.  करमणूककारा, तुझ्या पत्रातल्याहीपेक्षा मायादेवीचे चित्र माझे हृदयावर किती तरी सुरेख उठले आहे !  पुढील अंकी तू कृष्णदेवास मायादेवीचे पाणिग्रहण करायला लावणार हे आताच कळून चुकले आहे.  उष्णकाळी कुलीन वधूंनी नेसलेल्या पातळ वस्त्रातून त्यांची कोमलांगे (त्यांस) कळत न कळत अस्पष्ट दिसल्याने त्या जशा एकसमयावच्छेदेकरून समर्याद पण मनोज्ञ होतात तद्वतच कादंबरीकारांच्या गौप्यातच त्याचा परिस्फोट लीन असल्याने ते एकाच काळी कावेबाज१० व प्रसादमय होतात !