४-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता.३१ गुरुवार मार्च १८९८

मल्हार रामराव चिटणीसकृत थोरले शाहू महाराज यांचे चरित्र आता नुक्तेच वाचून संपले.  ह्या बखरीतील काही काही मुख्य गोष्टींचे शक चुकले आहेत.  पुष्कळ गोष्टी मागे पुढे लिहिल्या आहेत.  दाभाड्यांचे घराण्याची व पेशव्याची चुरस, पेशव्याचा व भोसल्याचा तंटा (नानासाहेब व रघोजी याचा), पेशवे व प्रतिनिधी यांचे वैमनस्य इत्यादी ऐतिहासिक महत्त्वाच्या वादग्रस्त बाबींचा करावा तितका खुलासा बखरकाराने केला नाही.  त्यावरून चिटणीसाजवळ बरेच कागदपत्र असूनही त्यांचा उपयोग त्यांनी किती केला असेल याची शंका वाटते.  सर्व प्रसंगी पेशव्यांची तरफदारी केलेली आढळते.  ज्या बाळाजीवर ग्रांट डफ आपमतलबीपणाचा व अराजनिष्ठतेचा आरोप करितो व ज्याने सखवारबाईस जुलमाने सती जाण्यास भाग पाडले असे डफ म्हणतो, व ज्या बाळाजीने शाहूचे मरणानंतर सातारा हा राजकीय तुरुंग व पुणे हीच महाराष्ट्राची राजधानी केली हे तर इतिहासप्रसिद्धच आहे, त्याच बाळाजीची एखाद्या कृतयुगातल्या सेवकास शोभतील अशी दोन बावनकशी राजनिष्ठतेची उदाहरणे बखरीत सांगितली आहेत. व त्याच उदाहरणावरून शाहूची हुकमत किती होती हे दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे.  पण ज्याचे विलासी कारकिर्दीत बहुतेक प्रधान व सरदार शिरजोर होत चालले होते, त्याचेच आज्ञेवरून सर्व गोष्टी होत होत्या असे मानण्यास आप [णास] फारच निराळा पुरावा पाहिजे.

शाहूची कारकीर्द म्हणजे मराठेशाईची (पेशवाईची [नव्हे]) भरभराट होय. शिवाजी महाराजांनी कमावले, संभाजीने गमावले, राजारामाने सावरले, शाहूने शहाण्या प्रधानाचे मदतीने वाढविले व उपभोगिले.  शककर्त्या महात्म्याचा कडवेपणा व शूरपणा संभाजीत उतरला; राजकीय धोरण, हिंमत राजारामात उतरली व अवशेष राहिलेला व्यक्तिविषयक चांगुलपणा तेवढा शाहूचे वाट्यास आला.  या राजश्रींनी मराठ्यास न शोभणारे गुण विलास व नेभळेपण व परावलंबिता इत्यादी मोगली झनान्यातून आणिले होते.  त्या योगाने मोठमोठ्या व्यक्तींनी त्याचे भोवती जमून त्याचे नावाचे आश्रयाखाली राज्याची मर्यादा दूरवर वाढविली तरी सर्वाकर्षक मध्यशक्तीचा कमजोरपणा याच वेळी त्यास दिसून चुकल्यामुळे ते डोयीजड होऊन परस्पराशी विरोध करू लागले.  व शाहूचे मरणानंतर तर मध्यशक्तीचा पूर्ण र्‍हास होऊन अगर तिचे रूपांतर होऊन ते स्वतंत्रपणे वागू लागले.  एथेच मर्‍हाटेशाई संपली !  नारायणरावाचे खुनानंतर पेशवाईचीही अगदी अशीच स्थिती होऊन सातार्‍याप्रमाणे पुण्यातही एक राजकीय तुरुंग होऊन शिंदेशाई व फडणीसशाई यामध्ये दंडेली चालली.  पुढे महादजीच्या व सवाई माधवरावाच्या मरणानंतर सर्व जगाच्या इतिहासास काळिमा आणणारी अनागोंदी सुरू झाली.  तिचा लय १८१८ त झाला !!  कोठे शिवाजीने केलेला महाराष्ट्रशाईचा उदय, कोठे बाजीने चालविलेल्या अनागोंदीचा अंत !!!  पण या राक्षसी भेदाची जबाबदारी एका शिवाजीवर नाही की एका बाजीवर नाही तर सर्व महाराष्ट्रियांवर आहे- एवढे तरी पक्के समजल्यास पुष्कळ झाले.  नाही तर बाजीस शिव्यांची लाखोली व शिवाजीचे महोत्सव यातच आम्ही दमून जाणार !११

संध्याकाळी मी बुधवारातून जात असता टार्गेपणाचा एक मासला कोतवाल चावडीजवळ पाहिला.  आज बरेच एक रामदासीबोवा बरोबर एका तरुण शिष्यास घेऊन रामदासी पृथ्वीच्छंदी श्लोक ठेक्यात म्हणत जातात.  ते ऐकून माझेही मनात बरेच वेळा भक्तीरस उमटला आहे.  कोतवाल चावडीजवळचे एका दुकानातून सुमारे १०।१२ आगदी सभ्य दिसणारी मंडळी चकाट्या पिटत बसली असता जवळून बोवा चालले.  त्यांचे तोंडून काही अशुद्ध वाणी निघाली असे म्हणून ही रिकाम टेकडी चौकडी 'अहो बोवा बोवा' अशा हाका मारू लागली.  ते तसेच चालले.  तेव्हा त्यातले एक मणीच होते.  त्यांनी वर बोवास जाऊन आडवलेच.  आपण कोण असे दरडावून विचारता बोवांनी ''गौड ब्राह्मण'' असे सांगितले.  नगररस्त्यातून ब्राह्मणाकडून पाया का पडून घेता असे मोठ्या उर्मठपणे विचारले.  बोवांनी 'माझ्या पाया पडत नाहीत, समर्थाच्या नावास पडतात, या वेषास पडतात.  शिवाय मी पडा म्हणत नाही' वगैरे शांतपणे सांगितले.  तरी ह्या पाजीने जमलेल्या मंडळीत पाच दहा मिनिटे अतीच टर उडविली.  ह्या पाजीचे केस पिकले होते.  व पोषाक उच्च वर्गातल्या फार सभ्य चालीचा होता.  पण ह्या जात्यभिमान्याला वानप्रस्थाश्रमी गौड ब्राह्मणाच्या पायी दक्षिणी ब्राह्मण पडलेले खपले नाही, म्हणून त्याने भर रस्त्यात एकाद्या झाडूलाही न शोभण्यासारखा अश्लीलपणा केला.  कोण हा जातिमत्सर !  कसा हा नाहीसा होणार !!  पण कित्येकांचे देशहित यातच साठले आहे ना !!!