१९-फर्ग्युसनमधील रोजनिशी
ता. २३ एप्रिल १८९९
कोल्हापुराहून पन्हाळ्याला यावयाचे झाले तर पावनगडाला वळसा घालून यावे लागते. कोल्हापूरचे वायव्येस पन्हाळा बरोबर १२ मैल आहे. ७व्या मैलापासून हळूहळू चढण सुरू होते. सिंहगडप्रमाणे ह्याची उंची एकदम सुरू नसल्याने ह्याच्या माथ्यावर उभे असता उंचीचा देखावा तितका चांगला दिसत नाही. तरीपण जागोजागी ह्याच्या तटाची उंची बरीच आहे. माथ्याचे क्षेत्रफळ सिंहगडच्या दुपटीने येईल. पण सिंहगडची उंची ह्याच्यापेक्षा सवाईने, कदाचित दिढीने जास्त येईल. सभोवतालच्या टेकड्यांच्या उंच मैदानावर गडाची दुसरी उंची उसल्याने चौकोनी चौथ-यावर बांधलेल्या अंतर्गोल अर्धवर्तुलाकार मनो-याप्रमाणे गडाची शोभा दिसते. पावनगडचे वायव्य टोक व पन्हाळगडचे ईशान्य टोक ह्यामधील दोन्ही गडाच्या तटाचे हे वरील अंतर्गोल बरोबर अर्ध वर्तुळ बनले आहे. पन्हाळ व पावन गड या दरम्यानच्या पावन खिंडीमुळे ह्या अर्धवर्तुळाचा थोडासा भंग झाला आहे. येथे आल्यापासून माझी दिशा-भूल झाली असल्यामुळे मी सर्व दिशा सूर्याचे गतीवरून अनुमानाने ठरविल्या आहेत. गडाच्या भोवती पायथ्याशी ७ वाराच्या ७ पेठा (लहान वाड्या) आहेत. मुख्य दरवाज्याजवळ आले असता ह्या अर्धवर्तुलाच्या मधोमध येतो. ह्या वर्तुलाच्या एका टोकावर एजन्सी बंगला अगदी ठेवल्यासारखा दिसतो. दुस-या शेवटास पावनगडचे टोक दिसते. ह्या देखाव्याने मन चांगले वेधते. मुख्य दरवाज्यास चार दरवाजा असे म्हणतात. हल्ली हा सर्व पडला आहे. केवळ पायावरूनच रचना समजते. तो ओलांडण्यापूर्वीच साधूबोवांचा सुंदर दर्गा दिसतो. पुढे लहानसे तळे आहे. ह्या अवलियाचे प्रसादाने गडावर साप वगैरे चावला तर उतरतो असा समज आहे. तसेच गडावर पटकी वगैरे साथी कधीच होत नाही(त) असे म्हणतात. उत्तरेकडे वर चढल्यास सरकारी इस्पतळ, पोष्ट ऑफीस लागते. पुढे धर्मकोटी संभाजी महाराजाचे देऊळ, लायब्ररी, सरकारी कचे-यांची वगैरे इमारती लागतात. पन्हाळा हे पेठ्याचे गाव आहे. म्हणून मुख्य अधिकारी मामलेदार आहेत. पन्हाळा हे पन्नंगालय ह्याचा अपभ्रंश असे सांगतात. ह्यावरून येथे पूर्वी साप फार होते असे दिसते. पण आता कोठे दिसत नाही.
आम्ही तटावर फिरत फिरत गडाला एक प्रदक्षिणा तीन दिवसात केली. डोंगरी किल्ल्याचा तट म्हणजे तुटलेले कडे तसेच भिंत बांधून उंच केलेला असतो. तटाची आतील सपाटीवरची उंची बहुतेक जागी पडली आहे. हे मोरचेबंदी व मा-यासाठी केलेली बंदुकीची व तोफांची भोके कोठेच दिसली नाहीत ह्यावरून दिसते. तटाखाली जागोजागी मोठ्या ८।१० तोफा गंजत पडल्या होत्या. मा-याच्या बाजूस व दरवाज्यापुढे तट दुतर्फी आहे. चार दरवाजा, तीन दरवाजा, वाघ दरवाजा व राज दिंडी असे चार गडाला पूर्वीचे दरवाजे आहेत. तट पडल्यामुळे आता आणखी दोनतीन वाटा जास्त झाल्या आहेत. चार दरवाजा हल्ली जमीन दोस्त आहे. तीन दरवाजा शाबुद व पाहण्यालायख आहे. वास्तविक पाहता ह्या रचनेत दोनच दरवाजे एकमेकाशी तिरकस बांधले आहेत. दोहोमध्ये एक कमानीदार चौक साधला आहे. वर उंच गच्ची आहे. तीवरून अस्तमानाचे वेळी खाली दरीत झाडी, खेडी कडे वगैरे अवलोकण्याचे मोठे सुख वाटते. अगदी बाहेरच्या दाराच्या शिरोभागी एक मुसलमानी लेख आहे आणि आतल्या दरवाज्यावर गणपती कोरला आहे. म्हणून हा दरवाजा मुसलमानांनी बांधला की मराठ्यांनी मागाहून गणपती कोरला की भोजराजा म्हणून मुसलमानाचे पूर्वी इकडे एक राजा झाला असे म्हणतात त्याने केला असे नाना संशय येतात. जवळच तीन दरवाजाची बाग आहे. तीत वेलदोडे, मिरी, महाळुंगे वगैरेची लागवड होते. हीत गोपाळतीर्थ नावाचे एक सांबाचे देऊळ, विहीर व हौद आहेत. ही बाग गाइकवाड नामक कोल्हापूरच्या सरदाराकडे आहे. ह्या घराण्यातल्या दोन दोन पुरुषांची येथे एक च्छत्री आहे. लढाईत यांचे पाठीशी शत्रू लागला असता लढत लढत यांनी येथेच गडावर प्राण सोडला असे सांगतात. शिद्दी जोहार याने गडाला वेढा दिला असता शिवाजी राजदिंडीने उतरून गेला असे सांगतात. वाघ दरवाजाकडे वाघ येत असत. हा अगदी कोप-यात आहे. हल्ली काही पडला आहे. ह्याचे खाली तबक बाग म्हणून एक केली. हीत आम्हांस रोजबेरीचे युरोपीय झाड पाहण्यास मिळाले. आमच्याकडे पावसाळ्यात विपुल फुलणा-या झुपकेदार तांबड्या पिवळ्या फुलांची कुपणाला उगवणारी झाडे असतात त्याचप्रमाणे हे झाड, पाने व देठ असतात. पानाचा रंग हिरवा अस्मानी असून पाने फार मऊ व कोमल असतात. त्याची फळे अद्यापी चांगली पिकली नव्हती. रंग पिवळसर तांबुस होता. ती आंबट मधुर असतात. करवंदाएवढी होती. खरबुडी होती. पश्चिम बाजूकडे अंबरखाना म्हणजे धान्याची मोठ-मोठ्या कोठाराची जागा आहे. तीन मोठ्या गल्लेकोठ्यांच्या कमानदार इमारती आहेत. त्यापैकी मोठीत तीन दालने असून (ती कोठी) उंच व भक्कम आहे. धान्य वरून ओतण्यास खिंडारे आहेत. येथे तिस-या मजल्यावर हेलीयॉग्रफीची म्हणजे आरशातून सूर्यकिरणांनी बातमी पोचविण्याची जागा आहे. एथून किरणे सोडीली असता ती नेमकी पावन खिंडीतून कोल्हापूरच्या कँपमध्ये पडतात. जवळच अंधारबाव म्हणून एक इमारत आहे. ही तीन मजली असून खालच्या मजला विहीर आहे. हीच पाठभिंतच तटाचा एक बुरूज आहे. हिच्या गच्चीवरून पाहिले असता तीन दरवाजातून खाली जाणा-या सडकेच्या वळणांचा देखावा रम्य दिसतो. पूर्व बाजूस पाराशराची म्हणून एक गुहा आहे. ही सुमारे १५ यार्ड आत फिरता येण्यासारखी आहे. पण पुढे चोर वाट लागते. ती हल्ली बंद आहे. जवळच तटाखाली रेडे बाग आहे... पावन खिंड आहे. हीतच बाजी देशपांड्याने (शिद्दी) जोहारास आडविले व शिवाजीची रांगण्यास (रवानगी केली.) गडावर स्वच्छ व गोड पाणी पुरेसे आहे.. त्यामुळे धुण्याची... आहे... गोड लाग.....ळ जाते व चांगले पचते. दोन प्रहरी पारा ८० पर्यंत असतो. गडावर पुष्कळ झाडे व बागा आहेत. तटाभोवती तर झाडाची गर्दी आहे. नाना प्रकारच्या वेलींनी तटाला चोहीकडून अगदी कवटाळे आहे ! तटाचे पायथ्याशी मोठमोठ्या काळ्याठिक्कर फत्तरांचे ढीगांचे ढीग पसरले आहेत. त्यास हार्द ही घाटी संज्ञा आहे. ह्यातूनच वाघ असतात. संध्याकाळी हांडा बुरुजावरून खालचा खोल देखावा पाहत असता खाली रानातून अकस्मात १०।१५ लांडग्यांची एक बुभुक्षित टोळी दृष्टीस पडली. जनाक्कास फार मौज वाटली ! एकंदरीत सिंव्हगडपेयेथे देखाव्यांची मोठी बहार आहे. साधारण गृहस्थास थोडक्या खर्चात इथे उन्हाळा काढता येतो. राहण्यास देवळे व जुन्या इमारती ब-याच आहेत. पेठा असल्याने डोंगरात देखील नागरिक सोयी आहेत. गडाची उंची २७०० फूट आहे असे म्हणतात.