२-फर्ग्युसनमधील रोजनिशी
२७ मार्च ९८
चिंतामणीस३ भेटावयास स्टेशनवर जायचे म्हणून पहाटे ३ वाजताच उठलो. पण वेळ कळेना. स्टेशनापर्यंत वाटेने म्युनिसिपालिटीचा एकही कंदील दिसला नाही. रे मार्केटात घड्याळ पहाण्यास गेलो तर तेथेही उजेड नव्हता. म्युनिसिपालिटीची दरिद्रावस्था पाहून वाईट वाटले. चिंतामणी तर त्या गाडीने आलाच नाही. तसाच डेक्कन कॉलेजात गेलो. संध्याकाळी बंडगार्डन्समध्ये सास्न्यांशी४ चिंतामणीसंबंधी [ बोलणे ] झाले. आमच्या भावी मंडळीविषयीही [बातचीत झाली]. सास्ने यांचा काय तो निश्चय ठरणार हो [ता]. [त्या] विषयी त्यास विचारण्यास विसरलो. त्यांनीही सांगितले नाही !! काय विसराळूपणा व हलगर्जीपणा !
ता २८ मार्च ९८ सोमवार
'काळ' चा५ पहिला अंक वाचला. मुख्य लेखात व्यवहार अगर तात्त्विकतेपेक्षा कवित्व अधिक दिसले. 'काळ' शब्दाची व्युत्पत्ती चांगली केली आहे. तिजवरून 'काळ' च्या ऐवजी 'काल' असे म्हटले असते तर अधिक अनुरूप व अर्थबोधक झाले असते. कारण 'काळ' या महाराष्ट्र रूपात दुष्ट प्रसंग, संहारक, यम इ. अर्थ येतात. कदाचित संपादकास देशी भाषेचा फार अभिमान वाटून काल हे संस्कृतरूपही खपले नसेल. निघालेल्या अंकावरून लोकपक्षाला ही नवीनच भर झाली म्हणावयाची. पण हे निराळेच पत्र न काढता केसरी पत्रच आठवड्यातून २ दा अगर ३ दा काढले असते तर फार बरे झाले असते. केसरीने आतापर्यंत प्रत्याहिक झाले पाहिजे होते. पण एकाचे दोनही त्यास अद्यापी का होता येत नाही व ज्ञानप्र [काश] .... झाले हे कळत नाही.
आज आमच्या वाड्याच्या मालकाची६ (कंत्राटदाराची) गृहस्थिती अवचित समजली. मी आजपर्यंत हे कुटुंब फार कुलीन व सुशील मराठ्यांचे असेल असे समजत होतो. व पुढे जनाबाईची चांगली सोय जमेल अशी फार आशा झाली. आल्यापासून आम्ही दोघांनी सर्व कुटुंबाच्या माणसास फारच लावून घेऊन राहण्याचा यत्न केला. पण लवकरच ही माणसे फारशी माणसाळण्यासारखी दिसली नाहीत. म्हणून हळुहळू निराशा होऊ लागली. मालकास 'काका', मालकिणीस 'काकू', मुलीस (जनाबाईच्या सोबतीणीस) 'ताई' अशा नावांनी आम्ही हाका मारितो. बर्याच वेळा यांच्या वर्तनावरून आपण श्रीमंत आहो ही गोष्ट त्यांच्या ध्यानात वाजवीपेक्षा जास्त ठसली आहे असे दिसून आले. तेव्हा जनाक्काला राग येई. काल काकांच्या भावांच्या घरी हळदीकुंकवाला काकू व ताई निघाल्या तेव्हा जनाबाईसही बोलावले. हळदीकुंकवास नको म्हणू नये [म्हणून] ती गेली. घर जवळ आल्याबरोबर काकूने ताईस आपल्या मुलाला जनाक्काजवळ देण्यास सांगितले. पोकळ डौल मानी जनाक्कास न खपून मुलास घेण्याचे साफ नाकारिले. त्या मोठ्या घरी गेल्यावर तेथल्या कोणी नबाबिणीने जनाक्काचा आगदी साधा पोषाक पाहून ही तुमची मोलकरीण काय असे काकूस विचारिले ! ताई हासली !! श्रीमंती सरळपणाचा प्रश्न ऐकून आपल्या मैत्रीणीचे बाष्कळ हसे पाहून बिचार्या जनाक्कास किती वाईट वाटले !!! पुढे काकूने ज्या बायकांशी भावजईचे, जावेचे, मुलीचे नाते जुळवले त्यांचा पोषाक व भाषा जनाक्का [स] निराळी दिसली तेव्हा तीस शंका आली. आज शेजारच्या एका बाईकडून असा चमत्कारिक खुलासा झाला की, काकाची जात कुंभार, काकू कुणब्याची. पूर्वी मोलमजूरी करून होती ती आपल्या नवर्यास सोडून काकाजवळ राहू लागली. ताईचे लग्न न्हाण आल्यावर झाले व तिला मराठी ६व्या इयत्तेपर्यंत शिक्षण मिळाले याचे कारण आम्ही इतके दिवस सुधारकपणा असेल असे समजत होतो. पण असे नसून केवळ आवश्यकता हेच असे कळले ! हे ऐकून आम्ही खजील झालो. चांगुलपणा जातीवर अगर केवळ समाजासच वाईट दिसणार्या काही गोष्टी केल्या म्हणून त्यावर अवलंबून नसतो असे समजून घेतले. तरीपण मनमिळाऊपणा, आगत्य, प्रेम वगैरे[चा] आभाव दिसल्याने जनाक्काची कायमची सोय कशी होईल ? ही काळजी राहीलीच.