रोजनिशी प्रस्तावना२
अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनातील एक परिवर्तन लक्षात घेऊ. ते मिशनच्या कामाचा व्याप झपाट्याने वाढवीत असतानाच मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद त्यांना १९१० मध्ये सोडावे लागले. असे का घडले ? प्रार्थनासमाज सामान्यतः सामाजिक सुधारणेला अनुकूल असला तरी त्याचे कार्य मुख्यतः धर्मविचारापुरते मर्यादित होते. पारंपरिक धर्मविधीच्या ऐवजी प्रार्थनासमाजाच्या पद्धतीनुसार धर्मविधी करणे, पुनर्विवाहासारख्या अथवा स्त्रीशिक्षणासारख्या मवाळ पांढरपेशा सुधारणा करणे यांत प्रार्थनासमाजाच्या धुरीणांना समाधान होते. अण्णासाहेबांसारख्या प्रार्थनासमाजाच्या प्रचारकाने अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला धडाडीने प्रारंभ करून त्यात बराचसा वेळ घालवावा व या कामाचा व्याप वाढवावा, त्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे हे मुंबई प्रार्थनासमाजाला फारसे रुचण्यासारखे नव्हते. येथेच प्रार्थनासमाजाचे धुरीण व महर्षी शिंदे यांच्या दृष्टिकोनातील तफावत जाणवते. समाजाची अपेक्षा अशी होती, की आपल्या प्रचारकाने धर्मप्रसाराच्या कामालाच बहुतेक वेळ द्यावा. तर अण्णासाहेबांच्या दृष्टीने अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे धर्मकार्यच होते. आपण धर्मकार्य करीत आहोत या श्रद्धेने व निष्ठेने त्यांनी अस्पृश्य मानलेल्यांच्या कामाला प्रारंभ केला होता.
`अण्णासाहेबांनी चालविलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य त्यांच्या अंतःकरणातील धार्मिक वृत्तीतूनच निर्माण झाले होते. धर्मभावना हा मूळ पाया आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य ही त्यावर उभारलेली इमारत होय` असे यथार्थ आकलन डॉ. वि. भि. कोलते दाखवितात.१ केवळ अस्पृश्यतानिवारणाचेच नव्हे तर अन्य सर्व सुधारणांची कामे त्यांनी धर्मबुद्धीनेच केल्याचे दिसते. त्यांच्या मनाचा पिंडच आध्यात्मिक होता. त्यांच्या लौकिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एकमेळ कसा झाला हे समजण्यासाठी त्यांची धर्मकल्पना स्पष्ट करून घेऊ व त्यांच्या मनाची घडण कशी झाली हे पाहू.
फर्ग्युसनमधील रोजनिशीतील दोन नोंदी वरील संदर्भात महत्त्वाच्या आहेत.
१. वि.भि. कोलते, `प्रस्तावना`, विठ्ठल रामजी शिंदे, `माझ्या आठवणी व अनुभव`, पुनर्मुद्रण, पुणे, श्री लेखन वाचन भांडार, १९५८, पृ. ४. या काळात त्यांच्या मनाने प्रार्थना समाजाची दीक्षा घेण्याचा निश्चय केला होता (प्रस्तुत रोजनशि, पृ. ३९), आणि याच काळात आपण महारमांग ह्या अति नीच मानल्या गेलेल्या लोकांसाठी काही एक करावयास पाहिजे अशी तळमळही त्यांना लागून राहिली होती (पृ.२८). या दोन्ही गोष्टी त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा आविष्कार करणा-या आहेत. धर्मकार्य आणि अस्पृश्य वर्गाची सुधारणा करण्याचे कार्य या दोन बाबी त्यांच्या दृष्टीने वेगळ्या नव्हत्याच. एवढेच नव्हे तर लौकिक व्यवहार करण्याच्या पाठीमागे जर उन्नत भावना असेल तर अशी भावना आणि धर्मभावना यांतही ते फरक करीत नव्हते. आपली ही धर्मकल्पना त्यांनी येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशीत विशद केली आहे व तिचाच पुनरुच्चार आपल्या `आठवणी व अनुभव` ह्या पुस्तकात केला आहे. ते लिहितात, "लहानपणी मुलांची खेळाची आवड, तरुणपणी तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणी एखाद्या ऐहिक बाबतीतल सात्त्विक चिंतामग्नता ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वतः अगदी भिन्नच आहे असे म्हणता येणार नाही. ह्या भावनांत जी वयपरत्वे अंतःकरणाची परिणती होत जाते तीच किंचित आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली, की तिला आम्ही भक्ती हे नाव देतो. ज्या सहज आनंदाने मूल खेळते, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेने व्याकुळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तीत आहे, हे माझे मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस यांना मी एकाच माळेत गोवतो." रसिकता, भक्ती आणि प्रेम ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने एकरूप आहेत. ते म्हणतात – "माझ्या जीवनात सहज रसिकता ऊर्फ प्रेम ऊर्फ भक्ती ऊर्फ Love - कोणी काही म्हणोत, कोणी निंदोत, कोणी वानोत - प्रत्यक्ष ईश्वरही कृपा करो न करो - माझे प्रेमच मला खरे आणि म्हणूनच मला ते पुरे." (रोजनिशी, पृ. १८५). त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे व ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरूप सांगताना ते म्हणतात,`प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे; प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे,` समाजसेवेलाही या प्रेमाचेच अधिष्ठान असल्याचे ते
१. वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, उनि.,पृ.७७. सांगतात.१ त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. द्वा.गो. वैद्यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या `संसार आणि धर्मसाधन` या नावाला आक्षेप घेताना ते म्हणतात, "धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजेच धर्मसाधन काय ? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषतः प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिकच म्हणता येणार नाही काय? असे जर आहे - तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते."२
राजा राममोहन राय यांच्याबद्दल म. शिंदे यांच्या मनात अतीव आदर होता. त्यांच्या धर्मनिष्ठेचे स्वरूप सांगताना ते म्हणतात, "त्याचा धर्म म्हणजे केवळ एक मत किंवा मनोवृत्ती नसे तर साक्षात् जीवन होता, व ते जीवनही सर्व बाजूचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली."३ म. शिंदे यांची धर्मकल्पना अशीच सर्व बाजूची, सारे जीवन व्यापून टाकणारी होती. जीवनाची सारी अंगे उंचावू पाहणारी त्यांची जीवनदृष्टी व जीवनकार्य ही धर्मरूपच होती.
त्यांची ही धर्मभावना लक्षात घेतल्यावर त्यांच्या जीवितकार्याचे आकलन अधिक सुलभ होते. लहानपणीच भागवतधर्माचे उदार संस्कार त्यांच्या मनावर झालेले होते. म्हणून मूर्तिपूजा हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे असे सांगणारा, अवतारवाद आणि ग्रंथप्रामाण्य मान्य नसणारा व सर्व मनुष्ये एका परमेश्वराची -