रोजनिशी प्रस्तावना५

वर उल्लेखिलेल्या अनेकविध वैशिष्ट्यांचा एकमेळ होऊन अण्णासाहेबांच्या मनाची आध्यात्मिक घडण घडली होती हे लक्षात घेतले नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन यथार्थपणे होऊ शकत नाही. एरव्ही अण्णासाहेबांच्या कार्याचे महत्त्व नीट ओळखणा-या श्री. धनंजयराव गाडगिळांचीही या बाबतीत फसगत झाल्यासारखी दिसते. ते म्हणतात, "आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रचलित विचार अगर कार्यप्रवाहात कर्मवीर शिंदे पूर्णपणे समरस झालेले दिसत नाहीत."२  म. शिंद्यांच्या जीवनकार्यावर नुसती नजर टाकली तर काय दिसते ? १९०३ मध्ये त्यांनी ब्राह्मधर्मप्रचारक म्हणून जीवितकार्याला प्रारंभ केला. १९०६ मध्ये भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची) स्थापना केली. १९१० मध्ये मुंबई प्रार्थनासमाजाशी प्रचारक या नात्याने असलेला संबंध सोडला. १९१२ मध्ये मिशनचे ठाणे मुंबईहून पुण्यास हालविले, व मिशनच्या कामाचा झपाट्याने भारतभर प्रसार केला. १९२० मध्ये बहुजनपक्ष स्थापन करून मुंबई कायदेकौन्सिच्या निवडणुकीत भाग घेतला. १९२३ मध्ये मिशनचा प्रमुख चालक म्हणून असलेला संबंध सोडला व संस्था अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केली. पुढील दोन वर्षे मंगलोरला ब्राह्म समाजाचे आचार्यपद सांभाळले. १९२६ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली. महात्मा गांधींनी प्रवर्तित केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत १९३० मध्ये भाग घेऊन खेडोपाडी दौरे काढले, शेतक-यात जागृती करण्याचा प्रयत्न केला, व प्रत्यक्ष कायदेभंग करून कारावास पत्करला. त्यानंतरच्या काळात `भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न` हा ह्या विषयावरील पहिलाच असा संशोधनपर प्रबंध तयार केला. अण्णासाहेबांच्या जीवनातील या मुख्य मुख्य घटनांकडे व वळणांकडे वरवरच्या दृष्टीने पाहिले तर अशी फसगत झाल्यावाचून राहात नाही.
खरी गोष्ट अशी आहे, की महर्षी शिंदे यांचा मनःपिंड आणि त्यांनी केलेले कार्य यांमध्ये कमालीचा सुसंवाद आहे. त्यांच्या मनाची घडण हीच मुळी अध्यात्मनिष्ठ असल्याने त्यांच्या मनात अध्यात्म, समाजकारण, राजकारण असे वेगवेगळे कप्पे नव्हतेच. त्यांचे सामाजिक, राजकीय स्वरूपाचे वाटणारे कार्य हासुद्धा त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीचाच आविष्कार आहे. त्यांचे चिंतन, व्यासंग आणि विविध क्षेत्रांतील भासणारे कार्य ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणेच आयुष्यभर चाललेल्या होत्या. त्यांच्या जिव्हाळ्याचे, चिंतनाचे विषय त्यांच्या आयुष्यात कधी मनावेगळे झाले नाहीत. १८९८ मध्ये पुण्याला विद्यार्थी असताना त्यांना प्रार्थनासमाजासारख्या उदारधर्माची जशी ओढ लागली होती तशीच आपण म्हार, मांग या दलित लोकांसाठी काहीएक करावे ही तलमळ लागून राहिली होती; धर्मप्रवृत्ती प्रबळ होऊन केवळ धर्माला वाहिलेले वृत्तपत्र काढावे असे त्यांना वाटत होते, तसेच त्यांच्या अंतःकरणातील हळुवार प्रेमवृत्ती आणि रसिकताही प्रकट होत होती आणि त्याचवेळी सामाजिक जीवनातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील तोकडेपणा आणि विसंवाद त्यांना खुपत होता. इंग्लंडला धर्मशिक्षण घेताना ते व्यासंगपूर्ण निबंध लिहीत होते तसेच शेतावर जाऊन जिव्हाळ्याने शेतमजुरांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती घेत होते, दीनदुबळ्यांची सेवा करणा-या संस्थांचे निरीक्षण करीत होते, तर कधी इंग्लंडमधल्या सरोवर प्रांतीच्या अलौकिक निसर्गसौंदर्याने देहभान हरपून श्रेष्ठ दर्जाचा आध्यात्मिक अनुभव घेत होते. भारतात परतल्यावर ब्राह्मधर्माचा प्रचार करीत होते आणि अस्पृश्यांची स्थिती सुधारण्यासाठी मिशनरी वृत्तीने समरसून काम करीत होते, व त्यांच्या स्थितीबाबत अभ्यासपूर्ण निबंध लिहीत होते. पुण्यात मिशनचे काम करीत असतानाच निवडणुकीला उभे राहिले होते, आणि मिशनमधून बाहेर पडल्यावरही अस्पृश्यांच्या हिताच्या ध्यासाने महात्मा गांधींशी भांडण विकत घेत होते. राजकीय हेतूने कायदेभंग करून ते तुरुंगात गेले, पण तेथेही ते कॅथॉलिक उपासनांना हजर राहात होते, तौलनिक भाषाशास्त्रावर व्याख्यान देत होते आणि खिडकीतल्या साळुंकीच्या जोडप्याशी काव्यमय हितगुज करीत होते. म्हणूनच त्यांच्या एकसंघ अशा आध्यात्मिक मनःपिंडाचा आविष्कार त्यांच्या विविध भासणा-या कार्यांतून आयुष्यभर होत होता असे म्हणणे अधिक युक्त वाटते. अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे आकलन केले तर त्यांच्या रोजनिशीचे स्वरूप आपल्याला अधिक यथार्थपणे समजू शकेल.

--------------------------------------------------------------------------------

(१. कित्ता, पृ. ४५-४६.
२. धनंजय गाडगीळ, `पुरस्कार`, वि.रा. शिंदे, शिंदे लेखसंग्रह, उनि., पृ.७.)

-------------------------------------------------------------------------------
अण्णासाहेब शिंदे यांनी आयुष्याच्या तीन वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेली रोजनिशी येथे एकत्रित केलेली आहे. बाह्य परिस्थितीचा परिणाम होऊन व त्यांच्या मनात विचारभावनांची जी आंदोलने निर्माण होत त्यांचे प्रकटीकरण त्यांनी आपल्या रोजनिशीत केलेले आहे. ह्या तीनही कालखंडात म. शिंदे ह्यांची मनःस्थिती वैशिष्ट्यपूर्ण असल्याने व बाह्य परिस्थितीही बदलणारी असल्याने प्रत्येक कालखंडातील रोजनिशीला काही एक वेगळेपण प्राप्त झाले आहे. असे असले तरी अण्णासाहेबांच्या अखंड व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार तीमधून झाल्याने काही समान वैशिष्ट्यांचा आढळ ह्या तीनही कालखंडातील रोजनिशीत पहावयास मिळतो. पुनरुक्तीचा दोष पत्करून म्हणावे लागते, की तीमधून त्यांच्या आध्यात्मिक मनःपिंडाचा, विचारांना असलेल्या व्यापक, मानवतावादी बैठकीचा व सर्वांगीण सुधारणेच्या तळमळीचा प्रत्यय आपणांस येतो. त्यांचे मन व्यापक अर्थाने सौंदर्यसक्त आहे. निसर्गाकडे ते स्वाभाविकपणे आकृष्ट होते. मनुष्य स्वभावात जिथे जिथे त्यांना उच्च नैतिक दर्जा आढळतो तेथेही ते नैतिक सौंदर्याकडे आकृष्ट होतात. त्यांच्या ठायी स्वाभाविक रसिकता आणि तरल संवेदनशीलता आहे. मात्र बाह्य भपक्याला भुलणारा त्यांचा स्वभाव नाही. त्यांची दृष्टी सदैव गाभ्यावर असते. म्हणून ते स्वाभाविकपणे बाह्य कवच भेदून अंतरंगाचे सौंदर्य, चांगुलपणा, नैतिकता पाहतात. व्यक्ती असो, वस्तू असो की परिस्थिती असो तिचे आकलन ते अंतर्भेदी दृष्टीने करतात. मात्र त्यांचे अंतःकरण भावनामय असल्याने त्यांच्या प्रतिक्रियांना कुठे कोरडेपणा येत नाही.