रोजनिशी प्रस्तावना४

कानडी आणि मराठी अशा दोन्ही संस्कृतीची वैशिष्ट्ये जमखंडीच्या वातावरणातच नव्हे तर त्यांच्या घरातही त्यांना पाहावयास मिळत होती. अण्णासाहेब वर्णन करतात, की त्यांच्या आजोबात मराठ्यांची तर आजीत कर्नाटक्यांची लक्षणे भरपूर होती. आजोबा नागरिक, दरबारी व गुलहौशी तर आजी खेडवळ, राकट व कुणबाऊ, यल्लम्मा या द्रविड देवतेला मानणारी. त्यांचे वडील लिहायला, हिशोब ठेवायला शिकलेले. संस्थानात त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. प्राकृत पोथ्यांचा व्यासंग चांगला. वळण ब्राह्मणी राहाटीचे. सर्व जातीतील संभावित माणसांचा स्नेह असायचा. त्यांची वृत्ती धार्मिक होती. पंढपूरच्या वारकरी संप्रदायाकडे ते आकृष्ट झाले, व वा-या करू लागले. आपल्या वडिलांच्या भागवतधर्मातून आपली भावी सामाजिक सुधारणा उदय पावली असे स्वतः अण्णासाहेब विश्लेषण करतात.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे ।।
या अभंगाचा ठसा आपल्या बाबांनी व आईने शुद्ध व प्रेमळ आचरणाने आपल्या ग्रहणशील मनावर उठविल्याचे अण्णासाहेब सांगतात. या संस्कारात ब्राह्मसमाजाने काही भर घातली असे त्यांना वाटत नाही. आपण ब्राह्मसमाजात गेल्याने सुधारक झालो असे नाही, तर सुधारक होतो म्हणून ब्राह्मसमाजात गेलो असे ते सांगतात. त्यांच्या घरी पडदा नव्हता की जातिभेद पाळला जात नव्हता. जातिभेदाचा संस्कारच मनावर झाला नसल्याने आधुनिक सुधारकाप्रमाणे जातिभेद मोडण्याचा खटाटोप करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मराठ्यांच्या घरी सामान्यतः न जेवणारी ब्राह्मणलिंगायत मंडळी त्यांच्या विश्वकुटुंबी घरी जेवत. न्हावी, धोबी, मुसलमान यांच्याशी कधी त्यांच्या घरात पंक्तिभेद केला जात नसे. घरात साहजिकपणेच सामाजिक सुधारणेची तत्त्वे पाळली जात. त्याचे रहस्य समता आणि स्वतंत्रता, उदारता आणि स्वाभिमान यांच्या समतोलात होते. पोकळ डौल सोडून अंतःकरणपूर्वक प्रेमाने जे वागत त्यांच्याशीच हा समतेच्या पातळीवरून प्रेमपूर्वक व्यवहार व्हायचा.१
अण्णासाहेबांच्या मनाच्या विकासात त्यांच्या आईलाही महत्त्वाचे स्थान आहे. आजारपणा, दारिद्र्याच्या वेदना सहन करूनही तिच्या मनाची शांती, रसिकता, आनंदी वृत्ती कमी झाली नाही. अण्णासाहेबांच्या धार्मिकसामाजिक विचारात आणि कार्यात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान मिळालेले दिसते. स्त्रियांबद्दलच्या दाक्षिण्यभावाचा उगम त्यांच्या मातृप्रेमात असावा. निसर्गाच्याही आधी आपण पहिले हृदयदान दिले ते आईलाच, असे ते म्हणतात.२
जमखंडी गाव तीन डोंगरांच्या कुशीत वसलेला. अण्णासाहेबांचे वडील पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसांत घरातील सर्वांना घेऊन एखाद्या रम्य डोंगरावर वनभोजनाला जात. अण्णासाहेबांच्या ठिकाणी जे निसर्गप्रेम निर्माण झाले त्याचे मूळ त्यांच्या वडिलांच्या ह्या आवडीत होते.
त्यांच्या हायस्कूलच्या काळात इंग्रजी आणि संस्कृत साहित्याचा त्यांना परिचय झाला. मराठीवर अकृत्रिम प्रेम जडण्यास शाळेपेक्षा घरीच साधने अधिक होती. श्रीधर, महिपती, तुकाराम, ज्ञानेश्वर, यांच्या ग्रंथांची पारायणे वडील करीत असत. इंग्रजी चौथी पाचवीत गेल्यावर ते रामविजय-हरिविजय या पोथ्यांचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत. अभ्यासाच्या सर्वच विषयात त्याची चांगली गती होती. याचे श्रेय ते आपल्या बुद्धीपेक्षा रसिकतेलाच देतात. आणि ही रसिकता त्यांनी शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा आईवडिलांकडून मिळविली, असे सांगतात.
अण्णासाहेबांच्या ज्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या कार्यातून आणि विचारातून झालेला आढळतो त्याची घडण अशाप्रकारे त्यांच्या बालपणीच झाली. घरातील ह्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या ग्रहणशील मनावर होऊन त्यांची बैठक अध्यात्मप्रवण बनली. मनाला उदारपणा, व्यापकपणा आला. संमिश्र संस्कृतीत वाढल्याने भेद जाणवण्याऐवजी ऐक्यभावनाच जोपासली गेली. मन भावनाप्रवण बनले. वृत्ती सौंदर्यौन्मुख झाली.

------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. वि.रा. शिंदे, `माझ्या आठवणी व अनुभव` उनि., पृ. ८१-८५.  
२. कित्ता, पृ. ६४)
----------------------------------------------------------------------------------------------------------