रोजनिशी- प्रस्तावना-११

अण्णासाहेबांच्या इतर काळातील रोजनिशीपेक्षा ह्या रोजनिशीत केवळ  माहिती देणा-या नोंदी तुलनेने जास्त आहेत. विशेषतः लंडनच्या वास्तव्यात त्यांनी जी रोजनिशी लिहिली तीमध्ये अशा नोंदी ब-याच आढळतात. बाह्य वास्तवाच्या वर्णनाच्या जोडीने अण्णासाहेब जेव्हा स्वतःच्या वैचारिक, भावनिक प्रतिक्रियाही प्रकट करतात तेव्हा त्या लेखनाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा रंग चढून त्याला विशेष प्रकारचे स्वारस्य प्राप्त होते. केवळ माहितीपर नोंदी काही एक प्रमाणात ह्या रोजनिशीत आहेत त्याचे एक कारण आहे. अण्णासाहेब ज्यावेळी इंग्लंडला जावयास निघाले तेव्हा त्यांना सुबोध पत्रिकेसाठी प्रवासवर्णनपर लेख लिहिण्याची विनंती संपादकांनी केली होती व त्याप्रमाणे अण्णासाहेब लेख लिहून पाठवीत होते. जलप्रवासाचे व मार्सेय, पॅरिस, लंडन या शहरांची वर्णने करणारे लेख, डेव्हनपोर्ट येथील गुडफ्रायडे, इत्यादि लेख त्यांनी सुबोध पत्रिकेसाठी पाठविले. इंग्लिश व स्कॉच सरोवर प्रांती बघितलेल्या निसर्गाचे व आलेल्या अनुभूतीचे आणि सुचलेल्या विचारांचे अप्रतिम वर्णन त्यांनी `जनातून वनात आणि परत` या लेखात केलेले आहे. इंग्लंडहून त्यांनी लिहून पाठविलेल्या लेखांची संख्या वीस आहे. या लेखांत अण्णासाहेबांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, विचारांची गहनता, सखोल चिंतनाची प्रवृत्ती यांचा अनुभव येतो त्याचप्रमाणे त्यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीचाही प्रत्यय येतो. उदाहरणार्थ `लंडन शहर` या लेखात लंडनला येण्याचा उद्देश सांगताना ते म्हणतात, "ज्या पाश्चात्य सुधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथांतून, गुरुमुखातून ऐकतो-एवढेच नव्हे तर जे हे सुधारणाचक्र, खाऊन पिऊन घरी स्वस्थ राम राम म्हणत बसणा-या आमच्या साध्या भोळ्या राष्ट्रास सुमारे शंभर वर्षे चाळवीत आहे. त्याची काही कळसूत्रे वरील अचाट शहरात दिसतील तर पाहावी असा एक हेतू निघतेवेळी मनात दडून राहिला होता."१  "कुळल्याही रहदारीच्या रस्त्यांत गेल्याबरोबर स्त्री-पुरुषांच्या लाटांवर लाटा थडकत असलेल्या पाहून जगावर मनुष्यप्राणी फार सवंग झाला आहे, असे वाटते आणि त्याविषयी फारशी पूज्यबुद्धी राहात नाही."२ लंडनमधील दुकानाचे ते वर्णन करतात, "माल मोहक तर खराच. पण तो दुकानात मांडून ठेवण्याची ढब त्याहून मोहक. आमच्याकडील दुकानदार आपल्या मालाचे ढिगाचे
(१.वि.रा.शिंदे, `लंडन शहर` लेख, व्याख्याने व उपदेश उनि. पृ.१५.
२. कित्ता, पृ.१५.)
ढीग दुकानात लपवून ठेवून आपण दाराशी येऊन बसतात. एखाद्यास वाटावे हे जणू रखवालीच करीत आहेत."३ फ्रान्समधील मार्सेय शहरासंबंधीच्या लेखात ते म्हणतात, "आमच्या व्यापारी पारशी सोबत्यास फ्रेंच भाषेत थोडीशी जीभ हलविता येत होती, त्याचा आम्हास अतोनात फायदा झाला."४
सुबोध पत्रिकेसाठी ज्या विषयांवर त्यांनी लेख लिहावयाचे ठरविले त्या विषयांच्या साध्या नोंदीच, पुनरुक्ती टाळण्याच्या उद्देशाने, त्यांनी रोजनिशीत केल्या असाव्यात. अशा नोंदी वगळल्या तर ह्या रोजनिशीच्या बाकीच्या भागात अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लेखशैलीचा प्रत्यय येतो.
अण्णासाहेब इंग्लंडास गेले ते केवळ धर्माचे पुस्तकी शिक्षण घेण्यासाठी नव्हे. स्वतःची धर्मबुद्धी विशद करून धर्मप्रसाराची तयारी करणे हा त्यांचा मुख्य परंतु एक उद्देश होता. ग्रंथांचे वाचन ते करीत होतेच. शिवाय विद्वानांची व्याख्याने ऐकत, चर्चा आणि धर्मसाधन करीत, वेगवेगळ्या पंथांच्या देवळांत जात, त्यांच्या रूढीचे अवलोकन करीत असत. निसर्गाच्या सहवासातही त्यांना आध्यात्मिक अनुभव प्राप्त होत असे. नैतिक गुणांच्या आढळातही त्यांचे आध्यात्मिक शिक्षण घडत असे. ऑक्सफर्डमधील पहिल्याच टर्ममध्ये बिझांटबाई, फोक्स जॅक्सन यांच्या धर्मविषयक ग्रंथांचे वाचन केल्याचे ते नमूद करतात. मार्टिनो क्लबमध्ये रशियातील धार्मिक शिक्षण हा चर्टकॉफचा निबंध ऐकतात व त्याचा परिचय करून घेतात. युनिटेरियन, कॅथॉलिक चर्चमधील उपासनांना हजर राहून त्यांचे तपशीलवार वर्णन देतात. कॉक ह्या सहाध्यायाच्या धार्मिक वृत्तीमुळे त्यांचे ह्याच्याशी विशेष जुळते. शोन, बार्न्स, कॉक व शिंदे प्रत्येक आठवड्यात आध्यात्मिक साधनासाठी एकत्र जमतात. मांसाहार सोडण्याचाही प्रयोग ते या काळात करतात हा त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचाच आविष्कार म्हणावा लागेल. शिंदे यांच्या आध्यात्मिक पिंडाचा वेगळेपणा जाणवतो, तो आणखी एका प्रंसगी. पिअर्सन कुटुंबात ते दुस-या एका सहाध्यायाप्रमाणे `पेईंग गेस्ट` म्हणून राहात असत. पिअर्सन हे एक कनिष्ठ मध्यमवर्गातील कुटुंब. मिस् अलाइस् पिअर्सन ही -
(३. कित्ता,  पृ.१६.
४. `मार्सेय शहर,` कित्ता, पृ.९.
या कुटुंबातील मोठी मुलगी. एकदा कॉलेजातील लेक्चरकडे त्यांचे मन लागले नाही. मग नंतरच्या उपासनेला न थांबता घरी येऊन ते मिस् पिअर्सनशी बोलत बसले. "ह्या संभाषणाने मला ठराविक व्याख्यानापेक्षा अधिक ज्ञान मिळाले. इतकेच नव्हे तर माझी आध्यात्मिक उन्नती झाली"(पृ. ७४) असे ते सांगतात. तिचे त्यांनी वर्णन केले आहे. "ही किती साधी आहे. हिची बुद्धीही साधी (साधारण) तसेच मनही साधे (सरळ). कला आणि कावेबाजी ह्यांचा हिला स्पर्शही नाही. आपल्या उणिवा लपविण्याची हिच्यात शक्ती नाही. तशीच पण इच्छाही नाही, इतकेच नव्हे तर आपल्या उणीवाबद्दल हिला असमाधानही वाटत नाही. हिच्यात कोणतीही नैतिक वाण दिसत नाही म्हणून हिचा हा भोळा व मुग्ध स्वभाव हिला फारच शोभतो. गरीब स्थितीतील हे निष्कलंक अंतःकरण पाहून माझ्या आध्यात्मिक शिक्षणात बरीच भर पडली" (पृ.७४). लंडनला सुटीत गेल्यानंतर रा. राजाराम पानवलकरांशी वृत्तीसाधर्म्याने त्यांचा स्नेह जुळतो व उदारधर्मावर व्याख्याने देणे, स्नेह संपादणे, बंधुता वाढविणे हा धंदा करीत जगाचा प्रवास करायचा असे स्वप्न ते बघतात. स्वतंत्र धर्ममते असणा-या व्हॉयसेच्या लंडनमधील चर्चमध्ये ते उपासनेस जातात. युनिटेरिअन सेक्रेटरी बोवी ह्यांजबरोबर एकेश्वरवादावर चर्चा करतात. `पोस्टल मिशन` ची माहिती करून घेतात. नंतरच्या सुट्यांमध्येही विविध पंथांची देवळे पाहणे, उपासना ऐकणे व निमंत्रणावरून स्वतः उपासना चालविणे हे त्यांचे कार्य चालूच होते. ब्रिडपोर्ट येथील उपासना चालविताना रंगून जातात (पृ.९३). डेव्हनपोर्ट येथील कॅथॉलिक चर्चमध्ये `गुडफ्रायडे`चा विधी कसा असतो हे ते तपशिलाने पाहतात (पृ.१०२). पारीस येथे नॉत्र दाम, व्हिनासां द पाल इ. देवळांतील उपासना पाहतात. प्रो. जाँ रेव्हील यांना भेटून तेथील धर्मपंथाची माहिती मिळवितात व धर्मस्थिती समजून घेतात. ह्या प्रोफेसराच्या व्याख्यानास ९ पुरूष व ४ म्हाता-या बायका हजर होत्या असे सांगून `पारीस येथे धर्माचे नाव काढल्यास कित्येकास हासे येते` असेही ते नमूद करतात (पृ. १३७).