साहित्यसेवा आणि संशोधनकार्य

विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या लेखनाचे मुख्यतः तीन विभाग दिसतात. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात व ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना केलेले रोजनिशीच्या स्वरूपाचे आत्मपर व प्रवासवर्णवपर लेखन हा पहिला विभाग. धार्मिक व सामाजिक स्वरूपाचे कार्य करीत असताना त्यांनी केलेल्या प्रवचनाच्या भाषणाच्या स्वरूपाचे लेखन हा दुसरा विभाग त्यांच्या लेखनाचा तिसरा टप्पा हा प्रामुख्याने संशोधनपर लेखनाचा असून १९२३ साली ते मिशनच्या जबाबदारीच्या कामातून मुक्त झाल्यानंतर हे लेखन केलेले आढळते. १९३० साली येरवड्याच्या तुरूंगात असताना त्यांनी रोजनिशी लिहिली तसेच माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रपर ग्रंथलेखनाला प्रारंभ केला व अखेरच्या आजारपणाच्या काळात तो पूर्ण केला. हे त्यांचे अखेरचे लेखन म्हणता येईल.


विठ्ठ्ल रामजी शिंदे हे फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना १८९८ मध्ये त्यांनी जी रोजनिशी लिहिली, ते त्यांचे पहिले लेखन होय. लिव्हिंग्स्टनचे चरित्र वाचताना त्याने आपल्या प्रवासात लिहिलेले जर्नल अथवा रोजनिशीही त्यांच्या वाचण्यात आली. त्यावरूनच त्यांना रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा झाली असावी असे वाटते. कारण फर्ग्युसनमधील या रोजनिशीची पहिली नोंद लिव्हिंग्स्टनच्या चरित्राबद्दलची आहे. विद्यार्थिदशेच्या या काळात त्यांच्या ठिकाणी आत्मविष्काराची ऊर्मीही प्रबळ असलेली आपल्याला आढळते. पुण्याच्या ह्या वास्तव्य काळात त्यांनी केळकर वाड्यामध्ये मित्रांचे एक चर्चामंडळ स्थापन केले होते. आत्माविष्काराची ही ऊर्मी किती प्रबळ आहे. हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, “पोटात घटकाभर विष आवरेल, पण नवीन विचार अगर एखादा सुंदर अनुभव मनाला घडला की, कोणातरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.’’२


चर्चामंडळ स्थापण्यामागे जी आविष्काराची प्रबळ उर्मी होती तीच त्यांच्या रोजनिशी लेखनामागेही असणे स्वाभाविक आहे. फर्ग्युसनमधील रोजनिशीमध्ये शिंदे हे पुण्याच्या वातावरणातमध्ये जे जे अनुभवीत होते, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया प्रकट केलेल्या आहेत. या काळात सामान्यतः त्यांनी ऐकलेली व्य़ाख्याने, केलेले वाचन अथवा दृष्टीस पडलेले प्रसंग याबद्दलच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. शिंदे यांची कुतूहलबुद्धी तीव्र होती, त्यामुळे ते वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याते असोत, की डेक्कन कॉलेजात ना. गोखले यांच्यासारख्या वक्त्यांचे होणारे व्य़ाख्यान असो, ही व्याख्याने ते ऐकत होते. पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचे ते निरीक्षण करीत असत. त्यामुळे शिंदे यांची फर्ग्युसनमधील रोजनिशी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यातील पुण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वरूपाच्या संस्थात्मक जीवनावरील भाष्य आहे. शिंदे यांचे मन भावनाशील असले तरी त्यांच्या दृष्टीचा वस्तुनिष्ठपणा ढळत नाही. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळालेल्या व्यक्तींच्या प्रभावाचे दडपण त्यांच्या मनावर कधी येत नाही. म्हणूनच वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचा नि:सत्त्वपणा, न. चिं. केळकरांचा दुटप्पीपणा, शि. म. परांजप्यांच्या भाषणातील पोकळपणा अथवा अर्थपूर्णतेचा अभाव हा जसा ते स्पष्टपणाने नमूद करतात, त्याचप्रमाणे ना. गोखले यांच्या भाषणाचे मोकळेपणाने गुणगानही करतात. ह्या रोजनिशीतच सर्वस्वी व्यक्तिगत अशा प्रकारच्या आपल्या विकार-वासनांच्या प्रबळ उर्मीचा आविष्कार करतात, त्याचप्रमाणे मनात उदभूत झालेल्या उन्नत धर्मभावनेचा विकास रेखाटतात. अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबाबत आपण काहीएक कार्य करावयास पाहिजे ही तळमळ त्यांना लागून राहिली होती, याचेही चित्र या रोजनिशीत पाहावयास मिळते. ह्या काळात त्यांच्या मनाची काहीएक घडण होताना दिसत असली, तरी त्यांचे जे प्रगल्भ मन आधीच घडले होते, त्याचा आविष्कार होतानाही दिसतो. शिंदे यांच्या भावी जीवनात कार्यरूपाने अथवा विचाररूपाने त्यांच्या मनाचा जो आविष्कार झालेला आहे, त्याचे सारे कंद १८९८-९९च्या या रोजनिशीमध्ये पाहावयास मिळतात.


धर्मशिक्षणासाठी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ या कालावधीत ऑक्सफर्ड येथे केलेल्या वास्तव्यात लिहिलेली रोजनिशी तुलनेने मोठी आहे. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना ज्या सुट्या मिळाल्या, त्या त्यांनी इंग्लंडमधील त्याचप्रमाणे जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली या देशांतील रम्य व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी खर्च केल्या. इंग्लंडमध्ये दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करणा-या संस्थांचे जाणीवपूर्वक निरीक्षणही त्यांनी केले. इंग्लंडमधील वास्तव्यात ते धर्मशिक्षण तर घेत होतेच, त्याशिवाय विव्दानांची व्याख्याने ऐकीत, चर्चा व धर्मसाधना करीत, युनिटेरियन, कॅथॉलिक, एपिस्कोपल इत्यादी वेगवेगळ्या पंथांच्या देवळांत जात व चर्चामंडळांत सहभागी होत. परोपकारी कार्य करणा-या मिशनच्या संस्थांना ते भेटी देऊन तेथील कार्यपद्धतीचे अवलोकन करीत असत. इंग्लंडमधील रोजनिशीत अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती खच्चून भरलेली आढळते. शिंदे यांचा स्वभाव चौकस, निरीक्षण सूक्ष्म आणि नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्याचा त्यांचा उत्साह उदंड असे. आपण हिंदुस्थानात गेल्यावर समाजसुधारणा कोणत्या धर्तीवर करावी हा विचारही त्यांच्या मनामध्ये प्रबळ असणार म्हणून ऑक्सफर्ड येथाल वर्कहाऊसचे किंवा कंगालखान्याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेले दिसते. सुटीत प्रवास करताना फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली वगैरे देशांतील भव्य इमारती, सुंदर निसर्ग, चित्रशिल्प कलेचे उत्तमोत्तम नमुने हेही त्यांनी बारकाईने पाहून घेतले. शिंदे यांच्या या दोन्ही रोजनिशीत त्यांच्या मनाचा आध्यात्मिक पिंड, व्यापक मानवतावादी दृष्टिकोण व सर्वांगीण सुधारणेची तळमळ यांचा प्रत्यय येतो. त्यांचे मन व्यापक अर्थाने सौंदर्यासक्त असल्याचे जाणवते. निसर्गाकडे त्यांचे मन स्वाभाविकपणे आकृष्ट होते. मनुष्यस्वभावातील नैतिक सौंदर्याकडे आकृष्ट होणारी तरल संवेदनशीलता त्यांच्या ठिकाणी आहे. मात्र बाह्म भरक्याला भुलणारा त्यांचा स्वभाव नाही. त्यांची दृष्टी सदैव गाभ्यावर असते, म्हणून ते स्वाभाविकपणे बाह्म कवच भेदून अंतरंगाचे सौंदर्य, चांगुलपणा व नैतिकता पाहतात. व्यक्ती असो की परिस्थिती तिचे आकलन ते अंतर्भेदी वृत्तीने करतात, मात्र त्यांचे अंतरंग भावनामय असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांना कुठेही कोरडेपणा येत नाही.


विठ्ठ्ल रामजी शिंदे हे इंग्लंडंमध्ये अभ्यासार्थ असताना त्यांनी केलेले दुस-या प्रकारचे लेखन म्हणजे त्यांची प्रवासवर्णने होत. ते इंग्लंडला येणार हे ठरल्यानंतर सुबोधपत्रिकेचे संपादक द्वा. गो. वैद्य यांनी शिंदे यांच्याकडून प्रवासवर्णनपर पत्रे पाठविण्याची कबुली घेतलेली होती. त्याप्रमाणे शिंदे यांनी आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यकाळात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलची व विविध ठिकाणी बघितलेल्या सौंदर्यस्थळांबद्दलची व संस्थांबद्दलची माहिती सुबोधपत्रिकेत लेखरूपाने पाठविली. शिंदे यांनी या दोन वर्षांच्या काळात सुबोधपत्रिकेतून जे लेखन केले त्या लेखनाने सुबोधपत्रिकेच्या तत्कालीन वाचकाचे मन आकृष्ट करून घेतले. शिंदे यांच्याबद्दल फार चांगले मत व जवळीक प्रार्थनासमाजबंधूंच्या मनामध्ये निर्माण झाली. शिंदे यांनी शेक्सपिअर, वर्डस्वर्थ इत्यादी प्रतिभावंतांची स्थळे, इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील सरोवर प्रांत इत्यादींचे सुरेख वर्णन केले आहे. त्यांनी केलेले लंडन शहराचे वर्णन असो की, पारीसमधील निशाजीवनाचे वर्णन असो, ते यथातथ्य तर असतेच, शिवाय त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचाही आविष्कार त्यामधून होतो. त्यांचा ‘जनातून वनात व परत’ या शीर्षकाचा जो लेख आहे त्यामध्ये नव्या भांडवलशाहीतील शोषणाचे चित्र शहरात कसे दिसून येते व नीरव अशा सरोवर प्रांतातील देखावा याच्याविरूद्ध कसा दिसतो याचे अप्रतिम वर्णन केले आहे,३ इंग्लंडमधून पाठविलेल्या शिंदे यांच्या या लेखनाच्या परिणामासंबंधी सुबोधपत्रिकेचे संपादक व्दा. गो. वैद्य यांनी लिहिले आहे, “मन त्रस्त झाले असेल तेव्हा अगर विश्रांतीच्या वेळी या पुस्तकात प्रसिद्ध झालेली रा. शिंदे यांची केवळ विलायतेहून लिहिलेली पत्रे जे कोणी वाचतील त्यास रा. शिंदे यांचे निरीक्षणसामर्थ्य, कल्पकता, भाषेतील काव्य व रस अवलोकून समाधान वाटल्यावाचून राहणार नाही.”४


भारतामध्ये आल्यानंतर विठ्ठ्ल रामजी शिंदे यांनी १९०३ पासून धर्मप्रचार कार्याला प्रारंभ केला. ब्राह्मधर्माचे प्रचारकार्य आणि १९०६ पासून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी त्यांना सदैव भारतभर भ्रमंती करावी लागत असे. तीसेक वर्षांच्या अवधीत त्यांनी भारताच्या बहुतेक सर्व प्रांतांतून प्रवास केला.कार्यानिमित्त केलेल्या प्रवासाबरोबरच त्यांनी विविध ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य प्रदेश हेही जाणीवपूर्वक पाहिले. परदेशात आणि भारतात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलचे एकंदर तीसके प्रवासवर्णनपर लेख आहेत.

भारतामधील बंगळूर, मंगळूर, पडबिद्री, खंडागिरी पर्वत इत्यादी शहरांचे व ठिकाणांचे; तेथील प्रेक्षणीय मंदिरांचे; पुरातन शिल्पांचे वर्णन केले आहे. शिंदे हे प्रवासात आलेल्या अनुभवाचे, बघितलेल्या ऐतिहासिक स्थळाचे, एखाद्या वास्तूचे, शिल्पाकृतीचे अथवा लोकसमुदायाचे वस्तुनिष्ठ वर्णन वेधकपणे करतात. मात्र त्यांनी केलेले वर्णन हे नुसतेच वस्तुनिष्ठ स्वरूपाचे वर्णन राहत नाही, तर त्या दृश्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये उदित केलेली भावना, तीमधून निर्माण झालेले चिंतन अथवा वैचारिक स्वरूपाच्या जाणिवा ह्याही ते प्रकट करतात. त्यामुळे त्यांच्या या स्वरूपाच्या लेखनाला आपोआपच वाड्मयीन गुणवत्ता प्राप्त होते.


त्यांचा मनःपिंड हा आध्यात्मिक स्वरूपाचा असल्याने त्यांच्या या प्रवासवर्णनपर लेखनातूनही त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा आविष्कार झाल्यावाचून राहत नाही. त्यांच्या वृत्तीची आध्यात्मिकता ‘जनातून वनात व परत’ ह्या इंग्लंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या वर्णनातून जशी प्रकट होते, त्याचप्रमाणे द. कानडामधील कारकळ येथील घुमटाराजाच्या पुतळ्याचे वर्णन करताना प्रकट होते. घुमटाराज नावाच्या ४३ फूट उंचीच्या पुतळ्याचे ते वर्णन करतात, “अगदी नग्न सावयव शरीर, धीरोदत्त व प्रसन्न मुद्रा. साधे पण भरीव सौंदर्य आणि भोवतालचे शांत वातावरण हे सर्व पाहून जैन धर्मविषयीच नव्हे तर शिल्पकाराविषयीदेखील पूज्य भावना उत्पन्न होते,” ह्या घुमटाराजाच्या अथवा गोमटेश्वराच्या मूर्तीने आपल्या मनाला का घेरले याचा विचार करीत असताना, विरोधाने कलकत्त्यास बघितलेल्या पाश्चात्त्य शिल्पकाराने निर्माण केलेल्या जनरल औटरॅमच्या अश्वारूढ पुतळ्याचे त्यांना स्मरण होते. ते लिहितात, “सत्तावन सालच्या बंडात बंडखोराच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळून झेप घावणा-या वाघाप्रमाणे आपल्या घोड्यावरून मागे वळून तलवारीचा वार करीत आहे. असा आव या पंचरशी पुतळ्याने दाखविला आहे. तो पाहून क्षणभर अंगावर शहारे उभारतात, पण ते क्षणभरच. लगेच ह्या पाशवी शक्तीचे असले उर्मट प्रदर्शन पाहून, तिरस्काराच्या लाटा उसळू लागतात. पण घुमटाराज! तुझ्या कपाळावरील गांभीर्याच्या व हनुवटीवरील माधुर्याच्या रेखा माझ्या काळजात खोल खोल रूतत आहेत. याचे रहस्य काय बरे असले?” याचे रहस्य शोधताना ते कलेच्या निर्मितीच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. ते म्हणतात, “काव्याचे व कलेचे हृदय म्हणजे पवित्र्य ऊर्फ धर्म हेच होय. हे हृदयच आपल्या अंगाबाहेर टाकून कवीने अथवा शिल्पकाराने आपली कितीही ओढाताण करून अजब सृष्टी निर्माण केली तर ती नुसती आश्चर्यकारक होईल, पण जड जीवाला उद्धारक होणार नाही, आमचे प्राचीन शिल्पकार पुष्कळदा धर्माने झपाटलेले असत. म्हणून त्यांच्या हातून अशा सृष्ट्या निर्माण झाल्या. पाश्चात्त्य शिल्पकार पुष्कळदा भक्तीपेक्षा चातुर्यावर भिस्त ठेवून कामाला लागतात, म्हणून त्यांच्या कृतीला तादृश किंमत येत नाही.”५ त्यांच्या अध्यात्मप्रवण मनाने शोधलेले कलानिर्मितीचे हे रहस्य अत्यंत मार्मिक असल्याचे जाणवते.


शिंदे यांच्या प्रवासवर्णनपर लेखनात वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती तर मिळतेच, शिवाय त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, त्यांची भावनामयता व चिंतनशीलता आणि त्यांच्या प्रकट होणा-या जाणिवा यांमुळे त्यांची प्रवासवर्णने वाड्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीने वरच्या दर्जाची ठरतात.


१९२३ नंतर ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या जबाबदारीच्या कामातून मुक्त झाले होते. म्हणून पूर्वीच्या तुलनेत १९२३ नंतर त्यांच्या आवडत्या संशोधनकार्याला काहीएका प्रमाणात फुरसत मिळू लागली. ज्याला संशोधनपर स्वरूपाचे लेखन म्हणता येईल ते १९२३ नंतरच्या दशकाच्या त्यांच्या हातून झालेले आहे, असेही आढळून येते. त्यांचे संशोधनपर स्वरूपाचे लेखन हे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, इतिहास, भाषाशास्त्र व समाजशास्त्र ह्या विषयांशी प्राधान्याने निगडित आहे.


विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या अस्पृश्यतेसंबंधी संशोधनकार्याला १९०५ साली प्रारंभ होतो. भारतभर अस्पृश्यवर्गाचे निरीक्षण केल्यानंतर विठ्ठ्ल रामजी शिंदे यांनी मुंबई येथील इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशनपुढे नोव्हेंबर १९०५ मध्ये इंग्रजीत अस्पृश्यवर्गाच्या दयनीय स्थितीबद्दल व्याख्यान देऊन ह्या वर्गाच्या उन्नतीसाठी व्यक्तिगत पुढाकार असलेले एक देशी स्वरूपाचे मिशन सुरू केले पाहिजे असा विचार मांडला. ह्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात १९०१ सालच्या खानेसुमारी अहवालाचा उपयोग करून अस्पृश्यवर्गाची आकडेवारीसह साधार माहिती दिलेली होती. या व्याख्यानातील प्रतिपादनच इंडियन सोशल रिफॉर्मरच्या २९ जुलै १९०६ च्या ‘ए मिशन फॉर दि डिप्रेस्ड क्लासेस : ए प्ली’ या नावानो प्रसिद्ध केले. शिंदे यांचा हा लेख म्हणजे भारतीय अस्पृश्यतेबद्दलचा पहिला संशोधनपर लेख असे म्हणता येईल. मिशनची स्थापना केल्यानंतर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या आज्ञेवरून त्यांनी बडोदा येथे अस्पृश्यवर्गाच्या स्थितीबद्दल व अस्पृश्यतानिवारण करण्याच्या निकडीसंबंधी सर्वांगीण विचार मांडणारे व्याख्यान दिले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिलेले हे व्याख्यान १९०८ साली मासिक मनोरंजनात व नंतर स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने ‘बहिष्कृत भारत’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र ज्ञानकोशाच्या सातव्या खंडासाठी त्यांनी ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ हा संशोधनात्मक माहितीपूर्ण लेख लिहिला.


१९२७ साली ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून भारताबाहेरील अस्पृश्यतेवर त्यांनी नवा प्रकाश टाकला. अस्पृश्यता कशी निर्माण होते यासंबंधीची प्रक्रियाच त्यांना तेथे पाहावयास मिळाली. अस्पृश्यताविषयक प्रश्नांचे त्यांनी ३० वर्षे जे चिंतन केले होते, जो व्यासंग केला होता, त्याचे फलित १९३३ साली लिहिलेल्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ह्या प्रबंधात पाहावयास मिळते. ह्या विषयाचा सर्वांगीण परामर्श घेणारा अस्पृश्यतेच्या विषयावरील भारतातील हा पहिलाच प्रबंध म्हणावा लागले. सर्वस्वी शास्त्रीय भूमिकेवरून लिहिलेल्या या प्रबंधात त्यांनी अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास व बुद्धपूर्व काळापासून ते वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची रूपे यांचे साधार असे विवरण केले आहे. अस्पृश्यांमधील वेगवेगळ्या नावांची व्युत्पत्ती, त्यांचा इतिहास, त्यांचा धर्म, सामाजिक स्थिती व त्यांचे राजकरण इत्यादी विषयांच्या अनुरोधाने त्यांनी विवेचन केले आहे. अस्पृश्यतेसंबंधी सर्वस्वी नवीन वाटावी अशी माहिती व निष्कर्ष त्यांनी या प्रबंधात साधार मांडले आहेत. प्रस्तुतचा प्रबंध म्हणजे अनेकविध समाजशास्त्रीय संशोधनपद्धतींचा अवलंब करून लिहिलेला नमुनेदार संशोधनपर ग्रंथ होय.


अस्पृश्यतानिवारणकार्याबद्दल शिंदे यांच्या अंतःकरणात आयुष्यभर तळमळ होती, त्याचप्रमाणे अस्पृश्यताविषयक संशोधनाचे कामही त्यांनी आयुष्यभर विलक्षण कळकळीने व आस्थेने केले. भारतीय प्रश्न या ग्रंथात समाविष्ट असलेले संशोधन करण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळालेला होता. त्यांनी म्हटले, “अस्पृश्यतेचा छडा लावण्यास-निवारणाचा भाग तर राहू द्या-मला स्वतःला जन्मभर जो अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षात घेता, मला आणखी जन्म मिळाला तर याच संशोधनात आणि सेवाशुश्रूषेत खर्चीन.’’


१९२३ नंतर शिंदे यांना जी मोकळीक मिळाली, तेव्हा मिळालेल्या काळाचा उपयोग आपण महत्त्वाच्या संशोधनकार्यासाठी खर्च करावा असे त्यांना तीव्रतेने वाटत होते.

 

इतिहासविषयक संशोधन हा त्यांच्या मोठ्या आस्थेचा विषय होता. मराठ्यांच्या इतिहासासंबंधी काम करावे असे त्यांना वाटत होते.हे काम करण्यासाठी आवश्यक ते साधनग्रंथ व सुविधा प्राप्त होणेही गरजेचे होते. त्या दृष्टीने बडोदा संस्थानामध्ये स्टेट लायब्ररीतील क्युरेटरचे पद आपल्याला मिळू शकेल काय, याचा त्यांनी अंदाज घेतला. परंतु स्वतंत्रपणे काम करण्याची शिंदे यांची जी कल्पना होती, ती संस्थानाच्या शासनव्यवस्थेत पुरी होण्याजोगी नव्हती, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो विचार सोडून दिला. श्रीमंत छत्रपती शाहूमहाराजांना छत्रपती शिवाजीमहाराज यांचे एक चरित्र लिहिले जावे याबद्दल कळकळ वाटत होती. इतर संशोधकांप्रमाणेच त्यांनी विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्याजवळही हा विषय एकदा काढला होता. शिंदे यांना ज्या वेळेला संशोधनकार्याला मोकळीक मिळाली, त्या वेळेला श्रीमंत शाहू छत्रपती हयात नव्हते. गादीवर असलेले श्रीमंत राजाराममहाराज यांना विठ्ठ्ल रामजी शिंदे यांनी पत्र पाठवून आपला मनोदय कळविला व शाहूमहाराजांनी प्रकट केलेल्या इच्छेचाही त्या पत्रात निर्देश केला. परंतु या ना त्या कारणाने शिंदे यांची ही कल्पनाही प्रत्यक्षात उतरली नाही. मात्र शक्य होईल त्याप्रमाणे त्यांनी या काळात आपल्या आवडीच्या विषयावर संशोधनपर लेखन केले.


या काळात त्यांनी केलेल्या संशोधनकार्यापैकी महत्त्वाचा सुदीर्घ लेख म्हणजे भागवत धर्माचा इतिहास. खरे तर हिंदुस्थानचाच पूर्वापार विस्तृत इतिहास लिहावा असे शिंदे यांना वाटत होते. कार्यव्यापृततेमुळे व साधनांच्या अभावी त्यांना ते शक्य झाले नाही. पण हिंदुस्थानातील धर्माचा इतिहास तरी लिहावा असे त्यांच्या मनात वारंवार येऊ लागले. तो इतिहास लिहिण्याचे काम हाती घेण्यापूर्वी एक विस्तृत प्रस्तावना लिहावी व मग तिच्यावरून धर्माचा मूळ ग्रंथ लिहावा असे त्यांनी योजिले व १९२५ साली भागवत धर्माचा इतिहास ह्या विषयावर पाच संशोधनपर व्याख्याने लिहून काढली आणि ती लोकांपुढे मांडली. त्यात भागवत धर्माची व्याख्या श्रद्धा व भक्ती ह्या दोन तत्त्वात आहे, याची निश्चिती करून ह्या धर्माचा आणि वैदिक धर्माचा फारसा संबंध नाही, असे त्यांनी दाखवून दिले. वैदिक धर्म म्हणजे जादूटोण्याच्या स्वरूपाचा अभिचार धर्म होय. त्याचा श्रद्धा व भक्तीशी संबंध येत नाही. वैदिक धर्म म्हणजे भौतिक धर्म व भागवत धर्म म्हणजे नैतिक धर्म असा या दोन धर्मांत भेद आहे असे त्यांनी दाखवून दिले. भागवत या शब्दांची व्युत्पत्ती ‘भग’ या शब्दापासून करून देवी भागवत म्हणजे देवीचे ऊर्फ शक्तीचे उपासक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. देवी भागवत, शिवभागवत, बौद्धभागवत, जैन भागवत आणि विष्णू भागवत असे पंचविध भागवतांचे प्रकार कल्पून त्यांचा त्यांनी परस्परसंबंध दाखविला. काळाच्या ओघात बौद्ध धर्म हिंदुस्थानातून गेला. जैन धर्माची प्रगती खुंटली व बाकी वैष्णव, शाक्त आणि शैव ह्या सर्वच पंथांची अवनती झाली. हिंदु धर्माचे पुनरूज्जीवन व सुधारणा महाराष्ट्र भागवत धर्माने म्हणजे पंढरपूरच्या वारकरी सांप्रदायाने कशी केली, हे त्यांनी दाखवून दिले, तसेच दक्षिणेकडील लिंगायत धर्म, उत्तरेकडील शीख धर्म आणि पूर्वेकडील चैतन्यांचा वैष्णव धर्म ह्यांनी हिंदु धर्माची सुधारणा कशी केला, याचे विवरण लेखमालेच्या शेवटी त्यांनी केले आहे.६


हिंदुस्थानच्या इतिहासामधे असणा-या आर्य व द्रविड यांचे स्थान हा शिंदे यांच्या चिंतनाचा व संशोधनाचा एक आस्थाविषय होता. हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे आर्यांचा इतिहास. आर्यांच्या आगमनापासून हिंदुस्थानच्या इतिहासास सुरूवात झाली इत्यादी कल्पना भ्रामक असून जाडेजाडे विव्दानही ह्याच कल्पनांना कवटाळून बसलेले आहेत, असे शिंदे यांना जाणवत होते. त्यांच्या मते आर्यांच्या पूर्वीही हिंदुस्थानात द्रविड पश्चिमेकडून आले. त्यांच्याही पूर्वी हिंदुस्थानात मोगल (कोल-कोळी वगैरे) आले. हिंदुस्थानभर त्यांनी वस्ती केली. या विषयावर संशोधकाच्या भूमिकेतून त्यांनी १९२५ सालच्या सुमारास नाशिक, कोल्हापूर वगैरे ठिकाणी जाहीर व्य़ाख्याने दिली, तसेच इंडियन सोशल रिफॉर्मर, मद्रासचे जस्टिस ह्या इंग्रजी वृत्तपत्रांत आर्य-द्रविड वादावर संशोधनात्मक लेख लिहिले. ह्यातील नवीन प्रतिपादनामुळे परंपरानिष्ठ आर्य अभिमान्यांना शिंदे यांचे विचार मानवत नसत. शिंदे यांच्या या विषयावरील व्याख्यानाचा वृत्तान्त प्रसिद्ध झाला तर, त्यांचे मित्र असलेल्या ज. स. करंदीकर यांच्या संपादकत्वाखाली निघणा-या केसरी वृत्तपत्रात शिंदे यांच्या ह्या विचाराचा तत्परतेने प्रतिवाद केला जात असे.


शिंदे यांना इतिहासविषयक दोन खंडनपर लेख लिहिणे भाग पडले. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी ‘राधामाधवविलासचंपू’ हे शहाजीराजे यांची प्रशस्ती असणारे जयराम पिंड्ये यांनी लिहिलेले काव्य प्रसिद्ध केले. मूळ ७६ पानांच्या काव्यग्रंथाला २०० पानांची प्रस्तावना राजवाडयांनी लिहिली. शहाजीमहाराजांची प्रशस्ती उजेडात आणताना मराठे जातीच्या सामान्य लोकांवर, त्याचप्रमाणे देशस्थांवर व जैन-लिंगायतांवर हीन स्वरूपाची टीका केली. ऐतिहासिक भूमिकेतून राजवाडे यांच्या प्रतिपादनावर शिंदे यांनी तीव्र स्वरूपाची टीका केली. राजवाडे यांचा गैरहेतू व अन्य जातींबद्दल असणारी तुच्छतेची वृत्ती पाहून शिंदे यांना सात्त्विक संताप आला व अपवादात्मक स्वरूपातच शिंदे यांचा सात्विक संताप या लेखातून प्रकट झाला.७ जदुनाथ सरकार यांनी पुणेरी पेशव्यांची कामगिरी वर्णन करणारा लेख ४ नोव्हेंबर १९२४ च्या केसरीत प्रसिद्ध केला त्यामध्ये पहिल्या शाहूमहाराजांची निंदा व पेशव्यांची थोरवी वर्णन केली. ऐतिहासिक सत्याचा त्यामध्ये विपर्यास केला जात आहे, असे वाटून शिंदे यांनी जदुनाथ सरकारांच्या लेखाचाही परखडपणे प्रतिवाद केला.८


इतिहासाप्रमाणेच तौलनिक भाषाशास्त्र हाही शिंदे यांच्या आवडीचा विषय होता.मराठी भाषेची घटना या पुस्तकाचे लेखक रा. भि. जोशी यांनी विनंती केल्यावरून १९२३ च्या डिसेंबरात सदर पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी ‘कानडी-मराठीचा परस्परसंबंध’ असा लेख लिहिला. या लेखात कानडी या जुन्या भाषेचा मराठीवर झालेला परिणाम केवळ शब्दांपुरताच मर्यादित नसून व्याकरणाच्या दृष्टीनेही तिचा मराठीवर दांडगा प्रभाव पडला असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.९ ‘कोकणी व मराठी यांचा परस्परसंबंध’ हा लेख जुलै १९२६ च्या विविधज्ञामविस्तारमध्ये प्रसिद्ध केला. त्यामध्ये कोकणी ही मराठीचीच एक पोटभाषा आहे, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठी भाषेच्या उत्पत्तीबद्दलही त्यांनी मांडलेला विचार स्वतंत्र आहे. त्यांच्या मते हल्लीची मराठी ही महाराष्ट्री असे नाव असलेल्या एका प्राचीन प्राकृतातूनच आलेली नसून ती मगध देशातून पश्चिम बंगाल, ओरिसा तेलंगण, व-हाड आणि हजार वर्षांपूर्वीच्या उत्तर कर्नाटक (कृष्णा व गोदावरी ह्यांमधील भाग) ह्या प्रांतांतून प्रवास करीत असलेली एक भाषा, असा त्यांचा ग्रह बनत चालला होता. अशा अर्धवट बनलेल्या स्थितीत ही प्रगमनशील भाषा सुमारे हजार-बाराशे उत्तर कोकण ऊर्फ अपरान्त या प्रांती आणि तेथून द. कोकण ऊर्फ केरळ या प्रांतात हल्ली मालवणी, कोकणी, गोव्हनी या नावाने ती रूढ झाली,असे त्यांचे मत होते.१०


व्युत्पत्तिशास्त्रातही त्यांना रूची होती. मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीचा विचार करीत असताना केवळ संस्कृत भाषेवर जो भर दिला जातो, तो अस्थानी आहे, असे त्यांचे मत असले पाहिजे; म्हणून १९३१ च्या सुमारास महाराष्ट्र शब्दकोशाचे काम चालले असता प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती करून नीट लावली पाहिजे व त्यासाठी निदान एका तरी आर्येतर भाषा जाणणा-या विव्दानाची कमिटीवर नेमणूक करावी अशी सूचना त्यांनी कोशकारांना केली. तिला अनुसरून प्रिं. राजवाडे, मोडकशास्त्री, कृ. पां. कुलकर्णी ह्यांच्या जोडीने शिंदे यांची नेमणूक त्या कमिटीवर केली होती. कमिटीची बैठक दर आठवड्यातून एकदा शब्दकोश कचेरीत भरत असे. शिंदे यांनी भारतभर भ्रमंती केल्यामुळे कानडीच्या जोडीनेच अन्य द्रविड भाषा त्यांना अवगत होत्या, त्याचप्रमाणे बंगाली, गुजराती, ओडिया, सिंधी या भाषांचाही त्यांना उत्तम परिचय होता. मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती सिद्ध करीत असताना त्यांना असलेल्या विविध भाषांच्या ज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असला पाहिजे, हे त्यांच्या दप्तरी असलेल्या काही व्युत्पत्तीविषयक कार्डावरून जाणवते. तौलनिक भाषाशास्त्रावर बडोदा येथे जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्ये डिसेंबर १९२९ मध्ये त्यांनी व्याख्यान दिले. अहमदाबादलाही त्यांनी व्युत्पत्तिशास्त्रावर व्याख्यान दिले. पुण्यातील व्युत्पत्ती कमिटीची माहिती तेथे सांगून अहमदाबाद येथील विव्दान लोकांनी अशीच कमिटी नेमावी व पुण्यातील कमिटीशी सहकार्य करावे असे सुचविले.


‘मराठ्यांची पूर्वपीठिका’ या विषयावर शिंदे यांनी तौलनिक मानववंशशास्त्राच्या भूमिकेतून १९२९-३० साली रत्नाकर मासिकातून तीन लेख प्रसिद्ध केले. व्युत्पत्तिशास्त्रीय, समाजशास्त्रीय अवलोकन यांच्या आधारे ते मराठा ही अनेक जातींपैकी एक जात नसून ते एक राष्ट्र आहे आणि प्रसिद्ध मानववंशही आहेत, असे प्रतिपादन त्यांनी प्रस्तुत लेखात केले आहे. रट्ट, राज आणि रथ या तीन निरनिराळ्या शब्दांशी मराठा या नावाचा असलेला संबंध त्यांनी दाखवून दिला व सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ रॉलिन्सन यांच्या हिस्ट्री ऑफ दि पार्थियन्स या ग्रंथाच्या आधारे मराठे हे पार्थव किंवा पल्लव वंशाचे असावेत असे त्यांनी साधार सुचविले आहे.११


अनेक शास्त्रांचा व्यासंग, साधार प्रतिपादन करण्याची दक्षता, बुद्धीची कुशाग्रता व दृष्टिकोणाचा व्यापकपणा यांमुळे महर्षी शिंदे यांच्या संशोधनपर लेखानाला मौलिकता प्राप्त होते. संशोधनपर लेखन मराठीमध्ये करावे याबद्दल विठ्ठ्ल रामजी शिंदे यांचा कटाक्ष होता व त्यामागे त्यांची एक भूमिका होती, असे जाणवते.


शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाच्या स्थितीसंबंधी १९०५ साली सुबोधपत्रिकेत, तसेच डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करण्यापाठीमागची भूमिका विशद करणारा लेख १९०६ साली इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये इंग्रजीमधून लिहिला. मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नावरील त्यापुढील लेख आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध त्यांनी मराठीतच लिहिला. भागवत धर्मविषयक, भाषाविषयक तसेच समाजशास्त्रविषयक संशोधनपर सर्व लेखन त्यांनी मराठीत केलेले आहे. आपले संशोधनपर लेखन, विशेषतः अस्पृश्यताविषयक लेखन, जर त्यांनी इंग्रजीमध्ये केले असते तर केवळ भारतीय पातळीवरच ह्या विषयाच्या संशोधनक्षेत्रात आघाडीचे व अव्वल दर्जाचे संशोधक असा त्यांचा नावलौकिक झाला असता. ऑक्सफर्ड विद्यापीठात दोन वर्षे शिक्षण घेतलेल्या शिंद्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी आवश्यकतेनुसार केलेले थोडेफार इंग्रजी लेखन त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाची ग्वाही देते.


आपले संशोधनपर, वैचारिक स्वरूपाचे लेखन मराठीतच असावे असा शिंदे यांचा कटाक्ष होता.ही त्यांची भूमिका १८९८ पासूनची होती हे त्यांनी रोजनिशीत नमूद केलेल्या मतावरून ध्यानात येते. वसंत व्याख्यानमालेमध्ये होणा-या व्याख्यानाबद्दलचा असंतोष प्रकट करताना, तसेच अशा प्रकारच्या मालांनी कोणते कार्य साधावे हे सांगताना त्यांनी म्हटले, ‘नवीन शास्त्रीय शोध सांगून बहुजन समाजाच्या ज्ञानात भर घालावी.’ (रोजनिशी, पृ.३६). बहुजन समाजाच्या हितासाठी शिंदे सर्वतोपरी काळजी घेत असत. बहुजन समाजाला ज्ञानी करावयाचे असेल; बहुश्रुत करावयाचे असेल तर मराठीमधून मौलिक, महत्वाच्या विषयावरचे लेखन होणे त्यांना आवश्यक वाटत होते. ह्या भूमिकेवरूनच त्यांनी बडोदा साहित्य संमेलनातील तत्त्वज्ञान व सामाजिकशास्त्रे या विभागाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना रा. मटंगे यांनी मराठीमध्ये लिहिलेल्या सापेक्षतावाद या छोटेखानी पुस्तकाचे तोंडभरून कौतुक केले. म्हणून स्वतः शिंदे महत्त्वाच्या विषयावर सामाजिक व संशोधनपर स्वरूपाचे लेखन मराठीतच करीत राहीले. या प्रकारचे लेखन मराठीत विपुलतेने झाल्यामुळेच मराठी भाषा समृद्ध होईल अशीही त्यांची धारणा होती.


१९२३ ते १९३३ पर्यंतच्या दशकातील काळांत त्यांना जो थोडाफार अवसर मिळाला, त्यामध्ये त्यांनी संशोधन स्वरूपाचे हे लेखन केले. १९३० साली म. गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिंदे यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला व सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा त्यांनी येरवड्याच्या तुरूगांत भोगली. ह्या शिक्षेच्या काळात रात्रीच्या वेळेचा उपयोग त्यांनी आत्मचरित्रपर लेखन करण्यात घालविला. (छोटीशी रोजनिशीही या काळामध्ये त्यांनी लिहिलेली आहे.).रोजनिशीही वेगळा असा शिंदे यांच्या आत्मपर लेखनाचा दुसरा आविष्कार म्हणजे त्यांनी लिहिलेले माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्रपर पुस्तक. ह्या पुस्तकाच्या सुरूवाताचा शंभरएक पृष्ठांचा भाग १९३९ साली शारीरिक विकलतेच्या अवस्थेत आयुष्याच्या अखेरच्या काळात लिहिलेला आहे. शारीरिक विकलतेमुळे शिंदे स्वतः लेखन करणे शक्य नव्हते. ते मजकूराचे, कथन करीत होते व त्यांचे धाकटे चिरंजीव रवींद्र हा मजकूर लिहून घेत होते. शिंदे यांनी तुरूंगामध्ये असताना लिहिलेला बालपणीचा भाग कॉलेजशिक्षण पूर्ण होईपर्यंतचा भाग एकंदर आत्मचरित्रात फारच हृद्य उतरला आहे. बालपणीचा भाग लिहिताना त्यांना अत्यंत प्रिय अशा आठवणीत ते रमून गेलेले होते. त्यामुळे त्यांनी समरसून आपले आईवडील, आजोबा, अन्य कुटुंबीय, सवंगडी, शिक्षक यांचे आणि आपल्या उदार कौटुंबिक वातावरणाचे हृदयंगम चित्र रेखाटले आहे. आठवणींचा पुढील भाग रोजनिशीसारख्या स्वलिखित साहित्याचा त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये आलेल्या संबंधित मजकुराचा आधार घेऊन लिहिलेला आहे. ह्या अखेरच्या भागात माहिती देण्याला प्राधान्य असले तरी ती कोरडेपणाने दिली गेलेली नाही; तर, एका भावनाप्रधान, धर्मप्रवण व प्रगल्भ व्य़क्तीने केलेले हे निवेदन आहे, याचा ठसा वाचकांच्या मनावर उमटतो. आठवणींच्या दुस-या भागापासून त्यांनी आपले कार्यरूप जीवन, त्यामध्ये वर्णन केले आहे. त्यांनी धर्मप्रचारकपद पत्करल्यानंतर केलेले प्रार्थनासमाजाचे प्रचारकार्य, निराश्रित साहाय्यकारी मंडळीची स्थापना करून केलेले अस्पृश्यतानिवारणाचे कार्य, त्यांचा राजकरणातील सहभाग, मंगलोर येथाल ब्राह्मसमाजाचे आचार्य म्हणून केलेले काम, कायदेभंगाच्या चळवळीत घेतलेला भाग व तुरूंगवास, त्याचप्रमाणे ब्रह्मदेशाची केलेली यात्रा व ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवानिमित्त केलेला दौरा इत्यादीचे वर्णन येते.


विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या लेखनातून त्यांची सत्यनिष्ठा, जीवनाच्या धार्मिक व सामाजिक अंगाची उन्नती करण्याचा त्यांचा ध्यास, त्यांच्या वृत्तीचा नि:स्पृहपणा, त्यांची रसिकता आणि विनोदात्मता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष या आत्मपर लेखनातून प्रत्ययाला येतात. त्यांच्या या आत्मपर चरित्रलेखनाचा अभावरूपाने जाणवणारा एक विशेष असा आहे की, त्यामध्ये कुठेही आत्मगौरव नाही. आत्मसमर्थन नाही. इतरांना दूषण दिल्याचे उदाहरण अपवादभूत स्वरूपातही दिसत नाही. या आत्मचरित्रपर लेखनातून प्रकट होणारे त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत उदात्त, प्रगल्भ व क्षमाशील अशा एका धर्मनिष्ठ विभूतीचे आहे, याचा ठसा वातकांच्या अंतःकरणावर उमटतो.


विठ्ठ्ल रामजी शिंदे यांचे लेखन हे उन्नत धर्मावर नितान्त श्रद्धा अवलेल्या धर्मनिष्ठाचे लेखन आहे. त्यांचे स्वतःचे जगणे, प्रत्यक्ष कार्य आणि त्यांच्या साहित्यातून प्रकट होणारी वैचारिकता आणि संवेदनशीलता यांच्यामध्ये एकवाक्यता आहे. स्वाभावितपणेच सच्च्या जगण्यातून त्यांचे हे लेखन निर्माण झालेले असल्याने त्याला गुणवत्ताही प्राप्त झाली आहे. पूर्वग्रहरहित जाणकार मराठी समीक्षक-वाचकांचा जो वर्ग आह त्यांना शिंदे यांचे वाडमय फार मोलाचे वाटते. त्यांना शिंदे हे प्रबोधनयुगातील आदर्श विचारवंत लेखक वाटतात. त्यांचे ललित स्वरूपाचे लेखन हेही चोखंदळ अभिरूची असणा-या वाचक-समीक्षकांना मोलाचे वाटते. शिंदे यांनी संशोधनपर वाडमयात त्याचप्रमाणे वैचारिक स्वरूपाच्या साहित्यामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यांचे ललित साहित्य हेही त्यांच्या जीवनसंबंद्ध दृष्टिकोणामुळे व वैशिष्टपूर्ण संवेदनशीलतेने मराठी साहित्याच्या संपन्नतेत भर घालणारे आहे, असे या अभिज्ञ वाचकवर्गाचे मत पडते.


शिंदे यांचे वाड्मय एवढे गुणवत्तापूर्ण असूनही त्यांच्या काळात सर्वसामान्य पांढरपेक्षा सुशिक्षित वाचकवर्गात त्यांना लेखक म्हणून मोठी लोकप्रियता वा मान्यता मिळाली असे दिसत नाही. शिंदे यांच्या विचारातील स्वतंत्रपणा तत्कालीन वाचकवर्गाला पेलणारा नव्हता. आर्य संस्कृतीबद्दल अनुकूल तर बौद्ध मताबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असणा-या सुशिक्षित मराठी वाचकवर्गाला शिंदे यांच्या संशोधनपर लेखनातील मूलगामीपणा आणि वैचारिक लेखनातील स्वतंत्रपणा भावणारा नव्हता.


मिल, स्पेन्सर आणि आगरकर यांच्या अज्ञेयवादी वा नास्तिकवादी विचाराच्या प्रभावातून शिंदे हे विद्यार्थिदशेतच स्वतःची सुटका करून घेऊ शकले व उन्नत धर्माकडे वळले. परंतु सुशिक्षित महाराष्ट्र मात्र ह्या वैचारिक दडपणाखाली पुढची पन्नासएक वर्षी राहिला व त्याची अजूनही पूर्णपणे सुटका झाली असे वाटत नाही. शिंदे यांनी तर एकेश्वरी धर्ममताचा स्वीकार करून ते प्रार्थनासमाजाचे, ब्राह्मसमाजाचे आयुष्यभर एकनिष्ठ प्रचारक राहिले व त्या भूमिकेवरून कितीतरी मौलिक स्वरूपाचे लेखन केले. परंतु मराठी संस्कृतीमध्ये प्रार्थनासमाजाचे खरेखुरे अंतरंग न ओळखता ख्रिस्ती धर्माची नक्कल करणारा पंथ म्हणून त्याकडे तुच्छतागर्भ दूरत्वाने शिक्षित मराठी समाज बघत आला. त्यामुळे न्या. रानडे, डॉ. भांडारकर यांच्या धर्मविषयक प्रगल्भ लेखनाची दखल घेतली गेली नाही. तीच गत शिंदे यांच्या धर्मविषयक लेखनाची झाली.


म. गांधींचा राजकारणात उदय होण्याच्या आधीपासून शिंदे हे तत्सदृश भूमिकेतून वैचारिक स्वरूपाचे लेखन करीत होते. पुढील काळात तर समानधर्मित्वामुळे ते म. गांधींच्या चळवळीतही सामील झाले. शिक्षित महाराष्ट्राला म. गांधी कधीच जवळचे वाटले नाहीत. स्वाभाविकपणेच गांधीवादाचा प्रभाव महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रावर पडू शकला नाही. शिंदे यांच्या उपेक्षेचे हेही एक कारण असणार. शिंदे यांच्या लेखनातून बौद्ध, इस्लाम, ख्रिस्ती इत्यादी धर्माबद्दल समत्वाची बुद्दी व ख्रिस्त, बुद्ध, महंमद ह्या धर्मसंस्थापकांबद्दल आदराची भावना प्रकट होते. त्यांच्या लेखनात संकुचित पक्षपातीपणा अथवा परधर्मीयांबद्दल द्वेषबुद्धीचा लवलेशही प्रकट होत नाही. त्यांच्या सर्वच जाणिवांचा अंतःस्त्रोत प्रेमधर्म असल्याचेच प्रत्ययाला येते.


अस्पृश्यविषयक संशोधनपर लेखन करण्यात विठ्ठ्ल रामजी शिंदे अग्रेसर होते. समाजशास्त्राविषयक अनेकविध संशोधनपद्धतींचा अवलंब करून त्यांनी एतदविषयक मौलिक स्वरूपाचे संशोधन केले. परंतु अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हा सुशिक्षित महाराष्ट्रीयांच्या फारसा आस्थेचा विषय होऊ शकला नाही. मग एतदविषयक संशोधनाची दखल घेणे दूरच. बहुजन समाजाचा आणि शोषित-पीडितांचा कैवार घेऊन त्यांनी केलेले सामाजिक प्रश्नांवरचे वैचारिक स्वरूपाचे लेखनही दुर्लक्षित राहिले. आपल्या वर्तुळाच्या बाहेरचे पाहू शकण्याची क्षमता नसणा-या पांढरपेश्यांच्या मनाला ते फारसे रूचणे शक्य नव्हते.


निदान स्वातंत्र्यपूर्व काळात तरी महाराष्ट्राची वाङ्मयीन अभिरूची ही जीवनसंबद्दतेपेक्षा वाग्विलास दाखविणा-या कल्पनाप्रचुर लेखनाला महत्त्व देणारी होती. म्हणून वरवरच्या वाग्विलासाकडे दुर्लक्ष करून थेट जीवनाच्या गाभ्याला हात घालणारे विठ्ठ्ल रामजी शिंदे यांचे वस्तुतः वरच्या दर्जाचे ललित साहित्य तत्कालीन उच्चभ्र वाचकवर्गाला मोलाचे वाटले नसणार. ह्या अनेकविध कारणांमुळे शिंदे यांना लेखक म्हणून ज्या योग्यतेची मान्यता मिळावयास पाहिजे होती ती पूर्वीच्या काळात मिळालेली दिसत नाही.


मराठी साहित्याच्या क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः १९६० नंतर, फरक पडलेला दिसतो आहे. साहित्यविषयक अभिरूचीत योग्य अशा प्रकारचे स्थित्यंतर घडताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनकार्यात शिंदे यांनी सुधारक म्हणून केलेल्या कामगिरीचे महत्त्व उत्तरोत्तर अधिक जाणवू लागले आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासाचा सामग्य्राने विचार करणारा शिंदे यांचा मार्ग हाच खराखुरा सुधारणेचा मार्ग आहे असे काही विचारवंत आज प्रतिपादन करीत आहेत. सुधारक व विचारवंत म्हणून शिंदे यांची थोरवी जशी आज पटू लागली आहे, त्याचप्रमाणे एक श्रेष्ठ दर्जाचे ललित साहित्याचे सर्जनशील लेखक व मूलगामी संशोधक म्हणूनही त्यांची मान्यता उत्तरोत्तर वाढू लागली आहे असे काही प्रमाणात दिसू लागले आहे.


संदर्भ
१)टॉमस ह्यूज, डेव्हिड लिव्हिंग्स्टन, मॅकमिलन आणि कं, लंडन, प्रथम प्रकाशन १८८९, तेरावे पुनर्मुद्रण, १९२८. डेव्हिड लिव्हिंग्स्टन (१८१३-१८७३) ह्याने धर्मप्रसार करणे, पूर्व आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार थांबविणे व नाईल नदीचा उगम शोधणे हे उद्देश मनात ठेवून आफ्रिकेची अखेरची सफर केली.
२)वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १००.
३)वि. रा. शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ५७-६९.
४)व्दा. गो. वैद्य, प्रार्थनासमाजाचा इतिहास, पृ. २८७.
५)वि. रा. शिंदे, ‘सह्याद्रीवरून-१’ मासिक मनोरंजन, ऑक्टोबर १९२५. समाविष्ट, घर्म, जीवन व तत्त्वज्ञान, पृ. १२६-३४.
६)भागवत धर्माचा विकास ह्या विषयावरील ही पाच व्याख्याने पुणे प्रार्थनासमाजात १७ जुलै १९२५ पासून ३१ ऑगस्ट १९२५ पर्यंत झाली. समाविष्ट, शिंदे लेखसंग्रह, पृ. १-६२.
७) ‘राधामाधवविलासचंपू आणि राजवाडे,’ शिंदे लेखसंग्रह, पृ. १७१-१९०.
८) ‘पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय (!) कामगिरी,’ तत्रैव, पृ. १९१-२०१.
९) तत्रैव, पृ. १५४-१६५.
१०) तत्रैव, पृ. १३४-१५३.
११) ‘मराठ्यांची पूर्वपीठिका अथवा रट्टवंशोत्पत्तीविषयी शास्त्रीय विचार’, तत्रैव, पृ. ६३-९४.