अंतःस्थ भावजीवनातील खळबळ

विठ्ठलरावांच्या पुणे वास्तव्यातील १८९८-९९ ही वर्षे विशेष खळबळीची गेली. सामाजिक क्षेत्रात आपण कोणते कार्य व ते कशा प्रकारे करावे हा एक त्यांच्या आस्थेचा विषय बनून राहिलेला होता. बुद्धिवादाचा पगडा कमी होऊन प्रार्थनासमाजाकडे त्यांचा ओढा जोरात सुरू झालेला होता. अशा ह्या अस्वस्थेच्या काळात त्यांच्या अंतःस्थ भावजीवनामध्ये एक वेगळीच खळबळ तीव्र स्वरूपात चाललेली होती. ही खळबळ होती ती त्यांच्या वैवाहिक स्थितीबाबतची. त्याचे ह्या बाबतीतील शारीरिक, भावनिक अस्वस्थतेचे चित्र त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीत पाहावयास मिळते.

११ मे १८९८ ते १९ एप्रिल १८९९ ह्या जवळ जवळ वर्षभराच्या कालखंडातील चार-पाच नोंदींमधून विठ्ठलरावांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेची कल्पना येऊ शकेल. शारीर विकाराचा उपशम न झाल्यामुळे शरीराची होणारी हानी, एकाकी अवस्थेत होणारे भावनिक व शारीरिक हाल संपण्याची  आणि सुंदर, आल्हाददायक वैवाहिक जीवन नव्या संबंधाने निर्माण करण्याची उद्धवलेली आशा व अखेरीस त्या बाबतीतही झालेली निराशा असा हा विठ्ठलरावांच्या मानसिक अस्वस्थतेचा ढोबळ आलेख आहे.

विठ्ठलरावांना पुण्यातील वास्तव्यात सासने, हुल्याळ, कनिटकर ह्या मित्रांचा प्रत्यक्ष सहवास मिळावयाचा. शिवाय त्यांना आणखी मनोमन सहवास असायचा तो त्यांचे तेरदाळचे जिवलग मित्र विष्णुपंत देशपांडे यांचा. अंतःकरणातील गुह्ये केवळ विष्णुपंत देशपांडे ह्यांच्याजवळच उघडी करावीत असे. त्यांना वाटत असे. ह्या अंतःकरणाच्या बाबीसंबंधी विष्णुपंतांना त्यांनी काही पत्रे पाठविली तर रोजनिशीतही यासंबंधीचा मजकूर विष्णुपंतांना उद्देशून लिहिलेला आहे. ११ मे १८९८ च्या रोजनिशीमध्ये विठ्ठलराव लिहितात, “जिवलगा विष्णू, माझी विधुरावस्था मला कोण खडतर ताप देत आहे. अविवाहित राहण्याचा माझा विचार तर ह्या तुफानात फुटून तुकडे तुकडे होतो. किती दिवस तरी ही अवस्था मला जाळीत आहे म्हणतोस ! प्रेमाचा पहिला अंकुर माझ्या काळजात उद्भवल्यापासून तो(जिच्यावर माझ्या पत्नीत्वाचा केवळ आळ आला होता) तिने त्याचा खुजट रोपा उपटून टाकेपर्यंत माझ्या उरात प्रेमाच्या पिकाऐवजी भावी सुखाच्या कल्पनेचे नुसते गवतच वाढत होते! आणि जेव्हा तो रोपा व त्याचेबरोबर ते सारे गवतही पार जळू खाक झाले तेव्हापासून तर माझे अंतःकरण, वणव्याने जळलेल्या कुरणाप्रमाणे रणरणत आहे...एका बाजूस माझ्या उच्च नीतीच्या कल्पना व मानसिक विचार व दुस-या बाजूस पाशवी राक्षसी वासना यांचे केव्हा केव्हा घनघोर घर्षण होते! ह्या चित-जड द्वंद्वाची कटकट नाही असे सुखी क्षण मला फार थोडे मिळू लागले आहेत. धन्य ते की ज्यांत नेहमी ह्यांचा Stable equilibrium असतो. त्यांच्या unstable equilibrium चेच मला जे एक दोन क्षण मिळतात ते अनुपम (सुख) देतात. केव्हा केव्हा अतृप्त वासनेचा प्रकोप इतका होतो, की माझी अंगे तापतात, किंचित ज्वर आल्याचा भास होतो. आता तशीच स्थिती झाली होती म्हणून बागेतून नुकतीच उमललेली व पाण्याने थबथबलेली ओंजळभर चमेलीची फुले आणून उघड्या उरावर ठेऊन दिली व घटकाभर उताणा पडलो. खरोखर ऊर गार झाले व संस्कृत कवींनी वर्णिलेल्या उपायाची प्रचिती पटून थोडा शरमलो, अथवा रमलोही म्हणावयाचा.

अरे!! पण माझे हे हाल, तर कुलीन विधवांचे काय होत असेल!!! सुखाची त्यांची पूर्ण निराशा झाली असेल तो होता होईल तो लवकर त्यांचा खून करणे हे कायदेशीर, नीतीचे, सोईचे, पुण्याचे व सनातन धर्माचे कृत्य आहे हे शपथेवर सांगतो. सती जाण्याची चाल बंद केली हा बेंटिंगने मोठा अधमपणा केला असे अशा विधवांनी का म्हणू नये?”१

ह्या नोंदीमध्ये त्यांनी आपली विधुरावस्था खडतर ताप देत आहे व वासनेचा दाह कसा त्रासदायक होत आहे ह्या वर्णन केले आहे. वस्तुतः विठ्ठलरावांचा विवाह त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी झाला होता व त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई ह्या हयात होत्या. दोघांच्या वयामध्ये सुमारे साडेआठ वर्षांचे अंतर होते. पत्नी हयात असताना त्यांनी येथे जो स्वतःच्या अवस्थेसाठी विधुरावस्था हा शब्द वापरला आहे तो साभिप्राय दिसतो. ९६ मध्ये म्हणजे ही नोंद लिहिली त्याच्या दोन वर्षे आधी रुक्मिणीबाईंना पुण्यात आणून जनाक्काबरोबर शाळेत घालून शिकविण्याचा प्रयोग विठ्ठलरावांनी केलेला होता. रुक्मिणीबीईंचे शिक्षणही होईल व आपल्या संसारी जीवनाला प्रारंभ करता येईल असा विठ्ठलरावांचा मनोद्य असावा. परंतु दोन्ही बाबतीत विठ्ठलरावांचा हेतू सफल झालेला दिसत नाही. रुक्मिणीबाई पहिल्या फेरीनंतर पुण्यास राहिलेल्या दिसत नाहीत आणि त्यांनी आपली पत्नीपणाची भूमिकाही निभावलेली दिसत नाही. तिचे पत्नीपण केवळ नावापुरतेच होते असे दिसते. कारण तिचे वर्णन त्यांनी “जिच्यावर पत्नीपणाचा केवळ आळ आला होता” ह्या शब्दांनी केले आहे. विठ्ठलरावांची वृत्ती काव्यात्म, रसिक होती. मन हळुवार होते. पत्नीने आपल्याशी संवाद साधावा व रसिकतेने आपण सहजीवन जगावे अशी त्यांची अपेक्षा असणार. काव्यात्म पातळीवरचा रसिक प्रतिसाद तर दूरच राहिला; उलट पत्नी या नात्याने साधी शारीरसौख्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रतिसाद दिला नसावा, असे दिसते. ‘प्रेमाचा पहिला अंकुर’ आणि ‘त्याचा खुजट रोपा तिने उपटून टाकला’ ह्या आलंकारिक वर्णनावरून हा अर्थ निष्पन्न होतो. पत्नीकडून झालेल्या अपेक्षाभंगामुळे शारीर पातळीवरील वासनेची पूर्ती होत नव्हती. ते जणू अविवाहित अशा अवस्थेत होते. पत्नी ही पत्नीप्रमाणे वागत नाही तर आपण ह्या ‘अविवाहित’ अवस्थेतच राहावे, असे त्यांनी योजिले होते. परंतु विकारक्षोभामुळे हा विचार पार नष्ट होतो, असे त्यांनी नमूद केले आहे. ‘अतृप्त वासनेचा प्रकोप’ ह्या शब्दप्रयोगावरून वासनापूर्तीच्या अभावानुळे निर्माण झालेली स्थिती सूचित होते. या स्वतःच्या या शारीरदारहाच्या अवस्थेतही त्यांना कुलीन विधवांना कोणत्या प्रकारे हाल सहन करावे लागतात हे जाणवते. ह्या तुलनेवरूनही त्यांना मुख्यतः होणारा वासनेचा कोंडमारा अभिप्रेत दिसतो. १९ जुलैच्या नोंदीमध्ये जबर स्वप्नावस्था व शक्तिपात होण्यामुळे प्रकृती कशी खालावली ह्यासंबंधी सांगितले असून हा आपल्या विधुरावस्थेचा परिणाम होय असा अभिप्राय दिला आहे. “माझ्या प्रेमाची अशी खडतर निराशा झाली नसती तर अशी दैन्यावस्था झाली नसती” असे त्यांनी नमूद केले आहे. “यापेक्षा मी अनीतीचा मार्ग स्वीकारला असता तर अधिक सुखी झालो असतो काय?” असा प्रश्न स्वतःला करून त्याचे उत्तर ते नमूद करतात, “छे, माझ्या शारीर यातनांपेक्षा मनाच्या यातना कष्टतर झाल्या असत्या.” यावरूनही पत्नीने त्यांना शरीरसुख द्यावयाचे नाकारले होते व त्यामुळेच त्यांच्या केवळ मनाचीच नव्हे तर शरीराचीही विकल अवस्था झाली होती असे दिसते. “आपल्या अमोघ प्रेमाचे चीज करणारी कोणी जन्ममैत्रीण” भेटली नाही तर आपण जास्त दिवस टिकणार नाही ही आशंका त्यांनी नमूद केली आहे.

पत्नीबाबत अशी दुहेरी निराशा वाट्याला आल्यामुळे विठ्ठलरावांच्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली. कोल्हापुरात वास्तव्य करणा-या सुशिक्षित, सुसंस्कृत केळवकर कुटुंबाबद्दल त्यांनी कोल्हापूरचे मित्र गोविंदराव सासने, वासुदेवराव सुखटणकर यांच्याकडून ऐकले होते. डॉ. कृष्णाजी दादाजी केळवकर ऊर्फ दादासाहेब हे मूळ वसईचे. ते मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजचे पदवीधर होते. अलिबाग येथे सरकारी इस्पितळात नोकरी करीत होते.
स्त्री-शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या निरक्षर पत्नीस स्वताःशिकवून सुशिक्षित केले. त्यांच्या पत्नी रखमाबाई ह्यांना पुण्याच्या फिमेल ट्रेनिंग कॉलेजचे सर्टिफिकेट मिळाले. कोल्हापूर दरबारने शिक्षिका म्हणून त्यांची १८८३ मध्ये नेमणूक केली. डॉ. केळवकर यांनी आजारपणामुळे  नोकरी सोडली. रखमाबाईंच्या नोकरीच्या निमित्ताने केळवकर कुटुंबाने १८८३ पासून कोल्हापुरात वास्तव्य केले. रखमाबाई यांना १८९५ मध्ये लेडी सुपरिटेंडेंट म्हणून बढती मिळाली.

केळवकर दंपतीला शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलींचेही मुलांप्रमाणे शिक्षण केले. कृष्णाबाई ही या दंपतीची द्वितीय कन्या. विठ्ठलरावांच्या रोजनिशीत तीन कुमारिका म्हणून जो उल्लेख येतो तो कृष्णाबाई (जन्म १८७९), यमुनाबाई (जन्म १८८२) व अहल्याबाई (जन्म १८८६) यांचा. कृष्णाबाई ह्या फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या विद्यार्थिनी. १८९४ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीची मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन त्यांनी इलाख्यामध्ये दहावा नंबर पटकवला होता. १८९५ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व प्रीव्हियस परीक्षा पास झाल्यानंतर मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन १९०१ मध्ये एल्. एम्. अँड एस्. ही परीक्षा पहिला वर्ग व अनेक पारितोषिके मिळवून उत्तीर्ण केली. यमुनाबाई, अहल्याबाई ह्या कृष्णाबाईंच्या बहिणीही देखण्या आणि हुशार होत्या.२

वैवाहिक जीवनात निराशा पदरी आल्यामुळे केळवकर कुटुंबातील सुशिक्षित मुलींपैकी एकीशी आपण लग्न करावे असा विचार विठ्ठलरावांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. वय, शिक्षण लक्षात घेता हया तीन  कुमारिकांपैकी कृष्णाबाई ह्या विठ्ठलरावांना अभिप्रेत असतील असे वाटते. १८९५ मध्ये कृष्णाबाई फर्ग्युसनमध्ये प्रीव्हियसच्या वर्गात असताना विठ्ठलरावांनी त्यांना पाहिले असणार. त्यांचे मॅट्रिकच्या परीक्षेतील यश, त्यांची बुद्धिमत्ता व त्यांचा तरतरीतपणा यांमुळे विठ्ठलरावांचा त्यांच्याबद्दल स्वाभाविकपणे अनुकूल ग्रह झालेला असणार. गोविंदरावांनी ह्या संदर्भामध्ये विठ्ठलरावांच्या वतीने बोलणे करावे ठरले होते, परंतु त्यांच्याकडून ते फारसे निभावले नाही. ह्या विषयाचा त्यांनी जवळ जवळ वर्षभर ध्यास घेतला होता. १८९८च्या मेच्या सुट्टीमध्ये ह्या नादाचा निकाल करावयाचा असा त्यांनी निश्चय केला होता. अनेक अडचणींतून पन्हाळ्याची सफर करण्याचे ठरवले होते, त्यापाठीमागेही हाच हेतू होता. मात्र गोविंदरावांनी ह्या बाबतीत निराशेचे व नाउमेदीचे उद्गार काढल्यामुळे विठ्ठलरावांचा फार विरस झाला. तरीही हा वर्षभर चालविलेला नाद तसाच सोडणे त्यांच्या जिवावर आले. गोविंदरावांनी दोन-तिन दिवस आधी केळवकरदादांकडे जावे व विठ्ठलरावांची इच्छा त्यांना उघडपणे कळवावी असे ठरले. पुढचे सविस्तर संभाषण स्वतः विठ्ठलरावांनी करावयाचे ठरविले. ह्याप्रमाणे १८ व १९ एप्रिल १८९९ रोजी विठ्ठलराव दादांसमवेत चार-पाच तास बोलत राहिले. ह्या कुटुंबाबद्दल त्यांचे अत्यंत अनुकूल मत झाले. “त्यांस (दादांस) सोडून उठावेसेच वाटत नाही असे जे गोविंदराव व वासुदेवराव यांनी सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांच्या स्वतःत एक प्रकारची आकर्षक शक्ती आहे. सर्व कुटुंबात जादू भरली आहे.  कुटुंबात असे एकही माणूस नाही ज्यास पाहून मन द्रवत नाही. बुद्धी, सौंर्द्य, विनय, विनोद, आदर इत्यादी मोहक गुणांचे विलास ह्या घरी सहज दृष्टीस पडतात.”३ पुढे विठ्ठलरावांनी असेही लिहिले आहे की, चौकस दृष्टीने खोल पाहिले असता हे गुण कृत्रिमपणाच्या सुंदर कोंदणात फार मार्मिकपणे बसविले आहेत. नागर सुसंस्कृतपणामुळे जाणीवपूर्वक वाढीस लावलेले हे गुण आहेत. १९ एप्रिल १८९९च्या प्रत्यक्ष भेटीत केळवकरदादांनी विठ्ठलरावांच्या वैवाहिक स्थितीबद्दल फार कळकळ दाखविली. गोविंदरावांनी विशिष्ट व्यक्तीविषयक बोलणे केले नव्हते व विठ्ठलरावांना आपणहून करणे प्रशस्त वाटले नाही. दोघेही एकमेकांशी तटस्थ वृत्तीने बोलत होते. आंतरजातीय विवाहासंबंधी विठ्ठलरावांनी आपली सडेतोड सुधारणावादी भूमिका त्यांना सांगितली. पण दादांच्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करण्याचे धाडस आहेसे विठ्ठलरावांना दिसले नाही. विठ्ठलरावांच्या सुधारक पद्धतीच्या नवीन विवाहास त्यांची हल्लीची वैवाहिक स्थिती ही अनिवार्य अडचण आहे हा दादांचा मुद्दा विठ्ठलरावांनी सपशेल कबूल केला. इतर कोणत्याही अडचणी त्यांना कबूल नव्हत्या. पण दादांची तयारी नाही असे विठ्ठलरावांना जाणवले. इतक्या दिवसाचा नाद आपल्याला सोडावा लागला ह्याचे विठ्ठलरावांना फार वाईट वाटले.

विठ्ठलरावांच्या भावजीवनामधील हे प्रकरण म्हणजे त्यांच्या तारुण्यावस्थेत मनाने दाखविलेला ओढाळपणा नव्हे की काव्य, कादंब-या वाचून त्यांच्या रोमॅंटिक मनाचा झालेला उच्छृंखल आविष्कारही नव्हे. ते स्वतः ऐन तारुण्याच्या भरात असताना त्यांची विवाहित स्त्री ही पत्नीपणाची भूमिकाच बजावत नाही. यामुळे त्यांच्या मनाला आलेले नैराश्य व वासनाप्रकोपामुळे होणारी शरीराची हानी यामुळे त्यांनी नव्याने वैवाहिक जीवनाची मांडामांड करावी असे घेतले होते. ह्यामध्ये पत्नीची उपेक्षा करावी, तिला नगण्य गणावे व केवळ आपल्याच सुखाचा विचार करावा अशी स्वार्थपरता अजिबात दिसत नाही. केवळकरांच्या ह्या तीन कुमारिकांपैकी कुणा एकीशी स्वतंत्रपणे संधान जुळविण्याचा विचार केला असेही दिसत नाही. उलट ह्या कुमारिकांच्या वडिलांशी बोलणी करावी व त्यांच्या अनुमतीनेच विवाह करावा अशीच त्यांची भूमिका होती. यात हेही खरे दिसते, की केळवकरांच्या घरातील सुसंस्कृत, नागर वातावरण त्यांना आवडले होते. कुमारिकांच्या ठिकाणी असणारे बुद्धी, सौंर्द्य, चांगुलपणा हे गुण त्यांना आवडले होते. त्यांच्यापैकी कुणी जीवनाची सहचारिणी मिळाली तर आपले वैवाहिक जीवन आनंददायक होईल असेही त्यांना वाटलेले असणार. मात्र या बाबतीत त्यांनी नीती, व्यवहार, चांगुलपणा आणि सुसंस्कृतपणा या बाबतीतील मर्यादा कुठेही ओलांडली नाही. ह्या काळामध्ये त्यांची आध्यात्मिक साधना चालू होती. समाजसुधारणे विचार चालूच होते. या विवाहासंबंधात चाललेला त्यांचा विचारही वरच्या पातळीवरचाच होता. आपला जिवलग मित्र विष्णुपंत देशपांडे ह्याला उद्देशून १२ एप्रिल १८९९च्या रोजनिशीत त्यांनी लिहिले आहे, “जिवलगा, ह्या विषयाचा ध्यास मला जवळ जवळ सुमारे वर्षभर लागला आहे. इतक्या अवधीत विचार आणि विकार यांनी मला अगदी भंडावून सोडले आहे. पण दोन्हीही उच्च प्रकारचे आहेत.”४

केळवकरदादांशी अंतिम बोलणे झाल्यानंतर त्यांची तीव्र निराशा झाली. त्यांना दुःख झाले, हे खरे असले तरी त्यानंतर हा विषय त्यानी प्रयत्नपूर्वक मनाच्या हद्दीबाहेर टाकला. गोविंदराव, वासुदेवराव, जनाबाई ह्यांच्याबरोबर ते पन्हाळा, पावनगड, विशाळगड वगैरेंच्या सहलीला गेले व त्या सहलीत ते रमून गेल्याचे दिसते. या सहलीच्या वर्णनातील एक नोंद त्यांच्या आंतरिक वेदनेची संदिग्ध सूचना देणारी आहे. पावनगडावरून दिसणा-या सुंदर दृश्याचे ते वर्णन करतात. “सडकांवरून खडी पसरवली होती ती अगदी सोनकावीच्या रंगाची होती. त्यामुळे मला अति प्रयकर उषःकालच्या फिकट आबाशायी रंगाची काळ्या फत्तरातून व हिरव्या झाडीतून सडकांची हृद्यंगम वळणे पाहून वारंवार माझे मन द्रवत असे व अंतरंगातील अतिगूढ विषयाकडे हट्टाने ओढ घेत असे.”५ ह्या बाबतीतील पुढच्या दोन-अडीच वर्षांतील घटना येथेच लक्षात घेऊ. ह्या अवधीत विठ्ठलरांवाच्या मनःस्थितीत पालट झाला. ते बी. ए. ची परीक्षा पास झाले व वकिलीच्या अभ्यासासाठी मुंबईस गेले. जमखंडीचे सुट्टीतले त्यांचे वास्तव्यही वाढले. त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांचेही वय वाढून त्यांना समज आलेली असणार. नव-याला जवळ येऊ न देण्याचा दुराग्रह वाढते वय व वाढती समज यांच्याबरोबर मावळला असणार. पतिपत्नींमध्ये सामंजस्याची भावना क्रमशः वाढीस लागली असणार. त्याचे दृश्य फळ म्हणजे रुक्मिणीबाईंनी पहिले अपत्य प्रताप ह्याला ९ सप्टेंबर १९०१ रोजी जन्म दिला. विठ्ठलरावांचे वैवाहिक जीवन निर्वेधपणे सुरू झाले.

संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २६.
२. सौ. संजीवनीबाई केळवकर, कोल्हापूर यांची मुलाखत व त्यांनी दाखविलेल्या कौटुंबिक कागदपत्रांच्या आधारे.
३. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ४५.
४. तत्रैव, पृ. ४३.
५. तत्रैव, पृ. ५०.