विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या लेखनाचे मुख्यतः तीन विभाग दिसतात. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात व ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना केलेले रोजनिशीच्या स्वरूपाचे आत्मपर व प्रवासवर्णवपर लेखन हा पहिला विभाग. धार्मिक व सामाजिक स्वरूपाचे कार्य करीत असताना त्यांनी केलेल्या प्रवचनाच्या भाषणाच्या स्वरूपाचे लेखन हा दुसरा विभाग त्यांच्या लेखनाचा तिसरा टप्पा हा प्रामुख्याने संशोधनपर लेखनाचा असून १९२३ साली ते मिशनच्या जबाबदारीच्या कामातून मुक्त झाल्यानंतर हे लेखन केलेले आढळते. १९३० साली येरवड्याच्या तुरूंगात असताना त्यांनी रोजनिशी लिहिली तसेच माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रपर ग्रंथलेखनाला प्रारंभ केला व अखेरच्या आजारपणाच्या काळात तो पूर्ण केला. हे त्यांचे अखेरचे लेखन म्हणता येईल.
विठ्ठ्ल रामजी शिंदे हे फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना १८९८ मध्ये त्यांनी जी रोजनिशी लिहिली, ते त्यांचे पहिले लेखन होय. लिव्हिंग्स्टनचे चरित्र वाचताना त्याने आपल्या प्रवासात लिहिलेले जर्नल अथवा रोजनिशीही त्यांच्या वाचण्यात आली. त्यावरूनच त्यांना रोजनिशी लिहिण्याची प्रेरणा झाली असावी असे वाटते. कारण फर्ग्युसनमधील या रोजनिशीची पहिली नोंद लिव्हिंग्स्टनच्या चरित्राबद्दलची आहे. विद्यार्थिदशेच्या या काळात त्यांच्या ठिकाणी आत्मविष्काराची ऊर्मीही प्रबळ असलेली आपल्याला आढळते. पुण्याच्या ह्या वास्तव्य काळात त्यांनी केळकर वाड्यामध्ये मित्रांचे एक चर्चामंडळ स्थापन केले होते. आत्माविष्काराची ही ऊर्मी किती प्रबळ आहे. हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, “पोटात घटकाभर विष आवरेल, पण नवीन विचार अगर एखादा सुंदर अनुभव मनाला घडला की, कोणातरी सहानुभूतीच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे.’’२
चर्चामंडळ स्थापण्यामागे जी आविष्काराची प्रबळ उर्मी होती तीच त्यांच्या रोजनिशी लेखनामागेही असणे स्वाभाविक आहे. फर्ग्युसनमधील रोजनिशीमध्ये शिंदे हे पुण्याच्या वातावरणातमध्ये जे जे अनुभवीत होते, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया प्रकट केलेल्या आहेत. या काळात सामान्यतः त्यांनी ऐकलेली व्य़ाख्याने, केलेले वाचन अथवा दृष्टीस पडलेले प्रसंग याबद्दलच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. शिंदे यांची कुतूहलबुद्धी तीव्र होती, त्यामुळे ते वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याते असोत, की डेक्कन कॉलेजात ना. गोखले यांच्यासारख्या वक्त्यांचे होणारे व्य़ाख्यान असो, ही व्याख्याने ते ऐकत होते. पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचे ते निरीक्षण करीत असत. त्यामुळे शिंदे यांची फर्ग्युसनमधील रोजनिशी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यातील पुण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वरूपाच्या संस्थात्मक जीवनावरील भाष्य आहे. शिंदे यांचे मन भावनाशील असले तरी त्यांच्या दृष्टीचा वस्तुनिष्ठपणा ढळत नाही. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळालेल्या व्यक्तींच्या प्रभावाचे दडपण त्यांच्या मनावर कधी येत नाही. म्हणूनच वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचा नि:सत्त्वपणा, न. चिं. केळकरांचा दुटप्पीपणा, शि. म. परांजप्यांच्या भाषणातील पोकळपणा अथवा अर्थपूर्णतेचा अभाव हा जसा ते स्पष्टपणाने नमूद करतात, त्याचप्रमाणे ना. गोखले यांच्या भाषणाचे मोकळेपणाने गुणगानही करतात. ह्या रोजनिशीतच सर्वस्वी व्यक्तिगत अशा प्रकारच्या आपल्या विकार-वासनांच्या प्रबळ उर्मीचा आविष्कार करतात, त्याचप्रमाणे मनात उदभूत झालेल्या उन्नत धर्मभावनेचा विकास रेखाटतात. अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबाबत आपण काहीएक कार्य करावयास पाहिजे ही तळमळ त्यांना लागून राहिली होती, याचेही चित्र या रोजनिशीत पाहावयास मिळते. ह्या काळात त्यांच्या मनाची काहीएक घडण होताना दिसत असली, तरी त्यांचे जे प्रगल्भ मन आधीच घडले होते, त्याचा आविष्कार होतानाही दिसतो. शिंदे यांच्या भावी जीवनात कार्यरूपाने अथवा विचाररूपाने त्यांच्या मनाचा जो आविष्कार झालेला आहे, त्याचे सारे कंद १८९८-९९च्या या रोजनिशीमध्ये पाहावयास मिळतात.
धर्मशिक्षणासाठी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ या कालावधीत ऑक्सफर्ड येथे केलेल्या वास्तव्यात लिहिलेली रोजनिशी तुलनेने मोठी आहे. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना ज्या सुट्या मिळाल्या, त्या त्यांनी इंग्लंडमधील त्याचप्रमाणे जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली या देशांतील रम्य व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी खर्च केल्या. इंग्लंडमध्ये दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करणा-या संस्थांचे जाणीवपूर्वक निरीक्षणही त्यांनी केले. इंग्लंडमधील वास्तव्यात ते धर्मशिक्षण तर घेत होतेच, त्याशिवाय विव्दानांची व्याख्याने ऐकीत, चर्चा व धर्मसाधना करीत, युनिटेरियन, कॅथॉलिक, एपिस्कोपल इत्यादी वेगवेगळ्या पंथांच्या देवळांत जात व चर्चामंडळांत सहभागी होत. परोपकारी कार्य करणा-या मिशनच्या संस्थांना ते भेटी देऊन तेथील कार्यपद्धतीचे अवलोकन करीत असत. इंग्लंडमधील रोजनिशीत अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती खच्चून भरलेली आढळते. शिंदे यांचा स्वभाव चौकस, निरीक्षण सूक्ष्म आणि नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्याचा त्यांचा उत्साह उदंड असे. आपण हिंदुस्थानात गेल्यावर समाजसुधारणा कोणत्या धर्तीवर करावी हा विचारही त्यांच्या मनामध्ये प्रबळ असणार म्हणून ऑक्सफर्ड येथाल वर्कहाऊसचे किंवा कंगालखान्याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेले दिसते. सुटीत प्रवास करताना फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली वगैरे देशांतील भव्य इमारती, सुंदर निसर्ग, चित्रशिल्प कलेचे उत्तमोत्तम नमुने हेही त्यांनी बारकाईने पाहून घेतले. शिंदे यांच्या या दोन्ही रोजनिशीत त्यांच्या मनाचा आध्यात्मिक पिंड, व्यापक मानवतावादी दृष्टिकोण व सर्वांगीण सुधारणेची तळमळ यांचा प्रत्यय येतो. त्यांचे मन व्यापक अर्थाने सौंदर्यासक्त असल्याचे जाणवते. निसर्गाकडे त्यांचे मन स्वाभाविकपणे आकृष्ट होते. मनुष्यस्वभावातील नैतिक सौंदर्याकडे आकृष्ट होणारी तरल संवेदनशीलता त्यांच्या ठिकाणी आहे. मात्र बाह्म भरक्याला भुलणारा त्यांचा स्वभाव नाही. त्यांची दृष्टी सदैव गाभ्यावर असते, म्हणून ते स्वाभाविकपणे बाह्म कवच भेदून अंतरंगाचे सौंदर्य, चांगुलपणा व नैतिकता पाहतात. व्यक्ती असो की परिस्थिती तिचे आकलन ते अंतर्भेदी वृत्तीने करतात, मात्र त्यांचे अंतरंग भावनामय असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांना कुठेही कोरडेपणा येत नाही.
विठ्ठ्ल रामजी शिंदे हे इंग्लंडंमध्ये अभ्यासार्थ असताना त्यांनी केलेले दुस-या प्रकारचे लेखन म्हणजे त्यांची प्रवासवर्णने होत. ते इंग्लंडला येणार हे ठरल्यानंतर सुबोधपत्रिकेचे संपादक द्वा. गो. वैद्य यांनी शिंदे यांच्याकडून प्रवासवर्णनपर पत्रे पाठविण्याची कबुली घेतलेली होती. त्याप्रमाणे शिंदे यांनी आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यकाळात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलची व विविध ठिकाणी बघितलेल्या सौंदर्यस्थळांबद्दलची व संस्थांबद्दलची माहिती सुबोधपत्रिकेत लेखरूपाने पाठविली. शिंदे यांनी या दोन वर्षांच्या काळात सुबोधपत्रिकेतून जे लेखन केले त्या लेखनाने सुबोधपत्रिकेच्या तत्कालीन वाचकाचे मन आकृष्ट करून घेतले. शिंदे यांच्याबद्दल फार चांगले मत व जवळीक प्रार्थनासमाजबंधूंच्या मनामध्ये निर्माण झाली. शिंदे यांनी शेक्सपिअर, वर्डस्वर्थ इत्यादी प्रतिभावंतांची स्थळे, इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील सरोवर प्रांत इत्यादींचे सुरेख वर्णन केले आहे. त्यांनी केलेले लंडन शहराचे वर्णन असो की, पारीसमधील निशाजीवनाचे वर्णन असो, ते यथातथ्य तर असतेच, शिवाय त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचाही आविष्कार त्यामधून होतो. त्यांचा ‘जनातून वनात व परत’ या शीर्षकाचा जो लेख आहे त्यामध्ये नव्या भांडवलशाहीतील शोषणाचे चित्र शहरात कसे दिसून येते व नीरव अशा सरोवर प्रांतातील देखावा याच्याविरूद्ध कसा दिसतो याचे अप्रतिम वर्णन केले आहे,३ इंग्लंडमधून पाठविलेल्या शिंदे यांच्या या लेखनाच्या परिणामासंबंधी सुबोधपत्रिकेचे संपादक व्दा. गो. वैद्य यांनी लिहिले आहे, “मन त्रस्त झाले असेल तेव्हा अगर विश्रांतीच्या वेळी या पुस्तकात प्रसिद्ध झालेली रा. शिंदे यांची केवळ विलायतेहून लिहिलेली पत्रे जे कोणी वाचतील त्यास रा. शिंदे यांचे निरीक्षणसामर्थ्य, कल्पकता, भाषेतील काव्य व रस अवलोकून समाधान वाटल्यावाचून राहणार नाही.”४
भारतामध्ये आल्यानंतर विठ्ठ्ल रामजी शिंदे यांनी १९०३ पासून धर्मप्रचार कार्याला प्रारंभ केला. ब्राह्मधर्माचे प्रचारकार्य आणि १९०६ पासून अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी त्यांना सदैव भारतभर भ्रमंती करावी लागत असे. तीसेक वर्षांच्या अवधीत त्यांनी भारताच्या बहुतेक सर्व प्रांतांतून प्रवास केला.कार्यानिमित्त केलेल्या प्रवासाबरोबरच त्यांनी विविध ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य प्रदेश हेही जाणीवपूर्वक पाहिले. परदेशात आणि भारतात त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दलचे एकंदर तीसके प्रवासवर्णनपर लेख आहेत.