अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक कार्याचे प्रारंभिक प्रयत्न

भारतात आणि महाराष्ट्रात इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतर येथे राजकीय व्यवस्थेत तर बदल झालेच; शिवाय ह्या नवीन इंग्रजी राजवटीचे आघात येथील सनातन अशा धर्मसंस्थेवर तसेच समाजव्यवस्थेवरही होऊ लागले. इंग्रजी शिक्षणाचा परिचय झालेली नवी पिढी अंतर्मुख होऊन आपल्या धार्मिक, सामाजिक जीवनाचा पुनर्विचार करू लागली व त्यामध्ये आढळून येणारी वैगुण्ये दूर करावी अशा प्रयत्नास लागली. समाजिक बाबतीतही सर्वात महत्त्वाची अशी बाब म्हणजे अस्पृश्यतानिवारणकार्याचा अग्र मान जोतीबा फुले ह्यांच्यारूपाने महाराष्ट्रासच मिळाला असे शिंदे ह्यांनी नमूद केले ते रास्तच आहे. जोतीबा फुले ह्यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि १८५२च्या आरंभी महार-मांगांच्या मुलांसाठी पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा मुंबई इलाख्यातच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासात अस्पृश्यांसाठी एका हिंदूने उघडलेली पहिली शाळा होय. सरकारी इन्स्पेक्टर मेजर कॅन्डीसाहेब ह्यांनी ह्या शाळेची परीक्षा घेऊन दिलेला अभप्राय २१ मार्च १८५२च्या ज्ञानप्रकाशच्या अंकात प्रसिद्ध झाला. “ह्या वेळेस शुद्ध लिहिणे व वाचणे वगैरे गोष्टींत ह्या शाळेतील मुलांनी विश्रामबागेतील (वरिष्ठवर्गाच्या) कित्येक मुलांपेक्षाही उत्तम परीक्षा दिली, असे मेजर साहेबांनी बोलून दाखविले.” ५ डिसेंबर १८५२च्या ज्ञानप्रकाशात पहिल्या वार्षिक रिपोर्टासंबंधाने संपादकांनी आपले मत दिले आहे, “त्यांनी एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ काढली. त्या कालावधीत व पुढेही त्यांना त्यांच्या जातीकडून फार त्रास सोसावा लागला. त्यांस शेवटी त्यांच्या तीर्थरूपांनी त्याच कारणावरून घरातून बाहेर काढले. आपल्या नीच मानलेल्या बंधुजनांस अज्ञानसागरातून काढून ज्ञानामृताचे सेवन देण्याकरिता त्यांनी संकटे भोगली हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे. आम्हीही त्यांचे आभार मानतो.” ह्या शाळेत चांभाराच्या मुलींना स्वतः जोतीबा व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई किती कळकळीने शिकवीत असत ह्याविषयी एक पत्र ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाले आहे. “त्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सखाराम यशवंत परांजपे ह्यांची जोतीबांना बरीच मदत असे. महारा-मांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे. ह्या लोकांस त्यांनी आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती.”१ अस्पृश्य मानलेल्या वर्गातील मुलांना शिक्षण देण्याचा व आपल्या घरातील विहिरीवर पाणी भरण्याची ह्या लोकांना परवानगी देऊन सामाजिक स्वरूपाच्या अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचा महात्मा जोतीबा फुले ह्यांचा हा प्रयत्न हिंदुस्थानच्या समाजव्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचा युगप्रवर्तक प्रयत्न म्हणावा लागेल.

बंगालमध्ये अस्पृश्यतानिवारण करण्याच्या कामाचा प्रारंभ बाबू शशिपाद बानर्जी ह्यांनी केला. बंगालमधील हावडा जिल्ह्यातील राबानगर येथे १८६४ मध्ये बानर्जींच्या प्रेरणेनेच ब्राह्मसमाजाची स्थापना झाली. त्यांचा जन्म १८४० मध्ये कुलीन ब्राह्मण जातीत झाला. त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला. बारानगर येथील मजुरांसाठी त्यांनी रात्रीच्या व दिवसाच्या शाळा काढल्या. शशिपाद बानर्जींच्या ह्या कामापेक्षा आणखी महत्त्वाचे काम म्हणजे स्वतः वर्तनाच्या द्वारा अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न. अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांमध्ये ते मोकळेपणाने मिसळत. मेहतरांसारख्या जातीतील अस्पृश्यांची प्रत्यक्ष ते सेवा करीत. त्यांच्यासारखा उच्चवर्णीय ब्राह्मण त्या वेळेस अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या आपल्यासारख्या माणसांच्या घरात आपल्याबरोबर जेवतो, गप्पागोष्टी करतो ह्यामुळे त्या वर्गातील लोकांना आपला बहुमान झाल्यासारखा वाटे. पं. शिवनाथशास्त्री ह्यांनी साधारण ब्राह्मसमाजाच्या १८७८च्या अहवालात तसेच मिस् कॉलेट ह्यांनी १८८०च्या वार्षिक पुस्तकामध्ये बाबू शशिपाद बानर्जी ह्यांनी बारानगर येथील ब्राह्मसमाजाच्या चालविलेल्या कार्याची माहिती दिली आहे. “सामाजिक सुधारणा मंडळी, सार्वजनिक वाचनालय आणि रात्रशाळा ह्या संस्थांचे व्यवस्थापना ज्यूट मिल्स कंपनीकडे असले तरी ब्राह्मसमाजाच्या द्वारा व बाबू शशिपाद बानर्जी ह्यांच्या प्रयत्नांमुळेच ह्या संस्था अस्तित्वात आल्या असल्या पाहिजे.”२ मजूरवर्गात असलेले मद्यपानाचे व्यसन सुटावे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एकंदरीत मजूरवर्गाची शैक्षणिक, नैतिक सुधारणा व्हावी ह्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा जोतीबा फुले ह्यांच्या प्रयत्नानंतरचा महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे शशिपाद बानर्जी ह्यांचाच होय.

१८७० मध्ये ब्रह्मानंद केशवचंद्र सेन हे विलायतेहून परत आले व त्यांनी मुंबईतील फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूटमध्ये एक व्याख्यान दिले. ह्या व्याख्यानात त्यांनी खालच्या जातीच्या उन्नतीसाठी मुंबई प्रार्थनासमाजाने काही कार्य करावे अशी सूचना दिली. त्या सूचनेला अनुसरून मुंबईच्या थीइस्टिक असोसिएशनने रात्रीच्या शाळा सुरू केल्या. मुंबई प्रार्थनासमाजाच्या पुढारी मंडळींनी असोसिएशनच्या ह्या कामात लक्ष घातले. प्रार्थनासमाजाचे प्रथम आचार्य श्री. भिकोबादादा चव्हाण ह्यांच्या पुढाकाराने १८७६ मध्ये चेऊलवाडी येथे मजूवर्गासाठी पहिली रात्रीची शाळा काढण्यात आली होती. अशा ५ शाळा असोसिएशनच्या वतीने चालविल्या जात असत. १८९० मध्ये महार-चांभार ह्या अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांकरिता मदनपु-यात एक स्वतंत्र शाळा उघडण्यात आली. १८९९ पासून थीइस्टिक असोसिएशन बंद पडल्यामुळे ह्या शाळांची व्यवस्था प्रार्थनासमाजाकडे आली. प्रार्थनासमाजाच्या वतीने दुसरी शाळा भायखळा येथे अस्पृश्यवर्गासाठी चालविण्यात येत असे.३

अस्पृश्यतानिवारणाचा प्रयत्न करणा-यांत श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांचा कालानुक्रमाने तिसरा क्रमांक लागतो. १८८३ पासून सयाजीरावमहाराजांनी अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मोफत शाळा उघडण्यास सुरुवात केली. १८८४ मध्ये सात व १८९१ मध्ये दहा शाळा झाल्या. हिंदू शिक्षक मिळत नसल्याने मुसलमान शिक्षकांवर त्यांना काम चालवावे लागले. १९०६ पर्यंत बडोदा संस्थानात अस्पृश्यवर्गासाठी २२ शाळा चालविल्या. वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची सोय केली व एकंदर १५०० अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. १९१० साली तर सयाजीरावमहाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला व त्यामुळे चित्र पालटून गेले. अंत्यज शाळांची संख्या २२ची २२८ झाली. अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या साडेपंधरा हजारांपर्यंत गेली. सुदैवाने पं. आत्मारामजी ह्या आर्यसमाजी कार्याकर्त्याने देखरेखीची जबाबदारी उचलली. अंत्यजवर्गाची धर्मकृत्ये करणा-या गरोडा ह्या त्यांच्या पुरोहित जातीच्या लोकांना धर्मकृत्ये संस्कृतमधून करता यावीत यासाठी संस्कृत शाळा उघडल्या. बडोदा, अमरेली, पाटण येथे अस्पृश्य मुलांसाठी तसेच मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली. पुढे श्री. भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत पीएच. डी. चा अभ्यास करण्यासाठी स्कॉलशिप दिली. लोकमताला आणि विरोधाला न जुमानता महाराजांनी हे काम नेटाने केले. सयाजीराव गायकवाड अस्पृश्य विद्यार्थ्यांन नुसते शिक्षण देऊनच थांबले नाही तर त्यांनी विविध खात्यांमध्ये नोक-याही दिल्या. १९११ साली शिक्षणखात्यात २००, लष्करात १९, म्युनिसिपालटीत १०, पोलिसांत ७, सर्व्हे खात्यात ३ आणि इतर ३ अशा एकंदर ३४२ अस्पृश्य व्यक्तींना सरकारी नोक-या दिल्या. विठ्ठल रामजी शिंदे हे १९०३ सालच्या अखेरीस विलायतेहू परतल्यानंतर अस्पृश्यवर्गांच्या शाळांची तपासणी करून अभिप्राय कळविण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर सोपविली होती, ह्याचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. महाराजांनी सुरू केलेले हे काम शिंदे ह्यांनाही प्रोत्साहक ठरले व अखिल भारतातील ब्राह्मधर्मप्रचारकार्य करीत असताना निरनिराळ्या प्रांतातील अस्पृश्यवर्गीयांची स्थिती निरखावी अशी प्रेरणा त्यांना ह्या कामामुळे मिळाली, असे त्यांनी स्वतः नमूद केले आहे.४

थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष कर्नल अल्कॉट यांनी अस्पृश्यतानिवारणाचा आणि त्यांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग म्हणून १८९४ मध्ये मद्रास शहरात अंत्यजवर्गासाठी पहिली शाळा एका झोपडीमध्ये काढली. १८९८ व १८९९ मध्ये आणखी दोन शाळा उघडल्या. १९०० सालामध्ये सर्व शाळांमधून ३८४ मुलगे, १५० मुली शिकत होत्या व १६ शिक्षक काम करीत होते. चवथ्या इयत्तेपर्यंत ह्या मुलांना हिशेब व व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविले जात. १९०३ सालच्या अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मद्रास शहरात सोसायटीने चालविलेल्या ४ नमुनेदार शाळा पाहिल्या.

दक्षिण भारतात अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठी व उन्नतीसाठी कार्य करणारे एक थोर सद्गृहस्थ म्हणजे के. रंगराव हे होत. केरळ प्रांती अस्पृश्यवर्गाचे विशेष हाल होत असत. मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी के. रंगराव ह्यांनी मंगळूर येथील आपली पहिली शाळा १८९७ मध्ये काढली. के. रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे गृहस्थ होते. अस्पृश्यवर्गासाठी ते काम करू लागल्यामुळे लोकांकडून त्यांना अतोनात छळ सहन करावा लागला. मात्र लोकविरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या संस्थेसाठी विस्तीर्ण जागा मिळवून इमारत बांधली. तसेच शाळेच्या जोडीने उद्योगशाळाही सुरू केली.

ब्रिटिश सरकार आणि ख्रिस्ती मिशने ह्यांनी अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याचे काहीएक प्रयत्न केले. परंतु सरकारच्या प्रयत्नाला नोकरशाहीचा अडथळा असे आणि धर्मांतराचा ध्यास हा मिशन-यांच्या कामातील अडथळा ठरत होता. मद्रासकडील ख्रिस्ती
मिशन-यांमध्ये तर शिंदे ह्यांना मोठाच दोष आढळून आला. ह्या रोमन कॅथॉलिक
मिशन-यांनी अस्पृश्यांना धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मात घेऊनसुद्धा अतिनीच अवस्थेतच ठेवले. ख्रिस्ती देवळात जाण्याचा त्यांना मज्जावच असे. ख्रिस्ती मिशन-यांचे काम जरी उदात्त हेतूने प्रेरित झालेले असले तरी त्यांच्या अस्पृश्यांसंबंधी कामाकडे हिंदू धर्मीय लोक विश्वासाने पाहू शकत नव्हते व अनेक अस्पृश्यांना धर्मांतर करूनसुद्धा लौकिक पातळीवर फायदा झाल्याचे अनुभवास येत नव्हते.

अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारण्याचे स्पृश्यवर्गातील पुढा-यांनी जे प्रयत्न केले ते वरीलप्रमाणे. ह्या बाबतीत स्वतः अस्पृश्यांनीसुद्धा आत्मोद्धाराची चळवळ केली. अशी चळवळ करणा-यांमध्ये कोकणातील गोपाळबाबा कृष्णाजी वलंगकर हे आरंभीचे एक मुख्य पुढारी होते. १८८६ मध्ये ते पलटणीतून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. ते म. जोतीबा फुले यांचे शिष्य होते. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी दापोली येथे ‘अनार्यदोषपरिहार समाज’ स्थापन केला. आर्य म्हणविणा-या हिंदूंनी अस्पृश्यांवर कशी बंधने लादली याबद्दल ते धर्मग्रंथ व पुराणे यांचा आधार घेऊन लेख लिहून भाषणे करून जागृत करीत असत. ह्याच विषयावर त्यांनी विटाळविध्वंसन अथवा विनंतीपत्र या नावाची एक पुस्तिका लिहिली.५ गोपाळबाबा वलंगकर हे विशेषतः प्रसिद्ध आहेत ते १८९३च्या अथवा १८९४च्या अर्जामुळे. इंग्रज सरकारने महार जातीतील लोकांची पलटणीत भरती करण्याचे थांबविले होते. ती लष्करभरती पुन्हा सुरू करावी यासाठी त्यांनी न्या. रानडे यांच्या साहाय्याने एक मोठा अर्ज तयार केला होता. ‘पण सैन्यातील निवृत्त झालेल्या महार अधिका-याच्या सह्यांच्या अभावी तो पाठविला नाही.’६ शतकानुशतकाच्या दडपणामुळे ह्या वर्गाची मनोवृत्ती कशी भित्री बनली होती याचे हे ढोबळ उदाहरण आहे. उच्चवर्णीय हिंदू असोत की, परकीय राज्यकर्ते इंग्रज असोत, ह्या वर्गातील लोक घाबरून वागत होते. शतकानुशतकाच्या रूढींचा त्यांच्या मनावर प्रचंड दाब होता. मोहपा (नागपूर) येथील अस्पृश्यवर्गाचे पुढारी किसन फागुजी बनसोडे हे पोस्टल मिशनची पुस्तके वाचून प्रार्थनासमाजाकडे वळले. १९०५च्या समाजाच्या उत्सवाला ते आले होते. पंधरा दिवसांच्या पाहुणचारात येथील मंडळींच्या हेतूंची व प्रयत्नांची त्यांना माहिती झाली. उत्सवाच्या अखेरच्या प्रीतिभोजनालाही हजर होते. यांनी ‘सोमवंशीय हितचिंतक समाज’ ही संस्था अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केली व महाराष्ट्रात सर्वत्र अशा प्रकारचे प्रयत्न व्हावेत या दृष्टीने काम चालू होते. आपल्या वर्गाच्या उद्धाराचे काम वरिष्ठवर्गाची मने न दुखाविता करीत राहावे; ह्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अस्पृश्यवर्गाच्या उद्धाराचे प्रयत्न चालविले होते. अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात(बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे हेडमास्तर, रावजी सदोबा गायकवाड शिक्षक, पुण्याचे शिवराम जानबा कांबळे हे अस्पृश्यवर्गीय पुढारी मोहपा येथील सोमवंशी हितचिंतक समाज ह्या संस्थेपासून प्रेरणा घेऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचे कार्य करीत होते. अस्पृश्यवर्गीय पुढा-यांकडून आपल्या वर्गाच्या उन्नतीचे जे काम चालले होते ते प्राधान्याने शालेय शिक्षण देण्याचे व आपल्या लोकांना वाईट सवयीचा त्याग करावयास लावून त्यांच्या अंगी उत्तम नागरी गुण बाणविण्याचे. हे प्रयत्न प्रामुख्याने स्थानिक पातळीवरचे होते. समाजामध्ये अस्पृश्यता पाळली जात असल्याने ह्या वर्गावर जो अन्याय होतो, त्यांना जो छळ सहन करावा लागतो, त्याविरुद्ध म्हणजे सामाजिक अस्पृश्यतेच्या विरुद्ध चळवळ करण्याचे धैर्य मात्र अद्यापि त्या लोकांमध्ये निर्माण झाले नव्हते आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळचा धार्मिक रूढीचा प्रचंड प्रभाव व त्यामुळे अस्तित्वात असलेले सामाजिक दडपणाचे वातावरण पाहता अस्पृश्य मानलेल्या वर्गातून असे धैर्य असणारा पुढारी उदयाला येणे संभवनीय नव्हते.

बहुसंख्य अशा स्पृश्यवर्गाच्या मनात पालट घडवून आणण्याचे काम ह्या काळात स्पृश्यवर्गातील कर्तबगार व्यक्तीनेच हाती घेणे आवश्यक होते.

विठ्ठल रामजी शिंदे हे या कामासाठी पुढे आले. स्पृश्यांच्या मनात असणारी अस्पृश्यतेची भ्रामक कल्पना नष्ट करून, पर्यायाने सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करून, दोन्ही वर्गांना एकाच पातळीवर आणणे त्यांना न्यायाच्या, धर्माच्या, समतेच्या व माणुसकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक वाटत होते.

संदर्भ
१.    अ. ए. गवंडी, फुलेचरित्र, पृ. ८.
२.    व्ही. आर्. शिंदे, दि थीइस्टिक डिरेक्टरी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, मुंबई, १९१२, पृ. १६.
३.    द्वा. गो. वैद्य प्रार्थनासमाजाचा इतिहास, पृ. ११३.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१०-२११.
५.    गोपाळबाबा वलंगकर, विटाळविध्वंसन, प्रथम प्रसिद्धी मौजे रावढूळ, जि. कुलाबा, १८८९, (संपा.) रोझॅलिंड ओ’हॅन्लन, डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, ‘प्रस्तावना,’ पृ. ४.
६.    श्री. वसंत मून यांनी रोझॅलिंड ओ’हॅन्लन यांना पत्राने कळविलेली माहिती. उदधृत, तत्रैव, पृ. ८.