इंग्लंडमधील रोजनिशी- टिपा१

 २६. दादाभाई नवरोजी (१८२५-१९१७) ह्यांनी डब्ल्यू. बी. बॅनर्जी ह्यांच्या सहकार्याने ह्या लंडन इंडियन सोसायटीची १८६५ मध्ये स्थापना केली. ह्या सोसायटीच्या स्थापनेपासून तो १९०७ पर्यंत ते अध्यक्ष व मृत्यु होईपर्यंत ऑनररी अध्यक्ष होते.

२७. `लंडन येथील बालहत्त्यानिवारक गृह` हा लेख. (लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. २१-२४).

२८. पोस्टल मिशनची माहिती मिळाल्यानंतर असाच धर्मप्रचारकार्याचा उपक्रम प्रार्थनासमाजामार्फत सुरु व्हावा असे वाटल्यावरून म. शिंदे यांनी श्री. वासुदेवराव सुखटणकरांना लिहिले व सुखटणकरांनी १९०२ मध्ये ब्राह्म पोस्टल मिशन काढून लहान लहान ब्राह्म व युनिटेरियन पत्रके यांच्याद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार सुरु केला. (बाबण बापू कोरगावकर, उनि., पृ. ४६). वासुदेवराव धर्मशिक्षणासाठी इंग्लंडास जाणार असे ठरल्यावर म. शिंदे यांनी सुबोध पत्रिकेत भगिनींना अनावृत्त पत्र लिहून या कार्याची माहिती दिली व हे काम करण्यासाठी त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले. (`सुशिक्षित धर्मभगिनीस अनावृत पत्र,` लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. ५१-५३).

२९. अँडॅम स्मिथ (१७२३-१७९०). सुप्रसिद्ध इंग्रज अर्थशास्त्रज्ञ. याचा `राष्ट्राची संपत्ती (वेल्थ ऑफ नेशन्स)` हा ग्रंथ क्रांतिकारक ठरला. त्यातील प्रतिपादन व्यक्तिस्वातंत्र्य, नैसर्गिक हक्क या कल्पनांना तसेच खुल्या व्यापाराच्या तत्त्वाला पोषक ठरले.

३०. सिजविक (१८३८-१९००). इंग्रज अर्थशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता. स्त्रियांना उच्च शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी झटला. मिल, बेंथॅमप्रमाणे उपयुक्ततावादी; परंतु त्याच्या भूमिकेत नैतिकतेवर भर होता.

३१. लॉर्ड ऑल्फ्रेड टेनिसन (१८०९-१८९२). सुप्रसिद्ध इंग्रज कवी.

३२. राजा राममोहन राय (१७७४-१८३३). प्रमुख बंगाली समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राह्मसमाजाचे संस्थापक. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न केला. १८३० मध्ये ब्राह्मसमाजाची स्थापना केली. दिल्लीच्या बादशहाचे वकील म्हणून गा-हाणी सांगण्यासाठी १८३० मध्ये इंग्लंडला गेले. १८३३ मध्ये ब्रिस्टल येथे मृत्यू.

३३. `इन्क्वायरर` हे इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाचे मुखपत्र. म. शिंदे यांनी The Romance of Social Reform in India या नावाचा निबंध मार्टिनो क्लबमध्ये वाचला व हिंदू गृहस्थितीचा देखावा प्रयोगरूपाने दाखविला. त्यांचा हा निबंध व प्रयोगाचे वर्णन ह्या `इन्क्वायरर` पत्रात १४ मार्च १९०३ मध्ये प्रसिद्ध झाले. (प्रस्तुत रोजनिशी, पृ. १५० व माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. १२२-२३). म. शिंदे यांचा हा निबंध उपलब्ध होऊ शकला नाही.

३४. इंग्लिश चर्चमध्ये धर्मोपदेशकांना महत्त्व देणारे ते हाय चर्च व तसे महत्त्व न देणारे ते लो चर्च.

३५. ही माहिती `बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली!` या शीर्षकाच्या लेखातून सुबोध पत्रिकेमध्ये (२४-८-१९०२) प्रसिद्ध. (लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. ३२-३४).

३६. `आपला व खालील प्राण्यांचा संबंध` या नावाचा लेख सुबोध पत्रिकेत (५-१०-१९०२) प्रसिद्ध. मुलांना उद्देशून लिहिलेल्या लेखात ह्या हकीगतीचा समावेश केलेला आहे. (कित्ता, पृ.५३-५४).

३७. `डेव्हनपोर्ट येथील गुड् फ्रायडे` ह्या शीर्षकाखाली ता. १०-४-१९०२ रोजी सुबोध पत्रिकेसाठी म. शिंदे ह्यांनी ही माहिती अधिक विस्ताराने व हुबेहुब वर्णन करणारी अशी पाठविली. (कित्ता,पृ. २६-२८).

३८ `बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास` (ता. २०-६-१९०२) व `राष्ट्रीय निराशा` (ता. २७-६-१९०२) हे दोन लेख सुबोध पत्रिकेत प्रसिद्ध. (कित्ता, पृ. २८ ते ३२.).

३९. शेक्सपीयरच्या जन्मस्थानाचे वर्णन व ते पाहून त्यांनी केलेले चिंतन `विभूतिपूजा` ह्या लेखात प्रसिद्ध. सुबोधपत्रिका, १९-१०-१९०२ (कित्ता, पृ. ३४-३६).

४०. इंग्लिश सरोवर प्रांतातील म. शिंदे यांचे वास्तव्य, तेथील सृष्टिसौंदर्य, व ते अनुभवून त्यांना येणारा श्रेष्ठ आध्यात्मिक अनुभव त्या अनुषंगाने घडणारे त्यांचे चिंतन ह्यांचा प्रत्यय देणारा `जनातून वनात व परत` ह्या शीर्षकाचा लेख म. शिंदे ह्यांनी लिहिला. (कित्ता, पृ. ५७-६८).

४१. डी क्विन्सीच्या The Reminiscences of the English Lake Poets ह्या पुस्तकात सरोवर प्रांतातील निसर्गाचे, बॉरोडेल दरीचे उल्लेख आढळतात; परंतु तोफेच्या प्रतिध्वनीचा उल्लेख सापडला नाही. कदाचित त्याच्या वर्तमानपत्री लिखाणातील हा उल्लेख म. शिंदे यांच्या वाचनात आला असावा.

 

४२. ह्या ओळी म. शिंदे यांनी आपल्या `जनातून वनात व परत` ह्या लेखात प्रस्तुत अनुभवाच्या संदर्भात उल्लेखिल्या असून त्याखाली माँटगोमेरी असे नाव लिहिले आहे. जेम्स माँटगोमेरी ह्या कवीच्या त्या असाव्यात. १८२९ मध्ये A. and W. Galignani ह्या कंपनीने पॅरिसमध्ये प्रसिद्ध केलेल्या The Poetical Works ह्या संग्रहात माँटगोमेरीच्या ह्या ओळी आढळल्या नाहीत.

 

४३. ह्या `पॉझ` हस्तलिखित पाक्षिक पत्रात प्राध्यापक व विद्यार्थी ह्यांवर विनोदी चुटकेही असत. प्रो. कार्पेंटर ह्यांच्यावर पुढील कविता होती -
Each day he does a mountain climb
A ten mile row, three meals, a witticism
And fills the intervening time
with Pali texts and Hebrew criticism.
शिंदे यांच्यावरील कविता अशी :
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints.

He is no vulgar fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.
(माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. १२६).

४४. उपरोल्लेखित `आमचा खालील प्राण्यांशी संबंध` ह्या लेखात शिंदे ह्यांनी ही हकीकत दिली आहे.

 

४५.  Fidelity ही कविता विल्यम वर्डस्वर्थने १८०५ मध्ये लिहिली व ती १८०७ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या कुत्र्याच्या एकनिष्ठेचे कथात्मक निवेदन ह्या कवितेत आहे.

४६. वर्डस्वर्थ हा म. शिंदे यांचा आवडता कवी असल्याने त्यांच्या 'जनातून वनात व परत` ह्या लेखात दिसून येते.

४७. इंग्लंडातील विल्यम बूथ व त्याची पत्नी कॅथरिन ह्यांनी धार्मिक व मानवतावादी कार्य करणारी संघटना १८६० च्या सुमारास स्थापन केली. १८७८ च्या सुमारास हिची सैन्याच्या धर्तीवर पुनर्घटना केल्यानंतर सॉल्व्हेशन आर्मी हे नाव प्राप्त झाले. ह्यातील कार्यकर्ते गणवेश धारण करणारे, तंबाखू आदि व्यसनापासून मुक्त असे असत. १९३१ मध्ये ह्या संघटनेचे ८४ देशांत कार्य चालू होते, एवढा तिचा विस्तार झाला.

४८. ग्रासमिअर खेड्यातील वर्डस्वर्थचे `डव्ह कॉटेज` हे कुटीर राष्ट्रीय स्मारक म्हणून राखले आहे. त्याचे वर्णन शिंदे यांनी वर उल्लेखिलेल्या `जनातून वनात व परत` ह्या लेखात विस्ताराने केले आहे. मूर्तिपूजेचा निषेध करणा-या कवीचीच अशा प्रकारे मूर्तिपूजा होत राहावी यातील विसंगती म. शिंदे यांना रुचली नसल्याचे ह्या लेखावरून जाणवते. (लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. ६३-६५).

४९. ही नोंद पुढील तारखेची आहे. स्त्रियांच्या उत्साहाचे उदाहरण म्हणून ह्या तारखेच्या रोजनिशीत विषयाच्या अनुरोधाने उल्लेख केलेला दिसतो.

५०. इंग्लंडमध्ये प्राचीन काळी अस्तित्वात असलेला, जादूटोणा इ. अतिभौतिकी सामर्थ्यांवर विश्वास ठेवणा-या लोकांचा धर्म. हे डरुइडपंथी वृक्षपूजक होते. विद्वत्ता व शहाणपणासाठी विख्यात. येथे वर्णन केलेल्या धर्तीची शिळावर्तुळे भारतातील काही प्रांतांत, विशेषतः दक्षिणेत आढळतात. विदर्भातील नागपूर-पार-शिवणी मार्गावरील नैकुण्ड येथे केलेल्या उत्खननांसंबंधी व शिळावर्तुळामध्ये मृताला पुरणा-या आदिवासींच्या संस्कृतीसंबंधीची काहीशी माहिती डॉ. शां. भा. देव यांच्या केसरी, दि. ७ मे १९७८ च्या `शिळावर्तुळे : संस्कृतीचे विलक्षण पान` ह्या लेखात पाहावयास मिळते.