इंग्लंडमधील रोजनिशी- टिपा२

   ५१. रॉबर्ट साउदे (१७७४-१८४३). इंग्रज कवी व लेखक. ह्याचे `लाइफ ऑफ नेल्सन` हे पुस्तक विशेष प्रसिद्ध.

५२. आधीच्या तारखेस भाटवडेकरांचा तपशील जसा दिला आहे तसा भाटे यांच्याबद्दलचा नाही. ह्या दोन्ही व्यक्तींबद्दल माहिती मिळू शकली नाही.

५३. होलीरूड हा एडिंबरो येथील राजवाडा. इ. स. ११२८ मध्ये बांधलेल्या मठाचा काही भाग त्यात समाविष्ट. राणी मेरीचा नवरा लॉर्ड डार्ने ह्याने तिचा इटालियन सेक्रेटरी रिझिओ याचा मत्सर वाटून तिच्यासमक्ष त्याचा वध ह्या राजवाड्यात केला. अघोर कृत्ये ह्या मेरीच्याच वेळी घडल्याचे उल्लेख आढळतात.

५४. सर वॉल्टर स्कॉट (१७७१-१८३२). सुप्रसिद्ध स्कॉटिश कवी आणि कादंबरीकार.

५५. रॉबर्ट बर्न्स (१७५९-९६). स्कॉटलंडचा राष्ट्रकवी मानला जातो. स्कॉटलंडच्या बोलीत याने काव्ये लिहिली. विशेषतः प्रेमकाव्यासाठी प्रसिद्ध.

५६. जॉन नॉक्स (१५१५-१५७२). स्कॉटिश धर्मसुधारक. कॅल्व्हिनच्या सुधारकी धर्ममताचा कट्टा पुरस्कर्ता. प्रॉटेस्टंट हा सा-या स्कॉटलंडचा धर्म व्हावा असा प्रयत्न केला.

५७. स्कॉटलंडची मेरी राणी (१५४२-१५८७) ही पक्की कॅथॉलिक व म्हणून जॉन नॉक्सची विरोधक होती.

५८. ह्या पोपटाची हकीगत `आमचा व खालील प्राण्यांचा संबंध` ह्या पूर्वी उल्लेखिलेल्या लेखात म. शिंदे यांनी दिली आहे.

५९. कार्तिकाचे दिवे ह्याचा अर्थ कार्तिक महिन्यात लावण्यात येणारे आकाशदिवे (महाराष्ट्र शब्दकोश, विभाग दुसरा, पृ. ७००). येथे, कागद कातरून तयार केलेले सुशोभित आकाशदिवे असा अर्थ अभिप्रेत दिसतो.

६०. स्कॉच बोलीत इंग्रजीतील `लेक` ला लॉख म्हटले जाते. स्कॉच सरोप्रांताचे वर्णनही पूर्वी उल्लेखिलेल्या म. शिंदे यांच्या `जनातून वनात व परत` ह्या लेखात आले आहे.

६१. स्कॉटच्या लेडी ऑफ दि लेक ह्या काव्यात एलनची कथा वर्णिलेली आहे. ह्या बेटाला Ellen's Isle हे नाव तिच्यावरूनच पडले.

६२.  समासात शिंदे यांनी ज्या शब्दांचे अर्थ अधोरेखित करून दिले त्या शब्दांवर आकडे टाकून ते कवितेच्या अखेरीस दिले आहेत. ही कविता स्कॉटलंडमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याचे गाइडबुकातील उल्लेखावरून दिसते.

६३. ही कविता उपलब्ध झाली नाही.

६४. मुलांना उद्देशून म. शिंदे यांनी माहितीपर लेख लिहिला. (लेख, व्याख्याने व उपदेश, कित्ता, पृ. ५५-५७).

६५. एक्सिटर हे इंग्लंडच्या नैऋत्य किना-यावरील गावाचे नाव.

६६. ऑर्थर राजाबद्दलच्या दंतकथेवरील हे काव्य टेनिसनने १८५९ मध्ये प्रथम लिहिले,

६९ मध्ये भर घातली व १८८५ मध्ये पूर्ण केले.

६७. फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल महादेव शिवारम गोळे यांनी `विद्याधर पंडित` ह्या टोपणनावाचे `हिंदुधर्म आणि सुधारणा` हा ग्रंथ लिहून पुण्यास १८९८ मध्ये प्रसिद्ध केला. सर्व ग्रंथाचा रोख हिंदू धर्मातील रूढ चालीचे समर्थन करण्याकडे आहे. येथे उल्लेखिलेल्या, लीलावती या पात्राचे विचार `विवाह पद्धतीसंबंधाने एका नवीन प्रयोगाची कल्पना` (पृ. २५६-२८६) ह्या प्रकरणात आले असून `कुटुंबात स्त्री किंवा पुरुष यांपैकी एक सेव्य व एक सेवक झाला पाहिजे. ज्याचे गुण व कर्तृत्व कमी (मग तो पुरुष असेल तर त्याने) सेवक व्हावे हे रास्त आहे` अशी तिची प्रारंभी कल्पना असते. विद्याधराचा उपदेश ऐकून तिचे हे मत बदलते व तिला उपरती होऊन नम्रता या गुणाची महती पटते व रूढीची बाजू ती उचलून धरते.

६८. प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाच्या `रिपब्लिक` या ग्रंथाच्या भाग ५ च्या प्रारंभी येथे उल्लेखिलेल्या स्त्रीपुरुषविषयक प्रश्नांची चर्चा आहे. निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष मांडण्यापेक्षा अनेक प्रश्न उपस्थित करणे व प्रत्यक्ष विचार करण्याची प्रक्रिया देणे हीच प्लेटोची प्रतिपादनाची पद्धती असल्याने म. शिंदे यांनी वरील मत मांडले असावे.

६९. मूळ रोजनिशीत पवनचक्कीचे ७ सें.मी. x ४ सें.मीं. असे चित्र म. शिंदे यांनी काढले आहे.

७०. ही त्यांनी आधी उल्लेखिलेली युनिटेरियन रोजनिशी असावी. उपलब्ध झाली नाही.

७१. ऑगस्ट डि कोंट (१७९८-१८५७) हा सुप्रसिद्ध प्रत्यक्षज्ञानवादी फ्रेंच तत्त्ववेत्ता. याचा सिद्ध केलेल्या गोष्टीवरच विश्वास व धर्मसत्तेस विरोध होता. १८४९ मध्ये `पॉझिटिव्हिस्ट कॅलेंडर` प्रसिद्ध करून त्यात ख्रिस्ती साधूंच्या ऐवजी जगातील सुधारणेच्या प्रगतीस मदत केलेल्या पुरुषांची नावे घातली.

७२. ह्या नोंदीतील हे अखेरचे वाक्य नंतर लिहिलेले दिसते.

७३. सदर पत्र उपलब्ध झाले नाही.

७४. ज्या हॉटेलात अण्णासाहेब शिंदे उतरले होते त्या हॉटेलचे नाव असलेल्या कागदावरच स्वतंत्रपणे ही माहिती लिहिलेली आहे. त्यावरूनच त्यांनी रोजनिशीत उतरून घेतली आहे.

७५. ही रोजनिशी उपलब्ध झाली नाही.

७६. ही पुरवणी म. शिंदे यांनी आधीच्या मजकुराप्रमाणेच २४ मार्च १९२६ रोजी अथवा त्यानंतर लगेच लिहिली असावी.