फर्ग्युसनमधील रोजनिशी - टिपा२

१६. बंडगार्डन्स नजीकच्या पुलासमोर येरवड्याच्या दिशेने एक मोठी टेकडी आहे. ह्या टेकडीवर जमिनीपासून सुमारे दीडशे ते पावणेदोनशे फूट उंचीवर हे लहानसे शिवाचे मंदिर आहे. गाभारा व समोरचा थोडा भाग डोंगरात कोरलेला आहे. त्यासमोर ब-याच अलीकडच्या काळात एक मोठा सभामंडप बांधलेला आहे. शिवमंदिराचे खोदकाम अकराव्या-बाराव्या शतकात झाले असावे. त्यानंतर अशी खोदकामे झाल्याची नोंद नाही. पुण्याजवळची सर्व शैलगृहे या काळातीलच आहेत. कदाचित येरवडा गावाचे हे स्थलदैवत असावे. (माहिती :  डॉ. म. श्री. माटे, पुणे, यांजकडून).

१७. माधव नारायण हुल्याळ (१८७३-१९५८). बी. ए., सरकारी नोकरी पत्करली. डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर असतानाच १९३१ ते ३७ पर्यंत भोर संस्थानचे दिवाण. १९३५ मध्ये रावसाहेबांचे `रावबहादूर` झाले. १९३८ ते १९४० रामदुर्ग संस्थानचे व १९४३ ते १९४६ पर्यंत जमखंडीचे दिवाण. येरवड्याच्या रोजनिशीत यांचाच उल्लेख आलेला आहे. (मुलाखत : श्री. बिंदुराव हुल्याळकर व श्री. व्ही. डी. ऊर्फ बाबूराव हुल्याळकर, जमखंडी).

१८. केशव रामचंद्र कानिटकर (१८७६-१९५४). जन्मगाव वाईजवळील धोम. म. शिंदे यांचे अखेरच्या काळापर्यंतचे निकट मित्र. फर्ग्युसन कॉलेजात १९०५ पासून शास्त्रविषयाचे प्राध्यापक व १९२१ ते १९२९ पर्यंत प्राचार्य. डे. ए. सोसायटी सोडल्यानंतर पुणे येथील मॉडर्न हायस्कूल, वाडिया कॉलेज ह्या संस्था काढण्यात पुढाकार. जातिभेद मानीत नसत. घरातील वातावरणही जातिभेद रहित. (मुलाखत : श्री. नरहर केशव कानिटकर; व हिस्ट्री ऑफ दि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (संपा.) पी. एम. लिमये, भाग २, पृ. २३१,३२).

१९. The Nineteenth Century, A Monthly Review by James Knowles, February 1898 मधील The Native Press in India (पृ. २६६-२७६) ह्या G. M. Chesney ह्यांच्या लेखाचा हा निर्देश हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे केवळ राजकारणापुरती बंदिस्त असून खेळ, संगीत, शास्त्र, साहित्य इत्यादिकांना, एवढेच नव्हे तर हा शेतकीप्रधान देश असून शेतीविषयाला जागा देत नाहीत. येथील लोकांना सरकार उलथून टाकायचे आहे परंतु पर्यायी व्यवस्थेची कल्पना त्यांच्या डोळ्यासमोर नाही. शिवाय, येथील लोकांना नोकरशाही नष्ट व्हावी असे वाटत नाही. दर दोन माणसामागे एकाची आकांक्षा सरकारी नोकरी मिळावी ही असल्याने नोकरीच्या जागा वाढवा अशीच त्यांची हाकाटी असते, अशी टीका ह्या लेखात केली आहे.

२०. हे तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे (१८७३-१९४९). म. शिंद्यांचे लहानपणापासून तो अखेरपर्यंतचे जिवाभावाचे मित्र. १९१७ च्या लखनौ काँग्रेसला उपस्थित व त्यानंतर काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश. १९२१ नंतर संस्थानी राजकारणात भाग. १९२७ मध्ये तेरदाळला सांगली संस्थान प्रजापरिषदेचे अधिवेशन व १९३० मध्ये दक्षिणी शेतकरी परिषद भरविण्यात पुढाकार. १९२८ मध्ये सारावाढ व तुकडेबंदी बिलाविरुद्ध म. शिंद्यांच्या प्रेरणेने चळवळ. १९३७ मध्ये मागडी येथील प्रजापरिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. ह्याच विष्णुपंत देशपांड्यांचे अनेक उल्लेख रोजनिशीत येतात. (मुलाखत व हस्तलिखित लेख : सौ. शकुंतलाबाई जमदग्नी, विष्णुपंतांच्या कन्या, कोल्हापूर; व मुलाखत : श्री. भाऊराव देशपांडे, विष्णुपंतांचे चिरंजीव, तेरदाळ).

२१.  नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे इंग्लंडला १८९७ साली वेल्बी कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी पुण्याच्या डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तेथून आल्यानंतरचे हे भाषण.
येथे उल्लेखिलेली मद्रास वेळ ही मुंबई वेळेच्या ३० मिनिटे पुढे व स्टॅन्डर्ड टाइमच्या ३९ मिनिटे मागे असायची.

२२. वैजनाथ काशीनाथ राजवाडे (१८६०-१९४४). निरुक्ताचे भाषांतरकार व वैदिक वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. १८८६ ते ९६ कराचीच्या डी. जे. कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक. १८९६ ते १९१६ पर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल.

२३. आयझॅक टॉडहंटर (१८२०-१८८४). हे इंग्रज गणिती. बीजगणित, भूमिती इ. विषयांवर अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. फर्ग्युसन कॉलेजच्या ग्रंथालयात यांची वीसेक पुस्तके आहेत.

२४. पेशरेकन ह्या शब्दाचा अर्थ प्रयत्न करूनही उपलब्ध होऊ शकला नाही. कथन, निवेदन असा अर्थ संदर्भावरून वाटतो.

२५. मंगळवार ता. २६ एप्रिल १८९८ च्या केसरीत शिवजयंत्युत्सवाचा कार्यक्रम कसा पार पडला याची माहिती आहे.

२६. प्रो. श्रीधर गणेश जिन्सीवाले (१८५२-१९०३). काही काळ विल्सन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक. पुराणमताभिमानी. वक्तृत्वोत्तेजक मंडळी, वसंत व्याख्यानमाला, सार्वजनिक सभा इ. संस्थांच्या कार्यात भाग. `सभेत दीड-दोन तास बोलत. बोलताना गाडी कुठे वाहवत जाईल याचा नेम नसे. त्यांचे धर्माचरण कडक, विद्वत्ता जाडी, आणि वक्तृत्व तर भारी पल्लेदार, प्रभावी होते.` (दत्तो वामन पोतदार,  लो. टिळकांचे सांगाती, पुणे, केसरी प्रकाशन, १९७५, पृ. ३९-४०).

२७.  `दुसरे दिवशी म्हणजे तृतीयेस संध्याकाळी प्रो. परांजपे यांचे भारतातील वनपर्वामधील पांडव विराट सदनी जाण्यापूर्वी तेथे गेल्यावर त्यांनी कशी वागणूक ठेवावी या विषयावर धौग्य ऋषींनी केलेला नीतिबोध या विषयावर पुराण झाले.` (केसरी, २६ एप्रील १८९८, पुणे).
`शिवाजी उत्सव,  गणपती उत्सव,  दुष्काळी चळवळ  या सर्व प्रारंभीच्या टिळकांच्या चळवळीत त्यांनी धडाडीने भाग घेतला... याच सुमाराला त्यांनी जागृतीची एक नवी टूम काढली. ते देवळात पोथी पुढे ठेवून पुराण सांगत. अर्थात हा थाट पुराणाचा असला तरी आतला घाट राजकारणाचा असे.`
(वामन कृष्ण परांजपे, शिवरामपंत परांजपे-व्यक्ती, वक्तृत्व, वाङ्मय, पुणे, चित्रशाळा प्रकाशन, १९५४, पृ. ३८).

२८. श्रीमंत सयाजीराव महाराजांकडून म. शिंदे यांना द. म. रु. २५ ची स्कॉलरशिप १८९६ पासून मिळत होती. बी. ए. च्या परीक्षेत १८९७ साली नापास झाल्यामुळे स्कॉलरशिपचा अर्ज करण्याचा संकोच त्यांना वाटत असावा.

२९. मोती बुलासा (१८६९-१९००). मध्यप्रदेशातील मारवाडी बनिया जातीचे गृहस्थ. खांडवा, नागपूर येथे शिक्षण झाल्यावर १८९५ मध्ये डे. ए. सोसायटीत आले व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक झाले. प्रार्थनासमाजी बनले. युनिटेरियन स्कॉलरशिप मिळाल्यावर तौलनिक धर्माचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबर १९०० मध्ये इंग्लंडला निघाले असता वाटेत पोर्ट सैदला वारले. ह्यांच्या मृत्यूनंतर रिकामी पडलेली स्कॉलरशिप घेऊन अण्णासाहेब शिंदे इंग्लंडला धर्म शिक्षणासाठी गेले.

३०. विष्णुपंत देशपांडे, तेरदाळकर ह्या जिवलग मित्रास उद्देशून कथन केलेले मनोगत.

३१. विधुरावस्था हा शब्द पत्नीविरहित एकाकी अवस्था ह्या अर्थाने वापरलेला दिसतो. विधुर ह्या शब्दाचा व्यंग, अपूर्ण असाही एक अर्थ शब्दकोशात आहे. (महाराष्ट्र शब्दकोश, विभाग सहावा, पृ.२८३४).

३२. विष्णू वामन मोडक (१८६८-१९१८). शिक्षण मॅट्रिकपर्यंत. इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व. `एडव्होकेट ऑफ इंडिया` या वृत्तपत्राचे सबएडिटर. दोन वर्षे `इंदुप्रकाश`चे संपादक. इंग्रजी आणि मराठी भाषेतील नामांकित वक्ते. लो. टिळकांवर यांनी लिहिलेले `दि ब्रेव्हेस्ट ऑफ दि ब्रेव्ह` हे काव्य सरकारने जप्त केले. (मोडक-कुल-वृत्तांत, (संपा.) मोरो हरी खरे, पुणे, १९४६, पृ. २३८).
१८९८ च्या आधी वसंत व्याख्यानमालेत १८९५ साली `राज्यक्रांत्या` ह्या विषयावर इंग्रजीत व्याख्यान.
(माहिती : श्री. म. श्री. दीक्षित, पुणे, यांजकडून).

३३. रामचंद्र अण्णाजी कळसकर. "त्यानंतर (प. वा. श्री. जोतिबा फुले यांच्या प्रयत्नानंतर) ह्या हतभागी लोकांकडे ज्या दुस-या उदार अंतःकरणाच्या पुरुषाचे लक्ष गेले, ते परलोकवासी श्रीयुत रामचंद्र आण्णाजी कळसकर हे होत. ह्यांनी प्रथम `वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी` नावाची संस्था वांगी येथे स्थापन करून नंतर ती बारामती येथे नेली. ह्या संस्थेच्या आश्रयाखाली त्यांनी महार लोकांकरिता खेड्यातून काही शाळा उघडल्या होत्या; पण त्या फार दिवस चालल्या नाहीत; हे काम भरपूर द्रव्यसाहाय्याशिवाय नावारूपास येणे शक्य नव्हते." (विठ्ठल रामजी शिंदे, `निराश्रित साहाय्यक मंडळी,` लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. १०९,११०).

३४. काशीनाथ बाळकृष्ण मराठे (१८४४-१३ नोव्हेंबर १९१८). डेक्कन कॉलेजमधून बी. ए. झाल्यानंतर न्यायखात्यात नोकरी. १९०१ मध्ये सबजज्जाच्या जागेवरून निवृत्त. नंतर १२ वर्षे डेक्कन कॉलेजात संस्कृतचे ऑनररी प्रोफेसर. काही काळ पुणे प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष. `वेदाविषयी निबंध` व `नावल व नाटक ह्याविषयी निबंध` एवढे प्रमुख लेखन. तुकारामाच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर.

३५. "मालेबाबतचा नेमस्त, सुधारक इत्यादींचा हा तटस्थ पवित्रा लक्षात घेऊन याच साली मालेची व्याख्याने हिराबागेसारख्या दूरच्या गैरसोयीच्या ठिकाणी न करता शहरात अन्य जागी करावीत असा `केसरी` तून प्रचार होऊ लागला. रानड्यांची अनुपस्थिती, त्यांच्या चाहत्यांचा अलिप्तपणा, आणि सार्वजनिक सभेतील टिळकांचे वर्चस्व या गोष्टी जमून आल्यामुळे मालेचे स्थित्यंतर सोपे झाले. यानंतर १८९८ ते १९०३ ही पाच वर्षे मालेचे सत्र दाणेआळीतील सार्वजनिक सभेच्या नवीन दिवाणखान्यात भरले." (म. श्री. दीक्षित, वाटचाल : वसंत व्याख्यानमाला स्मरणिका, पुणे, कार्यवाह वसंत व्याख्यानमाला, १९७४, पृ. १४).