येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी - टिपा२

२१. श्री. कृ. भा. बाबर यांनी मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी म. शिंदे यांचे चरित्र `कर्मवीर विद्यार्थी` या नावाने लिहून एप्रिल १९३० मध्ये प्रसिद्ध केले.

२२. बौद्ध धर्म व तत्त्वज्ञान यांचे गाढे अभ्यासक श्री. धर्मानंद कोसंबी यांनी श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरून फेब्रुवारी १९१० मध्ये बडोद्यास दिलेल्या व्याख्यानांच्या आधारे तयार केलेले हे पुस्तक निर्णयसागर प्रेसने मुंबई येथे एप्रिल १९१० मध्ये प्रसिद्ध केले.

२३. केशवचंद्र सेन (१८३८-८ जानेवारी १८८४) यांनी १८८१ मध्ये स्थापन केलेला ब्राह्मसमाजाचा उपपंथ. केशवचंद्र हे १८६२ मध्ये बंगालमधील `आदि ब्राह्मसमाजा`चे आचार्य होते. १८६६ मध्ये इतरांशी मतभेद झाल्यावर `भारतवर्षीय ब्राह्मसमाज` त्यांनी स्थापन केला. १८७८ मध्ये ह्या समाजातून फुटून पं. शिवनाथ शास्त्री वगैरेंनी `साधारण ब्राह्मसमाज` स्थापन केला. १८८१ मध्ये केशवचंद्रांनी सर्व राष्ट्रे, लोक, धर्म, लोकाचार, भक्तिमार्ग, वैराग्यसाधने यांचे एकत्व सांगणारा `नवविधान पंथ` स्थापन करून आपण स्वतः व इतर बाराजण ईश्वराचे प्रेषित असल्याचे घोषित केले. केशवचंद्रांचा हा पंथ ख्रिस्ती वळणावर अधिक होता.

२४. हरिभाऊ तुळपुळे (९ जुलै १८८५ - १० सप्टेंबर १९५७). पुण्यातील निष्ठावंत, स्वार्थत्यागी काँग्रेस कार्यकर्ते. देशकार्यासाठी पुष्कळ पैसा खर्च केला. आयुष्यातील सात-आठ वर्षे तुरुंगवासात काढली. १९३७ मध्ये मुंबई विधिमंडळावर निवडून गेले. सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन कार्य केले. (माहिती : श्रीमती कमलाबाई भागवत, पुणे).

२५. रा. हे राजमान्य शब्दाचे संक्षेपचिन्ह असावे व `हा. कर` हा हारोलीकर या नावाचा संक्षेप असावा. श्री. हारोलीकर नावाचे कार्यकर्ते १९२८ पासून येरवड्याच्या तुरुंगात अडीच वर्षांची शिक्षा भोगीत होते, व तेथे ते आजारीही होते.

२६. येथे उल्लेखिलेले अमितगती आचार्य हे जैन कवींत विद्वान आचार्य म्हणून प्रसिद्ध. काळ अंदाजे इ. स. ९७९ ते १०२१. तत्त्वभावना ह्या त्यांच्या ग्रंथात जैन तत्त्वज्ञानातील सात तत्त्वांची महती व तद्विषयक चिंतन आहे. बृहत् सामायिक पाठापैकी `सामायिक पाठ` ऊर्फ `भावना द्वात्रिंशिका` हा ३२ श्लोकांचा भाग अमितगती आचार्यांचा असून यामध्ये प्रत्येक जीवात आत्मा असतो, मनुष्ययोनीत राहूनच आत्मा स्थिर करता येतो, व जन्ममरणाचा फेरा चुकविता येतो, असे प्रतिपाद आले आहे. (माहिती : जैन ज्ञानकोशाचे विद्वान कर्ते श्री. मोतीलाल हिराचंद गांधी, औरंगाबाद).