प्रकरण ११. भारतीय निराश्रित साह्यकारी (2)

१९०१ सालच्या खानेसुमारीवरून असें सिध्द होतें कीं, हिंदु लोकांपैकीं एकचतुर्थांश लोकसंख्या हीन मानलेल्या अंत्यज लोकांची आहे; व मुसलमान लोकांपैकीं जवळजवळ एकसप्तमांश लोकसंख्या हीन मानलेल्या अर्जालू लोकांची आहे. ह्या हीन मानलेल्या मुसलमानांची संख्या विचारांत न घेतां नुसत्या हिंदु अंत्यजांची संख्या हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येशीं ताडून पाहिली तरी ही तिच्या एकषष्ठांशाहूनहि अधिक भरते. म्हणजे प्रत्येक सहा हिंदी माणसांत (मग ते कोणत्याहि जातीचे, धर्माचे अगर रंगाचे असोत) एक अगदीं टाकाऊ शिवून घेणेस देखील अयोग्य असा मनुष्यप्राणी सांपडतो.

पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला आहे. तो हाकीं जवळजवळ साडेपांच कोटी प्रजेनें अशा हीन स्थितींत राहून चालेल काय ? हिंदु समाज तर आपला सोंवळेपणा सोडावयाला तयार नाहीं आणि तो सोंवळेपणा जोंपर्यंत कायम आहे तोंपर्यंत ह्या हीन जातीला पुढें सरकावयाला जागा नाहीं. तर मग हें व्हावें कसें ? इतक्या सगळयांनीं एकदम ख्रिस्ती व्हावें ! यक्षिणीची कांडी फिरवून इतक्या लोकसमुदायाला एकदम कोणी ख्रिस्ती करील म्हणावें तर तें संभवनीय नाहीं. तथापि हिंदु लोकांची उदासीन विस्कळीतता शाश्वत राहिली तर मात्र वरील चमत्कारहि घडण्याचा संभव आहे. असा प्रकार खरोखरीच घडून आला तर राष्ट्रीय दृष्टया काय प्रकार होईल पहा. हल्लीं भारतीय साम्राज्यांत खालील प्रमाणें लोकसंख्या आहे : -

(इतर १५  + हीन ५॥ मिळून) २० ॥ कोटी हिंदु लोक.

(इतर ५  + हीन १ मिळून) ६ कोटी मुसलमान.
३० लक्ष ख्रिस्ती.
१ कोटी जंगली.
१ कोटी बुध्द, जैन, शीख वगैरे.

हिंदु समाजाची उदासीनता आणि ख्रिस्ती समाजाची चळवळ आतांप्रमाणेंच कायम राहील तर पुढें खालील प्रमाणें गणना होण्याचा संभव आहेः-

१५ कोटी हिंदु, ६ कोटी मुसलमान.
७ कोटी ख्रिस्ती, १ कोटी बुध्द, जैन, शीख.

म्हणजे राष्ट्रीय दृष्टया आतां जी हिंदु-मुसलमानांची दुही आहे तिच्या ऐवजी, वरील प्रकार घडलाच तर हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती यांचा तिरपगडा होणार! १५ कोटी मवाळ हिंदु आणि जवळ जवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून, या तिघांचें सूत कसें जमणार ईश्वर जाणें !


ता. १८ ऑक्टोबर १९०६ रोजीं कार्तिकी वर्षप्रतिपदेचा शुभदिवस उगवला. दोनच दिवसांपूर्वी मुंबई प्रार्थना समाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला यांनीं अशा मंडळीची स्थापना होऊन काम सुरू व्हावें म्हणून १००० रु. दिले होते. दिवाळी पाडव्याच्या शुभ दिवशीं सकाळीं ९ वाजतां मुंबई येथील एल्फिन्स्टन रोड लगतच्या मुरारजी वालजी यांच्या बंगल्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडून प्रार्थना समाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्यांनीं स्वतः जमलेल्या मुलांना पहिला धडा घालून दिला. त्यांनीं आपल्या भाषणांत पुढील सूत्रवाक्य सांगितलें. "ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्यानें आम्ही स्वतःलाच वर आणीत आहोंत. हें पवित्र कार्य करीत असतां ह्या लोकांचा आम्ही उध्दार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणांत न शिरो. आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळें जी अधोगती मिळाली आहे ती टळून सर्वांचा सारखाच उध्दार होणार आहे, असा साधा आणि सात्विक भाव आम्हांमध्यें निरंतर जागृत राहो.” ह्यास अनुसरून मंडळीचें काम सुरू झालें.

मंडळीची पहिली कार्यकारी समितिः- अध्यक्ष-सर नारायण गणेश चंदावरकर, उपाध्यक्ष-शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, जनरल सेक्रेटरी-श्री. विठ्ठल रामजी शिंदे, खजिनदार - रा. रा. नारायण भास्कर पंडित, सुपरिंटेंडेंट - डॉ. संतुजी रामजी लाड, पहिले शिक्षक-लक्ष्मणराव मल्कू सत्तूर.

पहिल्या तीन वर्षांच्या शेवटीं संस्थेच्या कार्याची खालीप्रमाणें वाढ झाल्याचें आढळतें.

मुंबईंतील मध्यवर्ती शाखेच्या संस्था : - १. परळ येथील शाळा-मराठी ५ इयत्ता व इंग्रजी ४ इयत्ता, शिक्षण ७, पटावरील मुलांची संख्या १७५. मोफत दवाखाना, पुस्तक बांधणें आणि शिवण कामाचा वर्ग.
२. देवनार येथील प्राथमिक शाळा - २ शिक्षक, ४७ मुले, मराठी ४ इयत्ता.
३. मदनपुरा प्राथमिक शाळा - ४ शिक्षक, १५० विद्यार्थी, मराठी ५ इयत्ता.
४. कामाठीपुरा गुजराथी शाळा - ही भंगी लोकांसाठीं मुंबईंतील पहिली शाळा होय. शिक्षण मिळणें दुर्मिळ झालें, तरी देखील १ शिक्षक, आणि ५१ विद्यार्थी.
५. रविवारच्या शाळा - एक परळ येथें व दुसरी मदनपुरा येथें. धर्म आणि नीति शिक्षणाच्या शाळा.
६. भजनसमाज - एक परळ येथें व दुसरा मदनपुरा येथें. पोक्त मंडळी भजनासाठीं आणि उपदेशासाठीं जमत आणि उपासना चालवीत.
७. व्याख्यानें - वेळोवेळीं उपयुक्त विषयावर.
८. परस्पर सहाय्यक चामडयाचा कारखाना - शशिभूषण रथ व दुस-या एका जर्मन तज्ज्ञाच्या नेतृत्वाखालीं नवीन त-हेचे बूट करण्याचा कारखाना काढला. सुरवातीचें भांडवल २००० रु.
९. निराश्रित सेवासदन - दोन तरुण गृहस्थ आणि तीन स्त्रिया यांच्या सहाय्यानें हें सदन उघडण्यात आलें. या तीन स्त्रिया गरीब लोकांच्या घरीं समाचाराला जात. आजा-यांची शुश्रूषा करीत, निराश्रितांना सदनांत आणीत, शिवण्याचा वर्ग आणि बायकांचा वर्ग चालवीत. तरुण गृहस्थ सर्व संस्थांची देखरेख करीत. परळ शाळेंतील सुमारें १२ विद्यार्थी यांची जेवण्याखाण्याची सोय सदनांतील वसतिगृहांत केली जाई.
१०. Purity Servant या  नांवाचे इंग्रजी मासिक दर महिन्याच्या १५ तारखेला प्रसिध्द होत असे. त्यांत मद्यपान निषेध व इतर सामाजिक विषयांवर लेख येत. आणि मिशनची सर्व बातमी प्रसिध्द होई. ह्याचे संपादक श्री. वा. स. सोहोनी हे होते. ह्याशिवाय मुंबईबाहेर खालील शाखा होत्या.
१. पुणें - (१) दिवसाची शाळा. (२) रात्रीची शाळा (३) भजन समाज. (४) चर्चामंडळ. शाळांतील पटावरील संख्या अनुक्रमें १४९, २५, ३३.
२. मनमाड - १ रात्रीची शाळा, ४५ विद्यार्थी.
३. इगतपुरी - १ दिवसाची शाळा, ६८ मुलें. ही शाळा दोन महार तरुणांनीं चालविली होती. शिवाय रविवारची धर्मशिक्षणाची शाळा व धर्म समाज चालू होते.
४. इंदूर - १ रात्रीची शाळा, २० विद्यार्थी.
५. अकोला - २ रात्रीच्या शाळा, ७२ विद्यार्थी, १ भजन समाज, १ विद्यार्थी वसतिगृह.
६. अमरावती - २ रात्रीच्या शाळा, ५३ विद्यार्थी.
७. दापोली - १ दिवसाची शाळा, ३७ विद्यार्थी, ह्याशिवाय मुलांना विद्यार्थी वेतनें मिळत.
८. मंगळूर - १ दिवसाची शाळा, ४९ विद्यार्थी. हातमागाचा विणण्याचा कारखाना. सर्व मुलांना दुपारचें जेवण मिळे. ७ मुलें मोफत वसतिगृहांत रहात.
९. मद्रास - १ पारिया जातीच्या अस्पृश्यांसाठीं दिवसाची शाळा, २३ विद्यार्थी, १ चांभारासाठीं दिवसाची शाळा, विद्यार्थी २९.
१०. महाबळेश्वर - मे १९०९ सालीं गव्हर्नरच्या बंगल्यावर लेडी म्यूर मॅकेंझी यांच्या आश्रयाखालीं मिशनच्या हितचिंतकांची सभा भरली. महाबळेश्वरचे सुपरिंटेंडंट मेजर जेम्सन हे अध्यक्ष होते. पूर्वी जमलेला ९०० रु. चा फंड मिशनला देण्यांत आला  आणि ही शाखा उघडली. दोरखंड तयार करणें, वेताचें विणकाम करणें वगैरे कामें होत.
 ११. नाशिक - १९०९ सप्टेंबर मध्यें जनरल सेक्रेटरी ह्या जिल्ह्यांत दौ-यावर गेले असतांना नाशिक येथें जाहीर सभा होऊन जिल्ह्याची कमिटी नेमण्यांत आली. जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन ह्यांस अध्यक्ष नेमण्यांत आलें. येणें प्रमाणें तिसरे वर्षाच्या अखेरीस ह्या मिशनच्या १२ शाखा, १६ दिवसांच्या प्राथमिक शाळा, १०१८ विद्यार्थी, सहा
रविवारच्या शाळा, ५ भजन समाज, ४ उद्योग शाळा, ७ मिशनरी-वाहून घेतलेले कार्यवाह आणि एक मासिकपत्र इतकी वाढ झाली.