प्रकरण ११. भारतीय निराश्रित साह्यकारी

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना
अमावास्येची काळोखी रात्र, १९०५ सालचे उन्हाळयांतले दिवस, अहमदनगरच्या समाजाच्या उत्सवासाठीं मी तेथें गेलों होतों. नेहमींचीं दगदगीचीं कामें करून मीं नुकतेंच कोठें जमिनीला अंग टेकलें होतें. अवचित् कांहीं अस्पृश्य वर्गाचें एक शिष्टमंडळ रात्रीं १२ वाजतां मला भेटण्यास आलें. भिंगार म्हणून अहमदनगराहून चार मैलांवर एक खेडेगांव आहे. तेथील स्थानिक अस्पृश्यांनीं अशा वेळीं एक मोठी जाहीर सभा बोलाविली होती. तिचें अध्यक्षस्थान स्वीकारून मीं चार शब्द सांगावेत म्हणून आमंत्रण करण्यासाठीं हें शिष्टमंडळ अपरात्रीं आलें होतें. नित्याप्रमाणें माझेबरोबर स्वामी स्वात्मानंद हेहि होते. “चला स्वामिजी, जाऊं या.” “कायहो, कोण हे लोक, काय ही सभा, अगाऊ तपास केल्याखेरीज एकाएकीं कसें जावयाचें?” स्वामिजी किंचित् त्रासून उद्गारले. “स्वामिजी, सत्कार्यांला काळ वेळ मुहूर्त लागत नाहीं. सभेच्या ठिकाणीं गेल्याशिवाय तुमच्या शंकेला उत्तर मिळणार नाहीं. भलताच कांहीं प्रकार जर घडलाच तर तुमच्या हातांत दंडा आहेच. आणखी मग काय पाहिजे.”

स्वामिजींना चेव आला. “बेशक चलीये,” म्हणून ते टांग्यांत बसले. गांवाच्या हद्दीवर महारवाडयांत उतरलों. मोठमोठे हिलाळ पेटलेले होते. लहान थोर, बायकामुलें यांनीं गजबजलेली सभा वाट पहात बसली होती. आम्ही गेल्याबरोबर टाळयांच्या प्रचंड गजरांत स्वागत झालें. खेडयाचा गांव मागासलेल्या समाजाचा एवढा जमाव जमलेला पाहून स्वामिजी आश्चर्य पावले. ही सभा अशा अवेळीं कां बोलविली असें चालकांना विचारलें. “साहेब, आम्ही गरीब लोक, दिवसभर कष्टानें राबून बायकामुलांनीं यावें तर हिच्याशिवाय दुसरी वेळ कोणती? तशांत आम्ही सर्व चालक मंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गांवच्या परकीय साहेबांच्या घरगुती कामांत गुंतलेलों. आम्हांलाहि यावेळेपूर्वी हूं कां चूं करण्यास वेळ मिळत नाहीं. आपल्यास तसदी दिली याची माफी असावी.”  माझ्या अंतःकरणांत चक्क उजेड पडला. ह्या लोकांची हजारों वर्षांची कहाणी अभ्यासून हिंदुस्थानांतील प्रांतोप्रांतींची माहिती घेऊन सद्यःस्थिति स्वतः निरखून माझें मन हळुवार झालें होतें. अधिक खुलासा नको होता. स्वामिजींच्याहि सर्व शंका तत्काळ मिटल्या. आणि कामास सुरवात झाली.

किसन फागू बंदसोडे आणि व-हाड नागपूरकडील इतर अस्पृश्य पुढारी यांनीं सोमवंशी हितचिंतक समाज ही संस्था त्या प्रांतीं काढली होती. त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात (बटलर), पांडुरंग लक्ष्मण डांगळे (मुख्याध्यापक), रावजी सदोबा गायकवाड (शिक्षक) वगैरेंनीं ही सभा बोलावली होती . ह्या मंडळींचे आत्मसुधारणेचे कामीं पुण्यांतील पुढारी शिवराम जानबा कांबळे यांच्या मदतीनें ठिकठिकाणीं अलिकडे चार पांच वर्षें प्रयत्न चाले होते. मोहपा (नागपूर) येथील मंडळींकडून आलेलें छापील जाहीर पत्रक जमलेल्या सभेस वाचून दाखविण्यासाठीं माझे हातीं दिलें. त्यांतील उद्देश मला फार बोधपर वाटले. हजारों वर्षें वरच्या जातीचा जुलूम सहन करूनही या पत्रकांत त्यांच्या उलट निंदा अथवा निषेधपर एक अवाक्षरहि काढलेलें आढळलें नाहीं. उलट वरिष्ठ वर्गांचीं मतें विनाकारण न दुखवता, किंबहुना कोणत्याहि प्रकारें त्यांच्या उलट वाटेस न जाता अस्पृश्यवर्गांनीं आपल्या स्वतःच्या हिताचे प्रयत्न करावे असा अर्थाचा एक उद्देश वाचून माझी स्वतःची जागृती झाली. हा विशेष उद्देश सभेला मी नीट समजावून सांगत असतां स्वतः माझ्यामध्यें हें उद्गाराचें काम आपण स्वतः अंगावर घेऊन विशेषतः या कामांत स्वतःचें भावी चरित्र वाहून घ्यावें अशी प्रेरणा जोरानें होऊं लागली होती. इतर सर्व कामें टाकून एक घडीचाहि वेळ न दवडतां ह्या कार्यास लागावें असा संकल्प परमेश्वराला स्मरून ह्याच रात्रींच्या मुहूर्तावर केलेला मला पक्का आठवतो. ह्या अपूर्व सभेची आठवण मला ह्यापुढें वेळोवेळीं राहून मीं काढलेल्या मिशनचें दोरण आणि पध्दत सहिष्णुतेच्या जोरावर मीं पुढें चालविली. सूडबुध्दि आणि अत्याचार यापासून ह्या हताश झालेल्या लोकांना सतत दूर ठेवावें आणि स्वतःही दूर रहावें या तपःश्चर्येला हें वरील जाहीरपत्रक नेहमीं मला ध्रुवाच्या ता-यासारखे मार्गदर्शक झालें.

नगरहून परत आल्यावर मुंबई येथील सामाजिक मंडळापुढें (Social Reform Association) माझें एक इंग्रजींत व्याख्यान करविण्यांत आलें. त्यांत विशेषतः हिंदुस्थानांतील बहिष्कृत वर्गांच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठ वर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्न, आणि स्वतः त्या लोकांकडूनच स्वोध्दारार्थ होणारे प्रयत्न, ह्यांची मीं प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली. हें व्याख्यान ह्या मंडळास विशेषतः त्या मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांस इतके आवडलें कीं ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ या पत्रामध्यें हें व्याख्यान प्रथम प्रसिध्द करून, त्याच्या पुस्तकरूपानें स्वतंत्र प्रती काढून वांटण्यांत आल्या.

ह्याच विषयावर १९०६ सालच्या ऑगस्टमध्यें दुसरें एक लहानसें इंग्रजी पुस्तक प्रसिध्द केलें. त्यांत एक एतद्देशीय स्वतंत्र मिशन स्थापावें अशी जोराची जाहीर विनंती केली. त्यांत म्हटलें कीं, “ह्या लोकांच्या उध्दारासाठीं नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीहि मोठया प्रमाणावर असो, स्थापून चालावयाचें नाहीं. तर ज्यामध्यें जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असें एक मिशन तयार झालें पाहिजे. अशा मिशननें ख्रिस्ति मिशन-यांप्रमाणें या लोकांच्या जीवितामध्यें क्रांति व विकास घडवून आणला पाहिजे. मुंबई शहर हें माझ्या मतें अशा कार्यासाठीं योग्य क्षेत्र आहे व मुंबई प्रार्थना समाज ही एकच संस्था असा प्रकारचे मिशन चालविण्यास पात्र आहे.”