प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (३)

काठीहार हें रेल्वेचें एक मोठें जंक्शन आहे. बरीच चौकशी केल्यावर अर्धवट बांधलेल्या ब्राह्म मंदिराचा पत्ता लागला. पण तेथें समाज नाहीं. दारें व खिडक्या नसून, नुसत्या भिंतीच पाहून हें मुक्तद्वार गौडबंगाल काय आहे याचा तपास करण्यासाठीं तेथेंच राहिलों. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थानें सांगितलें कीं, या अर्धवट इमारतीचा क्वचित प्रसंगीं अत्यंत खेदजनक दुरुपयोग होतो. १८८७ सालीं रेल्वेंतील ब्राह्म नोकरांनीं विशेषतः जानकीनाथ गांगुली व रखलदर्श चतर्जी यांच्या प्रयत्नानें येथें समाज स्थापन झाला. त्यावेळीं दहा सभासद होते. १८९९ सालीं ही अर्धवट इमारत उभी राहिली. पण इतक्यांत तेथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्त्यास गेल्यामुळें येथें एकहि ब्राह्मो उरला नाहीं.

येथून १८ मैलांवर पूर्णिया हें जिल्ह्याचें गांव आहे. येथें बाबू हजारीलाल हे आस्थेवाईक गृहस्थ होते त्यांचेकडे गेलों. तेथें मला तारकनाथ रॉय नांवाचे गृहस्थ भेटले. ह्या दोघांना काठीहारचें वर्तमान कळविलें. तेथील पूर्वीच्या फंडापैकीं २०० रु. अद्यापि शिल्लक आहेत असें कळलें. काठीहार येथें मंदिर आहे. पण समाज नाहीं. आणि पूर्णिया येथें समाज आहे पण मंदिर नाहीं. पूर्णिया येथील आस्थेवाईक सभासदांस घेऊन काठीहार येथें पुन्हां गेलों. सायंकाळीं माझें हायस्कुलांत व्याख्यान झालें. तेथील मुख्य अधिकारी मुन्सफ एक उदार मताचे बॅरिस्टर मुसलमान होते. त्यांनी आपल्या सहीच्या आमंत्रण चिठ्ठया लोकांना पाठविल्या व अध्यक्षस्थान पत्करलें. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल यांनीं येथील कांहीं मंडळींच्या सल्ल्यानें बाकी उरलेल्या शिलकेंतून मंदिर पुरें करून देण्याचें ठरविलें.

ह्या प्रकारें बिहार प्रांतांतील काम झाल्यावर मी श्रीगंगेचा निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणूं माहेरकडची सखी जी कुचबिहार नगरी तिच्या आंत सायंकाळच्या शांत समयीं अत्यादरपूर्वक प्रवेश केला.
कुचबिहार संस्थानची हद्द भूतान संस्थानचे हद्दीस लागूनच आहे. येथील मूळचे रहिवासी- जे अर्धवट जंगली लोक (कोल-कोळी) शेतकी करून आहेत-त्यांची सांपत्तिक हद्दहि कंगालपणाच्या सीमेला लागून आहे. ह्यांच्या चेह-यांत आर्यांपेक्षां मोंगली साम्य अधिक दिसतें. कुचबिहारचें राजघराणें ह्याच जंगली जातींचे आहे. राजा, प्रजा व मानकरी मंडळ हें सर्व एक जात असून यांचे दरम्यान अधिकारी वर्ग मात्र कारकुनापासून ते थेट दिवाणापर्यंत बंगाली बाबूंचा आहे. आणि मनुष्यस्वभाव अनुसरून यांचे एतद्देशीयांशीं अरेरावीचें वर्तन पाहून किंचित् कौतुकच वाटतें. उत्पन्नाचे मानानें हें संस्थान जवळ जवळ कोल्हापुराइतकें आहे. पण बंगाल्यांत हें पहिल्या प्रतीचें गणलें जाऊन शिवाय ब्रिटिश सरकारच्या मर्जीतलें असावें असें दिसतें. येथें एक एम् .ए. पर्यंतचें पूर्ण दर्जाचें कॉलेज आहे. त्यांत सुमारें ३०० विद्यार्थी असून फी पूर्णपणें माफ आहे. शिवाय एतद्देशीय विद्यार्थ्यांसाठीं मोफत वसतिगृह आहे. सुधारणेचीं हीं थोडीं चिन्हें सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेंच पुरातन वन्य साम्राज्य चालूं आहे. राजमहाल व चार बडया लोकांचीं घरें, आणि कांहीं सराकरी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहान-मोठयांचीं घरें म्हणजे अक्षरशः झोंपडयाच.

गांवाकडे नजर फेंकल्यास असें वाटतें कीं, केळीं व पोफळीं यांच्या सुंदर बनांत एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणूं एक सेग्रीगेशन कँपच बांधलें आहे. रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीं ह्या बांबूच्या झोपडया, दरम्यान बरीच मोकळी जागा सोडून दाटीनें बांधलेल्या दिसतात. प्रथम जमिनीवर सुमारें तीन फूट उंचीच्या खांबावर ओटा बांधून तिची तक्तपोशी वेळूची, भिंती वेळूच्या, वरचें छत व छप्पर वेळूचें, आंतील सामान वेळूचें आणि बाहेरील कंपौंडहि वेळूचें. यांचीं कारणें पुष्कळ आहेत. एक तर लोक गरीब आणि अल्पसंतुष्ट. दुसरें देश दलदलीचा, सर्द व अतिपावसाळा. तिसरें घरें बांधण्यास चिखल व दगड दोन्ही मिळत नाहीं. जमीन राखेच्या रंगाच्या मऊ व बारीक रेतीची. तिच्या विटाहि बनत नाहींत. बरें, इतक्यालाहि न जुमानता आढयतेनें जर एखादें घर उभारलें तर हिमालयबुवा वरचेवर भूकंपाचे धक्के देऊन जागें करण्यास तयार आहेतच. राजाचा सुमारें १३ लाखांचा सुंदर व भव्य प्रासाद व भोंवतालचा विस्तीर्ण बाग पाहून प्रेक्षक बाहेर राजरस्त्यांत येतो तों दुतर्फा सेग्रीगेशन कँप पाहून त्याचा बराच हिरमोड होतो.
ब्राह्मधर्माचा दिग्विजय करण्याकरतां जी प्रचारकसेनेची अभेद्य फळी उभारली होती तिची दुफळी केली ती याच कोप-यांतल्या कुचबिहारनें. बुध्दधर्माला जसा अशोक, ख्रिस्ती धर्माला जसा कान्स्टंटाइन, तसा ब्राह्म धर्माला एकादा राजबिंडा पुरस्कर्ता कुचबिहारपुरतां तरी मिळाला आहे काय? आतांपर्यंत तरी नाहीं आणि पुढें आशा नाहीं.

कुचबिहारांत साधारण ब्राह्मसमाजपक्षाचे आणि नवविधानपक्षाचे असे दोन समाज व त्यांचीं मंदिरें आहेत. साधारण पक्षाचे अध्यक्ष स्वतः दिवाण रायबहादूर कालिकादास दत्त हे आहेत. त्यांचे विचार पूर्णपणें उदार असूनहि त्यांची व्यवहारकुशलता त्याहूनहि परिपूर्ण असल्यामुळें ते अध्यक्ष होण्यापुरते केवळ हितचिंतकच आहेत. हा साधारण ब्राह्मसमाज विजयकृष्ण गोस्वामी यांनीं १८८४ सालीं स्थापन केला. १८९७ सालच्या भूकंपांत पूर्वीचें मंदिर पडल्यामुळें त्याच्याच पायावर हल्लींचें (१९०५) मंदिर नुकतेंच बांधले आहे.
१८७८ सालीं केशवचंद्र सेन यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह कुचबिहारचा राजा सर नृपेंद्र नारायण भूपबहादूर यांच्याशीं झाला. राजेसाहेब आणि राणीसाहेबांना आपल्या नवविधान पक्षाचा निराळा समाज पाहिजे म्हणून १५ ऑगस्ट १८८६ रोजीं येथील नवविधान समाज स्थापण्यांत आला. त्यापूर्वी म्हणजे १८८४ सालींच केशवचंद्र सेन वारले होते. विवाहाचे वेळीं केशवचंद्रांचे कन्येचें वय १४ वर्षांहून कमी होतें म्हणून ब्राह्मसमाजांत दुफळी झाली हें सर्व विश्रुतच आहे. हल्लीं या समाजाचे प्रमुख स्वतः राजेसाहेब आहेत. पण खरी सर्व व्यवस्था राणीसाहेबांचे हातूनच होत असते. राजाचें कुटुंब धरून समाजांत एकंदर ११ अनुष्ठानिक कुटुंबें आहेत. त्यांत एकंदर ७० मुलें माणसें आहेत. शिवाय ४० हितचिंतक आहेत. समाजाच्या खर्चाकरतां सालीना ५००० रु. ची नेमणूक आहे. एक कायमचा मिशनरी व गायक यांचा खर्च त्यांतूनच होत असतो.

समाजाचें अर्थातच एक सुंदरसें मंदिर आहे. इतकें सुंदर ब्राह्म मंदिर निदान माझ्या तरी पाहण्यांत कुठें आलें नाहीं. डाक्का, कलकत्ता वगैरे ठिकाणीं यापेक्षां मोठमोठीं मंदिरें आहेत; पण तीं केवळ व्याख्यान मंदिरें. आत्म्याला जागृत करण्याकरतां त्यांत विशेष असा कांहीं सात्विक भाव नाहीं. तो ह्या मंदिरांत भरपूर आहे. ह्या मंदिरांत रविवारी सायंकाळीं उपासना झाली. ती फार गंभीर झाली. बराच धूप जळत असल्यानें चहुंकडे सात्त्विक गंध सुटला होता. नियमित वेळीं घंटानाद झाल्यावर नेमणुकीचे प्रचारक वेदीवर बसले.
ते दुर्गानाथ राय हे केशवचंद्रांच्या प्रिय शिष्यांपैकीं एक असून फार साधे व सात्त्विक दिसले. गायन सुस्वर व भजन प्रेमळ झालें. भजनाचा रस जेव्हां दाटत असे व मृदंगाचा नाद जेव्हां घुमटांत घुमूं लागे तेव्हां पडद्यांतील अदृश्य स्त्रियांनीं आपल्या जवळचे मोठे शंख वाजवून त्यांच्या गंभीर ध्वनीचा मेळ असा मिळवून द्यावा कीं श्रोत्याचीं सर्व गात्रें बंद पडून तो कांहीं वेळ आत्मरूपानेंच उरावा.

माझी राहण्याची सुंदर सोय व थाटाचा पाहुणचार एका वसतिगृहांत केला होता. ता. १३ रोजीं टाऊन हॉलमध्यें Religion at the Basis of Life ह्यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. दिवाणसाहेब अध्यक्ष होते. कुचबिहार येथें दोन पक्षाचे समाज आहेत. एकाचे अध्यक्ष राजेसाहेब व व्यवस्थापक राणीसाहेब. शिवाय तत्वज्ञानाच्या अध्ययनाबद्दल सर्व बंगाल्यांत नांवाजलेले ब्रजेंद्रनाथ शील हे कॉलेजचे ब्राह्म प्रिन्सिपाल होते. मी तेथें असतांना तेथील कॉलेज कुमारांनीं दाखविलेली जिज्ञासा, तत्परता आणि तरुणांची सभा पुन्हां सुरू करण्याची उत्सुकता व त्यानंतर त्यांचीं आलेलीं पत्रें ह्या सर्वांकरून पाहतां कुचबिहार संस्थानांत एखादा ताज्या दमाचा प्रचारक पाठविल्यास पुष्कळ काम होण्यासारखें आहे. पण राजकारणामुळें तें होणार नाहीं ह्याचीहि खात्री आहे. म्हणून मी दोन दिवसांतच कार्यक्रम आटोपून मुकाटयानें १५ जानेवारी रोजीं ब्रह्मपुत्रेची वाट धरली.

“ब्राह्म धर्माचा प्रचारक होण्यांत मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढें राजसुखहि तुच्छ होय.” हें वाक्य जेव्हां मी बाबू उपेन्द्रनाथ बोस, डूब्री ब्राह्मसमाजाचे एक वजनदार पुरस्कर्ते. यांच्यापुढें उच्चारलें तेव्हां त्यांची मुद्रा सचिंत झाली. कोठें अरबी समुद्रावरील मुंबई बेट तर कोठें आसाम प्रांतांतील हा डूब्री गांव ? पण ज्या सनातन ब्राह्मसमाजाचा मी वार्ताहर होतों त्याचा शुभ महिमा असा आहे कीं त्यायोगें ह्या विशाल भरतखंडाचेच नव्हे तर ह्या विपुल पृथ्वीचींहि दूरदूरचीं टोकें पवित्र प्रेमरज्जूनें एकत्र होणार आहेत व हल्लीं होतहि आहेत. तथापि वरील उद्गार ह्या विशिष्ट प्रसंगीं निघण्याचें कारण केवळ हें अंतरीचें सुखच होतें असें नव्हे तर त्यांत भोंवतालच्या शांत व गंभीर देखाव्याची जबर भर पडली होती. सायंकाळीं ता. १५ जानेवारी रोजीं आगगाडींतून उतरल्यावर बाबू मजकुरांबरोबर मी ब्रह्मपुत्रेच्या उंच व विस्तीर्ण तीरावर फिरावयास निघालों. प्रथम एका अक्षरशः एकांत व तटस्थ स्थळीं जणूं प्रार्थनेंत मग्न झालेलें-ब्राह्म मंदिर पाहिलें.
मंदिराच्या दाराशेजारींच एका गतब्राह्म बंधूची सुंदर संगमरवरी समाधि पाहिली. ह्या बंधूंच्या प्रार्थना फारच प्रेमळ व तन्मय होत असत. अशीच एकदां प्रार्थना करीत असतां तिच्या तिच्या भरांत ह्यांचें देहावसान झालें. म्हणून त्या प्रसंगाच्या स्मारकार्थ समाजमंडळींनीं ही समाधी बांधली आहे, हें ऐकून व पाहून झाल्यावर मागें वळतों तोंच साक्षात् ब्रम्हपुत्रेनें आपले विराट् दर्शन दिलें. “मृत्योर्मा अमृतं गमय” असें मनांत येतें न येतें तोंच अमृताची पताकाच माझ्यापुढें फडकूं लागली. हिमालयाच्या पलीकडे कैलास पर्वताच्या पूर्व पायथ्याशीं असलेल्या मानस सरोवरापासून निघून पित्यास प्रदक्षिणा घालून आलेली ही महाभाग ब्रह्मपुत्रा ! हिनें केवळ दर्शनहेळामात्रें करून किती दिवसांची वार्ता सांगितली ! किती कालाची साक्ष दिली ! डूब्री गांवच्या तिन्ही बाजूंनीं हिचा प्रवास असल्यानें हा गांव तिनें खांकेंत कवटाळून धरल्यासारखा दिसतो. महासागरास पाहून ईश्वराच्या अनंत स्वरूपाची व गंभीरतेची थोडी कल्पना येते खरी, पण अशा महानदांच्या विभूती पाहिल्याशिवाय ईश्वराचें कार्य व संसाराची प्रगति याविषयींची प्रत्यक्षता ध्यानांत येण्यासारखी नाहीं. अस्तमान झपाटयानें होऊं लागला, सर्व दृश्य जगावर रात्रींचा अभेद्य पडदा पडूं लागला. मातीच्या डोळयाला जसजसें कमी दिसूं लागलें तसतसें स्मृतीच्या डोळयांस अधिकाधिक दूरदूरचा प्रदेश दिसूं लागला. किती देश! किती भाषा! किती जाती, किती रीति-पण सद्धर्माची किंचित् आंच लागल्याबरोबर हे सर्व भेद विरघळून जाऊन प्रेमरस कसा पाझरतो - धर्माची पताका धारण करून निघालों म्हणजे किती पाहुणचार! किती आदर! किती कळकळ! ही जणूं आपला शोध काढीत येतात आणि मग आलेल्या वाटेनें आपल्या मागें हें प्रेमसुताचें जाळें किती फैलावलेलें दिसतें - तशीच पुढील खांचखळग्यांची दिसणारी वाट जसजशी पायाखाली येते तसतशी कशी सपाट होते, आजच्या चिंताच उद्यांच्या आनंदास कशा कारणीबूत होतात, काल भोगलेले क्षणिक शारीरिक कष्ट आज कसें अक्षय्य मानसिक सुख देतात -या प्रकारें आंतील मानस सरोवरांतून निघालेल्या या स्मृतिनदाचे सुखदायी तरंग बाहेरील ब्रह्मपुत्रा दिसेनाशी झाली तरी एकावर एक स्वप्न वेगानें सुटूं लागले असतां वरील धन्यतेचा उद्गार माझे तोंडून निघाला यांत काय नवल!