हा गांव लहान व येथील समाजहि अगदींच लहान होता. तरी समाजांतील मंडळींची जूट व एकमेकांविषयीं कळकळ पाहून संतोष झाला. विशेष करून स्त्रियांमध्यें उपासनेविषयीं अत्यंत आतुरता दिसली. त्याच रात्रीं मी घरीं परत येऊन पोषाख बदलून प्रार्थनेला गेलों तों स्त्रिया आधींच पडद्याआड बसल्या होत्या. बहुतेक सर्व उपासना त्यांच्यासाठीं हिंदी भाषेंत करणें भाग पडलें. दुसरे दिवशी सायंकाळीं समाजांत Some Ideals for Modern India यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. ता. १७ रोजीं सकाळीं तरुणांसाठीं शाळेंत व्याख्यान झालें. ता. १७ रोजीं तेथून निघून नदीवरून आगबोटीनें जगन्नाथगंज येथें गेलों. ता. १८ रोजीं मैमनसिंग येथें पोहोंचलों.
येथें दोन्ही पक्षाचे दोन समाज आहेत. बाबू ईशानचंद्र विश्वास हे गृहस्थ कलकत्त्याहून येथें येऊन त्यांनी १८५५ चे सुमारास ब्राह्मसमाजाची स्थापना केली. नंतर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वडील भगवानचंद्र येथें आल्यापासून ह्या समाजाची भरभराट झाली. तथापि गांवांत ह्यांना फार हाल काढावे लागले. संबंध गांव येथील जमिनदाराचे ताब्यांत असल्यामुळें आणि तो विरुध्द असल्यानें मंदिराकरतां जागाच मिळेना. प्रथम मंदिर १८६७ त बांधलें; पण तें १८८६ च्या भूकंपांत पडलें. म्हणून पुन्हां बांधण्यांत आलें. ह्यापूर्वीच कुचबिहारच्या लग्नामुळें झालेल्या दुफळीमुळें ह्या समाज मंदिराचे मालकीसंबंधीं तंटा होऊन विघ्नें उपस्थित झालीं. १८९७ सालच्या भूकंपांत हें नवीन मंदिरहि पडलें. ह्याच भूकंपांत पूर्वी ज्या जमिनदारानें विरोध केला त्यांचाहि वाडा जमिनदोस्त झाला. हल्लीं (१९०५) जें मंदिर बांधलें आहे त्याचे उंच व नकशीचे भारी दरवाजे, तुळया व इतर संगमरवरी दगडाचें सामान ज्याच्याकडून पूर्वी जागाहि मिळाली नाहीं त्याच जमिनदाराकडून मिळालें आहे. समाजाला त्याची बरीच सहानुभूति आहे. नवविधान समाजांत एकंदर बायकामुलें मिळून २६ व साधारण समाजांत ७८ मंडळी आहेत. साधारण समाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा यांनीं गांवाबाहेर बरीच जागा घेऊन तेथें ब्राह्म लोकांचें एक स्वतंत्र खेडें वसविलें आहे नि त्याचा कार्यक्रम आटोपून मी मैमनसिंगहून डाक्काच्या वाटेवर कौरेड म्हणून एका लहानशा खेडेगांवीं गेलों. हें खेडें नामदार के. जी. गुप्त यांच्या मालकीचें आहे. शेतांत साहेब मजकुरांचें घर नदीचे कांठीं आहे. बाबू कालीनाथ गुप्त हे त्या कमिशनरांचे वडील असून भाविकपणाबद्दल सर्व ब्राह्मसमाजांत प्रसिध्द आहेत. हें एकांत स्थल त्यांच्या आवडीचें आहे. कोणी अतिथी आल्यास नेमलेलीं नोकर माणसें त्याची सोय मोठया आदरानें करीत असतात. पण येथें समाज नाहीं. येथें एक दिवस एकांत व आत्मसमाधानांत भोगून ता. २१ रोजीं पूर्वबंगालची राजधानी डाक्का येथें गेलों.
येथील समाज कलकत्ता समाजाच्या खालोखाल महत्वाचा आहे. या सफरीच्या प्रवासाचा ताण मजवर इतका पडला कीं, त्यामुळें माझी तब्येत किंचित् ढासळली होती. मद्रासच्या सफरींत अन्नांतील तिखटामुळें जसा परिणाम झाला तसाच उलट बाजूनें बंगालचे भोजनांत गोड फार असल्यामुळें व त्यांतील मोहरीच्या तेलाचा मला अत्यंत वीट आल्यामुळें प्रकृतीवर फार परिणाम झाला होता. डाक्का समाजांत माघोत्सवाचा समारंभ चालू होता. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन परत आलेला मी म्हणून माझ्या व्याख्यानाला अलोट गर्दी जमली होती. मी इंग्रजींत बोलावयास उठलों. १०|१५ मिनिटें बोललों नाहीं तोंच भोंवळ येऊन मी खुर्चीत गळून पडलों. सभेचा मोठा विरस झाला. मला उचलून घरीं पोंचविण्यांत आलें. एक दोन दिवस विश्रांति घेतल्यावर ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीनें प्रवास करून बंगालच्या उपसागरावरील बारीसाल या जिल्ह्याच्या गांवीं आलों. या जलप्रवासानें प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारीसालमधील माझें व्याख्यान फार परिणामकारक झालें. पण व्याख्यान आटोपून मी खालीं उतरतों तोंच माझ्या हातांत प्रकरण चौथ्यांत सांगितल्याप्रमाणें एक तांतडीची तार देण्यांत आलीं. मुंबई येथें माझी पत्नी आजारी असल्यानें व अहमनगर येथे माझी बहीण चंद्राक्का आसन्नमरण झाल्यानें मला मुंबईस परतावें लागलें.
१९०६ सालच्या नाताळांत या परिषदेची कलकत्ता येथें मोठया थाटानें बैठक झाली. सर नारायण चंदावरकर यांनीं के. नटराजन्, बंडोपंत भाजेकर आणि मला कलकत्त्यास आपल्याबरोबर नेले. कोकोनाडयाचे डॉ. व्यंकटरत्नम् नायडू यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे एक प्रतिनिधि मि. जी. ब्राऊन हेहि हजर होते. सुरुवातीच्या उपासना सिटी कॉलेजचे वृध्द प्रिन्सिपाल बाबू उमेशचंद्र यांनीं चालविली. केशवचंद्र सेनेचे शिष्य प्रसिध्द गायक त्रैलोक्यनाथ संन्याल यांचें भजन झालें. या अधिवेशनाच्या सर्व सभा ब्राह्मसमाजाच्या सिटी कॉलेजच्या हॉलमध्यें यशस्वी रीतीनें पार पडल्या.