रोजनिशी प्रस्तावना३
(१. वि.रा. शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, (संपा.) बी.बी. केसकर, मुंबई, दामोदर सावळाराम आणि मंडळी, १९१२, पृ. १४२.
२. वि.रा. शिंदे, `प्रस्तापना`, द्वा.गो.वैद्य, संसार व धर्मसाधन, संपा. व प्रका.बी.बी. केसकर, मुंबई, १९३५, पृ.१२-१३.
३. वि.रा. शिंदे, लेख, व्याख्याने व उदेव, उनि., पृ. १५७.)
लेकरे आहेत म्हणून भेद न राखता परस्परांशी बंधुभावाने वागावे असे सांगणारा एकेश्वरवादी उदार ब्राह्मधर्म त्यांच्या मनाला भावला व ते त्याकडे आपोआप ओढले गेले. त्यांनी आयुष्यभर ह्या उदारधर्माच्या प्रचाराचे कार्य केले. मानव निर्मित भेदभावाला व उच्चनीचतेला त्यांच्या मनात जागा नव्हती. म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्याच्या व अस्पृश्य मानलेल्यांची सर्वांगीण उन्नती करण्याच्या कामी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले. "अस्पृश्यतानिवारण हा तर माझ्या धर्मकार्याचा भाग" असेही त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे.१ आध्यात्मिक तसेच सामाजिक बाबतीत स्त्रियांचा दर्जा उंचावण्याची त्यांची जी तळमळ होती तिचे मूळही त्यांच्या ह्या आध्यात्मिक बैठकीतच आहे. म्हणूनच ते स्त्रीसदस्यांसह कौटुंबिक उपासना मंडळाचे सदस्यत्व देण्याचा आग्रह धरतात, व मुलांच्या जोडीनेच मुलींनाही सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी चळवळ करतात. मुरळीची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या शेतक-यांसंबंधीच्या तळमळीचे अधिष्ठानही आध्यात्मिक आहे. तेरदाळ येथील संस्थांनी शेतकरी परिषद, बोरगाव येथील वाळवे तालुका परिषद, वडनेर येथील चांदवड तालुका शेतकरी परिषद व पुणे येथील मुंबई इलाखा शेतकरी परिषद ह्या परिषदांमधून त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांचा विचार केला, तत्कालीन स्थितीचे विश्लेषण करून ती स्थिती सुधारण्याचा उपाय म्हणून खंबीर एकजूट करण्याचा मंत्र सांगितला. शेतक-यांची स्थिती सुधारण्याची पोटतिडीक त्यांना होती म्हणूनच ते त्यांच्या प्रश्नांचे मूलगामी विश्लेषण करून बिनतोड उपाय कळकळीने सुचवितात. ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवानिमित्त बंगालच्या फिरतीवर जाण्याचे लांबणीवर टाकून पुण्याच्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेला ते हजर राहिले. `हे काम धार्मिकच समजून मी पत्करले आहे` असे त्यांनी सांगितले.२
त्यांच्या राजकारणालाही आध्यात्मिक अधिष्ठान आहे. १९२० मध्ये पुण्यातील मराठा समाजाने त्यांना निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह केला. मराठ्यांच्यासाठी सात राखीव जागा होत्या. परंतु जातिवाचक तत्त्वाच्या आपण -
(१. वि.रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. २६४.
२. वि.रा. शिंदे, `शिंदे लेखसंग्रह` संपा. मा.प. मंगुडकर, पुणे, श्री लेखन वाचन भांडार, १९६३, पृ. २५६.)
विरूद्ध असल्याने त्या राखीव जागेवरून निवडणूक लढविणार नाही असे त्यांनी सांगितले. व सर्वसाधारण जागेवर उभे राहण्यास पाठिंबा मिळाल्यामुळे बहुजनपक्ष या नावाने जाहीरनामा काढून त्यांनी निवडणूक लढविली. त्यांचा हा जाहीरनामा त्यांच्या वृत्तीचा निदर्शक आहे. `विद्याबल, द्रव्यबल अथवा अधिकारबल नसल्याने नाइलाजाने मागासलेला वर्ग अथवा बहुजनसमाज जो आहे` त्याचा कैवार घेण्याची भूमिका त्यांनी मांडली. ह्या बहुजन समाजात ते शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर, अस्पृश्य व स्त्री अशा आठ वर्गांचा समावेश करतात, ही गोष्ट लक्षणीय आहे.१
भारतीय राजकारणात महात्मा गांधींचा उदय झाल्यानंतर महर्षी शिंद्यांना जणू त्यांच्यामध्ये समानधर्मा आढळला. महात्माजींच्या जवळ समग्र जीवनाचा विचार होता व त्याला आध्यात्मिक बैठक होती. महात्माजींच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झालेले दिसतात. म. गांधींच्या इतका आदरभाव अन्य कोणत्याही समकालीन राजकारणी पुरुषांबद्दल त्यांना वाटत असल्याचे दिसत नाही. १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी कारावास पत्करला. महात्मा गांधींच्या ह्या चळवळीचा उल्लेख ते अगदी सहजपणे `धर्मयुद्ध` असा करतात ही गोष्टही त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीची साक्ष देणारी आहे.
महर्षी शिंदे यांच्या सा-याच जीवनकार्यामध्ये एक अंतःसूत्र दिसते. त्यांचे समाजकारण असो की राजकारण असो, त्यांची सारी धडपड जुटीसाठी, एकात्मतेसाठी होती. फुटीचे सोपे, तात्कालिक यश देणारे पण अंतिमतः हानिकारक असणारे समाजकारण, राजकारण त्यांनी केले नाही, की सहजी लोकप्रियता देणारा फुटीचा एकदेशी विचार कधी मांडला नाही. दोन संस्कृती असोत की दोन जाती असोत, दोन प्रांत असोत की दोन पंथ असोत अथवा दोन भाषा असोत त्यांतील भेदापेक्षा त्यांच्यातील एकात्मता, लागेबांधे त्यांच्या दृष्टीला दिसतात. हे अंतःसूत्रही त्यांच्या आध्यात्मिक बैठकीतून निघते. तथाकथित अस्पृश्य आणि स्पृश्य असे दोन्ही वर्ग एकमेकांत अगदी मिसळून जावेत ह्या प्रेरणेने तर त्यांनी आयुष्यभर कार्य केले. अस्पृश्यांच्या राखीव मतदारसंघाला त्यांनी -
(१.वि.रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ.३०६-८.)
या भूमिकेतून विरोध केला. अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ देणे म्हणजे त्यांची अस्पृश्यता कायम करणे होय अशी त्यांना भीती वाटत होती. मराठ्यांनी राष्ट्रीय प्रवाहापासून अलग राहू नये असा त्यांनी प्रयत्न केला. ब्राह्मणेतर पक्षाला जसा त्यांचा विरोध होता तसाच मराठा-मराठेतर असा नवा भेद करणारानांही होता. स्त्रिया ह्या पुरुषांच्या जोडीने यायला पाहिजेत अशी त्यांची तळमळ होती. विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे ख-या अर्थाने सहसिक्षण घडून यावे, गुरू-गुरूपत्नींनी त्यांना आपल्या प्रेमपंखाखाली घेऊन शाळा हे घरच वाटेल असा कुलभाव त्यांच्या ठिकाणी निर्माण करावा ही त्यांची आत्मीय शिक्षणाची कल्पना होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बाबतीत त्यांचे हे असे एकत्वाचे अंतःसूत्र होते. याच वैशिष्ट्याचा आढळ त्यांच्या संशोधनपर लेखनातही दिसून येतो.
अण्णासाहेबांचे बालपण आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी या गावी कानडी व मराठी संस्कृतीच्या संमिश्र वातावरणात गेले. या दोन्ही संस्कृतींचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. अर्धा युरोप त्यांनी डोळसपणे पाहिला. अनेकवार भारताच्या सगळ्या प्रांतांत हिंडून चिकित्सकपणे निरीक्षण केले. इतिहास, तौलनिक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, तौलनिक धर्मशास्त्र यांच्या व्यासंगाची जोड त्यांच्या विवेकबुद्धीला मिळाली. त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि दृष्टी वस्तुनिष्ठ. एका संस्कृतीपेक्षा दुसरी संस्कृती श्रेष्ठ, एका वंशापेक्षा दुसरा वंश श्रेष्ठ अशा प्रकारच्या पूर्वग्रहाचा पूर्ण अभाव. उलट वृत्ती विश्वकुटुंबी. यामुळे `भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न`, `भागवतधर्माचा विकास`, मराठ्यांची पूर्वपीठिका` यांसारख्या त्यांच्या संशोधनपर लेखनाला एक वेगळीच मौलिकता लाभली आहे. भारतीय संस्कृती म्हणजे आर्यसंस्कृती, येथील आर्यपूर्व संस्कृती ही मागासलेली अविकसित संस्कृती होती तर आर्यसंस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती होती हे गृहीत धरूनच त्यांच्याआधी सामान्यतः विचार केला जात होता. अण्णासाहेब शिंदे हे भारतातील मूळ रहिवाशांची संस्कृती, आर्यपूर्व अथवा द्रविड संस्कृती आणि आर्यांची संस्कृती यांच्या मिलाफातून भारतीय संस्कृती निर्माण झाली असे प्रतिपादतात. अस्पृश्य हे देखील मूळचे राजवैभव भोगलेले राजे असावेत, मराठे हे मध्य आशियातून आलेल्या शक, पल्लव वंशाचे असावेत अशी मीमांसा ते भाषाशास्त्र, समाजशास्त्र इत्यादींच्या आधारे करतात. संशोधनाच्या क्षेत्रात अंतिम असा सिद्धांत नसतो ही भूमिका घेऊन जरी ते हे विचार मांडत असले तरी त्यांची ही मीमांसा मौलिक स्वरूपाची आहे. त्यांनी संशोधन करून काही नवे पुरावे पुढे आणले एवढेच महत्त्वाचे नाही. तर पुराव्याचा अर्थ लावण्यात, मीमांसा करण्यात त्यांनी वेगळेपणा दाखविला आहे. त्यांचा अनेक शास्त्रांचा व्यासंग या मीमांसेला सहाय्यक आहे ही गोष्ट जशी खर, तसेच व उल्लेखलेली एकात्मता पाहणारी त्यांच्या मनाची बैठकही कारणीभूत आहे.
भेदाला थारा न देणारी, एकात्मतेची ओढ व प्रेमाचे अधिष्ठान असलेली त्यांच्या मनाची जी आध्यात्मिक घडण तयार झाली ती त्यांच्या बालपणीच. त्यांचे निसर्गाचे प्रेम, सौंदर्याची आवड व चांगल्या दर्जाची रसिकता यांचाही समावेश त्यांच्या आध्यात्मिकतेतच करावा लागतो. त्यांचा आध्यात्मिक मनःपिंड लहानपणीच घडला होता. त्यांच्या तरुणपणी व कर्तृत्वकालात त्याचा फक्त आविष्कार होत राहिला, असे म्हणणे रास्त ठरेल.