रोजनिशी- प्रस्तावना-१०
येथे दुस-याही एका गोष्टीचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. पृ. ३९ वरील दि. १ ऑगस्ट १८९८ च्या रोजनिशीतील नोंद अपुरी आहे. कारण या शब्दानंतरची पुढील तीन पाने म्हणजे सहा पृष्ठे (मूळ रोजनिशीतील पृष्ठ क्र. ६७ ते पृष्ठ क्र. ७२ अखेर) नाहीत. ह्या पृष्ठांवर वरील संदर्भातील व्यक्तीचा कदाचित नामोल्लेख असल्याने शिंदे यांनी ही पृष्ठे उत्तरकाळातील वाचनात काढून टाकली असावीत. आपण केलेल्या ह्या नामोल्लेखामुळे एखादी व्यक्ती अडचणीत येऊ नये ह्याबद्दल त्यांनी दक्षता घेतली असल्याची शक्यता आहे.
अण्णासाहेबांच्या ठिकाणी असलेल्या निसर्गाच्या ओढीचे व ऐतिहासिक स्थळे पाहण्याच्या आवडीचे आल्हाददायक दर्शनही ह्या रोजनिशीत घडते. पन्हाळगडच्या सहलीत त्यांनी पन्हाळ्यास मुक्काम करून आजूबाजूचे पावनगड, वाडी रत्नागिरी, पांडवदरी, विशाळगड असे गड व स्थळे पाहिली.
अण्णासाहेबांच्या रोजनिशीत नुसतेच निसर्गाचे यथातथ्य चित्र येत नाही. निसर्ग त्यांच्या मनावर परिणाम करतो. निसर्गाचा देखावा भव्य, भयानक असो, की रम्य, सुंदर असो, त्यात ते रममाण होतात. स्वतःमधील आंतरिक चैतन्याची खूण पटून वृत्ती उन्नत झाल्याचा आध्यात्मिक अनुभव त्यांना येतो. विशाळगडाच्या परिसरातील `विराटस्वरूपी निसर्गाचे कठोर विलसित` पाहून ते स्तिमित होतात (पृ.५७). मलकापुराहून बैलगाडीतून केलेल्या रात्रीच्या प्रवासाचे व निर्माण झालेल्या चित्तवृत्तीचे हृदयंगम वर्णन ते करतात (पृ.५८). सोनचापा, सुवर्णपुष्प, नेवाळी इत्यादि फुलझाडांनी परिमळलेल्या; बोरे, आंबे, जांभळे ह्या फळझाडांनी बहरलेल्या, पन्हाळ्याच्या परिसराचा माणसाच्या मनावर कोणता परिणाम होतो ते सांगतात. पाहणारा रसिक अजून नास्तिक असेल तर तो "सबाह्यआंतर आनंदमय होऊन आपल्या स्वतःला विसरून जातो. पण आस्तिक असेल तर ह्या सुंदर अंतर्बाह्य विश्वाच्या सच्चिदानंद परमात्म्याचे ठायी लीन होतो." (पृ.५५). अण्णासाहेब हे अर्थातच दुस-या वर्गात मोडतात.
अण्णासाहेबांची इंग्लंडमधील रोजनिशी तुलनेने मोठी आहे. एकतर ती दोन वर्षेपर्यन्त ब-याचशा सातत्याने त्यांनी लिहिली आहे. ह्या दोन वर्षांच्या अवधीत त्यांना ज्या मोठ्या सुट्या मिळाल्या त्या त्यांनी लंडन, इंग्लंडच्या दक्षिण किना-याचा परिसर, इंग्लिश व स्कॉचसरोवर प्रांत, कॉर्नवॉल ह्या परिसरात घालविल्या. एक सुटी ऑक्सफर्डमध्ये व अखेरची सुटी जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली देश पाहण्यात घालविली. हा विविध ठिकाणचा प्रवास त्यांनी जाणीवपूर्वक निरीक्षणाच्या हेतूने केला होता म्हणून त्या त्या ठिकाणची शक्य तितकी माहिती त्यांनी रोजनिशीत टिपली आहे. खुद्द ऑक्सफर्डमधील नोंदी, विशेषतः प्रारंभीच्या काळातीलच आहेत. नंतरच्या नोंदी प्रामुख्याने त्यांनी केलेल्या भ्रमंतीच्या काळातील आहेत.
ह्या रोजनिशीलेखनाच्या काळातील अण्णासाहेबांची मनःस्थिती आधीच्यापेक्षा वेगळी आहे. ते बी.ए. होऊन मुंबईस एल्एल्. बी. चा अभ्यास करीत होते. त्यांच्या संसाराला प्रारंभ झाला होता. त्यांची आणि पत्नीच्या मनाची जुळणी तोपर्यंत झाली असावी. इ.स. १९०० मध्ये त्यांना मुलगा झाला. प्रार्थनासमाजाची रीतसर दीक्षा तर त्यांनी १८९८ मध्येच घेतली होती. पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी उपासनेची निमंत्रणे येऊ लागली होती. धर्मकार्याला वाहून घेण्याचे जीवितध्येय त्यांनी निश्चित केले होते. धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला पाठविण्यासाठी कलकत्त्याच्या ब्राह्मसमाजाने व मुंबईच्या प्रार्थनासमाजाने त्यांची निवड केली होती. अशा अनेक घटनांमुळे त्यांच्या मनाला स्थैर्य प्राप्त झाले होते. वृत्तीतील तीव्रपणा कमी होऊन त्या शांत झाल्या होत्या. मूळच्या कर्तव्यनिष्ठेच्या आणि ध्येयवादित्वाच्या जोडीने जबाबदारपणाची भावना निर्माण झालेली होती. मात्र त्याचा परिणाम अती गांभीर्यात झाला असे नव्हे. उलट त्यांची मुळातील विनोदवृत्ती खुलली, आत्मविश्वासामुळे एक प्रकारचा मोकळेपणा आला. आध्यात्मिक बैठक, दीनदलितांच्या उद्धाराची कळकळ, निसर्गाची ओढ व स्वाभाविक रसिकता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मूळ वैशिष्ट्ये तर येथेही प्रकट होतात.
बाह्य परिस्थितीमध्ये तर उघडच फरक पडला होता. युरोपचा निसर्ग वेगळा, संस्कृती उद्योगप्रधान, वातावरण लोकशाहीवादी, व्यक्तिगत व सार्वजनिक शिस्त हीही भारतीयांना अपरिचित अशीच. अशा वातावरणात वावरताना अण्णासाहेबांनी लिहिलेल्या ह्या रोजनिशीला एक वेगळेपण प्राप्त झालेले आहे.
युरोपमधील सांस्कृतिक वातावरण, तेथील धर्मसंस्था, शिक्षणपद्धती, सार्वजनिक व कौटुंबिक जीवन, लोककल्याणकारी संस्था, तेथील निसर्ग अशा अनेक अंगांचा परिचय ह्या रोजनिशीद्वारा आपणांस होतो.