फर्ग्युसनमधील रोजनिशी - टिपा१
१. Thonas Hughes यांनी लिहिलेल्या `डेव्हिड लिव्हिंगस्टन` ह्या चरित्रावरील (प्रकाशक, मॅकमिलन आणि कं., लंडन, प्रथम प्रकाशन १८८९) अभिप्राय. म. शिंदे यांनी नमूद केलेला उतारा लिव्हिंग्स्टनच्या ७ जुलै १८७२ च्या रोजनिशीतील आहे (तेरावे पुनर्मुद्रण, १९२८ ह्या प्रतीत पृ. १७२). डेव्हिड लिव्हिंग्स्टन (१८१३-१८७३) ह्याने धर्मप्रसार करणे, पूर्व आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार थांबविणे व नाईल नदीचा उगम शोधणे हे उद्देश मनात ठेवून १८६६ मध्ये आफ्रिकेतील अखेरची सफर सुरू केली. त्याने ह्यावेळेस आपल्याबरोबर घेतलेले आशियाई व आफ्रिकी मदतनीस त्याला सोडून गेले. त्यांनी त्याची औषधाची पेटीही पळविली व लिव्हिंग्स्टन मेला असे उठविले. त्याच्या ह्या अखेरच्या काळात तो आजारी होता. त्याचा शोध घेण्यासाठी आलेला `न्यूयार्क हेराल्ड` चा वार्ताहर एच. एम्. स्टॅन्ले त्याला ह्या काळात भेटला. दोघांनी मिळून काही दिवस प्रवास केला. स्टॅन्ले ह्याचा परत स्वदेशी जाण्याचा सल्ला न जुमानता लिव्हिंग्स्टनने नाईलच्या मुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. त्याच्या आजारी व एकाकी अवस्थेतील वरील उद्गार आहेत. रोजनिशीतील शेवटची ओळ पानाच्या जीर्णतेमुळे नष्ट झाली आहे.
२. हा मजकूर रोजनिशीच्या नवीन पानावर सुरू होतो. त्याचा कोपरा झिजलेला आहे. कदाचित नवीन तारखेखाली हा मजकूर असू शकेल. उल्लेखिलेले पुस्तक. : F. W. Bain, On the Principles of Wealth-Creation; Its Nature, Origin, Evolution and Corrollaries; London, Parker James and Co., 1892.
३. हे चिंतामणी कोण याचा नेमका पत्ता लागत नाही. जमखंडीच्या परशुरामभाऊ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या जंत्रीमध्ये इ. स. १८८४ मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांत चिंतामण यशवंत यादवाड असे नाव आढळते. म. शिंदे यांचे वडील रामजी यांचा यादवाड कुटुंबाशी स्नेह होता व आप्पा यादवाड हे दत्तक जाऊन जमखंडीचे अधिपती म्हणून श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन बनले.
(भगिनी जनाबाई शिंदे, `स्मृतिचित्रे,` साप्ताहिक तरुण महाराष्ट्र, पुणे संपादक अ.आ. मानकर, दि. २०-१-१९४९). सदर चिंतामणी हे यादवाड कुटुंबातील असण्याची शक्यता आहे. पन्हाळगड वगैरेच्या कौटुंबिक सहलीत हेच चिंतामणी त्यांच्यासोबत असावेत. (पहा, प्रस्तुत रोजनिशी, पृ. ५४,५६).
४. गोविंदराव सासने (१८७२-१० ऑक्टोबर १९६४). अण्णासाहेब शिंदे यांचे अखेरपर्यंतचे निकट स्नेही. ह्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात फौजदार होते. गोविंदराव काही काळ कागल येथील हायस्कूलचे हेडमास्तर. त्यानंतर शिक्षणखात्यात असि. डे. एज्यु. इन्स्पेक्टर. सार्वजनिक कामाकडे ओढा. राजर्षी श्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९१८ मध्ये निवृत्त होऊन सत्यशोधक समाजाचे काम. अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यात विशेष भाग घेतला. (मुलाखत : श्री. सासने यांचे जावई श्री. नानासाहेब व्यंकटराव सूर्यवंशी, कोल्हापूर, व श्री. सासने यांच्या कन्या श्रीमती सुशीलाबाई मोहिते, कोल्हापूर).
५. श्री. शि. म. परांजपे यांच्या `काळ` ह्या वृत्तपत्राचा हा उल्लेख आहे. `काळ` चे प्रारंभीचे अंक शोध करूनळी पाहावयास मिळाले नाहीत.
६. पुणे येथील १८९८ च्या प्लेगात अण्णासाहेब राहात असलेला जमखंडीकरांचा वाडा पठाण, बलुची लोकांना राहाण्यासाठी रिकामा करून द्यावा लागला; व ते भगिनी जनाबाईच्या एका मैत्रिणीच्या वडिलांच्या शुक्रवार पेठेतील वाड्यात राहावयास गेले. तेच हे कंत्राटदार. आपल्या आठवणींमध्ये जनाबाईंनी ह्या कुटुंबाविषयी माहिती दिली आहे. (`स्मृतिचित्रे,` तरुण महाराष्ट्र, पुणे, दि. १-४-४९).जनाबाईंचा जन्म १८७८. विवाह त्यांच्या लहानपणीच झाला. त्या चार यत्ता शिकलेल्या. नवरा निरक्षर. नव-याकडून भयंकर छळ होऊ लागला. त्याने द्वितीय संबंधाची बाई घरात आणली व जनाबाईच्या जिवाला धोका निर्माण झाला तेव्हा अण्णासाहेबांनी जनाबाईस कायमचे माहेरी आणले. पुण्यास मॅट्रिकपर्यंत शिक्षण. पनवेलीस हेड्मिस्ट्रेस असताना नोकरी सोडून अण्णासाहेबांच्या मिशनमध्ये आजीव कार्यवाहक झाल्या. अण्णासाहेबांच्या अस्पृश्यतानिवारणाच्या व धर्मप्रसाराच्या कामात निष्ठावंतपणे आयुष्यभर साह्य केले. आगीच्या अपघातात सापडलेल्या शेजारच्या सौ. मट्टू ह्या तरुणीस वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतः भाजून पुणे येथे २७ एप्रिल १९५६ मध्ये मृत्यू.
७. पोटे हे जमखंडीचे सुखवस्तू कुटुंब. हरिपंत पोटे हे फौजदार. अण्णासाहेब शिंदे याचे स्नेही विष्णुपंत देशपांडे, तेरदाळकर यांशी आप्तसंबंधाने निगडित. येथे उल्लेखिलेल्या विष्णू हरीचा मृत्यू १९३५ मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी व कृष्णाजी हरी यांचा मृत्यू १९११-१२ च्या सुमारास झाला. (जमखंडी येथे श्री. विष्णू उर्फ बाबूराव दामोदर हुल्याळकर यांच्यासमवेत पोटे कुटुंबियांची मुलाखत).
८. श्री. रामचंद्र नारायण सावंत. अण्णासाहेबांचे मित्र. १८९५ मध्ये पुण्यातील सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळ पालकरांच्या वाड्यात अण्णासाहेब व त्यांचे मित्र जनुभाऊ करंदीकर, सासने व हे सावंत राहात होते.
९. `करमणुकी` मधून क्रमशः प्रसिद्ध होत असलेल्या हरिभाऊ आपट्यांच्या `कृष्णदेव यादव` ह्या कथेवरील प्रतिक्रिया.
१०. अण्णासाहेब कावेबाज हा शब्द चातुर्यनिदर्शक ह्या चांगल्या अर्थाने वापरतात.
११. लो. टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या शिवजयंत्युत्सवाच्या चळवळीबद्दल इंग्रज सरकार सावध होते. त्यावेळच्या वातावरणावर ह्या चळवळीचा प्रभाव असल्याचे म. शिंदे यांच्या ह्या प्रतिक्रियेवरून जाणवते. १८९८ च्या शिवजयंत्युत्सवाच्या कार्यक्रमाची माहिती केसरीच्या दि. १८-४-९८ च्या अंकात येते, व हा कार्यक्रम पार पडल्याची माहिती २९-४-१८९८ च्या अंकात आहे.
१२. The Nineteenth Century, A Monthly Review, Edited by James Knowles, February, 1898, (Pages 250 to 255) ह्या लेखावरील प्रतिक्रिया.
१३. George Henry Lewes, History of Philosophy Vol. II – Modern Philosophy, Fifth Edition, London, Longmans, Green and Co., 1867. सदर पुस्तकातील महत्त्वाची वाक्ये म. शिंदे यांनी रोजनिशीत उतरलेली आहेत. गोल कंसातील पृष्ठ क्रमांक संपादकाने टाकलेले आहेत. तिरकस टाइपातील वाक्ये आणि शब्द म. शिंदे यांचे आहेत.
१४. `माझा विशेष कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असताना लॉजिक आणि मॉरल फिलासफी, न्यायशास्त्र, आणि नीतिशास्त्र हे विषय न घेता, मी इतिहास आणि कायदा हे विषय घेतले ह्याचे कारण बी. ए. च्या परीक्षेत कायद्याच्या पेपरमध्ये शे. ६० वर मार्क मिळाल्यास एल्एल्. बी. ची परीक्षा पास झाली असे गणण्यात येत होते. म्हणून मी या सवलतीचा फायदा घेण्यासाठी ही निवड केली.` (वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. १०८)
१५. उपरिनिर्दिष्ट लेविसच्या पुस्तकातील उतारे. तिरकस ठशातील मजकूर म. शिंदे यांचा.