फर्ग्युसनमधील रोजनिशी - टिपा३

३६. श्रीनिवास अय्यंगार सेटलूर (१८६२-१९३०). आरंभी मद्रास-बेंगलोरकडे होते. नंतर मुंबईस वकिली करू लागले. १८९७ च्या टिळकांच्या राजद्रोहाच्या खटल्यात यांची टिळकांना मदत झाली. `टिळक ट्रायल` हे खटल्याचे पुस्तक माधवराव देशमुख (लोकहितवादींचे नातू) यांच्या सहकार्याने छापले.

३७. बॅ. कृष्णाजी वामन भट (१८६७-१९१८). मूळ गाव रत्नागिरीजवळील शिरगाव. मुंबई हायकोर्टात ओरिजिनल साइडकडे वकिली. पुण्यास नारायण पेठेतील पत्र्या मारुतीजवळील भटवाडा यांचा. टांगा ठेवण्याची, फुलझाडांची हौस होती. (मुलाखत : श्री. विश्वनाथ कृष्णराव भट, बॅ. भटांचे चिरंजीव, पुणे).

३८. वालूताई : थोरले आप्पासाहेब सरकार, जमखंडी (१८३५-१८९७) यांची नात. इतर तीन नातींप्रमाणेच वालूताईच्या लग्नासाठी रू. १५०००/- ची तरतूद श्रीमंत आप्पासाहेब यांनी मृत्युपत्राद्वारेच करून ठेवली होती. वालूताईंचा विवाह पुण्यास सरदार गोळे यांच्याशी झाला. (माहिती : वालूताईंचे पुतणे श्री. वि. भा. ऊर्फ तात्यासाहेब जोशी, जमखंडी, यांच्याकडून).

३९. गणेश कृष्ण ऊर्फ दादासाहेब खापर्डे (१८५४-१९३८). नामवंत वकील, प्रभावी वक्ते, राजकारणात व सार्वजनिक कार्यात आघाडीवर. राष्ट्रसभेच्या कामात लो. टिळकांच्या बाजूने राहून कार्य.

४०. कुलुलीत हा शब्द उतावीळ, खाज असलेला, हुरळलेला अशा अर्थाने वापरलेला दिसतो. कुलुली अथवा कुलोली ह्या शब्दाचा मोल्स्वर्थच्या कोशातील अर्थ पुढीलप्रमाणे – The excitement of a stallion or horse towards the mare; also heat or desire of the male mares (पृ. १७६). `महाराष्ट्र शब्दकोशा` मध्ये कुलुली, कुलोली ह्या शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे दिले आहेत : १. कुलकुली २. खाज; आवेग  ३. आरडाओरडा; आरोळ्या मारणे ४. बोंब मारणे; ओरडणे. (पृ. ७६०).

४१. हरिभक्तपरायण म्हणून पुढील काळात प्रसिद्धीस आलेल्या श्री. ल. रा. पांगारकरांचा येथे उल्लेख आहे. पांगारकर हे बी. ए. मध्ये दोन वर्षे नापास होत होते तरी १८९८ सालीच त्यांनी शिवजयंत्युत्सवात पुण्यास व गणेशोत्सवात मुंबईस व्याख्याने देऊन नावलौकिक मिळविला होता. (ल. रा. पांगारकर यांच्या `चरित्रचंद्र` ह्या आत्मचरित्रावरून).

४२. ह्यापुढील तीन पाने अथवा सहा पृष्ठे रोजनिशीत नाहीत. स्पष्टीकरण प्रस्तावनेत केले आहे. ह्यानंतरच्या काळात रोजनिशीलेखनात मोठा खंड पडलेला दिसतो. पृष्ठ ७३ वर ३१ मार्च १८९९ ला म्हणजे जवळजवळ सात महिन्यानंतर रोजनिशी लिहिलेली आहे. मधल्या अवधीत अण्णासाहेब बी. ए. परीक्षा उत्तीर्ण होऊन मुंबईस एल् एल. बी. चा अभ्यास करीत होते.
४३. येथे सोमवार हा चुकीने पडलेला आहे. कारण आधीच्या तारखेला सोमवार येतो व तसा लिहिलेलाही आहे.

४४. डॉ. कृष्णाजी दादाजी केळवकर (१८४७ – २९ – ६ - १९०६) मूळ गाव वसई. ग्रँट मेडिकल कॉलेजचे पदवीधर. अलिबाग येथे सरकारी इस्पितळात नोकरी. स्त्रीशिक्षणाची आवड. निरक्षर पत्नीस स्वतः उल्हासाने शिकवून सुशिक्षित केले. आजारपणानंतर नोकरी सोडली. पत्नीच्या नोकरीनिमित्त १८८३ पासून कोल्हापुरास वास्तव्य.

रखमाबाई (१८५५ - २९ जून १९५०) ह्या पत्नी. पतीने घरीच उत्तम शिक्षण दिले. तांत्रिक दृष्टीने पुण्याच्या फीमेल कॉलेजमध्ये राहून सर्टिफिकेट मिळविले. कोल्हापूर दरबारने एक उत्तम स्त्रीशिक्षक मिळावा म्हणून मागणी केल्यानंतर कोल्हापुरास १८८३ मध्ये आल्या. १८९५ मध्ये लेडी सुपरिंटेंडेंट म्हणून नेमणूक. १९२० मध्ये सेवानिवृत्त.


ह्या परिच्छेदात उल्लेखिलेले डॉ. धनवडे म्हणजे श्री. रामचंद्र यल्लाप्पा धनवडे. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर. साथीच्या रोगाच्या वेळी शिरोळ स्टेशनवर क्वारंटाइनचे डॉक्टर होते. राजर्षी शाहू छत्रपतींशी निकटचा संबंध. महाराज त्याना `देव डॉक्टर` असे संबोधित. वृत्तीने धार्मिक, मारुतीची फार भक्ती करीत असत. जयसिंगपूर स्टेशननजीक मारुतीची स्थापना केली. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवर त्यांच्या ज्येष्ठ कन्येच्या स्मरणार्थ मारुतीचे देऊळ बांधले. (माहिती : डॉ. एस. डी. धनवडे, कोल्हापूर, यांजकडून).


४५.  श्री. विष्णुपंत देशपांडे यांचे चिरंजीव श्री. भाऊराव यांची तेरदाळास जाऊन मी भेट घेतली. म. शिंदे यांच्याकडून विष्णुपंतांना गेलेली पत्रे जतन करून ठेवली नसल्याने उपलब्ध होऊ शकली नाहीत.


४६. रोजनिशीत येथपासून सहा पृष्ठे नसल्याचा उल्लेख वर केला आहेच.

४७. श्री शाहू छत्रपतींना ३१ जुलै १८९७ रोजी प्रथम पुत्रलाभ झाला. त्यांचे नाव राजारामराजे असे ठेवले. १५ एप्रील १८९९ रोजी द्वितीय पुत्र झाला. त्यांचे नाव शिवाजीराजे असे ठेवण्यात आले. यांच्याच जन्मसोहळ्याचा उल्लेख येथे आहे.

४८. इंग्रजीतील sophisticated ह्या शब्दाचा आशय म. शिंदे यांना प्रकट करावयाचा आहे असे दिसते.

४९. पन्हाळगड, पावनगड, विशाळगड व आजूबाजूचा रम्य परिसर पाहण्याचे म. शिंदे यांनी ठरविले होते. नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची आवड वडिलांमुळेच त्यांच्यात लहानपणापासूनच निर्माण झाली होती. (वि. रा. शिंदे, `माझ्या एकांत सहली,` माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. ६३-६४).
`गडाला एक प्रदक्षिणा तीन दिवसात केली` (पृ. ५७) असे म. शिंदे यांनी रोजनिशीत लिहिले आहे. `दिवसात` हा शब्द `प्रहरात` या शब्दाऐवजी अनवधानाने पडलेला दिसतो.