येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी - टिपा१

ह्या भेटीत म. शिंदे व श्री. भास्करराव जाधव यांचे काय बोलणे झाले याची कल्पना त्यांच्या पुढील निवेदनावरून येते. "भास्कररावांना मी `का आलात ?` असे विचारले. `एरव्ही समाचाराला आलो` असे सांगून ते म्हणाले, "आता तुम्ही वृद्ध झाला आहात. तुम्हास विश्रांतीची जरूरी आहे. ती घेण्याचे निश्चित करीत असाल तर तुम्हाला नेण्यासाठी आलो आहे."  मी म्हटले, "विश्रांतीच जर मला पाहिजे आहे, तर येथल्यासारखी बाहेर दुसरीकडे कोठे मिळणार नाही. आणि आमच्यासारखी मंडळी येथे असली तर बाहेरचीही थोडी गडबड कमी होईल." (माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ. ४०२)

११. श्री. प्रतापराव व लक्ष्मीबाई शिंदे यांची प्रथम कन्या २२ जून १९३० रोजी जन्मली. हिचे उर्मिला असे नाव ठेवले. अमेरिकेतील युटा स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. दत्ताजीराव साळुंखे यांच्याशी विवाह.

१२. रामभाऊ हिरे (जन्म १८ नोव्हेंबर १८९९). फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए. राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास पत्करला. अहमदनगर येथे राष्ट्रीय पाठशाळा काढली. तिला आर्थिक मदत व्हावी म्हणून `मोहनमुद्रा मंदिर` नावाचा छापखाना काढला. तुरुंगातील आठवण सांगताना त्यांनी म्हटले, `महर्षी शिंदे स्वभावाने फार मनमिळावू होते. स्वच्छतेची त्यांना अतिशय आवड असे. आपले धोतर ते पांढरेशुभ्र ठेवीत. त्याचप्रमाणे सर्व भांडी घासूनपुसून स्वच्छ ठेवीत.` हल्ली श्री. हिरे यांचे वास्तव्य अहमदनगर येथे आहे.
त्रिंबक अण्णाजी ऊर्फ नानासाहेब देवचके (५ नोव्हेंबर १८९५ - २६ फेब्रुवारी १९५५). अहमदनगरचे अनाथ विद्यार्थी गृह ही संस्था स्थापन करून तिच्यासाठी कष्ट घेतले. नगर येथील सामाजिक जीवनात कार्य केले. (माहिती : श्री. द. बा. डावरे, वकील, अहमदनगर, श्री. रामभाऊ हिरे यांचे मेहुणे, यांच्याकडून).

१३. स्वामी सहजानंद यांच्याऐवजी स्वात्मानंदजी हे नाव चुकून लिहिले गेलेले दिसते. कारण नमूद केलेल्या १४ नावांत यांचे नाव नाही. स्वामी स्वात्मानंदजी हे प्रार्थनासमाजाच्या आणि डिस्प्रेड क्लासेस मिशनच्या कामातील म. शिंदे यांचे सहकारी होते. परिचयातील हे नाव अनवधानाने येथे लिहिले गेले असावे.

१४. अहल्याबाई शिंदे (जन्म १८९४) ह्या श्री. तुकाराम बाबाजी गरूड यांच्या कन्या. हे चित्रपटव्यवसायाची सामग्री व इस्पितळउपकरणे यांचा व्यापार करणा-या बाबाजी सखाराम आणि कं. चे व `करमणूक` वृत्तपत्राचे मालक. अहल्याबाईंचा विवाह १९१५ मध्ये श्री. गणपतराव शिंदे यांच्याशी झाला. वडिलांकडून आलेली मोठी संपत्ती मराठा फ्री बोर्डिंग चालविण्यासाठी व दीनदलितांना साह्य करण्यासाठी पतीच्या स्वाधीन केली. प्रार्थनासमाजी. पतीच्या सामाजिक-धार्मिक कार्यात अंतःकरणपूर्वक सहकार्य केले. सध्या अतीव वार्घक्याच्या स्थितीत पुण्यास मुलगा केशवराव यांजकडे आहेत.

१५. गणपतराव शिंदे (३ डिसेंबर १८८० - २१ फेब्रुवारी १९७५). शिक्षण मॅट्रिकपर्यंत. १९०६ पासून शेतकीखात्यात नोकरी. दत्तात्रय अनंत आपटे हे कविमित्र भेटले. रविकिरण मंडळातील कवींशी स्नेह. मासिक मनोरंजन, विविध ज्ञानविस्तार, करमणूक इ. मधून `सरस्वतीकंठाभरण` व `विनीत` ह्या टोपणनावांनी कवितालेखन. प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत सभासद व कार्यकर्ते. वयाच्या ९४ व्या वर्षीदेखील उपासना चालवीत. कौटुंबिक उपासना मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम केले. पुण्याचे मराठा फ्री बोर्डिंग स्वार्थत्यागपूर्वक चालविले. अण्णाचे साहेबांचा शिंदे दंपतीवर फार लोभ होता. (मुलाखत : गणपतराव शिंदे, पुणे, १० मे १९७४;  व माहिती : केशवराव शिंदे, गणपतरावांचे चिरंजीव, यांजकडून).

१६. कृष्णराव गोविंदराव पाताडे (१८९६-१९३३). अण्णासाहेब शिंदे यांचे निष्ठावंत सहकारी. मुंबई, बंगलोर, पुणे येथील मिशनच्या शाखांमध्ये धडाडीने कार्य. पर्वती सत्याग्रहात भाग. म. गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाच्या आधी अस्पृश्यतेच्या विरुद्ध सत्याग्रह करावा हे बिंबविण्यासाठी १९२० साली दांडी सत्याग्रहाच्या वेळी मिठाचे मडके ताब्यात घेऊन त्या सत्याग्रहाला विरोध दर्शविला. पर्वती सत्याग्रहात भाग घेतला. राष्ट्रीय वृत्तीचे. अण्णासाहेब शिंदे यांचे त्यांच्यावर अपत्यवत् प्रेम होते. १९३३ मध्ये मानसिक बिघाड झाला. त्यातच न्यूमोनियाचा विकार होऊन मृत्यू.

१७. सुभेदार आर. एस. घाटगे हे १९०६ च्या सुमारास अण्णासाहेबांच्या सहवासाता आले. डिस्प्रेड क्लासेस मिशनचे कार्यकर्ते. रा. पाताडे यांजबरोबर म. गांधींच्या दांडी सत्याग्रहास विरोध केला. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी बनले. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सक्रीय भाग घेतला.

१८. माधवराव केळकर (१८९९-२८ ऑगस्ट १९६५). प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक श्री. सदाशिव पांडुरंग केळकर यांचे चिरंजीव. ह्यांचा निसर्गोपचार पद्धतीचा अभ्यास होता, व तिला अनुसरून वैद्यकी करीत.

१९. केशव, हिरु व शिवाजी ही गणपतराव व अहल्याबाई शिंदे ह्यांची मुले.

२०. श्री. बी. बी. केसकर ह्यांनी संपादित केलेले ` विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश ` हे दामोदर सावळाराम आणि मंडळीने मुंबई येथे १९१२ मध्ये प्रसिद्ध केलेले पुस्तक.