येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी - टिपा
१. विश्वास (जन्म १९०७) हे म. शिंदे याचे मधले चिरंजीव. ह्यांची मानसिक वाढ झाली नव्हती. १९६५ मध्ये मृत्यू होईपर्यंत थोरले चिरंजीव प्रतापराव यांनी त्यांचा प्रतिपाळ केला. छबू ऊर्फ शुभदा ह्या म. शिंदे यांचे बंधू एकनाथराव यांच्या कन्या. यांचा विवाह श्री. एकनाथराव घोरपडे यांच्याशी झाला. बबन ऊर्फ रवींद्रराव (जन्म ६ जुलै १९१३) हे म. शिंदे यांचे धाकटे चिरंजीव. काही दिवस सैन्यात नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर पुण्यास शेतकी खात्यात नोकरी केली. म. शिंदे यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या मागे लागून, त्यांना सर्व प्रकारे मदत करून त्यांच्या `माझ्या आठवणी व अनुभव` ह्या पुस्तकाचा अखेरचा भाग उतरून घेतला. यांचा मृत्यू २९ जून १९७५ ला झाला.
२. म. शिंदे यांच्या `माझ्या आठवणी व अनुभव` ह्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन करावयास प्रारंभ केल्याचा हा उल्लेख. ह्या सुमारे ४१३ छापील पृष्ठांच्या पुस्तकापैकी १०३ पृष्ठांपर्यंतचा मजकूर त्यांनी तुरुंगवासात लिहिला.
३. प्रतापराव (जन्म ११ सप्टेंबर १९००) हे म. शिंदे यांचे थोरले चिरंजीव. पुणे कँटोनमेंट बोर्डात हिशोबखात्यात नोकरी केली. पुणे प्रार्थनासमाज, जातिनिर्मूलन संस्था इ. संस्थांशी निगडित. सामाजिक, धार्मिक विषयांवर अनेक मासिकांतून व वृत्तपत्रांतून स्फुट लेखन. मृत्यू ९ सप्टेंबर १९७३.
४. ब्राह्मधर्माचा प्रचार बहुजनसमाजात आणि विशेषतः कुटुंबात (बायका-मुलांत) व्हावा ह्या तळमळीतून म. शिंदे यांनी `कौटुंबिक उपासना मंडळा`ची १९२६ मध्ये पुण्यास स्थापना केली. `आईबाप, बहीणभाऊ, नवराबायको, ह्यांच्या प्रेमाचे केंद्र म्हणजे कुटुंब. हेच धर्माचरणाचे व प्रसाराचे क्षेत्र`, ह्या भूमिकेतून, व्यक्तीने नव्हे तर कुटुंबाने, ह्या मंडळाचे सदस्य व्हावे ही अपेक्षा होती. बाबूराव जगताप, केशवराव जेधे, गणपतराव शिंदे, रामराव शिंदे, कृ. गो. पाताडे इत्यादींची कुटुंबे ह्या मंडळात सहभागी होती. मंडळाचे काम १९३६ पर्यंत विशेष जोरात होते व म. शिंदे यांच्या मृत्यूपर्यंत ते चालले. (वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, उनि., पृ ३६१-६४).
५. श्रीमती लक्ष्मीबाई (जन्म १९१४) ह्या म. शिंदे यांचे थोरले चिरंजीव श्री. प्रतापराव यांच्या पत्नी. बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील पदच्युत राजे मल्हारराव ह्यांचे पुत्र गणपतराव ह्यांच्या कन्या. आपल्या पतीसमवेत ह्याही सामाजिक कार्यात भाग घेत. पुणे प्रार्थनासमाजाशी निगडित. काही काळ उपाध्यक्ष. हल्ली वास्तव्य लॉस एंजेलिस येथे इंजिनीअर असलेल्या शंतनू ह्या मुलाकडे.
६. बाबूराव मारुतीराव जेधे (१८९९-१९६७). सत्यशोधक चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते. बहुजनसमाजाच्या चळवळीस सर्वतोपरी साह्य केले. केशवराव जेधे यांचे बंधू. अण्णासाहेबांशी यांचे अतिशय घरोब्याचे संबंध होते.
७. रुक्मिणीबाई (१८८२-१९५४) ह्या म. शिंदे यांच्या पत्नी. १९०९ साली पुण्यास भरलेल्या डिस्प्रेड क्लासेस मिशनच्या प्रांतिक परिषदेच्या वेळी व्यवस्था ठेवण्यात झटून काम केले. अण्णासाहेबांच्या बरोबर सार्वजनिक कार्यात भाग घेतला.
८. गजानन नारायण ऊर्फ सेवानंद बाळूकाका कानिटकर (१८८६-१९५९). १९०८ मध्ये बी. ए. प्रथम टिळकांचे अनुयायी. १९२० ते ४४ पर्यंत म. गांधींचे अनुयायी. मुळशी सत्याग्रह (१९२१-२३) संघटित केला. मिठाचा सत्याग्रह, दारूबंदी, `चले जाव` ह्या चळवळींत भाग. १९४४ मध्ये काँग्रेसचा राजीनामा व त्यानंतर पुणे येथे `हिंदमाता मंदिर` स्थापन करून गरीब विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वावलंबनाचे शिक्षण. ग्रामोद्धाराचे कार्य.
९. भास्करराव विठोजीराव जाधव (१८६७-१९५०). १८८८ साली मॅट्रिक परिक्षेत इलाख्यात पहिले. एम्.ए., एल्एल् बी. १८९५ ते १९२१ पर्यंत कोल्हापूर संस्थानात नोकरी. सहकारी चळवळीस चालना दिली. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार. १९२३ पासून मुंबई कायदेकौन्सिलात विविध मंत्रिपदावर. म. शिंदे यांना तुरुंगात भेटण्यास आले त्यावेळी ते मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री होते.
१०. ह्या वाक्यानंतर मूळ रोजनिशीत सुमारे १० ओळींची जागा कोरी ठेवलेली आहे. रा. भास्करराव जाधवांशी ह्या प्रसंगी जे बोलणे झाले ते तुरुंगातील निर्बंधामुळे ह्या वेळेस लिहिणे म. शिंदे यांना योग्य वाटले नसावे. तुरुंगातून सुटल्यानंतर लिहिण्यासाठी ही जागा कोरी ठेवली असावी.