अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधींजी संबंध

अण्णासाहेब शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या मिशनच्या कामातून अंग काढून घेतले आणि ही संस्था प्रामुख्याने अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन केली, तरी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यातून त्यांची सुटका होणे कठीण होते. कारण अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे त्यांनी धर्मकार्य म्हणून आंतरिक प्रेरणेने पत्करलेले काम होते व ह्या कार्याच्या सिद्धीसाठी शक्य होतील ते सर्व प्रयत्न पुढील काळातही अण्णासाहेब करीत राहिले.


राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतानिवारणाचा ठऱाव मंजूर केल्यानंतर हे काम राष्ट्रसभेच्या कामाचा एक भाग बनणे अपरिहार्य होते व म. गांधींसारखा देशाच्या सर्वांगीण जीवनाचा विचार करणारा नेता काँग्रेसचाही नेता बनल्यानंतर अस्पृश्यतानिवारणाच्या कामाकडे त्यांनी लक्ष देणे स्वाभाविक होते. विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा गांधी यांचा दोघांच्याही जिव्हाळ्याच्या ह्या प्रश्नावर विचारविनिमय होत असे, संवाद त्याचप्रमाणे विसंवादही घडत असे, असे दिसते. महात्मा गांधींचा भारतीय राजकारणात उदय झाल्याबरोबर त्यांची अलौकिक थोरवी विठ्ठर रामजी शिंदे यांच्या मनाला भावली होती व महात्मा गांधीबद्दल त्यांच्या अंत:करणात अतीव आदराची भावना निर्माण झाली होती. म. गांधींची आध्यात्मिक दृष्टिकोणातून जीवनाच्या सर्व अंगांचा विचार करण्याची व्यापक भूमिका शिंदे यांच्या मते थोर व्यक्तीचे लक्षण होते. म. गांधींची थोरवी वर्णन करताना त्यांनी १९२२ साली लिहिले आहे, "गेल्या तीन शतकांत आमच्या ह्या हतभागी हिंदुस्थानात दोन लोकोत्तर पुरुष निर्माण केले. ह्यावरुन जगाच्या प्रभावळीत ठेवण्यासारखी पुरुषरत्ने पैदा करण्याची आमच्या देशाची शक्ती नष्ठ झाली नाही हे आम्ही निरभिमानपणे व केवळ आध्यात्मिक दृष्टीने म्हणू शकतो. ही रत्ने म्हणे पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज आणि पूज्यपादारविंद महात्मा गांधीजी हीच होत!" आपण या आधी पाहिले आहेच की, मंगलोर येथे असताना तेथील सरकारी कॉलेजात सेंट फ्रान्सिस ऑफ असीसीवर प्रवचन करीत असताना त्यांनी म. गांधींच्या संदर्भात असे प्रतिपादन केले की, गांधीजी हे धर्म आणि राजकारण यांत भेद न करिता राजकारणाला धर्माचे अधिष्ठान देतात; मात्र इंग्रज शासनकर्ते आपला धर्म व शासन ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवतात," अण्णासाहेब शिंदे यांना ही तुलना करुन म. गांधीची थोरवी तर सांगायची होतीच, परंतु इंग्रज हे हिंदुस्थानवर धर्मबुद्धीचे राज्य चालवीत नाहीत हेही दाखवून द्यावयाचे होते.


म. गांधीबद्दल शिंदे यांच्या मनात असलेला अतीव आदर कधीही कमी झाला नाही. मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नावर त्यांच्याशी शिंदे यांचे मतभेद अनेकदा होत राहिले व त्यांची स्पष्ट शब्दांत जाणीव करुन देण्याबद्दल शिंदे यांनी कधीही कसूर केली नाही.


१९९५ च्या सुमारास म. गांधी हिंदुस्थानमध्ये आले. ते पुण्यात आले असता ना. गोखले यांना भेटले हे त्यांना गुरुस्थानीच होते व ते गांधींची सर्वतोपरी काळजी घेत. कदाचित गोखले यांनी सांगितल्यावरुन असेल, गांधीजी विठ्ठल रामजी शिंदे यांना भेटण्यासाठी भोकरवाडी येथील डी.सी. मिशनच्या शाळेमध्ये आले होते. पुण्यातील मंडळी व्यक्तिशः गांधीजींना त्यावेळी ओळखत होती, असे नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांची मात्र त्यांच्याशी या आधीही भेट झाली होती. श्रेष्ठ कृषितज्ज्ञ व पुण्यातील शेतकी कॉलेजचे प्राचार्य पी. सी. पाटील यांनी गांधीजी भोकरवाडीला मिशनच्या शाळेत कसे आले व आपण त्यांना कसे पाहिले याचे वर्णन केले आहे, ते असे:


"पुण्यास ज्या वेळी मराठा समाजात शिक्षणविषयक जागृती होत होती, तेव्हा एकदा विठ्ठल रामजी शिंद्यांनी भोकरवाडीत मराठी इतिहासावर व्याख्यानमाला सुरु केली होती. आम्ही चाळीस-पन्नास तरुण हजर होतो. बडोद्याचे इंजिनिअर जयराम जनार्दन सावंत यांचे व्याख्यान होते. विषय "बाजीप्रभू व पावनखिंडीची लढाई" असा होता मी अध्यक्ष होतो. मी व सावंत प्लॅटफॉर्मवरील खुर्च्यांवर बसलो होतो. विठ्ठलराव शिंद्यांसह बाकीची मंडळी प्लॅटफॉर्मखाली जाजमावर बसली होती. सावंतांच्या व्याख्यानाला बराच रंग आला होता. इतक्यात एक साधारण, सडपातळ गृहस्थ डोक्यास काठेवाडी धर्तींचे पागोटे, अंगात खादीचा आखूड अंगरखा व खादीचा पंजा नेसलेले बाहेरून एकटेच सभेत आले. विठ्ठलरावांनी त्यांना पाहताच पुढे जाऊन त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. विठ्ठलरावांखेरीज आम्हा कोणालाही त्या नवख्या गृहस्थाची ओळख नव्हती. व्याख्यान संपले. समारोप झाला आणि विठ्ठलराव शिंदे अध्यक्षांचे व व्याख्यात्यांचे आभार मानण्यास उठले. प्लॅटफॉर्मच्या जवळ येऊन त्या नवख्या गृहस्थाकडे बोट करुन त्यांनी सांगितले, "हे सज्जन कोण आहेत हे आपणास माहीत नाहीसे दिसतात. हे दुसरे कुणी नसून द. आफ्रिकेत हिंदी समाजाचे पुढारी म्हणून ज्यांच्यासंबंधी आपण वृत्तपत्रांतून वाचतो तेच हे गांधीजी होत. ते नुकते द. आफ्रिकेतून परत आले आहेत. त्यांचे दर्शन झाले याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटेल."


"आम्ही अगदी विस्मयात पडलो व सर्वांनी त्यांना आदराने नमस्कार केला. गांधींसारख्या जगप्रसिद्ध, पण मी त्या वेळपर्यंत न पाहिलेल्या महात्मापुढे अध्यक्ष म्हणून बसण्याचा प्रसंग मला आठवतो. हेच माझे गांधीजींचे पहिले दर्शन."


म.गांधींनी असहकाराची व बहिष्काराची चळवळ सुरु केल्यानंतर अस्पृश्यवर्गाने ह्या चळवळीत भाग घ्यावा की नाही याबद्दलचा विचार गंभीरपणे करण्याचा प्रसंग निर्माण झाला. मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर स्वत: शिंदे, मुंबई शाखेचे सेक्रेटरी वामनराव सोहोनी व सय्यदांसारखे अन्य कार्यकर्ते यांचे ह्या प्रश्नाबाबात एकमत होते. अस्पृश्यतवर्गाला या चळवळीत ओढले तर स्वाभाविकपणेच त्यांना मिळणारी सरकारी ग्रॅंट बंद होण्याची भीती होती, म्हणून अस्पृश्यवर्गाला ह्या चळवळीपासून दूर ठेवावे असेच ह्या मंडळीचे मत होते. याबाबत अण्णासाहेब शिंदे यांनी लो. टिळकांच्या मताचा कल अजमावावा असे ठरविले. १९९८ साली कर्नाटकात अथणी येथे राष्ट्रीय पक्षाची जिल्हापरिषद भरली असत त्यामध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी भाग घेतला व लो. टिळकांचे ह्या प्रश्नाबाबत मत आजमावले. टिळकांनीही "मिशनला राजकारणात ओढणे शक्य नाही व इष्ट नाही." असेच मत दिले.


१९२० च्या नाताळात नागपूर येथे राष्ट्रीय सभा भरली असताना असहकारितेच्या चळवळीत अस्पृश्यांना सामील करुन घ्यावे की नाही याबाबतीत शिंदे यांचे काय मत पडले, हे म. गांधींनी अजमावून पाहण्याचे ठरविले व त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या विषयनियामक समितीत शिंदे यांची नेमणूक त्यांनी करुन घेतली. असहकारसारख्या कठीण बाबतीत अस्पृश्यांना गुंतविण्याचा तूर्त काळ आला नाही, हे जाणून मिशनच्या शिंदे वगैरे मंडळींनी जे समतोल धोरण ठरविले होते तेच योग्य आहे हे सरकारी ग्रॅंट घेण्याचे चालू ठेवावे असे महात्माजींचे यावेळी मत पडले.


नागपूर येथे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी २५ डिसेंबर १९२० रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद आयोजित केली. ही परिषद शिंदे यांना घाईघआईने भरवावी लागली. पण परिषदेस प्रचंड लोकसमूह हजर होता. मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी वगैरे प्रांतोप्रांतीचे पुढारी हजर होते. म. गांधींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ह्या परिषदेत पुढील दोन ठऱाव मंजूर झाले. १. अस्पृश्यवर्गाची हिंदू धर्म व हिंदू राष्ट्र यांच्याशी असलेली एकनिष्ठा ध्यानात घेऊन त्यांच्यावर असलेले नागरिकत्वाचे व धार्मिक प्रकारचे सर्व प्रतिबंध काढून टाकावेत. २. हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून अस्पृश्यांच्या मार्गात अद्यापि स्वतंत्रपणे धद्याची निवड करण्यात आणि चालविण्यात काही अडथळे येत आहेत ते सर्व जाऊन त्यांच्यात स्वयंनिर्णयाची वृत्ती विकसित व्हावी अशी रीतीने त्यांना हरएक सवलत देऊन मदत करावी.


हे दोन्ही ठराव महत्त्वाचे होते. पहिला, सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतेची जाणीव नष्ट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता व वरिष्ठवर्गीयांच्या मनामध्ये पालट घडविण्याचा त्याचा हेतू होता. दुसरा ठराव अस्पृश्यवर्गीयांची उन्नती होण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे उद्योगधंदे करावेत, याबाबतीत चालना देणारा होता.या परिषदेत म. गांधी भाषण करताना म्हणाले, "मी वैष्णव आहे. वर्णाश्रमाचा अभिमानी आहे. तरीसुद्धा अस्पृश्यतेस हिंदू धर्मात कोठेही आधार सापडत नाही; अस्पृश्यत्व हे फार अत्यंत प्रेम आहे. ती मला पोटच्या मुलाप्रमाणे प्रिय आहे व तिला आपली असे म्हणून घेण्यासाठी मला आपल्या पत्नीशी बरेच झगडावे लागले आहे. मी या मुलीला दत्तक घेतले आहे. तरी इतरांनीही तसेच करावे असा माझा आग्रह नाही."


महात्माजींनी दत्तक घेतलेली ही लक्ष्मी नावाची मुलगी मुंबई मिशनच्या वसतिगृहातून त्यांनी नेली होती. पुढे तिचा विवाह एका ब्राह्मण गृहस्थाशी लावण्यात आला. शिंदे यांनी चालविलेले कार्य व त्यांचे धोरण व महात्माजींची भूमिका यामध्ये येथपर्यंत सुसंवाद आढळून येतो. महात्माजींचा वर्णाश्रमधर्माचा अभिमान हा शिंदे यांना पटणारा नव्हता. परंतु अस्पृश्यतानिवारणाच्या कामामध्ये म. गांधीच्या या भूमिकेचा निदान अद्यापपर्यत तरी अडथळा आलेला नव्हता.


राष्ट्रीय सभेने १९९७ साली अस्पृश्यतानिवारणचा ठराव मंजूर केल्यानंतर व म. गांधींनी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय प्रवेश केल्यानंतर व एक प्रकारे काँग्रेसची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आल्यानंतर अस्पृश्यतानिवारणाचे कार्यही म. गांधींनी काँग्रेसच्या द्वारा जोमदारपणाने करावे, ह्या कामाला काँग्रेसने महत्त्व द्यावे असे शिंदे यांना वाटत होते. आपली ही अपेक्षा काँग्रेसकडून, म. गांधीकडून पूर्ण होत नाही असे ध्यानात आल्यावर शिंदे यांना त्याबद्दल असमाधान वाटू लागले व म. गांधीकडे काहीशा प्रेमाच्या अधिकाराने ते तक्रारही करु लागले असे पुढील काळातील घटनांवरुन दिसून येते. १९२३ साली विठ्ठल सामजी शिंदे डी. सी. मिशनच्याकामातून मुक्त झाले. संस्थेच्या द्वारा अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे त्यांच्याकडून प्रत्यक्षरुपाने होणारे काम स्वाभाविकपणेच संपुष्टात आले. तेव्हा एखाद्या चळवळीत प्रत्यक्षपणे सहभागी होऊन लोकांमध्ये जागृती करण्याचे काम मात्र त्यांनी चालूच ठेवले. मंगलोर येथे ते वास्तव्य करीत असाताना व्हायकोम येथील मंदिराप्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला. १९२४ च्या अखेरीस मंगलोर येथून ते परत पु्ण्यास आले. अस्पृश्यांबाबतचे काम काँग्रेसकडून ज्या जोमाने व तळमळीने व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती त्याप्रमाणे ते होत नाही असे लक्षात आल्यानंतर ह्या कामाकडे म. गांधीचे लक्ष वेधण्याचे ते प्रयत्न करीत होते. ह्या बाबतीत त्यांनी एक पत्र त्यांचे सहकारी कृ. गो. पाताडे यांच्याबरोबर महात्माजीना पाठविले. हे पत्र वाचून महात्माजींनी "अगदीच वाईट' अशी प्रतिक्रिया प्रकट केली. महात्माजींची ही प्रतिक्रिया पाताडे यांच्याकडून समजल्यानंतर अण्णासाहेब शिंदे हे स्वाभाविकपणेच नाराज झाले व आपली प्रतिक्रिया व भूमिका त्यांनी महात्मा गांधींना २५ नोव्हेंबर १९२४ रोजी पत्र लिहून कळविली. शिंदे यांनी पुढीलप्रमाणे पत्र लिहिले:


प्रिय महात्माजी,
ऑल पार्टी कॉन्फरन्सच्या वेळी श्रीयुत पाताडे यांनी आपली भेट घेतली. त्यांच्याजवळ मी आपल्याला जे पत्र दिले होते ते वाचल्यानंतर आपण 'अगदी वाईट' असे त्याचे वर्णन केले हे मला त्यांच्याकडून समजले. आपल्यासारख्या थोर व मनमोकळ्या व्यक्तीकडून अशी प्रकारची प्रतिक्रिया प्रकट झाल्याचे समजून मला आश्चर्य वाटले व दु:खही झाले. हे पत्र व्यक्तिश: तुम्हाला लिहिलेले मुळीच नव्हते. ते माझ्यासारख्या दलितवर्गाच्या नम्र सेवकाने आपल्यासारख्या दैवी प्रेरणा असलेल्या भारताच्या पुढा-याला लिहिलेले पत्र होते.त्यामध्ये प्रकट केलेली मते आणि आशंका सर्वस्वी माझ्या नव्हे तर सामान्यत: दलितवर्गाच्या व विशेषतः मिशनच्या होत्या.


आपल्या अंतःकरणात खादीला प्रथम स्थान आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला दुसरे आणि कदाचित अस्पृश्यतेला तिसरे स्थान आहे. परंतु माझ्या अंत:करणात मात्र (अस्पृश्यतेला) पहिले स्थान आहे. मी निश्चितच माझी आपणाबरोबर तुलना करायचे मनातही आणीत नाही. प्रत्यक्ष व्यावहारिक राजकारणाच्या बाबतीत मी चुकत असेन व आपण बरोबर असाल हे संभवते. ते पत्र मी अतिशय घाईत परंतु माझ्या अंत:करणाशी प्रामाणिक राहून लिहिले होते आणि ते आपणाकडे एक व्यक्ती म्हणून नव्हे तर पुढारी म्हणून पाठविले होते.


आपल्या नेतृत्वाखाली असणा-या काँग्रेसची ह्या तथाकथित हिंदू असणा-या दुर्दैवी अस्पृश्यवर्गाबद्दलची जाहीर वक्तव्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये किती मोठी तफावत आहे हे आपण जाणताच. नागपूर काँग्रेसच्या विषयनियामक समितीमध्ये मी भाग घेतला, पंरतु त्याचा विशेष लाभ झाला नाही. अर्थात मी पुढारीही नव्हे. परंतु त्यानंतरच्या अवधीत आपला व श्री. राजगोपालाचारी यांचा अपवाद वगळता नाव घेण्याजोग्या कोणत्याही पुढा-याला ह्या वर्गाच्या दु:खामध्ये लक्ष घालण्यास वेळ मिळाला नाही. दक्षिणेतील सत्याग्रहाचा मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यास केला. परंतु तुमचे या प्रश्नाकडे लक्ष असतानाही आपल्या अन्य पुढा-यांकडून या सत्याग्रहाची सफाईदारपणे उपेक्षा करण्यात आली. आपण स्वत: व्हायकोमला जाऊ शकला नाहीत आणि पं. मालवीयजी जाणे संभवनीय नव्हते. स्वामी श्रद्धानंदजी यांची आणि माझी मंगलोरला भेट झाली. कदाचित त्यांना आता ह्या जुनाट क्षेत्रात भाग घेतल्याबद्दल पश्चात्ताप होत असेल.


मलबार आणि द. कानडा भागात शांतपणे काम करण्यात मी गेले आठ महिने घालविले. माझी आता अशी खात्री आहे की केवळ सनातनीच नव्हे तर वारंवार आपली मते प्रकट करणारे उदारमतवादीही विधायक स्वरुपाची आश्वासने देत असूनही ह्या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करीत आहेत असे दिसत नाही. भारतीय अथवा परकीय, कोणतीही संघटित स्वरुपाची संस्था, दलितवर्गाचा एक राजकीय अंग म्हणून विचार करावयास तयार असल्याचे दिसत नाही.


श्री. पाताडे यांनी मला सांगितले की, गेल्या आठवड्यात मुंबई येथे सुमारे दहा-बारा अखिल भारतीय कीर्तीच्या पुढा-यांना ते मुंबईत भेटले. परंतु त्या सर्वांनी बेळगाव येथे होणा-या आगामी अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची तयारी दाखविली नाही. आपणाला आठवत असेलच की, आपण नागपूर येथील ह्या परिषदेचे अध्यक्षस्थान कृपावंतपणे पत्करले होते. त्यानंतर इतके वर्षांत सहानुभूतिपूर्वक भाषणे करीत असूनसुद्धा ह्या तिय्यम दर्जाच्या कामाला वेळ देण्याइतकी सवड कोणालाही नाही. तूर्त मी आपणाला कोणत्याही प्रकारची विनंती करुन त्रास देऊ इच्छीत नाही. फक्त आपण कृपया माझे ते पत्र आपणाला "अगदी वाईट" का वाटले हे कळवावे. श्री. पाताडे यांनी आपल्याला हे मिशन आणि मुंबई येथील पितृसंस्था यांमधील भेद स्पष्ट केलेला आहेच.


ताजा कलम : हे लिहीत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण क्षमा कराल असा विश्वास मी बाळगतो. आपली प्रकृती सुधारली आहे हे ऐकून मला फार आनंद वाटता.
वि.रा. शिंदे