८-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता १५ शुक्रवार एप्रिल १८९८

आजचा 'काळ'चा अंक वाचला. मद्रास ले. कौन्सिल पुढचे 'आन. जंबुलिंग मुदलियरचे बालविवाह निषेधक बिल' यावरची टीका वाचून काळ कोणच्या पक्षाचा हे कळले.  काळ म्हणजे केसरीची नक्कलच दिसते.  पण केसरीचा स्वाभाविक खरमरीतपणा, जाज्वल्य अर्थगांभीर्य, शब्दाचा नेमकेपणा व साधी ढब, नखरेबाज अलंकाराविषयी निष्काळजीपणा वगैरे चांगले गुण काळात तंतोतंत उतरलेले दिसत नाहीत.  पण केसरीचा कुत्सितपणा व व्यक्तीला व पक्षाला टोचून लिहिण्याची सवय मात्र बर्‍याच ठिकाणी काळात चमकते.  काळ हे विशाळ नाव घेऊन प्रसंगविशेषी देखील असली लघुता पत्रकाराने दाखवू नये.  आजपर्यंत ४ चार अंक वाचले.  पण मनाला तल्लीन करण्यासारखा एकही विचार अगर विकार यात मला दिसला नाही.  कदाचित पत्र नवे आहे म्हणून असे झाले असेल.  तरी पत्रकर्ते विद्वान व शांत आहेत म्हणून देशी पत्रात जी २।३ च चांगली मासलेवाईक आहेत [त्यात] आपली लवकर गणना करून घेतील.  पण असल्या कटकटीच्या दिवसात मुद्दाम अवतार घेतलेल्या 'काळा'त इतर सर्व पत्रापेक्षा काही विशेष सापडेल अशी जी आशा ती मात्र गेली.  बहुतेक पत्रांना कसला तरी पक्षघात झालेला आढळत आहे.  त्यामुळे पत्रलेखकांचे खरे व अकलुषीत मत प्रतिबिंबित होत नाही.  किंबहुना सवयीच्या जोराने पत्रकाराच्या डोक्यात असल्या मतास थारा मिळेनासा होतो.  ह्या स्थितीचा अभाव म्हणजे खर्‍या स्थितीचे दिग्दर्षन करणे व आपले मत स्पष्ट व निर्भयपणे प्रकट करणारा (आगरकराचा आवतार) केव्हा येईल तेव्हा येवो !  खरी स्थिती कळणे ही एक अडचण व कळल्यावर प्रामाणिकपणे व बिनधोक प्रसिद्ध करणे ही तीहून खडतर अडचण.  ह्या दोन्ही अडचणीस भीक न घालणारी वर्तमानपत्रे इलाख्यातून एक एक जरी निघाली तरी सुदैव.  पण पायोनीयरच्या एडिटरला नायनटीन्थ सेंचरी मासिक पुस्तकात लिहिलेल्या 'नेटिव्ह पेपर्स' प्रमाणे आमच्या सर्व देशास खाली मान घालावयास लावणारे लेख लिहिण्यास अवसर सापडणार नाही.१९

ता १६ एप्रिल ९८ शनिवार

कॉलेजमधून घरी येत असता सकाळी चि. जनाक्का वाटेतच भेटली. जमखंडीकराच्या वाड्यातून मला बोलावून आणण्यास निघाली होती.  चर्या खिन्न व कंठ दाटला होता.  परत येताना, घराच्या मालकीणीने जे तिच्याशी हलकट वर्तन केले होते व ज्यासाठी तिला इतका राग येऊन वाईट वाटत होते ते सांगू लागली.  जनाक्का विटाळशी झाली असून आज दुसरा दिवस.  पुण्यास राहिल्यापासून तिच्या विटाळाची पाळी म्हणजे तिच्या व माझ्या त्रासाची व उद्वेगाचीच पाळी असे झाले आहे.  वेळेवर कोणी मनाजोगती मोलकरीण सापडत नाही.  जरी एखादीला आणिलेच तर ती आपले गुण उधळते.  एक तर अशी खमंग भेटली होती की तिने जनाक्काचे व माझे भलतेच नाते असावे अशी कुटील कल्पना करून घेऊन आपल्या शीलास योग्य पण जनाक्काच्या पवित्र कानावर कधी न आलेले उपदेशजहर ओतिले.  बिचार्‍या जनाक्काला कोण असह्य वेदना झाल्या.  त्या भोळीला आसला घाणेरडा उपदेश नुसता ऐकूनही जी लज्जा वाटत होती तिचा जोर व खरेपणा तिला आलेल्या क्रोधाच्यापेक्षा इतका जास्त होता की दोन दिवस ही गोष्ट मला तिच्याने कळवणे देखील झाले नाही.  कळवल्यावर मी तीस रागे भरलो.  मोलकरणीने तर अगोदरच काळे केले होते.  तेव्हापासून असल्या हलकटाकडून काम घेणे जीवावर येते.  असो.  जनाक्काच्या मैत्रीणीसही आम्ही या कामी कधी मुळीच भीड घातली नव्हती.  पण तिचा नवरा चांगला मनुष्य असल्यामुळे त्याच्या आग्रहास्तव आज तिजकडे जनाक्काने भातास तांदूळ दिले होते.  इतक्यात तिची आई घरची मालकीण तिच्या खोलीत येऊन एकदम जनाक्कास कठोर शब्द बोलू लागली.  जनाक्काचे उत्तरही ऐकीना.  बिचारीला फार वाईट वाटल्याने खोलीत बसून रडली.  अगदी लहानसान बाबतीत मालकीणीचे वर्तन फार हलक्या मनाचे असते.  पण आज स्वतः जनाक्कावर प्रसंग गुदरल्याने तिला ते फार असह्य झाले होते.  म्हणून ती मजकडे निघाली होती.  मी आलो तरी त्या बाईची टकळी चालूच होती.  अर्धीकच्ची शिजलेली डाळ चुलीवरून काढून एकीकडे ठेवविली होती !  हा हलकटपणा जो दररोज घरच्या नोकरासंबंधी दिसत होता त्याचा आमच्यावरच प्रयोग का झाला हे नीट कळत नाही.  ह्या बाईचा वृत्तांत थोडक्यात पान ८।९ मध्ये आला आहे.  त्यापेक्षा जास्त काही कळले नाही.  एकूण कोठेतरी दुसरीकडे बिर्‍हाडाची सोय केली पाहिजे.  आता ती कशी जुळेल ?  कोण हा ताप !  जनाक्का फाजीलपणे विशेष कोणाशी सलगी ठेवीत नाही.  त्यात मालकिणीकडे तर ती फारच कमी जात येत असते.  त्यामुळे ती कदाचित् रागावली असावी.  नव्हे तिच्या मनाचा लहानपणाच इतका.  म्हणून ती म्हणाली की 'घरच्या कामास मोलकरीणी लावून तुझे काम कोणी करावे ?'  पण जनाक्काच्या मैत्रिणीचा पोचटपणा किती पहा.  तिला इतके आपल्या आईला स्पष्ट म्हणणे झाले नाही, की 'तांदुळ व डाळ मीहूनच आणिले आहेत,'  शेवटी मी माझ्या हातून सर्व स्वयपाक करून दोघे जेवलो.  जनाक्कास फार वाईट वाटले होते.  पण मी तिची समजूत केली की जगात असलीच माणसे फार आढळणार.  देशपांड्याप्रमाणे (तेरदाळच्या)२० सर्वच आमच्याशी आपलेपणा जोडणारे मिळत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नये.  परके ठिकाणी शहरात असल्याचीच गाठ पडणे साहजिक आहे.  उलट आपण हल्ली मिळालेल्याच आप्‍त माणसाबद्दल आनंद मानिला पाहिजे.  आज घडलेल्या अनुभवाचे चांगले स्मरण ठेव म्हणजे असल्या प्रसंगी पुन्हा तू अधिक धैर्याने, शांततेने वागशील.  तसेच आपण दुसर्‍याशी असेच तुसडेपणाने वागू नये, हे सांगणे तर मुळीच जरूर नव्हते.  ह्याप्रमाणे पुस्तकातल्या धड्यापेक्षा आज तिला मिळालेल्या धड्याची मातबरी कशी जास्त होती हे तिला नीट कळले !