१७-फर्ग्युसनमधील रोजनिशी

वर्षप्रतिपदा ता. ११ मंगळवार १८९९ एप्रिल
डा. धनवडे फारच गरीब व चांगले गृहस्थ आहेत. सरकारी नियम पाळून लोकांस देववेल तितकी सवलत देतात. त्यात पक्षपात करीत नाहीत. मला ह्यांनी फार चांगल्या रीतीने वागविले. हे सर्वांना प्रिय आहेत. आज आम्ही नदीवर उदगावच्या पुलाजवळ पोलीस नाईक मल्हारजी साळुंके ह्यांचेच झोपडीत राहण्यास गेलो. झोपडी स्वच्छ सुंदर आणि मजबूत आहे. निजण्यास बसण्यास तीन निराळ्या खोल्या आहेत. नदीच्या अगदी काठावर. दोहो बाजूस दोन जंगी पूल. एकांतवास, रम्य देखावा, स्वच्छ हवा पाणी व जनाक्काचा सहवास. मग काय पाहिजे. संध्याकाळचे गाडीने सर्व सामान घेऊन गोविंदराव कोल्हापुराहून आले. नाईकसाहेब गोविंदरावांचे आप्तच होत. ते आजपासून आमचेकडेच जेवू लागले.
ता. १२ एप्रिल बुधवार १८९९
संध्याकाळी मी व गोविंदराव उदगावच्या गाडीच्या पुलाजवळ नदीचे पाण्याजवळ पुष्कळ वेळ बोलत बसलो. संभाषण ता. १ आगष्ट १८९८ रोजी रात्री झालेल्या संभाषणातल्या मजकुरासंबंधी होते. (पान ६६ पहा)४६. त्या रात्री गोविंदरावाच्या बोलण्याने जितका आनंद व आशा वाटली तितके आज दुःख व निराशा झाली. आज ते त्रासल्यासारखे दिसत होते.
जिवलगा, ह्या विषयाचा ध्यास मला जवळ जवळ सुमारे वर्षभर लागला आहे. इतक्या अवधीत विचार आणि विकार यांनी मला अगदी भंडावून सोडले आहे. पण दोन्हीही उच्च प्रकारचे आहेत. ह्या मेच्या सुट्टीत ह्या नादाचा काय तो निकाल करावयाचाच असा इकडे निघण्यापूर्वीच निश्चय झाला होता. तो गोविंदरावास ठाऊक होता. अनेक अडचणी सोसून पन्हाळ्याची सफर करण्यात हा एक अंतर्गत हेतू होताच ! पण गोविंदरावाचे केवळ निराशेचे, नाउमेदीचे व नापसंतीचे उद्गार ऐकून मी फार विरसलो. पण इतके दिवसाचा नाद, त्याबद्दल काहीच विचारपूस न करता सोडणे म्हणजे योग्य नव्हे. म्हणून दादाना एकदा स्पष्टपणे ही गोष्ट कळवण्यास गोविंदरावास सांगितले. व त्यांनी (आतल्या आत नाखुषीने) कबूल केले. मी कोल्हापुरास जाण्यापूर्वी २।३ दिवस गोविंदरावांनी जावे व माझी इच्छा दादास उघडपणे कळवावी असे ठरले. ह्या विषयावर दादा बोलण्यास कबूल असतील तर बाकीचे सविस्तर भाषण मी स्वतःच करणार होतो. पण अगोदर मीच गोष्ट काढणे मला अयोग्य होते. पण आतापासून मला निराशेच्या खडतर वेदना होऊ लागल्या. आधीच आशेचा कोठे एक लव होता नव्हता तो आता त्या लवाचाही लेश मात्र उरला नुरला असे झाले. काय हा माझा मूर्ख नादिष्टपणा अशी माझी मलाच टोचणी लागली !!
ता. १५ शनिवार एप्रिल १८९९
गोविंदराव कोल्हापुरास गेले. आज कोल्हापूरच्या महाराजास दुसरा मुलगा झाल्याचे शुभ वर्तमान ऐकिले.४७ संध्याकाळी मी व जनाक्का बरेच लांब फिरावयाला जात असू. दोघाला एकमेकांपासून अशा फिरण्याने फार आनंद होत असे.
ता. १७ सोमवार
आज स्टेशनावर गोविंदरावाकडून दादांच्या निकालासंबंधी कार्ड येणार होते. फार वाट पाहिली. व्यर्थ !! हिरमुसला होऊन परत झोपडीत आलो. किंचित गोविंदरावाचा राग आला ! पण लगेच तो जाऊन माझा मलाच आला !! रात्री झोप येईना. एक वाजण्याचा सुमार होता. एकटाच झोपडीच्या दाराशी बसलो. पाऊस मंदमंद झिरपत होता. अंधार काळा कुट्ट ! चहुकडे सामसुम ! विश्रांतीचे पूर्ण साम्राज्य दिसत होते. वाटेवरच्या कंदिलातील दिवाही झोपी गेलासा दिसत होता. इतका निश्चल व मंद होता. बाह्य अंधःकार माझ्या अंतरांधःकाराचेच जणू प्रतिबिंब असे भासू लागले. व आपण कितीही विद्रूप असलो तरी आपले प्रतिबिंब पाहून आपले मन रमते ह्या न्यायाने माझ्या निराशेचे व भावी नीरस आयुष्याची कल्पना जरी अत्यंत उद्वेगजनक होती तरी त्या कल्पनेचे प्रतिबिंब हुबेहुब पाहून मीही बराच रमलो !!! १ तासभर ह्या भयप्रद प्रशांत देखाव्याचे अतिशांतपणे अवलोकन करून मी निद्रावश झालो.
ता. १६ एप्रिल १८९९
नदीवर आल्यापासून रोज रात्री निजण्याचेपूर्वी काही वेळ मल्हार नाईक, गोविंदराव व मी मिळून भजन करीत असतो. हे भजन पंढरपूरच्या संप्रदायाचे असते. झोपडीत टाळाच्या दोन जोड्या व चिपुळ्या आहेत. आम्ही शिकलेले असून (मी) पद्धतशीर भजन करितो ह्याचे मंडळीना कौतुक वाटते. क्वारंटाइनानिमित्य पुलावर वारक-यांची बरीच गाठ पडते. नाइकांची त्यावर श्रद्धा आहे. बाळोबा नावाच्या उदगावच्या एका म्हाता-या वारक-याचा दृढ आणि भोळा भाव पाहून फार आश्चर्य वाटले. इतका म्हातारा असून ४० कोसाची दर पंधरावड्याची वारी कधी चुकत नाही ! १।२ दिवस विश्रांती घेऊन पुन्हा वारीला निघतो. त्याच्या हातात धरावयाची काठी आहे ती ३। सवातीन हात लांब भल्या मोठ्या मुसळापेक्षा जाड व जड आहे !  मला दोन मैलाच्यावर काही तिला घेऊन जाववणार नाही !! एकदा दोन्ही पायाला नारू झाले होते आणि नदीला पूर आला होता अशात म्हातारा `विठ्ठल` असे ओरडत गेला, असे सांगतात.
कोणते तरी लहानसे पद्य अगर चरण वरचेवर म्हणून भजन करण्याची चाल मला फार आवडते. पण मी ऐकलेल्या सर्व भजनात देवाचे अत्यंत साकार व सगुण रूप वर्णलेले असल्यामुळे त्यांची अर्थगोडी लागत नसे. म्हणून मी आज स्वतःकरता आदि तत्त्वाचे एक भजन रचले आहे ते हे.
जय जय सच्चिद्घन मूर्ती । जय जय चिदानंद स्फूर्ती ।।
जय त्रिविध ताप हर्ता । जय जय भक्तिमुक्तिदाता ।।
जय जय सकलगुणगणानिधान । जय जय निर्गुण वस्तुस्थान ।।
जय जय अंतिम मंगल धाम । जय जय मुजिन मन विश्राम ।।
जय जय स्वसंवेद्य सुखभोग । जय जय जीव शिवसंयोग ।।५।।
हे मला फार गोड लागते. ह्यात माझा लय लागतो. वृत्ती सात्त्विक होते. सर्व एैहिक ताप निवतात ! पण ही निवृत्तावस्था फार वेळ राहत नाही. विचारात देखील मला प्रवृत्तीचा सर्वथैव त्याग करवेना. इतका मायावश होतो की उलट निवृत्तीमार्गातच धन्यता व पुरुषार्थ नाहीत असे वाटते !!