१८-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. १८ एप्रिल १८९९ मंगळवार
आज जनाक्काचे १० दिवस क्वारं. चे भरले. सकाळी १० चे सुमारास कोल्हापुरास पोचलो. पुत्रजन्मोत्सवानिमित्त घरोघर गुड्या उभ्या केल्या होत्या. पेठेतून निशाणे तोरणे फडकत होती. हात्ती, घोडे, उंटस्वार, पायदळ  इतक्या सरंजामांनी भर रस्त्यातून प्रत्येक घरी हत्तीवरून साखर वाटण्याची गडबड चालली होती. मी स्वतः संस्थानची प्रजा असून मला अद्यापि अशा सुप्रसंगामुळे आनंदलेल्या सर्व शहाराचा देखावा पाहवयास मिळाला नाही, म्हणून वाईट वाटले. प्रथम पुत्रोत्सवाचे वेळची करवीरस्थांची किती उल्हास वृत्ती झाली असेल. छे ! एक लाख रुपये त्यावेळी खर्चले असे सांगतात. खालसातल्या लोकांस ह्या आनंदाची कल्पनाच नाही. अशा प्रकारचा आनंद सर्व करवीर इलाख्यातून एकसारखा बारा दिवस चालणार !
ता. १९ एप्रिल १८९९
काल व आज दादाशी (केळवकर) ४।५ तास बोलत बसलो. त्यास सोडून उठावेसेच होत नाही असे जे गोविंदराव व वासुदेवराव यांनी सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांच्या स्वतःत एक प्रकारची आकर्षक शक्ती आहे. सर्व कुटुंबात जादू भरली आहे. कुटुंबात असे एकही माणूस नाही की ज्यास पाहून मन द्रवत नाही. बुद्धी, सौंदर्य, विनय, विनोद, आदर इत्यादी मोहक गुणांचे विलास ह्या घरी सहज दृष्टीस पडतात. पण ब-याच चौकस दृष्टीने खोल पाहिले असता दिसून येईल की वरील गुण कृत्रिमपणाच्या सुंदर कोंदणात फार मार्मिकपणे बसविले आहेत वरील कोणत्याच गुणाची उत्पत्ती व वाढ स्वाभाविक नाही असा चौकस मनुष्यास शोध लागला तरी ह्या कुटुंबाच्या सहवासापासून होणा-या समाधानात काडीमात्र कमताई होत नाही. ह्यावरून सवयीच्या जोराने कृत्रिमपणाचे काम किती बेमालूम वठत आहे ह्याची खात्री होते (कृत्रिमपणा ह्याचा अर्थ कपट नव्हे. जाणूनबुजून करणे, तसेच शिक्षण ठेवणे इत्यादी). हा चांगुलपणा खेडवळ नव्हे तर नागरिक आहे !४८
दादाशी माझा प्रत्यक्ष परिचय तर नव्हताच पण पत्र्यव्यवहारही नव्हताच. तरी पण माझ्या सर्व कुटुंबाची व मताची बारिक माहिती त्यांनी गोविंदरावादीकडून करून घेतली आहे असे कळले. माझ्या वैवाहिक स्थितीसंबंधी कळकळ त्यांनी फार दाखविली. आज विशेष त्यासंबंधी बोलणे झाले. ता. १२ ला ठरलेला बेत तडीस नेण्याचे धाडस गोविंदरावास झाले नसल्याने ह्या बाबीचे व्यक्तिविषयक विशिष्ट संभाषण मला करणे झाले नाही. तरीपण माझे मनोगत दादांना कळले नसेल इतके ते भोळे आहेत असे वाटत नाही. पण वर दोघांनी तटस्थ वृत्ती आम्ही परस्परांस दाखविली. Intermarriage संबंधी साधारणपणे माझे विचार व बेत मी उघडपणे कळवले. ह्या बाबतीत कृती करण्याचे धाडस दादाना नाही. माझा सणसणी सुधारणावाद ऐकून दादा निरुत्तर झाल्यासारखे दिसले. माझ्या सुधारक रितीच्या नवीन विवाहास हल्लीची वैवाहिक स्थिती ही अगदी अनिवार्य अडचण आहे, हा त्यांचा अपेक्षित मुद्दा मी सपशेल कबूल केला; व तो तसाच एकीकडे ठेविला. ह्या शिवाय मला कोणत्याच अडचणी कबूल नव्हत्या. पण दादाची तितकी तयारी दिसेना. ह्या प्रकारे आडून गोळ्या सोडून आम्ही हे बोलणे आटपले. आणि एवढ्यावरच मला माझा इतक्या दिवसाचा नाद सोडणे भाग पडले हे पाहून अतिशय वाईट वाटू लागले.
शुक्रवार ता. २१ एप्रिल १८९९
तापातून अगदी बरा झालो नसताही भर उन्हात घर सोडले. शिरोळ रोडचे तिकिट मिळत नसता मिरजेहून पायीच गेलो. मजबद्दल ५ दिवस व जनाबाई मागाहून आली म्हणून तिज करता १० दिवस असे पंधरा दिवस क्वारंटानचे शिरोळास घालविले, जनाबाईची २।३ महिन्याची स्कालरशिप बुडवून घेतली व काही दिवस शाळा चुकवली. ह्या सर्वाचे मुख्य कारण पन्हाळगड पाहणे.४९ त्या गडास आज दोन प्रहरी दोन वाजता पोचलो.