रोजनिशी- प्रस्तावना-१२
बहुजनसमाजात धार्मिकता वाढीस लागावी ह्या हेतूने सुरू झालेल्या केसिक कन्व्हेन्शनला ते जातात. सभेचे चालक जुन्या मताचे असूनही तेथील, देव व साधक ह्यांचे दरम्यान कोणाची मध्यस्थी असू नये हे प्रतिपादन, भावनाप्रधान उपरतीचा देखावा, पंथाभिमानाचा अभाव व साधकाचे लक्ष केवळ ख्रिस्ताकडे लागावे व त्याचे वर्तन सुधारावे हा हेतू, हे सर्व बघून अण्णासाहेबांना संतोष होतो (पृ.१३). एडिंबरो येथील जुन्या मताच्या देवळात उदारमताचा शिरकाव कोठे झालेला पाहून त्यांना आनंद वाटतो. असे घडले तर युनिटेरिअनसारख्या चळवळींची जरूरीही नाही असे म्हणताना त्यांची खरीखुरी उदार धर्मदृष्टी प्रकट होते (पृ.१२०).
प्रस्तुत रोजनिशीत अण्णासाहेब धर्माचे अनेक अंगांनी कसे निरीक्षण व चिंतन करीत होते हे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे त्यांचे कांही आध्यात्मिक पातळीवरचे अनुभवही पाहावयास मिळतात.
"१२-३० (वाजलेले). रस्त्यात चांदणे स्वच्छ पडले होते. अगदी सामसूम होते. देखावा सौम्य गंभीर होता. थोडेसे फिरून येऊन निजलो. माझी परमेश्वरावर श्रद्धा कायम राहिली. पण जीविताचे गूढ काय आहे ते कळेना. संशयाच्या यातना दुःसह झाल्या. परमेश्वरा, हे गूढ कधीतरी उकलेल काय ?" (पृ. १०४). कधी अशी संशयाची अवस्था त्यांच्या मनाची होते तर क्वचित् निसर्गाच्या सहवासात श्रेष्ठ प्रतीचा आध्यात्मिक अनुभव त्यांना येतो. इंग्लिश सरोवर प्रांती प्रो. कार्पेंटर ह्यांजकडे मुक्काम असतेवेळचा एक अनुभव अण्णासाहेबांनी सांगितला आहे. रात्रौ ९ वाजल्यानंतर मि. कॉकबरोबर बॉरोडेल दरीतून शतपावलीस ते निघतात. "डरवेंट नदीचे मंजुळ गाणे चाललेले. चहुकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. बाह्य शांतीमुळे अंतःकरणातील शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. सुधारलेल्या जगाची धडपड शेकडो मैल दूर होती... ९-३० वाजले तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की वाचता सहज येत होते. आम्ही दोघेही समानशील. दरीतून पुढे पुढे जात असता सृष्टी आपल्या अंतःपुरात बोलावतेच असे भासले. खोल दरीतून नदीच्या काठाने जात असता कॅसलरॉकचा अगदी सुळकेदार मनोरा समोर होता. त्यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. अशा आसमंतच्या देखाव्यात आम्ही स्वतःस विसरलो. ऐहिक अत्यंत प्रिय विषयांचाही विसर पडला हे सांगणे नको. अगदी आपलेच असे काही येथे मिळाले म्हणूनच असा हा विसर पडला. `ह्या उदात्त भेटीच्या प्रसंगी` विचारास अवकाश नव्हता... देवा, अशी वारंवार भेट दे." (पृ.१०७-१०८). कुमारी द्युगा ह्या बाईच्या सहवासानंतरची अण्णासाहेबांची जी वृत्ती होते तीमध्ये त्यांची विशुद्ध रसिकता व एका आध्यात्मिकाची तरल संवेदनशीलता आढळते. अण्णासाहेब पारीसला गेले असता कुमारी द्युगा ह्या अध्यापिकाबाईची भेट घेतात. हिचे फारच सुरेख चित्र त्यांनी रेखाटले आहे. तिचा पोशाख व वागणूक साधी. माहिती देण्याची उत्कंठा, तिचा सुस्वभावीपणा व निरागसपणा अण्णासाहेबांना आवडतो. दुसरे दिवशी रात्री फ्रान्समधील स्त्रीशिक्षण, विवाहपद्धती इ. बद्दल मनमोकळे बोलणे होते. ते लिहितात, "रात्री ११ वाजता ट्राममधून सेन नदीचे काठाने येताना तो रात्रीचा देखावा पाहात, नुकत्याच घडलेल्या शुद्ध सहवासाविषयी माझे मनात अनेक गोड विचारतरंग येऊ लागले. आत्मा आत्म्यावर लुब्ध झाला होता. म्हणून वियोग झाल्यावरही सुखच होत होते. शरीराची सर्वच सुखे दुःखपर्यवसायी आहेत. आत्म्याला पर्यवसानच नाही. कारण आत्मा अनंत आहे म्हणून त्याची वृत्ती अखंडित राहते." (पृ. १४७).
इंग्लंडच्या रोजनिशीत अनेक गोष्टींबाबत माहिती खचून भरलेली आढळते. अण्णासाहेब शिंदे यांचा स्वभाव चौकस, निरीक्षण सूक्ष्म आणि नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्याचा त्यांचा उत्साह उदंड. काही गोष्टी हिंदुस्थानातील समाजसुधारणा अशा धरर्तीवर घडावी ह्या आस्थेतून त्यांना महत्त्वाच्या वाटत असणार; तर काही बाबींबद्दल त्यांची व्यक्तिगत आभिरुची आणि जिज्ञासूपणा कारणीभूत असणार. ते इंग्लंडमधल्या शेतमजुराला मजुरी किती मिळते याची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. ऑक्सफर्ड येथील वर्क हौस किंवा कंगालखान्याचे बारकाईने वर्णन करतात. अडीचशे म्हातारी, दुबळी, अनाथ, स्त्रीपुरुषे येथे असतात व त्यांची व्यवस्था चोख, कळकळीने ठेवली जाते इ. वर्णन करून `संस्था पाहून अत्यंत समाधान वाटले. हा खरा ख्रिस्ती धर्म` असे उद्गारतात (पृ. १०५). गरीब लोकांस फुकट वाचावयास देणारे ४८००० पुस्तकांचे जंगी वाचनालय एडिंबरो येथे असते. मजूर लोक त्याचा लाभ घेतात. `हे खरे लोकशिक्षण` अशी समाधानाची भावना अण्णासाहेबांची होते (पृ.१२०). मँचेस्टर येथे दरिद्री आणि गलिच्छ वस्तीच्या आठदहा घरी जाऊन तेथील परिस्थिती ते मुद्दाम पाहतात (पृ. १३०).
इंग्रजी खेड्यातील शिक्षण कसे असते ते पाहण्यासाठी बर्टन येथील शाळेचे तपशीलवार निरीक्षण त्यांनी केले आहे (पृ.९४-९७). ही निरीक्षणे करीत असता हिंदुस्थानातील गोरगरिबांची स्थिती कशी सुधारेल, ही तळमळ अण्णासाहेबांच्या मनामध्ये असणार, यात शंका नाही.
ऐतिहासिक स्थळे, सुंदर इमारती इ. पाहाव्यात, विविध विषयांची माहिती करून घ्यावी अशी अण्णासाहेबांच्या ठिकाणी तीव्र जिज्ञासाबुद्धी होती. लंडनच्या मुक्कामात येथील अँश्मोलियन म्युझियम, ट्रॅफल्गार स्क्वेअरमधील नॅशनल पिक्चर गॅलरी, रीजंट पार्कमधील प्राणिसंग्रहालय, ब्रिटिश म्युझियम; एगार्डन टेकडीवरील रोमन छावणीचे अवशेष, मँचेस्टर येथील दगडी कोळशाची खाण, बॉस कॅसल येथील शर्ट करण्याचा कारकाना, ऑक्सफर्ड जवळच्या खेड्यातील पवनचक्की (पृ.१३५), इंग्लिश सरोवर प्रांतातील ड्ररूइडिकल सर्कल (११७), एडिंबरोजवळील फोर्थ ब्रिज (पृ. १२२), पारीसमधील कितीतरी प्रेक्षणीय स्थळे, शेक्स्पीयअर, वर्डस्वर्थ वगैरे प्रसिद्ध व्यक्तींची स्थाने, इत्यादि अत्यंत बारकाईने पाहून त्यांनी त्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे.
केसिक कन्व्हेन्शन (पृ.११२), ऑक्सफर्ड येथील पदवीदान समारंभ (पृ.१४८-४९), पारीस येथील गुड फ्रायडे अथवा व्हेद्र दी सां (पृ. १४४-४५), पाँपी शहराचे अवशेष (पृ. १५३-५४), पारीसमधील ऑलिंपिया नाटकगृह (पृ.१३९), बॉइ बॉला हे सार्वजनिक नाचाचे ठिकाण (पृ. १४०-४१), इत्यादींचे त्यांनी जे वर्णन केले आहे ते पाहता अण्णासाहेबांची हुबेहुब वर्णन करण्याची शक्ती किती दांडगी आहे व त्यांची संवेदनशीलता किती तरल आहे याची कल्पना येते.
अण्णासाहेबांच्या ठिकाणी स्वाभाविक रसिकता होती, मनाची ठेवण प्रेमळ होती. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे भक्ती, प्रेम, रसिकता ही त्यांना एकरूपच वाटतात. त्यांचा धर्मविषयक व्यासंग चालला असला तरी ते जीवनातील आनंदाला पारखे झाले नव्हते. उलट ते जीवन चवीने, रसिकतेने, आनंदाने जगत होते. बाइसिकल शिकणे, बोट वल्हविणे त्यांना आनंददायक वाटत होते. ते पियानोवर गाणे वाजवितात, चित्रे काढतात, नाटके बघतात. कला, चांगुलपणा, निरागसता, चैतन्य दिसले की ते आनंदतात. `गरीब लोकांची घरे कितीही कंगाल असली तरी त्यात दहावीस चित्रे, काही मूर्ती` असतात हे त्यांना चांगले वाटते (पृ.८७).
प्रस्तुत रोजनिशीत अशी कितीतरी स्थळे आहेत की त्यातून अण्णासाहेब शिंदे यांची वेगळीच संवेदनशीलता व सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आढळते. इंग्लिश व स्कॉच सरोवर प्रांतीच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतलेल्या अण्णासाहेबांना पारीसजवळचे बो द बलोनचे कृत्रिम उपवन आवडत नाही. ते लिहितात ’एकाद्या सिंहाचे दात व नखे उपटून काढावीत व त्यास मिंधे करून एकाद्या श्रीमंताच्या लाडक्या पोरास खेळावयास द्यावे तशीच गत ह्या पारीसजवळच्या उपवनाची झाली आहे. झाडे दुकानत ठेवल्याप्रमाणे एकाच नमुन्याची. एकंदर देखावा इतका माणसाळलेला की ह्यास उपवन म्हणण्यापेक्षा आरण्याचे प्रदर्शन म्हणणे अधिक शोभते." (पृ. १३७-१३८).
त्यांनी कुटुंबांची सुरेख चित्रे रेखाटली आहेत. उदाहरणार्थ :- ऑक्सफर्डमधील पिअर्सन कुटुंब (पृ.७३-७४), ब्रिडपोर्ट येथील व्हाईट कुटुंब, (पृ.९८), पारीसमधील रोज कुटुंब (पृ.१३८). कुटुंबात जिव्हाळा, प्रेम, शांती, आनंदी वातावरण इ. बघितली की त्यांच्या मनाच्या तारा कंपित होतात. रोज कुटुंबाचे ते वर्णन करतात, "मादाम रोज ही फार गोड व कुशल बाई आहे. ही इंग्रजी शिकत आहे. निदान तशी मोस्यू रोजची समजूत आहे. मी काही इंग्रजीत विचारले की मादामजी जी कासावीस होते मग ती आर्तपणे आपल्या नव-याकडे पाहते, त्याचे मला मौठे कौतुक वाटते." (पृ.१८). लॉख लोमंडजवळ टार्बेटला एका झोपडीत ते वास्तव्य करतात. शेजारच्या कुटुंबातील मुलींचे ते वर्णन करतात, "शेजारी झिप-या मुली अँग्नेस व जेसी आणि उनाड जॉनी आणि टॉमी हुदोड्या घालीत. जेसी तीन विती पण फार धीट असे. तिने मला स्पष्ट सांगितले, तिची बाहुली माझ्याइतकी मोठी आहे." (पृ.१२६). त्यांच्या अंतःकरणाच्या प्रेममयतेमुळे कुटुंबातील सोज्वळ दृश्ये त्यांना आवडतात. त्याच कारणाने प्रेमी जोडप्याचे उघड्यावरील प्रियाराधनही त्यांना आनंददायक वाटते. इंग्लिश सरोवर प्रांतातील वास्तव्याच्या काळातील हे वर्णन. "वाटेने येताना अंधारात व आडवळणीस कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क दिसली. हे मानवी संसारातील अत्यंत गोड पवित्र चित्र मला येथे वारंवार दिसते." (पृ.११३). एडिंबरोस असता ब्लाकफर्ड हिल् वरील अशाच प्रसंगाचे काहीसे मौजेने ते वर्णन करतात. "टेकडीवरून एडिंबरोचा सौम्य, शांत व सुंदर देखावा दिसला. पुष्कळ लोक आपल्या प्रिय पात्रास बरोबर घेऊन फिरावयास आले होते. अशा तरुण जोडप्यांची ही टेकडी मोठी आवडती दिसली. टेकडीच्या वळणांतून, खाचखळग्यांत, झुडुपांखाली, गवतांतूनही प्रेमाने बद्ध झालेली जोडपी सर्व जगास विसरून आपापल्यातच गर्क झाली होती. वाटेने जाताना अवचित, अनपेक्षित अशा अवघड ठिकाणी जोडपे पाहून चमत्कार वाटे. न जाणो चुकून एकाद्यावर पाय पडेल म्हणून आजूबाजूस पाहून चालावे लागले." (पृ. ११९). मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन बघून ज्याला विषाद वाटेल त्याला ते हतभागी, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघडलेला इ. दूषणे देतात.