रोजनिशी- प्रस्तावना-१३
विनोदात्मता हा खरे तर अण्णासाहेबांच्या रसिक व्यक्तिमत्त्वाचा एक भाग. फर्ग्युसनमधील रोजनिशी लिहिली त्या काळात त्यांचे मन एक प्रकारे ताणलेल्या अवस्थेत होते म्हणून तेथे त्यांच्या या अंगाचा फारसा आविष्कार होताना दिसत नाही. प्रस्तुत रोजनिशीत आणि त्या काळात त्यांनी सुबोध पत्रिकेमध्ये जे लेखन केले त्यामध्ये त्यांचा सूक्ष्म व प्रसन्न विनोद ब-याचदा आढळतो. अण्णासाहेब इंग्लंडमध्ये गुलाबी फेटा घालून वावरत ह्याचे लोकांना विशेषतः बायकामुलांना फार कुतूहल वाटत असे. तरुण मुली घरात पळत पळत जाऊन इतरांना ओढून आणून हे दृश्य दाखवीत असत असा फ्रान्समधील अनुभव त्यांनी नमूद केलेला आहे.१ बर्टन येथील उत्तम रीतीने शाळा चालविणा-या मि. मिलबोर्नचे ते वर्णन करतात, "मि. मिलबोर्न ह्या कामाला अगदी लायक दिसला. मुलावर त्याची अशी जरब होती की कधी न पाहिलेल्या माझ्या फेट्याकडे फारसे न पाहता नेहमी पाहिलेल्या त्याच्याच तोंडाकडे सावधपणे पाहत." (पृ.९६). ग्लासगो येथील कॅथीड्रलमध्ये ते उपासनेला जातात त्यावेळचे व्रणन ते करतात, "फेट्यामुळे मला बराच नेहमीप्रमाणे मान मिळाला. अगदी पुढची जागा मिळाली. मद्रासला एकदा मागे बिशप होते त्यांचा आज उपदेश झाला. भाषणात हिंदुस्थानसंबंधी बोलताना माझाही उल्लेख केला. मी फेट्याचे आभार मानले." (पृ. १२४). डेव्हनपोर्टमधील `मांजराने दार उघडावयास सांगितले` ह्या हकीगतीतील मांजर बंद दाराच्या कडीकडे पुढचे पाय उचलून जणू दार उघडण्याची सूचना अण्णासाहेबांना करीत होते. ते लिहितात, "एवढी खूण मला बस झाली. मी दार उघडल्यावर मांजर मुकाट्याने चालू लागले. काय ते `थँक यू` म्हणावयाचे उरले होते." (पृ.१००). अनेक व्यक्तींच्या वर्णनातही ही विनोदाची छटा पाहावयास मिळते.
(१. वि.रा. शिंदे, `मार्सेय शहर`, लेख, व्याख्याने व उपदेश, उनि;पृ१०.)
तात्पर्य, अण्णासाहेबांच्या इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांच्या मनाच्या आध्यात्मिक ठेवणीचा, धर्मप्रवण मनोवृत्तीचा, लोकहिताच्या कळकळीचा तसेच त्यांच्या स्वाभाविक रसिकतेचा व सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय येतो.
येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी ही महर्षी शिंदे यांची सर्वांत छोटी रोजनिशी आहे. दि. १२ मे १९३० रोजी त्यांना तुरुंगात दाखल करण्यात आले व १४ ऑक्टोबर १९३० ला त्यांची सुटका झाली. ह्या पाच महिन्यांच्या वास्तव्यापैकी सुमारे शेवटच्या अडीच महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही रोजनिशी लिहिली आहे.
ह्या वेळी अण्णासाहेबांचे वय सत्तावन्न वर्षांचे होते. अस्पृश्यतानिवारण्याच्या कामी भारतभर संस्थात्मक प्रयत्न त्यांनी केला होता. ह्या अवधीत अन्य कितीतरी कामांना त्यांनी हात घातला होता. सार्वजनिक जीवनात मानाचे तसेच अपमानाचे प्रसंग अनुभवले होते. ह्या मानापमानाच्या पलीकडे जाणारी प्रौढ, शांत, स्थिर अशी त्यांची मनोवृत्ती झाली होती. महात्मा गांधींनी आरंभिलेल्या स्वातंत्र्ययुद्धात धर्मबुद्धीने त्यांनी भाग घेतला होता. ह्या रोजनिशीत अण्णासाहेबांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा, तत्त्वचिंतक आणि काव्यात्म मनाचा व विनोदी वृत्त्तीचा प्रत्यय येतो. त्यांच्या मनाची आध्यात्मिक बैठक व धर्मप्रवणता ह्या सा-याच्या मुळाशी आहेच.
आधीच्या रोजनिशीतल्याप्रमाणे येथे बाह्य परिस्थिती नाही, तर तिचा एक प्रकारे अभावच आहे. तुरुंगातील चाकोरीचे जीवन आहे. त्यात फारशी विविधता नाही. त्यांच्या इतर कालखंडातील रोजनिशीत बाहेरच्या जगातील व्यक्ती, वस्तू अथवा घटना यांचा त्यांच्या मनावर जो परिणाम होतो त्याचे ते वर्णन करतात. तुरुंगात याचा अभाव असल्याने छोट्या छोट्या गोष्टींना आपोआपच मोठे परिमाण प्राप्त होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बाह्य जगातील लक्षणीय घटनांच्या अभावी स्वाभाविकपणेच त्यांची अंतर्मुखता आणि चिंतनशीलता वाढलेली जाणवते.
अण्णासाहेब तुरुंगात आपल्या आयुष्यातील आठवणी व अनुभव लिहीत होते. त्या लेखनाच्या जोडीनेच ह्या रोजनिशीचे लेखन चालले होते. तुरुंगवासात त्यांनी आठवणीची सुमारे दोनशे पाने, म्हणजे त्यांच्या छापील पुस्तकातील १०३ पृष्ठे लिहिली. यात प्रामुख्याने त्यांच्या घरचा बालपणीचा काळ येतो. हा भाग लिहीत असताना घरच्या आनंदमय वातावरणाचा, आईबापांच्या प्रेमाचा व खेळकर बाल्याचा ते पुन्हा एकदा अनुभव घेत होते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा हा कालखंड आहे. ह्या आठवणींच्या लेखनामुळेही ते एका वेगळ्या प्रसन्न आनंदमय वातावरणात गेलेले दिसतात. ह्या रोजनिशीतील प्रसन्नपणाच्या मुळाशी हे एक अधिकचे कारण असण्याची शक्यता आहे.
लिहावयाचे सामान मिळावे म्हणून काय प्रयास पडले, किती वेळ गेला; व शेवटी उंदराच्या कानाएवढी दौत मिळते व तीही अंधारात पाय लागून फुटते ह्या दुर्दशेचे मौजेने आणि विनोदात्म पद्धतीने ते वर्णन करतात. कानिटकरांकडून कांदा मिळताच त्यांना कोण आनंद होतो. नवीन जास्तीची भांडी मिळाल्यावर आपल्याजवळ पंचपात्रे आहेत असे इतर तुरुंगसोबती म्हणू लागले तेव्हा हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळालेले मातीचे परळ भरीला घालून अण्णासाहेब मी षट्पात्री आहे असे आढ्यतेने सांगतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांची वृत्तीची प्रसन्नता आणि विनोदबुद्धी दिसते.