रोजनिशी- प्रस्तावना-१५
ह्या रोजनिशीच्या प्रारंभीच्या भागात पोलीस पकडावयास येतात व म. शिंदे त्यांच्याबरोबर निघतात, या प्रसंगाचे आणि त्यांच्यावर खटला चालून शिक्षा होते त्या प्रसंगाचे पूर्वनिवेदन आले आहे. या दोन्ही प्रसंगांतील त्यांची शांत, धीरोदात्त व प्रसन्न वृत्ती जाणवते. अण्णासाहेबांनी १८९८ मध्ये त्यांचे मित्र रा. हुल्याळ यांची त्यांच्या आजारपणात आठ दिवस परिश्रमपूर्वक सुश्रुषा केली होती. हे आता पुण्यास डे. कलेक्टर असतात व त्यांच्यावरच अण्णासाहेबांना शिक्षा ठोठावण्याचा प्रसंग आला होता. खटल्याचा फार्स आटोपल्यावर अण्णासाहेब रा. व सौ. हुल्याळ यांच्याशी पूर्वीचा मैत्रभाव आठवून प्रसन्नपणे वागतात, त्या दोघांशी विनोद करतात. तुरुंगातही त्यांचे आध्यात्मिक साधन चालूच होते. तेथे दर मंगळवारी होणा-या कॅथॉलिक उपासनेला हजर राहण्याची परवानगी ते मिळवतात. ह्या उपासनेला ते विनोदाने मंगळागौर म्हणतात, व "आजपर्यंत चार मंगळवार झाले" (पृ. १६५) असा उल्लेख करतात. कधी स्वामी सहजानंदांबरोबर, तर कधी छोटालाल गांधी यांजबरोबर धर्मचर्चा करतात. नित्याची भजनप्रार्थना आहेच. कधी विशेष धार्मिक चर्चा वा प्रवचन असते. अध्यक्ष अण्णासाहेबच असतात. आपल्या नातीला जन्मून दोन महिने झाले ही तारीख लक्षात ठेवून तिच्यासाठी प्रार्थना करतात. ता. ६ सप्टेंबरच्या रोजनिशीत त्यांचे तत्त्वचिंतन पाहावयास मिळते. अण्णासाहेबांच्या धर्मकल्पनेत प्रेम, रसिकता आणि भक्ती ह्या वेगळ्या नाहीत हे येथेही जाणवते. (पृ.१८४-८५).
अण्णासाहेब तुरुंगात कॅथॉलिक उपासनांना उपस्थित राहात. तेथील कैद्यांच्या आध्यात्मिक उन्नतीची कळकळ त्यांच्या मनात निर्माण होते. आपल्या सुटकेनंतर कोणत्याही विशिष्ट धर्माचा नव्हे तर, सर्वसामान्य आध्यात्मिक उपदेश या कैद्यांना करण्यासाठी परवानगी मिळेल का, अशी विचारणा ते करतात.
तुरुंगात निसर्ग दिसून दिसून किती दिसणार? तुरुंगातील अंधारी वॉर्डात आल्यावर त्यांना विशेष आनंद होतो ह्याचे कारण तेथे तीन झाडे असतात. ही तीन झाडे आकारवैशिष्ट्यामुळे त्यांना त्यांची पत्नी रुक्मिणीबाई, सून माई व बहीण जनाक्का यांची आठवण करून देतात. ते ह्या झाडांची कुटुंबातील व्यक्तींशी इतकी एकरूपता कल्पितात की त्या झाडांना आक्का (म्हणजे पत्नी), माई, जनाक्का असेच संबोधतात. आपल्या कुटुंबियांबद्दलच्या प्रेमाचा वर्षाव झाडांवर करतात (पृ. १६९). दुस-या बराकीत बदली झाल्यावर `आळंदीच्या वाटेवरील डोंगर पावसाने हिरवेगार` झालेले बघताना ते आनंदतात (पृ. १७५).
त्यांच्या खोलीत एक साळुंकीचे जोडपे येत असते. त्याला बघून अण्णासाहेबांना त्यांचे जिव्हाळ्याचे प्रेमळ मित्र गणपतराव शिंदे व ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदरयुक्त प्रेम आहे त्या अहल्याबाई ह्या जोडप्याची आठवण येते. हे साळुंकीचे जोडपे म्हणजे शिंदेदंपती कल्पून ते त्यांच्याशी अत्यंत भावपूर्ण हितगुज करतात. `माझ्या खोलीच्या उंच खिडकीत बसून हे जोडपे गुलगुल बोलू लागले म्हणजे माझे काळीज जणू उठून त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसे. इतका आनंद मला होई (पृ.१७६)` असे वर्णन ते करतात. हा साराच भाग म. शिंदे यांच्या अंतःकरणाचा हळुवारपणा, प्रेमळपणा व काव्यात्म आणि प्रसन्न वृत्तीचा उत्कट प्रत्यय देणारा आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन त्यांना नेहमीच आनंदित करते. इथे तुरुंगातही साळुंकीच्या मिषाने ते शिंदेदंपतीचे आल्हाददायक चित्र भावपूर्णतेने रेखाटतात.
कौटुंबिक सुखाला दुरावलेल्या अण्णासाहेबांना तुरुंगातून सुटका कधी होईल याची उत्कंठा लागून राहिली होती. म्हणून समेटाच्या बातम्यांकडे इतरांप्रमाणे त्यांचीही नजर होती व आशाअपेक्षाभंगाची आंदोलने ते अनुभवीत होते. तुरुंगात इतरांशी त्यांचे होणारे जे वर्तन आहे त्यातून त्यांचा खेळीमेळीचा व प्रेमळ स्वभाव दिसतो. सगळ्यांसाठीच तेथे एकत्र आध्यात्मिक साधना, प्रवचन व व्याख्यान घडते. नगरचे नानासाहेब देवचके व रामभाऊ हिरे यांच्याशी त्यांचा फार जिव्हाळा जमला होता. नाशिकच्या तुरुंगात या दोघांची बदली झाल्यानंतरच्या निरोपप्रसंगातून त्यांच्यामधील जिव्हाळा आपल्याला दिसतो (पृ.१९०). तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अण्णासाहेबांच्या अभिनंदनार्थ रे मार्केटात जाहीर सभा झाली. शेवटी माळ घातल्यानंतर अण्णासाहेब म्हणाले "आता कायदेभंग करून तुरुंगात जाणे इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की अशा माळा तुरुंगातून परत आलेल्यांच्या गळ्यात न घालता त्या माळा अद्यापि तुरुंगात न गेलेल्यांच्या गळ्यात घातलेल्या ब-या" (पृ. १९४). हा ह्या रोजनिशीचा प्रसन्न शेवट त्यांच्या तुरुंगवासातील मनोवृत्तीशी अत्यंत सुसंगत आहे.
महर्षी शिंदे यांची रोजनिशी वाचताना एक चांगल्या दर्जाची ललित वाङ्मयकृती आपण वाचीत आहोत असा अनुभव येतो. हे का घडते? रोजनिशी हा ललितवाङ्मयाचा प्रकार आहे काय ? रोजनिशी लिहिणा-याचा हेतू काय आहे व त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, यावरून रोजनिशीचे स्वरूप ठरते.