रोजनिशी- प्रस्तावना-१६

रोजनिशांचे सामान्यपणे दोन स्थूल प्रकार संभवतात. एक, केवळ वस्तुनिष्ठस्वरूपाच्या नोंदी असणारी रोजनिशी; व दुसरी, लिहिणा-याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी. आपण जे पाहिले ते महत्वाचे आहे, पुढेमागे सार्वजनिक दृष्टीने त्याचा उपयोग होईल असे वाटून ज्या रोजनिशीत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या नोंदी केलेल्या असतात ती रोजनिशी पहिल्या प्रकारात मोडते. अलिप्त वृत्तीनेच काय घडले याच्या नोंदी अशा रोजनिशीत असल्यामुळे तिच्यात वाङ्मयीन गुण उतरणे कठीण. अशी रोजनिशी इतिहास वा इतिहासाची सामग्री ठरेल. रोजनिशीचा दुसरा प्रकार संभवतो तो म्हणजे जीमध्ये काय घडले या निवेदनाच्या जोडीनेच लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार होतो. अशा रोजनिशीत स्वाभाविकपणेच वाङ्मयगुण उतरतात; आणि लेखकाचे व्यक्तिमत्त्व जर विविध पैलूंनी युक्त आणि संपन्न असेल तर तिला श्रेष्ठ दर्जाची वाङ्मयीन गुणवत्त्ता लाभते. अण्णासाहेब शिंद्यांची रोजनिशी ही ह्या प्रकारची आहे.
आपण आतापर्यंत तीनही कालखंडातील रोजनिशीचे स्वरूप लक्षात घेताना तीमधून ज्याचा गाभा आध्यात्मिक आहे असे अनेक पैलूंनी युक्त असणारे अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्त्व कसे प्रगट होते ते पाहिलेच आहे. ह्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आपल्याला सहज यावा अशी महर्षी शिंदे यांची लेखनशैली आहे.
विविध प्रकारची वर्णने ते यथातथ्यपणे करतात. विस्तार टाळण्यासाठी अवतरणे न देता अशा विविध प्रकारच्या वर्णनांचा पुढे उदाहरणादाखल फक्त निर्देश करतो. हुल्याळाचे आजारपण व शिंदे यांनी केलेली सुश्रुषा (पृ.१४-१५), जनाक्काचा झालेला अपमान (पृ.५, १६-१७) अशी घटनांची निवेदने आहेत. मलकापूर ते विशाळगड असा रात्रीचा प्रवास (पृ. ५५-५६), ऑक्सफर्ड ते इंग्लिश सरोवर हा प्रवास (पृ.१०६) यांसारखी उत्तम प्रवासवर्णने आहेत. पांडवदरी (पृ. ५३-५४), ऑक्सफर्डयेथील कंगालखाना (पृ.१०४), पारीसमधील ऑलिंपिया नाटकगृह व बॉइ बॉला हे सार्वजनिक नाचाचे ठिकाण (पृ.१३९-४०), व्हर्साय्य येथील चौदाव्या लुईचा राजवाडा (पृ.१४७-१४८) अशा कितीतरी स्थळांची तपशीलाने वर्णने केली आहेत. पन्हाळ्याचा परिसर, इंग्लिश व स्कॉच सरोवरप्रांत येथील निसर्गाचे वर्णन ते वेधक रीतीने करतात. प्रसंगांची वर्णनेही तो तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहील, अशीच असतात. लंडन इंडियन सोसायटीची सभा व दादाभाई नवरोजींचे भारतीय तरुणांशी होणारे प्रेमळ वर्तन (पृ.८०), मांजराने दार उघडावयास सांगितले हा प्रसंग (पृ.८०), केसिक कन्व्हेन्शनमधील भावपूर्ण उपासना (पृ.११४-१५), ऑक्सफर्ड येथील पदवीदानसमारंभ व मुलांचा व्रात्यपणा (पृ.१४८-४९), अण्णासाहेबांना मि. मिलर अटक करावयास येतात तो प्रसंग (पृ.१६०-६१), येरवड्याच्या तुरुंगात युरोपियन वॉर्डरशी घडणारा विनोदी संवाद (पृ. १८९), असे कितीतरी प्रसंग त्यांनी शब्दद्वारा साक्षात् केले आहेत. कुटुंबातील वातावरणाची आणि व्यक्तींची वर्णनेही प्रत्ययकारी आहेत. सगळ्याच बाबतीत साधी असणारी अलाइस् पिअर्सन (पृ. ७४), उत्साहमूर्ती काटक प्रो. कार्पेंटर (पृ. १०८), तीन वितीची धीट जेसी (पृ. १२६), इंग्रजी शिकणारी परंतु बोलण्याचा प्रसंग येताच कासावीस होणारी मादाम रोज (पृ. १३८), अत्यंत निरागस व सौजन्यमूर्ती असणारी मॅडेमोझील द्युगा (पृ. १४५-१४६) अशी नमुनेदार व्यक्तिचित्रे आपणांस पाहावयास मिळतात.
म. शिंदे वर्णने यथातथ्य करतात त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचारही सुस्पष्ट असे मांडतात. लिव्हिंग्स्टनचे चरित्र वाचल्यानंतर मनात आलेले विचार (पृ.३), वसंत व्याख्यानमालेचे स्वरूप (पृ. २९-३०) , पारीसमदील वैवाहिक नीतीसंबंधीचे विचार ही याप्रकारची काही उदाहरणे. स्वतःच्या मनातील भावनांचे चित्रही ते हूबेहूब रेखाटतात. विकारवशतेमुळे मनाची झालेली स्थिती (पृ. २६), इंग्लंडप्रवासाचे वेळी मचवा हलताच होणारी हताश भावस्थिती (पृ. ६२,६३) अथवा कुमारी द्युगाच्या सहवासानंतर अनुभवाला येणारी उदात्त भावावस्था यांसारखी स्वतःच्या भावनिक अवस्थांची चित्रे परिणामकारक अशी त्यांनी रेखाटली आहेत. बॉरोडेल दरीतून हिंडताना आलेला आध्यात्मिक अनुभव (१०७-१०८), ब्रह्मतत्त्वाची सुबक झळकू लागणारी कल्पना (२७-२८) आणि तुरुंगात भक्ती, प्रेम, रसिकता यांसंबंधी केले चिंतन (१८४-८५) यांसारख्या अभिव्यक्तीस कठीण अशा अनुभूतींचेही प्रकटीकरण ते करतात. प्रवास असो की निसर्ग असो, प्रसंग असो की स्थळ असो, भावना असो की विचार असो, कुटुंब असो की व्यक्ती असो अथवा श्रेष्ठ दर्जाचा आध्यात्मिक अनुभव असो-- या सा-यांचे वाचणा-याच्या मनाला साक्षात् प्रत्यय देणारे वर्णन अण्णासाहेब करतात. ही चित्रे डोळ्यांसमोर दृश्य उभी करणारी असली तरी ती नुसती एकेरी, वस्तुनिष्ठ अशी वर्णने नसतात. त्यांत बघणा-याची भावना व त्याच्या मनात उठणारे विचार यांची जोड असल्याने ह्या वर्णनाला भरघोसपणा प्राप्त होतो. अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे रंग त्या वर्णनाला प्राप्त होतात व ती परिणामघन होतात.