रोजनिशी- प्रस्तावना-१७
अशा प्रकारचा प्रत्यय देण्याचे सामर्थ्य अण्णासाहेबांच्या शैलीत आहे. त्यांची लेखनशैली सरळ, नेमकी व जोरकस आहे. तिचे वळण अस्सल मराठी आहे. संस्कृत वा इंग्रजी वळणाने त्यांची शैली अजिबात दूषित झालेली नाही. अण्णासाहेबांना चांगल्या शैलीची योग्य कल्पना त्यांच्या अगदी पहिल्या रोजनिशीलेखनाच्या काळापासून होती हे त्यांच्या काळ-केसरी ह्या वृत्तपत्राच्या व शि.म. परांजप्यांच्या भाषणावरील अभिप्रायांवरूनही दिसून येते. म. शिंदे यांनी एका वेगळ्या संदर्भात मराठी शैलीबद्दलचे आपले विचार नमूद केले आहेत. मराठी साहित्यिक जगात शैलीची फारशी यथायोग्य कल्पना आढळून येत नसल्याने व अण्णासाहेबांचे मराठी शैलीसंबंधीचे विचार महत्त्वाचे असल्याने ते येथे उद्घृत करण्याचा मोह होतो. मराठी भाषेच्या द्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार कसा करावयाचा ह्या प्रश्नांसंबंधी एका लेखात विचार मांडल्यावर अण्णासाहेब लेखाच्या अखेरीस म्हणतात, "शेवटी एका नाजूक मुद्द्यावरील माझे किंचित विक्षिप्त मत कळवून आटोपते घेतो. हल्ली आम्ही इंग्रजी शिकलेले लोक मराठी म्हणून जी भाषा बोलतो व लिहितो ती अशिक्षित बहुजन समाजास- विशेषतः खेड्यात राहणा-यांस कळ नाही. ह्याचे कारण, आमचे शब्द जरी मराठी असतात तरी विचार इंग्रजी व अबालबोध असतात. `अबालबोध` हा अवघड शब्द मी येथे मुद्दाम वरील दुबळेपणाच्या उदाहरणार्थच योजिला आहे. खरी मराठी भाषा ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच होती. ती प्रथम मोरोपंताने बिघडविली. बिघडता बिघडता लोकहितवादी आणि जोतिबा फुले ह्यांचेपर्यंत ही कशीबशी जीव धरून होती. पण चिपळूणकर व आगरकरांनी तर तिचा गळाच चेपला. टिळकांनी व हरिभाऊ आपट्यांनी तोंडात शेवटचे दोन घोट सोडले. पण ते शेवटचेच ठरले. आजकाल चिपळूणकरांचा इंग्रजी-संस्कृत कित्ताच आम्ही सर्वजण आधाशासारखे मिरवत आहो. ह्यामुळे आम्ही एखाद्या खेड्यातल्या पिंपळाचे पारावर आमच्या मराठीचा हार्मोनियम सुरू केल्याबरोबर खेडवळ समाज अर्थ न कळल्यामुळे आम्हाला पाहून आपल्या कानांऐवजी डोळ्यांचेच अधिक पारणे फेडीत असतो. व ते कोणी आम्हाला विनोदाने सुचिवेल तरी ते आम्हाला समजतही नाही."१
शैलीची ही जाणीव अण्णासाहेबांना होती म्हणून साध्या साध्या शब्दांचे
(१. वि.रा. शिंदे,`मराठी भाषेच्या द्वारा ब्राह्मधर्माचा प्रसार` सुबोधपत्रिका, १७ ऑक्टोबर १९२६.)
सामर्थ्य ओळखून ते त्याचा सहजपणे उपयोग करतात. सूक्ष्म भावावस्थांचे निवेदनही ते साध्या शब्दांतून करतात. कॉलेज सहाध्यायी कुकनूर मरण पावलेला असतो. त्याचे प्रेत ठेवलेल्या खोलीत ते तासभर एकटेच बसतात. त्याचे वर्णन "त्या निर्जीव सोबत्याशी माझा एकांतवास फारच उदासवाणा झाला" (पृ. ३४) अशा शब्दांत करतात. इंग्लंडला जाताना निरोप द्यायला आलेल्या आईचे व बहिणीचे वर्णन "आईच्या व जनाबाईच्या तोंडाकडे पाहून वरचेवर उमळून येऊ लागले. त्या दोघी तर भानावर नसल्यासारख्याच दिसत होत्या (६१)" अशा साध्या परंतु परिणामकारक शब्दात करतात. पन्हाळ्यावरील `एजन्सी बंगला अगदी ठेवल्यासारखा दिसत होता` या शब्दांतून ते नेमके चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. `संगीत, चित्रे, विणकाम इ. पैकी कोणते तरी लळीत साधल्याशिवाय सभ्यता मिळत नाहीसी झाली आहे` (पृ. ९३), `खाणीत काम करणारी माणसे पिशाच्चासारखी दिसली` (पृ.१३२), `नानासाहेब देवचक्यांना आजीबाईसारखी सर्वांची काळजी घेण्याची सवयच लागली आहे` (पृ-१८३) यांसारख्या वाक्यांतून नेहमीच्या वाक्प्रचारांचा अथवा व्यवहारातील उपमांचा ते परिणामकारक उपयोग करताना दिसतात. मात्र याचा अर्थ असा नव्हे, की अण्णासाहेबांना संस्कृत, इंग्रजी शब्दांचे अथवा अलंकाराचे वावडे आहे. साधेपणा हे अण्णासाहेबांच्या शैलीचे वैशिष्ट्य नव्हे, तर तिचा अस्सल मराठीपणा हे वैशिष्ट्य आहे. मनातील अभिप्राय प्रकट करण्यासाठी मराठी वळणाशी जुळेल असे संस्कृत, इंग्रजी शब्द ते वापरतात. `स्मारकबुक` यासारखा मराठी इंग्रजी जोडशब्दही ते सहजतेने घडवतात. शिंदे यांची शैली काही अलंकाररहित नाही. त्यांचा मनःपिंड भावनात्मक असल्याने भावनिक प्रतिक्रिया ते सातत्याने व्यक्त करतात व त्यासाठी अलंकारांचा उपयोग त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात होतो. परंतु डोळ्यांत भरेल असे अलंकाराचे प्रदर्शन ते कधी मांडत नाहीत. त्यामुळे अलंकाराची जाणीव होऊ न देताही अलंकाराचा परिणाम साधण्याची अभिजातता त्यांच्या भाषेत आहे. `वर्तमानपत्राचा केर` असे रूपक वापरून मनातली निषेधाची भावना ते प्रकट करतात. वेगळ्या प्रकारची अनुभूती आणि संवेदनशीलता प्रकट करण्यासाठी ते अलंकारांचा मार्मिकपणे उपयोग करतात. उदाहरणार्थ, पारीसमधील स्मशानाचे तपशीलवार वर्णन केल्यावर `असा एकंदर देखावा पाहून आपण पाताळ लोकात मृतांच्या स्तब्ध शहरातच आहो असे वाटते.` (पृ. १४२). पारीसमधील उपवनाचे कृत्रिम वर्णन केल्यावर ते लिहितात, `एकंदर देखावा इतका माणसाळलेला की ह्यास उपवन म्हणण्यापेक्षा आरण्याचे प्रदर्शन म्हणणे अधिक शोभते` (१३८). विशेषणांची खैरात न करता सत्पात्री दान करावे त्याप्रमाणे आवश्यक तेथे समुचित विशेषणांचा ते उपयोग करतात. त्यांना गद्यशैलीचा कान आहे. म्हणून मोठे संयुक्त वाक्य लिहितानाही ते त्यातील वाक्यांशांचा योग्य तोल सांभाळतात. त्यामुळे भाषेला बोजडपणा तर येत नाहीच, उलट परिणामकारकता वाढते.