येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी-मंगळवार ता. २ सपटंबर १९३०
मंगळवार ता. २ सपटंबर १९३०
प्रत्येक तीन महिन्यांनी एक एडव्हायसरी कमीटी तुरुंग पाहवयाला येत असते. जून महिन्यात मी दवाखान्यात असताना ही कमीटी आली होती. त्यावेळी मि. मॅकी, कमिशनर व त्यांच्या बरोबर ७।८ युरोपियन व हिंदी गृहस्थ आले होते. आजही एक युरोपियन बडे ऑफिसर, पुण्याचे कलेक्टर व काही हिंदी मंडळी आली. ही माणसे नुसते आमच्याकडे जणू काय आम्ही प्राणिसंग्रहालयातील प्राणीच आहोत, असे पाहून जातात ! कोणी कोणाला काही विचारीत नाहीत. मग ह्या कमीटीचा काय उपयोग ? निदान आम्हाला तरी कळला नाही ! मी नुकताच दूध घ्यावयाला खाली बसणार - नुकताच कॅथॉलिक उपासनेहून आलो - इतक्यात हा कळप आला. दुस-या कोणाजवळ न उभा राहता शेवटी मजसमोर सर्वांना आणिले. माझे हिस्टरी टिकेट मुख्य साहेबांनी (दाखविले). मंडळी मुक्याचे व्रत पाळून चालती झाली. मला हे दुःसह वाटले !
मागचे वेळी, मि. मॅकीनेच माझी ओळख धरली. You have changed your occupation = तुम्ही आपली वृत्ती बदलली असे म्हटले. मी ओळख लागत नाही असे म्हटलेवर डि. सी. मिशन (वर) वरचेवर येत होतो म्हणाले. माझी ओळख धरिल्याबद्दल मी जरी त्यांना Thank you आभार मानतो म्हटले तरी त्यांचा टोमणा मला आवडला नाही हे दाखविण्यासाठी ही वृत्ती नसून वृत्तीचा अभाव आहे, असे म्हणालो.
आज इतकेही कोणी बोलले नाही !
आज सायंकाळी पावसाची एक मोठी सर येऊन आमचा व्हरांडा सर्व भिजला. मी तो मग सर्व धुवून काढला.
बुधवार ता. ३ सपटंबर १९३०
काल आणि आज माझे पोट शेकण्यास हॉट वॉटरबॅग मिळते. नानासो देवचके नावाचे नगरच्या अनाथालयाचे सुपरिंटेंडंट आमचेच वॉर्डमध्ये आहेत. त्यांनी मजकरिता डॉक्टरकडून ही बॅग आणविली. आजीबाईसारखी सर्वांची काळजी घेण्याची त्यांना सवयच लागली आहे.
ता. ४ गुरुवार सपटंबर १९३०
आज सुपरिंटेंडंटची साप्ताहिक तपासणी झाली. माझी धार्मिक पत्रे दिली नाहीत. तसे `विविधवृत्त` पत्र मि. रॉजर्सनी मिळेल असे सांगितले, ते मी लेखी मागून आज ६ दिवस झाले तरी काहीच दाद नाही म्हणून मी पुन्हा तक्रार केली. धार्मिक पत्राविषयी आपल्यास काहीच माहीत नाही असे सुपरिंटेंडंटने म्हटल्याबरोबर ही पत्रे येतात असे त्यांचे तीन कारकून सांगतात, असे मी म्हणालो. लगेच कारकुनाला सुपरिंटेंडंटने बोलावून पुनः आमचेकडे आले. कारकुनाने मी सांगितलेली हकीकत कबूल केली. सुपरिंटेंडंट किंचित रागावले. ह्यात जेलरची चूक काय ते कळेना काही. आज दोन अंक इन्क्वायररचे मिळाले. विविधवृत्त आणि माझी चारी धार्मिक पत्रे मिळावीत म्हणून मी पुनः प्रत्यक्ष सुपरिंटेंडंटलाच आज तारखेला पत्र लिहिले. ते रॉजर्सचे मार्फत उद्या पाठवीन. रा. कानीटकरांनी डेली ज्ञानप्रकाशही आज मागविला आहे. अधिका-यांची ही टोलवाटोलवी नमुनेदार आहे. त्यांच्या वर्तनात पुष्कळ अनुकूल फरक पडत आहे खास ! ही चांगली चिन्हे आहेत.
काल आणि आज जयकर सप्रू पुनः वाटाघाट करून गेले. पुष्कळ आशा आहे !
शनिवार ता. ६ सपटंबर १९३०
आज सकाळी पहाटे उठल्यावर नित्याप्रमाणे अत्यंत शांतरसाचे तात्त्विक विचार मनात येऊ लागले. बहुतेक ४ वाजता जाग येतेच. आज ती ३ वाजता आली. काल माझ्या आठवणी व अनुभव लिहिण्याचा कंटाळा केला. म्हणून मला आठवणी झाल्या व अनुभव आला तो असा : माझ्या बाळपणी खेळ व खोड्या केल्या, तरुणपणी श्रृंगार केला - (पण माझ्या वाट्याला तारुण्य आलेच नाही. बाल्य १९२७ साली संपले आणि वार्धक्य तर त्याच्या आधीच म्हणजे १८८५ साली माझा वडील भाऊ वारला आणि मी हायस्कूलमध्ये गेलो तेव्हाच आले) - व वृद्धपणी मी तत्त्वचिंतेला लागलो. खेळ, अनुराग, आणि कर्मयोगातील त्याग ह्या सर्वांना प्रेम हे एकच नाव आहे. एकच वृत्ती तम, रज, सत्त्व तीन रूपाने कमी अधिक सर्व मानवी जीवनामध्ये प्रगट होते. म्हणून मानवी आत्म्याचे पूर्ण स्वरूप ज्याला ब्रह्मविहार (करुणा, मुदिता, मैत्री, उपेक्षा हे बौद्धाने दिलेले नाव) किंवा सच्चिदानंद (हे अद्वैतवेदांत्यांनी दिलेले नाव) असे माझ्या अनुभवास आज पुनः आले. १।२ तास ह्या धन्य विवेकाचे स्थितीत घालविल्यावर मी नेहमीप्रमाणे माझी स्मरणी घेऊन माझा शांतिजप केला ! लहान मूल खेळते, तरुण तरुणीशी रत होतो, पोक्त मनुष्य स्वार्थत्यागपूर्वक कर्मयोगी (भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे) व शेवटी वृद्ध समाधी (बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे निर्वाणाची) घेतो. ह्या सर्वांना प्रेम, वल्लभाचार्य म्हणतात त्याप्रमाणे किंवा God is Love, St. John ने म्हटल्याप्रमाणे एकच नाव आहे. केवळ नैतिक न्याया (Justice) पेक्षा हे प्रेम अथवा भक्ती अर्थात श्रेष्ठ आहे. म्हणून शुष्क कर्मयोगापेक्षा रसिक भक्तिमार्ग श्रेष्ठ होय. तो जास्त व्यापक आहे. जीवात्म्याचा परमात्म्यात लय होतो तो केवळ कर्माने किंवा ज्ञानानेच नसून भक्तीने अधिक पूर्ण आणि स्पष्ट होतो. वल्लभाचार्यांचा पुष्टी मार्ग = Way of Grace जरी मला अद्यापि कळला नाही तरी भक्तिमार्ग माझ्या आठवणीने व अनुभवांनी कळविला आहे. भक्तीचा मी अधिकारी, व ईश्वरच केवळ (Grace = कृपेचा) अनुग्रहाचा अधिकारी आहे. असो. माझी भक्ती ईश्वराच्या अनुग्रहाला पात्र आहे की नाही हे मी पाहात बसलो तर मी खरा भक्तच नव्हे. मूल खेळताना, तरुण तरुणीशी रमताना, प्रौढ पुरुष अनासक्त कर्म करीत असता आणि वृद्ध तत्त्वचिंतामग्न असताना, तो ईश्वरी कृपेला आपण पात्र आहे काय हे पाहतो काय ? मग मीच का ईश्वरी कृपेची आकांक्षा करावी ? पण वल्लभाचार्यांचे म्हणणे असे दिसते की मनुष्य (उदाहरणार्थ मी) जसा जसा भक्तीला वश होतो तसा ईश्वरही आपोआपच कृपेला वश होतो. ईश्वर भक्तापेक्षाही खालच्या पायरीला जाऊन आपणच कृपा करावयाला भक्ताच्या पाठीस लागतो. हाच जर वल्लभाचार्यांचा पुष्टिमार्ग असेल तर तो खास सुंदर आहे. पण हा मार्ग ईश्वराचा झाला. माझ्या जीवनात सहज रसिकता उर्फ प्रेम उर्फ भक्ती उर्फ Love - कोणी काही म्हणोत, कोणी निंदोत, कोणी वानोत - प्रत्यक्ष ईश्वरही कृपा करो न करो - माझे प्रेमच मला खरे आणि म्हणूनच मला ते पुरे !
ता. ७ रविवार सपटंबर १९३०
समेटाविषयी आमची कालच निराशा झाली होती. आज टाईम्स वुइकलीचे रडगाणे वाचून विशेष वाईट वाटण्याचे कारण उरले नव्हते. तरी चहुकडे उदासीनतेचे ढग सर्वांचे तोंडावर दिसू लागलेच ! मनुष्य हा आशेवर जगणारा प्राणी आहे. ह्या न्यायाने पुनः पुढच्या रविवारची वाट पाहण्याचे आम्ही ठरविले !
आज पंधरावड्याचे वजन झाले. माझे १४५ पौंड म्हणजे गेल्या पंधरावड्यापेक्षा १ पौंड जास्त भरले. टॉनिक सतत सव्वा महिना चालू असल्यामुळे माझ्या प्रकृतीत बराच अनुकूल फरक भासत आहे. तरी पण उठता बसता अशक्तपणा भासतच आहे !
ता. ८ सोमवार, सपटंबर १९३०
आज पार्शी सणाबद्दल आम्हाला सुटी होती. पण अनंत चतुर्दशीबद्दल गेल्या शनिवारी सुटी नव्हती. पण सुटीचे दिवशी ३ वाजताच कोंडण्यात येते. आणि काम नसते. वर्तमानपत्रे तर अझूनी वाचावयास मिळाली नाहीत. विविधवृत्त, ज्ञानप्रकाश मिळेल म्हणून वचन देऊन ते अद्यापि तरी पाळण्यात आले नाही. त्यामुळे अशा सुटीमुळे मनाला उल्हासाऐवजी उदासीनता जास्तच उग्र भासते ! एकांतवासाचा कंटाळा येतो. अशा वेळी आमच्या दोन वार्डातले बी क्लासचे १४ जण मिळून काही धार्मिक उपासना प्रवचन करू म्हटले तर त्यालाही परवानगी मिळत नाही ! मग सी क्लासची कोण अवस्था !