येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी : २५ जुलै १९३० शुक्रवार

२५ जुलै १९३० शुक्रवार
सुमारे ३।४ चे सुमारास खंडाळा येथील सरकारी बंगल्यात पोचल्यावर रा. शिंदे इन्स्पेक्टर म्हणाले की मि. मिलर जे खेडला नेतो असे मला सांगितले ती त्यांची गैरसमज होती. माझ्या खटल्याची सुनावणी येथे रा. माधव नारायण हुल्याळ, बी. ए., Deputy Collector  पुणे पश्चिम भागाचे प्रांत, ह्यांचेपुढे होणार. मला पकडताना वॉरंटही दाखविले नाही. मीही मागितले नाही. माझेवर चार्ज ११७ कलन पिनलकोड (गुन्ह्याला चिथावणी देण्याचा) व ४७ सी (बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा) होता. अर्ध्या तासात सर्व फार्स आटपला. हे मॅजिस्ट्रेट माझ्या जमखंडी गावचे बाळमित्र, कॉलेजमध्ये बी. ए. पर्यंतचे सहाध्यायी आहेत. त्यांनी मी खोलीत (कोर्टात) शिरताच प्रथम आपण होऊनच मला नमस्कार केला. आपल्या टेबलाला लागूनच मला खुर्ची दिली. प्रॉसिक्युटर, दोन पोलीस व एक मॅजिस्ट्रेटशिवाय कोर्टात कोणीच नव्हते. गर्दी टाळण्याची ही उत्तम युक्ती ! शेवटी गुन्हा कबूल आहे काय असे मॅजिस्ट्रेटनी विचारता मी एकच वाक्य विचारले की "खेड येथील १०,००० लोकांपुढील सभेत मी अध्यक्ष होतो, भाषण केले, व मिठाचा लिलाव केला, वगैरे पोलीसची हकीकत खरी आहे. पण मी गुन्हा केला की कसे ते सांगणे माझे काम नव्हे. ते कोर्टाने वाटेल तसे ठरवावे." सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. क्लास बी अशी शिफारस केली. पण ती वारंटवर न लिहिता तोंडीच पोलीस इन्स्पेक्टरला बजावली.

रा. हुल्याळ फिरतीवर ह्या बंगल्यात उतरले होते. आता मॅजिस्ट्रेटचे नाते संपले. मित्राचे नात्याने त्यांचे कुटुंबाला सौ. रमाबाईला भेटण्याची हरकत आहे काय ? असे मी विनोदाने विचारले. अर्थात् आनंदाने भेटा, चला म्हणून मला आत नेऊ लागले. मी पुनः म्हटले मी आता कैदी आहे. पोलीसची परवानगी पाहिजे. इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले, प्रत्यक्ष मालकच तुम्हाला नेत आहेत, तर पोलीस कशी हरकत घेतील. भेटीस गेल्यावर सौ. रमाबाईचे डोळे अश्रूने भरलेले पाहून मी पुनः विनोद केला,  "आपल्याच नव-याचा मी कैदी असून आपणच पुनः अश्रू गाळता!" एक अंजीर खाऊन पाणी पिऊन मी पोलिसांबरोबर मोटारीत बसलो.


सायंकळी ७ वाजता (ता. १२ मे १९३०) वैशाख पौर्णिमेचा चंद्र उगवला असता मला येरवड्याच्या तुरुंगाचे दारात उभे केले गेले. बुद्धजयंतीवर व्याख्यान देण्याची ही वेळ. दरसालच्या नियमाप्रमाणे शिवाजी शाळेच्या आंगणात ते मी दिलेही असते. पण योगायोग असा ! सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु एष बुद्धानुशासनम् ।। हा श्लोक म्हणून मी त्या प्रचंड कारागृहात पाय टाकला. (मला खेड येथे नेले अशा समजुतीने २०-२५ मंडळी तेथे गेली. नंतर तळेगावला गेली. फुलांचे हार वगैरे सर्व तयारी फुकट गेली असे मागाहून कळले).


ता. २७ जुलै १९३० रविवार
ता. २४ जुलैपासून दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून आपली खोली ऊर्फ पिंजरा बदलून जेथे रा. बाळूकाका कानीटकर८ वगैरे B Class कैदी होते तेथे (अंधारी वॉर्ड नं.२) बदलून घेतला असे वर सांगितलेच आहे. अर्थात येथे बाळूकाका वगैरे मित्रांची भेट होते. आज बाळूकाकांनी मला मोठी मेजवानी दिली. म्हणजे त्यांनी मला एक मोठा कांदा खावयास दिला. कांदा, मीठभाकर म्हणजे मला बासुंदी पुरीपेक्षा प्रिय, हे माझे आईला माहीत होते. लहानपणी मी गरीब विद्यार्थी होतो तेव्हा आई मला भाकरी, हिरव्या पातीचा कांद जेव्हा देई, तेव्हा मी म्हणे की कांदा म्हणजे माझे तूप अगर लोणी आहे. हा माझा अल्पसंतोष पाहून माझी आई अश्रू गाळी. आज आनंदाने कांदा खात असता ही आठवण झाली. B Class मध्ये चपाती, लोणी, साखर, दूध मिळत असता मला कांदाच इतका जास्त आवडावा ! कारण मी मराठ्याचा साधा बच्चा. बी क्लासमध्ये गुजराथी स्वयंपाकी वरण, भाजी अगदी आळणी करतो. माझा लहानपणचा गोडघाशेपणा लवकरच मावळून मी लहानपणीच साध्या अन्नाचा भोक्ता झालो. आता सर्व हिंदुस्थानातील प्रांतात वरचेवर फिरूनही मराठ्याच्या झुणकाभाकरीची आठवण व्हावी ! किती मानवी लक्षण !

रविवार २७ जुलै १९३०
तुरुंगात दर पंधरा दिवसांत रविवारी कैद्याचे वजन मोजून त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात ते नमूद करीत असतात. गेल्या २।। महिन्यात माझे सारखे वजन कमी होत होते. आलो त्यावेळी १५६ पौंड होते, ते मागील पंधरावड्यात १४६ पौंडावर आले. आज ह्याच पंधरावड्यात १५० पौंड झाले हे पाहून मला आनंदापेक्षा आश्चर्यच अधिक वाटू लागले. वरील कांद्याच्या मेजवानीमुळे तर हा फरक झाला नसावा ना ! मात्र आज वजन मापण्याचे नवीन यंत्र आणिले होते, त्याचा तर हा प्रताप नसेल ना ?

सोमवार २८ जुलै १९३०
दर गुरुवारी सुपरिंटेंडंट तपासणीस आम्हा सर्वांकडे येत असतात. शिवाय मध्ये कधी तरी येत असतात. आज तसे ते व जेलर मि. क्वीन पाहण्यास आले होते.
अलीकडे माझी धार्मिक वर्तमानपत्रे १) Indian Messenger २) सुबोध पत्रिका ३) Inquirer ४) Xian Register मला मिळावी अशी परवानगी असता, ती अलीकडे फारच थोडी मिळतात. सुबोध पत्रिका तर कधीच मिळाली नाही. Indian Messenger दोनच प्रती मिळाल्या. लंडनचे Inquirer ही अलीकडे दोन आठवडे मिळाले. म्हणून आज सुपरिंटेंडंटना विचारले. सुपरिंटेंडंट Major Martin, I. M. S. फार चांगले सभ्य गृहस्थ आहेत. त्यांनी आपल्यास काही माहीत नाही असे सांगितले. इतक्यात जेलर मि. क्वीन पुढे आले. ते म्हणाले की ह्या पत्रांतून राजकारण असते म्हणून ते दिले नाही. मी म्हटले, ह्या कारणावरून जर पत्रे मला द्यावयाची नसली तर निदान ती माझ्या खर्चाने का होईनात माझे घरी परत पाठवावीत. मध्येच गहाळ होऊ नयेत.
आज सुपरिंटेंडंटनी मला कांदा एक रोजचे जेवणांत देण्यास परवानगी दिली !

मंगळवार २९ जुलै १९३०
जुलै १ तारीख मंगळवारी रा. भास्करराव जाधव९ मला भेटावयाला आले. स्वतः सुपरिंटेंडंटनी मला ह्या भेटीसाठी ऑफिसात बोलावले. अर्थात चहुकडे गडबड झाली. सुपरिंटेंडंटनी मला फार चांगल्या रीतीने वागविले.१०

ह्या भेटीत मला सुपरिंटेंडंटकडून कळले की दर मंगळवारी येथे एक कॅथोलिक उपासना होत असते. पुढच्या मंगळवारपासून ह्या उपासनेस हाजर राहण्यास मला परवानगी मिळाली.

आषाढात कर्नाटकात बहुजन समाजात गुळ्ळवाची पूजा आणि श्रावणात ब्राह्मणांत दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा होत असते. मी विनोदाने ह्या उपासनेस मंगळागौर म्हणत असतो. कारण ब्राह्मणाचे संस्कृत जसे मुलींना समजत नाही, त्याप्रमाणे ह्या उपासनेतील सर्व विधी व प्रार्थना लॅटीनमधल्या मला समजत नाहीत. तथापि कॅथॉलिक मास (Mass) म्हणजे ख्रिस्ताचा आत्मयज्ञ म्हणजे काय ह्या उपासनेतील तंत्रावरून प्रत्यक्ष कळले. आजपर्यंत चार मंगळवार झाले.
दर मंगळवारी रोमन कॅथॉलिक पाद्री खडकीहून ह्या उपासनेस मुद्दाम येतात. आज त्यांनी त्यांचे नाव दिले.

Rev. John Lauder S. J.

R. C. Chaplain St. Ignatius Church,
Opp. R. A. Officers Mess,
Burr Road, Khirkee

असा त्यांनी आपला पत्ता दिला. हे आयरिश आहेत. उपासना एका कैद्याच्या लहानशा खोलीत होते. सुमारे २५-३० युरेजियन व नेटिव्ह ख्रिस्ती कैदी जमतात. अर्थात सर्व कॅथोलिकच. मीच एकटा विक्षिप्त ब्राह्म ! उपदेश १०-१२ मिनिटे. बाकी सर्व विधीचाच अवडंबर असतो. भजन किंवा गाणे मुळीच नाही. सर्व लॅटीन असल्यामुळे गुडघे टेकून बराच वेळ राहण्यापलिकडे मंडळीना काहीच करावयाचे नसते ! प्रभू येशूचे शेवटचे भोजनाची नक्कल तीच तीच नेहमी होते. भाकरी माझे शरीर व दारू माझे रक्त हेच माझे स्मारक समजा, ही येशूची आज्ञा अक्षरशः खरी करून दाखविली जाते ! हा मानवी स्वभावाचा चमत्कारच म्हणावयाचा !!


दुसरीकडे दर सोमवारी एक चर्च ऑफ इंग्लंडची अशीच उपासना होत असते.

पण त्या वॉर्डमध्येच महात्मा गांधी असल्याने बाहेरच्या कोणालाही जाता येत नाही असे मि. रॉजर डेप्युटी जेलरने मला सांगितले !