येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी १९३०

प्रास्ताविक मजकूर म. शिंदे यांच्या हस्ताक्षरात (PDF साठी येथे क्लिक करावे)

१९३०

सोमवार ता. २१ जुलै १९३०
येथे आल्यापासून मला लिहावयाचे सामान मिळावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो. ते सामान आज मला सर्व मिळाले म्हणून किती आनंद झाला म्हणून सांगू !
ता. २६ जूनला गुरुवारी सुपरिंटेंडंटनी लिहिण्याचे सामानासाठी घरी पत्र लिहिण्यास परवानगी दिली. ते पत्र ३ जुलैला तुरुंगातून रवाना झाले. ता. १२ जुलै शनिवारी जनाक्का, विश्वास,१ छबू आणि बबन मला भेटावयाला आले. त्यांनी बरोबर तीन वह्या, दोन टाक, एक शिसपेन, ४ शाईच्या पुड्या व एक ब्लॉटिंगची प्याड, एक दस्ता सुटे कागद इतके सामान आणिले. पण शाईची दौत आणावयाला विसरले. झाली, माझी सामान मिळविण्याची दोन महिन्याची तपश्चर्या फुकट गेली.
शाईची दौत मागण्यासाठी सर्वांपुढे तोंड वेंगाडावे लागले. ऑफिसमध्ये माझे पैसे आहेत त्यातून मला एक लहानशी दौत मिळावी म्हणून चिठ्ठी लिहिली. पण दाद लागेना. ता. १७ ला गुरुवारी आठवड्याचे तपासणीला सुपरिंटेंडंटसो आले. मी दौतीचा अर्ज केला. दौत देणे नियमात आहे. काय, त्याचा विचार होईल असे उत्तर मिळाले. रविवारी ता. २० ला सहज जेलरसो. आले. त्यांनी दौत पुनः मागितली. मी Ink-stand हा शब्द वापरीत होतो. त्यामुळे ह्या लोकांची मोठे कलमदान अशी गैरसमजूत होऊन हा सर्व विलंब लागला. नुसती एक लहान दौत असे हाताने दाखवून सांगितल्याने साहेबांनी तात्काळ पोलिसास एक दौत देण्यास फर्माविले. ता. २१ सोमवारी मि. रॉझर्स डेप्युटी जेलरने एक उंदराच्या कानाएवढी चिमुकली दौत जुनी दिली. मला स्वराज्य मिळाल्याइतका आनंद झाला. त्याच दिवशी सायंकाळी मी माझ्या आयुष्यातल्या आठवणी२ लिहिण्यास आरंभ केला!
[रोजनिशीच्या समासात नंतर लिहिलेला मजकूर – संपादक]
जे सामान मी ता. २१ जूनला मागितले ते येवढे गोते खाल्ल्यावर शेवटी ता. २१ जुलै रोजी जवळजवळ एका महिन्याने मिळाले !
ता. २४ जुलै गुरुवारी प्रतापरावांनी३ चि. रविंद्राबरोबर मला एक दौत पाठविली. ती मिस्ट. रॉजर्सने २५ रोजी मला नुसती कळविली. ता. २६ रोजी शनिवार संध्याकाळी सदाशिव जमादारांनी मला आणून दिली. तीही ता. ४ आगष्ट रोजी फुटली ! ही तुरुंगातली दशा !!

मंगळवार ता. २२ जुलै १९३०
आज जवळ जवळ तीन महिने झाले. मला लिहावयाला वेळ नाही, किंवा लिहावयाला कागदशाईलाही मी पारखा झालो ना ! एप्रिलच्या तिस-या आठवड्यापासून मेच्या दुस-या आठवड्यापर्यंत मी पुणे जिल्ह्यातील खेड्यांतून कायदेभंगाच्या प्रचारावर फिरत होतो. ता. १० मे १९३० शनिवारी तिसरे प्रहरी मी पुण्यास घरी पोचलो. ह्या माझ्या तिस-या फेरीवर मी सुमारे ५० मैल पायी चाललो होतो. पहिल्या फेरीत मी १०० मैल चाललो होतो. पण ह्या फेरीत भीमाशंकर डोंगर चढून उतरावा लागला. जंगल सत्याग्रहाची मी पूर्ण काल्पनिक तयारी केली होती. पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष काही घडले नाही. मी फार थकलो होतो.
 
गुरुवार ता. २४ जुलै १९३०
ता. ११ रविवार सकाळी कौटुंबिक उपासना मंडळाची४ श्री. शिवाजी शाळेत साप्ताहिक उपासना चालविली. थकल्यामुळे बाहेर पडलो नाही. सोमवारी वैशाख पौर्णिमा श्री गौतम बुद्धाची जयंती होती. पण मी ह्या कायदेभंगाच्या घाईत असल्याने वार्षिक सभा करणे झाले नाही. तथापि मी एकटाच सकाळी दोन तास पर्वतीचे डोंगरावर जाऊन ध्यान व शांतीचा जप करून आलो. दोन प्रहरी बारा वाजता जेवण करून आमच्या दिवाणखान्यात येऊन बसतो इतक्यात, पुणे शहरचे पोलीस इन्स्पेक्टर मि. मिलर व डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर मि. शिंदे हे दोघे मला पकडावयाला माझ्या दिवाणखान्याच्या दारी येऊन दाखल झाले. हे येणार अशी कुजबूज मला दोन तास अगोदरच समजली होती. मिलर माझे ओळखीचे युरोपियन अधिकारी होते.  I am afraid, I am coming on an unpleasant- असे शब्द त्यांचे तोंडी येताच ते वाक्य पूर्ण होण्याचे पूर्वीच मी म्हटले, "तुमची मी वाटच पाहत आहे. इतका उशीर का केला ? अमळ खुर्चीवर बसा मला एक लहानशी कामाची चिठी लिहावयाची आहे. तितका वेळ द्याल काय ?" त्यांनी आनंदाने कबुली दिली. लिहून झाल्यावर माझी प्रवासाची पडशी व अत्यंत जरूरीचे कपडे व पुस्तके घेऊन निघालो. भगवद्गीता, धर्मपद, बायबल व सुलभ संगीत व माझी स्मरणी, चष्णा आणि विंचरण्याची फणी इतके माझे सोबती कोठेही बरोबर असणारे, तेही मजबरोबर निघाले. घरात अर्थात् गडबड उडाली. कोणी डोळे पुसतो, कोणी पाया पडतो हे चालावयाचेच. माईचे५ (माझी सून) डोळे पाण्याने भरलेले दिसले. इतर कोणाचे तोंडाकडे मी पाहिलेच नाही. जिना उतरण्यापूर्वी दारात जनाक्काने पायावर डोके ठेविले. "घाबरावयाचे मुळीच कारण नाही बरे, " हे माझे घरातील शेवटचे वाक्य होते. दोन पोलीस ऑफिसरबरोबर खाली अंगणात आलो तो बाबूराव जेधे६ ह्यांचा मोठा मुलगा यशवंत समोर दिसला. "मला खेडला नेत आहेत" (असे मला मि. मिलरने कळविले होते) असे त्याला सांगितले. रस्त्यात मोटारलॉरी, चार पोलीस शिपाई सज्ज होती. रस्त्यात तितक्यात गर्दी जमली होती. चि. बबन व सौ. रूक्मीणीबाई७ लॉरीपर्यंत आल्या. अर्थात् डोळे पुशित होत्याच. शंकरशेट रोडवरू लष्करमधील पोलीस सुपरिंटेंडंटचे ऑफिसजवळ आल्यावर मि. मिलर ह्यांनी मोटार उतरून मला लष्करी सलाम केला,  Good Bye म्हणाले. मोटार खेडची वाट सोडून चिंचवड स्टेशनावरून खंडाळ्याकडे निघाली. तेव्हा पोलीसनी खेडची हूल खोटी उठवली हे कळले !

ता. २४ जुलै १९३० गुरुवार
हे लिहित असता माझ्या खोलीत बरोबर सात वाजता सायंकाळी चक्क विजेच्या दिव्याचा प्रकाश पडला. कारण आजच मी माझी ह्या नव्या जागी अंधारी वॉर्ड नंबर ३ पासून नं. २ मध्ये प्रकाशासाठी बदली करून घेतली होती. आज २।। महिन्यात दिव्याचा प्रकाश काय तो आजच पाहवयास मिळाला. तो पाहून मला इतका आनंद झाला की लिहिणे सोडून किती वेळ तरी मी दिव्याकडे पाहतच बसलो. वस्तू गेल्याशिवाय तिची किंमत कळत नाही, हे खरे.
मी आज आलो आहे हा वॉर्ड फार सुंदर दिसला. विस्तीर्ण आंगण. त्यात लिंबाचे एक मोठे व कलमी आंब्याचे ठेंगणे दोन सुंदर झाडे आहेत. फार रमणीय वाटले.