येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी -दसरा, गुरुवार ता. २ ऑक्टोबर १९३०

दसरा, गुरुवार ता. २ ऑक्टोबर १९३०
आज दसरा असून अर्धाच दिवस सुटी मिळाली ! सुटीचा अर्थ इतकाच की सकाळी ७ पासून ९।। पर्यंत आणि मग ११-१२ पर्यंत आम्हाला काम करावे लागले. ९।। वाजता सकाळचे व १ वाजता संध्याकाळचे अशी दोन जेवणे मिळाली. व लगेच १।।। वाजता आम्हाला दुसरे दिवशी सकाळपर्यंत कोंडण्यात आले. हाच दसरा ! सणादिवशी जेवणांत मुळीच फरक नसतो. उलट लवकर कोंडतात.

सकाळी नित्याची साप्ताहिक सुपरिंटेंडंटची तपासणी झाली. मी गेल्या शनिवारी घरी पाठविलेले पत्र माझ्या हिस्टरी बुकात नमूद केलेले नव्हते. ही तक्रार सुपरिंटेंडंटकडे केली. सपटंबर ता. १८ गुरुवारला एक पत्र घरी ऑफिसने पाठविले होते की माझ्या भेटीची परवानगी दिली आहे. तेच चुकून माझ्या बुकात नमूद केले गेल्यामुळे माझे गेल्या शनिवारचे पत्र ऑफिसातच दाबून ठेवण्यात आल्यामुळे मला "ज्ञानप्रकाश" अद्यापि मिळाला नसावा. कारण गेल्या शनिवारच्या पत्रात मी "ज्ञानप्रकाश" साप्ताहिक मागविला होता. अशा चुकांमुळे कैद्यांची जी गैरसोय होते ती अधिकारी शांतपणाने लक्षात घेत नाहीत.

रा. हा. कर ह्यांना२५ कृत्रिम रीतीने अन्न पोटांत घालण्यांत येत असे कळले ! लवकरच चालू लागतील हे ऐकून समाधान झाले !

सोमवार ता. ६ ऑक्टोबर १९३०
रा. च्छोटालाल घेलाभाई गांधी (अंकलेश्वर-भडोच) हे कैदीबंधू माझ्या वार्डात आल्यामुळे व ते भाविक जैनधर्मी असल्यामुळे त्यांच्याशी मी जैनधर्मावर चर्चा करीत असतो. त्यांनी दिलेले "सनातन जैन ग्रंथमाला" प्रथमोगुच्छकः२६ (निर्णयसागर छापखाना १९०५) ह्या संस्कृत पुस्तकांतील कित्येक ग्रंथ व अमितप्रति आचार्यविरचित् "तत्त्वभावना" आणि बृहत् सामायिक पाठ हे दोन ग्रंथ (विक्रम संवत् १०७०) हे अंशतः वाचले आहे. आज जैन धर्मात ईश्वरवाद आहे, असे च्छोटालाल ह्यांचे म्हणणे होते. त्यांच्या (शी) संवाद करून जैनधर्मातील ईश्वरवाद निराळा व इतर धर्मीयांचा ईश्वर निराळा असे आम्हा दोघांचे शेवटी मतैक्य झाले.

इतरांचा ईश्वर कर्तृत्वरूपी आहे. तसा जैनांचा नसून तो एक अनेक परमात्म्यापैकी एक परमात्मा आहे.

बुधवार ता. ८ ऑक्टोबर १९३०
आज श्री. च्छोटालाल ह्यांच्याशी भाषणात जैनाने सामायिक व्रत (संध्या) आणि प्रतिक्रमण (Confession) काय आहे, व ह्याचा प्रचार कसा आहे वगैरे समजून घेतले.

गुरुवार ता. ९ ऑक्टोबर १९३०
सुपरिंटेंडंटची आज साप्ताहिक तपासणी झाली. ता. २६ ऑक्टोबर ची तारीख माझ्या हिस्टरी टिकेटमध्ये लिहिलेलीच कायमची ठरली नसल्यास माझी सुटका एक आठवडा अगोदर म्हणजे ता. १८ शनिवारी होईल काय ते विचारले. ऑक्टोबर मध्याला सुटका होईल असे मागे एकदा सुपरिंटेंडंटनी म्हटले होते त्याची आठवण दिली. त्यांनी जेलरला विचारले. ता. २२ ला सुटका होईल असे ते म्हणाले. मी म्हटले त्याच दिवशी तर दिवाळीची प्रतिपदा आहे. सुट्टी आहे. मग दोघांनी ता. १८ शनिवारी सोडण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे मी घरी कळविण्यास पत्राची परवानगी मागितली. तीही त्यांनी दिली. २२ आठवडे शिक्षा भोगिल्याचे दुःख विसरून एक आठवड्याची जास्त माफी मिळाल्याचाच आनंद झाला. तरी आझुनी एक आठवडा काढावयाचा आहेच. तो दुःसह झाला आहे!

शनिवार ता. ११ आक्टो. १९३०
आज घरी एक पत्र लिहिले. आज आमचे वॉर्डात नाडी विणण्याचे दोन माग आणून उभे केले.
सायंकाळी अवचित चि. प्रताप भेटावयास आला. बरोबर सौ. रूक्मिणीबाई, चि. बबन, रा. गणपतराव आणि आत्माराम पाटील इतकी मंडळी होती. त्यांनी "कर्मवीर विद्यार्थी" हे माझे चरित्र व ता. १० ज्ञानप्रकाशात त्यावरील अभिप्राय व इतर ज्ञानप्रकाशाचा एक अंक आणिला. पण दैनिक ज्ञानप्रकाशाचा ता. ११ चा अंक मला घेण्याची परवानगी मिळाली नाही. ता. १८ रोजी माझी सुटका होणार हे कळविले. त्या दिवशी मंडळी मला घेण्यास येईल. कानीटकरांची काही पुस्तके व माझी काही पुस्तके घरी परत केली. भार कमी केला. टाटा स्टील कंपनीच्या डिव्हिडेंटवर सही केली. मी येणार नाही म्हणून दिवाळी घरी करणार नव्हते. आता करतो असे सौ. म्हणाल्या. पण डोळे ओले झालेच शेवटी ! ता. १८ रोजी माई व तुरुंगी मला न्यावयाला येणार !
(ह्यापुढील तीन पाने ता. ५ सपटंबर १९३२ म्हणजे जवळजवळ दोन वर्षांनी लिहिली आहेत. - वि.रा. शिंदे)

सोमवार ता. १३ ऑक्टोबर १९३०
आज सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास मी व बाळूकाका आंगणात शतपावली करीत असता, आमचा वॉर्डर सखाराम तुकाराम धोकरे एकदम मजकडे येऊन माझ्या पायावर पडून रडू लागला. १०।१५ मिनिटे काही कारण सांगेना. आपल्याला पश्चाताप झाला येवढेच म्हणत होता. मला मागाहून कळले की माझी सुटका दुसरे दिवशी ता. १४ रोजी मंगळवारीच होणार होती हे त्याला कळले होते. ते त्याला मला कळविण्याचा अधिकार नव्हता. उद्या सकाळी येण्याचे पूर्वीच माझी सुटका होणार होती. म्हणून हे रडे.
रात्री कोंडल्यावर दुसरे वॉर्डर येऊन मला उद्या सुटका होणार काय, विचारू लागले. एकंदर गडबड पाहून मी उद्या सुटणार म्हणून अर्थात आनंद झाला.
आज रात्री झोप येईना. नेहमीचे लिहिणे होईना. पाळीस जमादार रात्री येऊन विचारू लागला की सर्व बांधाबांधीची तयारी आहे काय ? हा प्रश्न ऐकून मला सुटण्याची जवळ जवळ नोटीसच मिळाली.

ता. १४ आक्टोबर १९३०
सकाळी उठल्याबरोबर कालच्याच जमादाराने येऊन मी सुटलो व सामानाची तयारी लवकर करून ऑफिसात येण्याची वर्दी दिली. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी जोशी माझेबरोबर सुटले. माझी ही डायरी व इतर लेख तपासून काही आक्षेप निघतील की काय भीती होती. तसे काही झाले नाही. ८ वाजण्याचे सुमारास आम्ही बाहेर पडलो. गावातून एका मित्राकडून मोटर आणण्याविषयी तुरुंगाचे अधिका-यांनी आपला टेलीफोन करण्याची परवानगी दिली. एकंदरीत सर्व अधिका-यांनी मजशी माझ्या तुरुंगवासात मला बरे वागविले. मी घरी ९-१० चे दरम्यान पोचलो. लागलेच जोशी ह्यांचे घरी व पुढे दुस-या दिवशी रे मार्केटात जाहीर सभा भरून अभिनंदन झाले. शेवटी माळ घातल्यावर मी म्हटले की "आता कायदेभंग करून तुरुंगात जाणे इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की अशा माळा तुरुंगातून परत आलेल्याच्या गळ्यात न घालता, त्या माळा अद्यापि तुरुंगात न गेलेल्यांच्याच गळ्यांत घातलेल्या ब-या." हे ऐकून सभेत हशा आणि टाळ्या झाल्या. गेल्या सहा महिन्यातल्या ह्या खोट्या नाटकाचा असा गोड शेवट झाला.