येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी -गुरुवार ता. ७ ऑगष्ट १९३०

गुरुवार ता. ७ ऑगष्ट १९३०
आज आठवड्याची तपासणी झाली. मला आज अशक्तता वाटत होती. टॉनिकचे औषध चालूच आहे. सुपरिंटेंडंटना "काम फार पडते. सकाळी ७ पासून तिसरे प्रहरी तीनपर्यंत बसणे फार होते," म्हणून सांगितले. आज नवीन जास्त भांडी मिळाली. एक अँल्युमिनियम ताट, एक गडवा, आणि तोंड धुण्याला एक मोठे तस्त (बसीन) इतकी मिळाली. इतर आढ्यतेने सांगू लागले की आपल्याजवळ पंचपात्रे आहेत. मी त्याहून आढ्यतेने सांगे की मी षटपात्री आहे. कारण माझेजवळ एक मातीचे परळ हॉस्पिटलमध्ये मिळालेले होते !!

शनिवार ता. ९ ऑगष्ट १९३०
आज श्रावणी पौर्णिमा (नारळी पौर्णिमा) म्हणून आज आमचे काम बंद होते. सुट्टी होती. पण रविवारप्रमाणे आज आम्हाला तिसरे १ वाजता जेवण आणि दोन वाजताच कोंडण्यात आले. अशा सुट्टीबद्दल हसावे की रडावे समजत नाही ! सणाचे दिवशी जेवणात काहीच फरक नसतो. ही सुट्टीदेखील आमच्यासाठी नसतेच मुळी. पोलीस व वरच्या अधिका-यासाठी असते.


मंगळवार ता. १२ ऑगष्ट १९३०
सकाळी कॅथोलिक उपासना आटपून परत वॉर्डमध्ये येतो तो आम्हा सर्व बी क्लासवाल्यांची तेथून उचलबांगडी दुसरीकडे झाली होती. कारण काल मध्यान्ह रात्री कोणी प्रतिष्ठित पाहुणे A class चे कैदी - हे बहुतकरून फारच मोठे बादशाही कैदी कोण असावेत हे कळले - आमचे येथे आल्याने त्यांना जागा पाहिजे होती. आमच्या सहवासी मंडळीना मी येण्यापूर्वीच दुसरीकडे नेले होते. चहुकडे शुकशुकाट. मला वाटले सर्वांना सोडून दिले. एक सेकंदभर आनंदाचा पूर आला ! लगेच आम्हाला नं. ३ सर्कलमध्ये नं. १ चे बराकीत नेऊन एकाच विस्तीर्ण बराकीत आम्हा चौदा जणांची मांडणी झाली. आज ह्या धांदलीत काम देण्यात आले नाही. सर्वांची एकाच मोठ्या दालनात पथारी पडल्याने बोलण्यास, एकत्र बसण्या-उठण्यास पूर्ण स्वराज्य आजच मिळाले.

बुधवार ता. १३ ऑगष्ट १९३०
आज सायंकाळी बराच वेळ स्वामी सहजानंद ह्यांच्याशी धर्मपर चर्चा झाली. मुख्य विषय वैराग्य हा होता. आम्ही चौदाजण आमच्या १।२ वार्डातून येथे सर्कलमध्ये आलो होतो. त्यांची नावे१२ -
१ बाळूकाका कानीटकर (गजानन नारायण)
२ पांडुरंग दत्तात्रय खाडीलकर, वाई.
३ रामभाऊ बळवंत हिरे, अहमदनगर
४ त्रिंबक अण्णाजी देवचके, अहमदनगर.
५ भीमभाई अखुभाई वशी, बारडोली स्वराज्य आश्रम.
६. भिखाभाई ईश्वरभाई पटेल.
७. च्छोटालाल घेलाभाई गांधी, अंकलेश्वर, भडोच.
८. केशवलाल गणेशजी पटेल, बारडोली.
९. ठाकूरलाल दयाराम ठाकूर, भडोच.
१०. फुलसिंहजी भारतसिंगजी दामि, विनयमंदीर, सुणाव. खेडा Via आनंद.
११. नगीनलाल नारायणदास पारख, गुजराथ पीठ, अहमदाबाद.
१२ हिराभाई नरसीभाई पटेल, करणसद्, खेडा Dist.
१३ स्वामी सहजानंद भारती, नावूर, पोस्ट पुणतांबे, अहमदनगर.
१४ वि. रा. शिंदे.

चतुर्भुज अमीन बिरसद, खेडा Dist.
नरसीभाई ईश्वरभाई पटेल, पाटीदार आश्रम, आनंद.
ही सर्वजण आम्ही ह्या चर्चेच्या वेळी एकत्र झालो. काही मंडळीने अगदी हळू स्वरात भजन केले. नंतर मीही ह्या भजनात सामील झालो. रामभाऊ ह्यांनी मला एक अभंग म्हणावयास सांगितला. तो म्हणून मी लहानशी प्रार्थना केली. समाधान झाले.

गुरुवार १४ ऑगष्ट १९३०
आज सायंकाळी आम्हा वरील चौदा जणांना कोंडल्यावर माझे त्यांच्यापुढे भाषाशास्त्रावर एक तास व्याख्यान झाले. त्यांना ते सर्वांना फार आवडलेसे ते म्हणाले. स्वामी स्वात्मानंदजीनी१३ माझी फार स्तुती केली. ह्यानंतर भजन होऊन नंतर मी हिंदीमध्ये प्रार्थना केली. रामभाऊ हिरे ह्यांना माझे भजन व प्रार्थना फार आवडतात असे ते व इतर मंडळी वारंवार म्हणते.

शनिवार ता. १६ ऑगष्ट १९३०
जुन्या पंचांगाप्रमाणे आज कृष्णाष्टमी आल्याने आम्हाला सुट्टी होती. काही लोकांनी फराळाचे मिळेल काय म्हणून मि. रॉजर्सला विचारले. सुपरिंटेंडंटला विचारून पाहतो असे म्हणाले. काल संध्याकाळी फार तर रताळी मिळतील म्हणाले (होते). शेवटी तीही न मिळाल्यामुळे आज नेहमीचेच अन्न मिळाले !!
आजचा दिवस धार्मिक चर्चा, प्रवचन, भजन (करण्यात) घालवावा, असा काहींचा अभिप्राय कालच झालेला होता. पण सकाळी एक* गोष्ट घडून आल्यामुळे आमची मने तिच्यासंबंधाने व्याकूळ झाली. शेवटी सायंकाळी आम्ही नित्याच्या भजन प्रार्थनेस जमलो. उपासना चालविणेचे काम मजकडे असते. त्यात मी आज १० मिनिटे प्रवचन केले. आणि सुचविले की जे धर्मसाधन आज झाले नाही ते आम्ही उद्या तरी करू या. उद्या जरी काही आपत्ती आमचेवर आजच्या प्रकरणातून आली नाही तरी उद्या सकाळ कपडे धुण्यात व दोन प्रहर Illustrated Weekly वर्तमानपत्र वाचण्यात जाणार. मग पुढे जो आम्ही प्रोग्राम केला आहे तो कसा काय पार पडेल ह्याची शंकाच आहे. तुरुंगातले मनाचे स्वस्थ आळवावरच्या पाण्याहूनही किती तरी अधिक चंचल ! हे तुरुंगात आल्याविना कळत नाही !

रविवार ता. १७ ऑगष्ट १९३०
आज सकाळी आम्हाला कुलूपे उघडून बाहेर घेतल्यावर समोरील बराकीच्या व्हरांड्यात बसविण्यात आले. व ज्या बराकीत आमची निजण्याची सोय केली होती तिला कुलूप लावण्यात आले. कारण तिच्यामागील व्हरांड्यात ५।६ चक्क्या होत्या, व त्यावर १५-२० मुलांना दळावयास लावले होते. ही मुले सर्व आमच्या ओळखीचे राजकीय कैदी असल्याने आमचा व त्यांचा निकट संबंध येऊ नये म्हणून असे करण्यात आले. सकाळी मि. रॉजर्स B Class वरचा डेप्युटी जेलर मला भेटला. हा माझ्या फार ओळखीचा झाला होता.  व सलगीही फार झाली होती. काल घडलेल्या प्रकारासंबंधाने माझे व त्याचे बरेच खासगी बोलणे झाले. शेवटी ह्या संभाषणाने हे प्रकरण मिटेल असे वाटले.

[* ही गोष्ट ही की रा. बाळूकाका कानीटकर ह्यांनी चक्कीवरील तरूण व लहान स्वयंसेवकांना फार मार बसतो ह्याबद्दल सुपरिंटेंडंटची भेट मागितली. त्यामुळे जेलर मि. क्वीन ह्यांना राग येऊन, बाळूकाकांना निराळ्या खोलीत कोंडण्यात येईल अशी धमकी मिळाली. दुसरे दिवशी डेप्युटी जेलर रॉजर्स मजकडे आल्यावर त्यांना मी स्पष्ट सांगितले की बाळूकाकांना ही धमकी नसून ती आम्हा सगळ्यांना आहे. ह्याचा परिणाम नीट होणार नाही. येवढ्यावरच हे प्रकरण मिटले. (तांबड्या शाईतील (हा) शेरा ५ सपटंबर १९३२ रोजी लिहिला. वि.रा. शिंदे.)]

आज व काल सुटी असल्याने २ वाजता सुटीच्या नियमाप्रमाणे आम्हाला ह्याच बराकीत कोंडण्यात आले. कारण सुटीच्या दिवशी १२ वाजताच सी क्लासची कामे आटोपतात. म्हणून आम्हाला बराक मोकळी झाली. सायंकाळी ३।। वाजता काल ठरलेला प्रोग्राम सुरू झाला. नेहमीप्रमाणे सर्व मंडळी माझ्या हांतारुणाभोवती जमली. माझ्या हांतरुणाजवळच स्वामी सहजानंदांचे हांतरुण होते. प्रथम च्छोटालाल घेलाभाई गांधी (अंकलेश्वर, भडोच) ह्यांचे जैन धर्मावर सुमारे १ तासभर व्याख्यान झाले. हे स्वतः जैन आहेत. नंतर अर्धा तास विश्रांती झाल्यावर स्वामी सहजानंदाचे नामस्मरण ह्यावर व्याख्यान झाले. खरे पाहता हे व्याख्यान वेदांत किंवा अद्वैतवादावरच होते. ते काहीजणांना आवडले. नेहमीप्रमाणे मीच अध्यक्ष ठरलेला होतो. तुलनात्मक धर्मावर माझे व्याख्यान व्हावयाचे. पण मला फार कणकण वाटत होती. क्वीनीन फार (झाल्याने?) कान बहिरे झाले होते. अध्यक्षस्थानी म्हणजे माझे गादीवर कांबळे पांघरून मी अर्धा कललेलाच पडलो होतो. माझे व्याख्यान तहकूब केले. पुढे नित्याची उपासना झाली. ती मीच चाविली. मग आम्ही निजलो.