येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी : ता. २ ऑगष्ट १९३० शनिवार
ता. २ ऑगष्ट १९३० शनिवार
लिहावयाचे सामान मिळाले म्हणून दिव्याची जरूरी लागली. म्हणून ही B Class च्या वॉर्डमधील खोली मागितली. एक आठवडा रात्री मी लिहित असे. पण येथे आल्यापासून कामाचे तास वाढले. पूर्वीच्या वॉर्डमध्ये आम्ही आपल्या सवडीप्रमाणे रोज सुमारे १ पौंड दोन औंस काथ्या वळीत असू. येथे असा नियम दिसला, सकाळी ७ पासून तिसरे प्रहरी ३ पर्यंत काम करीत बसलेच पाहिजे. मध्यंतरी ९ पासून १०।। पर्यंत आंघोळीला व जेवणाला मोकळीक असे. एकंदरीत ६।। तासपर्यंत काम केलेच पाहिजे. १ पौंड २ औंसच जरी काथ्या वळला तरी इतके तास रोज ८ दिवसपर्यंत बसून पुनः ५ वाजता खोलीत कोंडल्यावर रात्री ९ पर्यंत वाचन व लेखन करीत होतो. ह्यामुळे काल रात्री मला फारच थकवा व थोडा ताप आला. रोज १०।। तास काम केल्याने आज तीन चार दिवस फार शीण आला. आज सकाळी डॉक्टरांनी टॉनिक दोन दिवसाकरिता दिले आहे । (पानाच्या वरच्या जागेत पुढील वाक्य लिहिले आहे : टॉनिकचे (लोहभस्म) औषध डॉ. सय्यदनी आज सुरू केले - संपादक)
परवा ३१ जुलै गुरुवारी नेहमीप्रमाणे सुपरिंटेंडंटसाहेबाची तपासणी झाली. ही सकाळी ६ वाजण्याचे वेळी होते. त्यावेळी सुपरिंटेंडंटबरोबर असिस्टंट सुपरिंटेंडंट, जेलर, त्यांचा एक लास्ट असिस्टंट जेलर, २ पोलीस, ४ वॉर्डर असा लवाजमा येतो. प्रत्येक खोलीपुढे (मेजर मार्टिन, I.M.S. हे सुपरिंटेंडंटचे नाव) एक मिनिट फार तर उभे राहतात. त्याचे आत काही सांगावयाचे अगर मागावयाचे असते. थोडक्यात ते दाद घेतात. सुपरिंटेंडंट गंभीर चांगले माणूस आहेत. माझी धार्मिक वर्तमानपत्रे सुबोधपत्रिका, Indian Messenger, Inquirer, Xian Register ही मला घरून दर आठवड्याला मिळण्याची परवानगी मिळाली आहे. पण अलीकडे ही पत्रे मला मिळत नव्हती. पत्रिका तर कधीच मिळाली नाही. कारण ती घरीच काही दिवस बंद झाली होती, असे ऐकले. Indian Messenger तीन अंक व Inquirer ७।८ अंक मिळाला. Xian Register मात्र परवापर्यंत मिळत होता. राजकीय मजकूर काही पत्रात येतो म्हणून देण्यात येत नाही, असे मला जेलरसाहेबांनी सुपरिंटेंडंटसो. समक्ष सांगितले. जर द्यावयाची नसल्यास ही पत्रे माझे घरी तशीच परत तरी करावीत, असे मी सुपरिंटेंडेंटसाहेबांस कळविले. त्यावर मला Xian Register हेही पत्र मिळाले नाही !
विजेचा दिवा निदा ९।। पर्यंत असावा अशी सुपरिंटेंडंटची आज्ञा आहे. पण वॉर्डर नवाचे पुढे जागण्यास कंटाळतात. म्हणून ९ लाच सर्व खोलीतील दिवे बंद होतात. परवा ही गोष्ट मार्टिन सो. ना सांगूनही काही इलाज झाला नाही !
ता. २ ऑगष्ट ३० शनिवार
आज टॉनिक घेतल्यामुळे लिहिण्याला किंचित उत्साह वाटतो म्हणून हे लिहीत आहे. सकाळी ६ ला उठल्यापासून तो पुनः सायंकाळी ५ ला खोलीत कोंडीतोंपर्यंत वाचावयालाही मिळत नाही. मग लिहिण्याची गोष्ट दूरच राहिली !
रविवार ता. ३ ऑगष्ट १९३०
मागचे रविवारी माझे वजन वाढलेले जरी डॉक्टरानी सांगितले (४ पौंड वाढलेले) तरी माझी अशक्तता वाढत आहे, हे पाहून तुरुंगवास मला जाणवू लागला आहे, माझी प्रकृती ढासळत आहे, असे दिसते. मी तसे घरी कळविले नाही. तरी प्रकृतीवर कायमचा परिणाम होईल की काय न कळे. बसल्या जागेवरून उठताना त्रास पडतो. पाण्याचे टंबरेल एका हाताने उचलून थोडा वेळ धरवत नाही. रोज नियमाने १-२ तास लिहवत नाही. ही लक्षणे बरी नव्हती ! असो. तरी ह्याचा माझ्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून मी वाचण्यात व लिहिण्यात काळ घालवीत आहे.
बाळूकाका कानीटकरांनी Hachinson's History of Nations हे सुंदर नियतकालिक वाचावयास दिले आहे. त्या प्रत्येक पानात भरपूर सुंदर चित्रे आहेत. इतिहास वाचून बरे वाटते.
मंगळवार ता. ५ ऑगस्ट १९३०
आज सकाळी कॅथॉलिक उपासनेला गेलो. फादर लॉडरनी सेंट इग्नॅशस लायलॉ ह्यांची माहिती उपदेशात सांगितली. कारण त्यांचे खडकीचे देऊळ इग्नेशसच्या नावाने चालते. आणि ही तुरुंगातील उपासक मंडळी त्यांच्या पॅरिशमधली (पंचक्रोशीतली) आहे.
आजही मला बरे वाटत नव्हते. अशक्तता व कणकण वाटत होती. तरी पण नित्याप्रमाणे काथ्या वळण्याचे काम करावे लागलेच !
काल रात्री मी लिहीत असता विजेचा दिवा एकदम मालविला. खोलीत अंधार पडला. मी चाचपडत उठलो तो माझ्या काचेच्या दौतीला पाय लागून ती फुटली. शाई चहूकडे सांडली. अंधारात काचेच्या तुकड्यावर पाय पडेल म्हणून चाचपडत वेचावे लागले. कानीटकरांनी दिलेल्या मोठ्या पुस्तकावर शाईचे मोठाले डाग पडले. असे हे तुरुंगातले सोहाळे. !
बुधवार ता. ६ ऑगष्ट १९३०
ता. १२ मे १९३० सोमवारी मी येरवडा तुरुंगात आलो. ता. २२ मेपर्यंत मला सी क्लासातच ठेवण्यात आले. तेथे माझी धार्मिक पुस्तके गीता, धर्मपद, बायबल, हीच तेवढी वाचावयाला मिळत. पुढे ता. २२ जूनपासून मी बी क्लासमध्ये आल्यावर माझा वार्ड बदलला. म्हणजे अंधारीतील ४ थ्यामधून मी तिस-यामध्ये आलो. येथे घरून माझे Life's Basis & Life's Ideals हे प्रो. ऑयकेनचे पुस्तक वाचावयास मिळाले. शिवाय येथील लायब्ररीतील कादंब-या व तुकारामाची गाथा वगैरे पुस्तके वाचावयाला मिळत.
सकाळी ७ पासून काथ्याची तरटे उकलण्याचे काम करावे लागे. ९ पासून १०।। वाजेपर्यंत स्नानाला व जेवणाला वेळ मिळे. मग पुनः काथ्याचे काम दोन प्रहरी २ वाजेपर्यंत करावे लागे. त्यापुढे वाचावयास वेळ मिळे. रात्री ७ वाजता अंधार पडे. ह्या तिस-या किंवा चौथ्या वार्डात दिव्याची सोय मुळीच नसे. पहिल्या व दुस-या वार्डातल्या १५ खोल्यातून माझेअगोदर आलेले जे बी क्लासचे राजकैदी असत त्यांना सायंकाळी ७ पासून ९ पर्यंत विजेच्या दिव्याचा प्रकाश मिळे. पण मला तेथे जागा नव्हती म्हणून ता. २४ जुलै गुरुवारपर्यंत ह्या अंधारी खोलीतच रात्री काढाव्या लागल्या. ह्या वार्डास "अंधारी" = Solitary असेच नाव आहे. दिवसा उजेड आणि हवा उत्तम असते. पूर्वी तीही नसावी म्हणून पूर्वीचेच नांव "अंधारी" हे अद्यापि चालू आहे.
ता. २१ जुलै किंवा ता. २४ जुलैपर्यंत सुमारे २।। महिने मला येथे वाचणे काही म्हणण्यासारखे करता आले नाही. लिहिण्याचे तर अशक्यच. त्यानंतर लिहिण्याचे सामान माझे घरून मिळाले, व दिव्याची खोली मिळाली म्हणून आता ही माझी रोजनिशी व दुस-या एक वहीत माझ्या आयुष्यातल्या आठवणी मी लिहू लागलो आहे.
मी आल्यापासून ही अशी सोय व्हावी म्हणून मी सारखा मागत होतो. तो आता कोठेशी दाद लागली. तरी पण दिवे ७ वाजल्याबरोबर एकदम लागत नाहीत. काळोख तर पडू लागतो. अर्धा पाव तास वाट पहावी लागते. १० वाजेपर्यंत प्रकाश असावा असा नियम आहे. ९।। वाजेपर्यंत तरी असावाच असे सुपरिंटेंडंटने मला स्वतः सांगितले. तरी ९।। वाजताच दिवे बंद होतात ! गेल्या गुरुवारी ही तक्रार मी केली, पण अद्यापि ९चे पुढे प्रकाश मिळत नाही. इतकेच नव्हे, ९चे अगोदरच केव्हा तरी एकदम दिवे बंद होऊन, गेल्या सोमवारी तर पुढे (म्हणजे मंगळवारच्या रोजनिशीत) लिहिल्याप्रमाणे हाल होतात ! तथापि इतके तरी लिहिणे वाचणे होते ह्यात मोठा आनंद मानून आहे !
अंधारी (Solitary) म्हणून एरवड्याच्या तुरुंगाचा एक भाग आहे. तो मुख्य दरवाजा ओलांडल्याबरोबरच लागतो. अंधारी हे नाव ऐकूनच शहारे यावयाचे. पण नावाप्रमाणे हा भाग मुळीच भयंकर नाही. पूर्वी असेल कदाचित. बी क्लासच्या सर्व कैद्यांची राहण्याची व्यवस्था अंधारी नावाच्या ह्या चार वार्ड उर्फ चौकांतच केली आहे. नंबर २ च्या दालनात मी हल्ली आहे. हे दालन ह्या चारीमध्ये सुंदर व एकांत आहे. येथे आल्यापासून मी रमलो आहे. ह्या दालनात सात खोल्या आहेत. त्यात पाच गुजराथी व नगरचे नानासो. देवचके व मी असे दोघे मराठे आहो. पुढच्या दालनात बाळुकाका कानीटकर व इतर सहा मंडळी आहेत. पुढील सात कैदी बंधूंना स्नानासाठी व शौच्यासाठी आमच्याच दालनात यावे लागते. त्यामुळे आम्हा १४ जणांची भेट वरचेवर होते.
सुमारे १००० चौरस फुटांचे खुले आंगण आमच्या दालनापुढे आहे. शेवटची नंबर ७ ची खोली माझी निवांत आहे ! मनमुराद फिरावयाला मिळते. विशेष हे की ह्या आंगणात तीन झाडे-एक कलमी आंब्यांचे अगदी ठेंगणे, गर्द हिरव्या पालवीने झाकून गेलेले; दुस-या टोकाला एक त्याहून उंच पण हिरव्यागार पानांनी व शाखांनी वाकलेले लिंबाचे झाड असून त्यांच्या मधोमध त्याच ओळीत एक लिंबा-याच्या झाडाचे एक उंच खोड वरती शेंड्याला मात्र अगदी थोडी पालवी अशी ही तीन नमुनेदार झाडे आमच्या घरातील सौ. रूक्मीणीबाई, माई व जनाक्का ह्यांची वेळोवेळी अनुक्रमाने आठवण करून देणारी आहेत. कलमी आंब्याच्या झाडाखाली नेहमी थंड पाण्याने भरलेले घडे गर्द सावलीत ठेविले असतात. ते आक्काच्या ४ मुलांची (च्छबुसुद्धा) आठवण देतात. माईच्या झाडाखाली एक अगदीच नूतन जन्मलेले लिंबाचे रोप तिच्या तुरूंगीची११ आठवण करते. माईच्या सावलीत मी वाचावयास बसतो. अक्का इतकी ठेंगणी आहे की उभा राहिलो असता तिच्या फांद्या व पाने माझ्या खांद्याखाली येतात. जनाक्का रोडकी, मध्ये वाकलेली, पाने नसल्यामुळे उन्हात उभी आहे. म्हणून तिलाच रोज प्रेमाने पाणी घालतो ! ह्याप्रमाणे मी दालनाला घरच समजून सुखात काळ ढकलीत बसलो आहे !