येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी-गुरुवार ता. ११ सपटंबर १९३०

गुरुवार ता. ११ सपटंबर १९३०
आज सुपरिंटेंडंटची साप्ताहिक तपासणी झाली. माझ्या हिस्टरी टिकेटमध्ये मी सुटण्याची संभवनीय तारीख सपटंबर ११ असे लिहिले होते. ते खोडून ऑक्टोबर २६ ही तारीख घातलेली आज नवीनच दिसली. मी सुपरिंटेंडंटला विचारले की मागील खेपेस ऑक्टोबरच्या मध्याला माझी सुटका होईल असे ते म्हणाले असता आता ऑक्टोबरचे शेवटी ही तारीख २६ कशी ? ता. २६ ऑक्टोबरला रविवार येतो. शिवाय ता. २२ रोजी बळिप्रतिपदा व त्याचेपूर्वी तीन दिवस सुटी आहे. एकूण ता. १८ ऑक्टोबरला तरी माझी सुटका होणे रास्त आहे. ती होईल काय म्हणून मी विचारले. सुपरिंटेंडंट म्हणाले ही तारीखही २६ अद्याप निश्चित नाही. अझूनी एक महिना अवकाश आहे. पुढे मला आणखी विचारा. पाहू काय होते ते.

शनिवार ता. १३ सपटंबर १९३०
घरी चि. जनाक्काना पत्र लिहिले. १ माझे लेख व्याख्याने२० २ रा. कृ. बाबर मास्तरांनी लिहिलेले नवीन चरित्र२१ ३ बुद्धधर्म आणि संघ२२ ४ माझी इंग्लंडातली मोठी डायरी ५ फर्ग्यूसन कॉलेजातील डायरी ६ टाकाची दोन निब्स इतके सामान घेऊन पुढचे शनिवारचे आत कोणी तरी भेटावयास यावे असे लिहिले. विविधवृत्ताचे मागील दोनचार अंक व एक ताजा अंक आणावयास लिहिले.

रविवार ता. १४ सपटंबर १९३०
आजच्या वुइकलीमध्ये समेटाचे ओंफस झाल्याचे वाचले. ही निराशा अगोदरच झाली होती. विविधवृत्ताचे मागील अंक ४ महिन्याचे बांधलेले कानीटकरांकडून वाचावयाला मिळाले.

ता. १५ सोमवार सपटंबर १९३०
आज ता. २३ ऑगष्टचा इन्क्वायरर मिळाला. त्यात प्रथमलाल सेन कलकत्त्यातील नवविधानचे२३ आचार्य वारल्याचे वाचले. इंडियन मेसेंजर मला न दिल्यामुळे ही बातमी मला इतक्या उशीरा पोचली. चि. प्रतापचे सुपरिंटेंडंटला आलेले पत्र मला दाखविले. पण त्यात असलेले पत्र मात्र मला मिळाले नाही.

मंगळवार ता. १६ सपटंबर १९३०
आज कॅथोलिक मासला गेलो. गेल्या मंगळवारी पावसामुळे जाता आले नाही. आजपर्यंत सबंध आठवडाभर पाऊस पडतच होता !

गुरुवार ता. १८ सप्टेंबर १९३०
आज सुपरिंटेंडंटच्या साप्ताहिक तपासणीचे वेळी मी कॅथोलिक उपासना लॅटिनमध्ये होते, दुसरीकडे प्रॉटेस्टंट उपासना इंग्रजीत होते तिला जाण्याची परवानगी मागितली. पण तिकडे कोणालाच जाण्याची परवानगी नाही, असे सुपरिंटेंडंट म्हणाले. राजकीय कारणावरून मला परवानगी मिळत नाही काय, असे मी पुनः विचारले. कारण तिकडे महात्मा गांधी असतात, म्हणून परवानगी नसावी हे मला कळले होते. काही असो परवानगी मिळाली नाही. नंतर मी विचारले, की मी तुरुंगातून सुटल्यावर कैद्यांना काही तरी आध्यात्मिक उपदेश करण्याची अगर त्यांचा समाचार घेण्याची व्यवस्था करावी. आणि ही केवळ कोणत्या संप्रदायाला केवळ अनुसरून न होता हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती कोणत्याही कैद्याला ह्याचा फायदा मिळावा अशी तजवीज करावयाचा विचार करण्यासाठी सुपरिंटेंडंट (ची) खास भेट होईल काय ? ते म्हणाले, तुरुंगातील अधिका-यांची हरकत नाही. पण ही गोष्ट मध्यभाग कमिशनरचे हातात आहे. मी म्हटले त्यांना भेटण्यापूर्वी तुरुंगातील अधिका-यांचा विचार घेणे आवश्य आहे. त्यांच्या सहानुभूती आणि सहकार्याशिवाय ही गोष्ट होणे नाही. पण ह्याला उडवा-उडवीचेच उत्तर मिळाले.मग माझ्या सुटकेचा प्रश्न निघाला. जेलर मि. क्वीनने माझे हिस्टरी तिकेट घेऊन त्यात ता. २६ ऑक्टोबर ३० (रविवार) ही तारीख पाहिली. हीच कायम तारीख. सुपरिंटेंडंटने विशेष सवलत दिल्याशिवाय मला ता. २५ चे अगोदर जाता येणार नाही. मी सुपरिंटेंडंटला विचारता "अशी सवलत देण्यासारखे तुम्ही काय केले आहे," असे मला हासून म्हणाले. "ही गोष्ट मजपेक्षा आपणच जास्त सांगू शकाल. तुरुंगात मला काय करणे शक्य आहे ?" असे मी उत्तर दिले. एकंदरीत ही वेळही थट्टेवारीच मारून नेली ! मी चुरमुरे खात उभा राहिलो.

शनिवार ता. २० सपटंबर १९३०
आज प्रतापाची भेट झाली. कारकून रा. रास्ने ह्यांनी मला सांगितले की शनिवारी भेटीची परवानगी दिल्याचे पत्र प्रतापाला ता. १७ मंगळवारीच गेले म्हणून. परंतु प्रताप म्हणाला की त्याला अशा परवानगीचे पत्र मिळालेच नाही. तरी तो सायकलीवर आला म्हणून माझी भेट झाली. येथील लोक खरे बोलत नाहीत, ह्याची किती तरी उदाहरणे ही ! असो. प्रतापाने माझ्या डाय-या व मच्छरदाणी व मी ता. १३ सपटंबरचे पत्रात मागितलेले सर्व सामान आणिले. डेप्युटी जेलर मि. मॅक्लीयन ह्यांनी ते सर्व सामान ताबडतोब पास करून दिले. मि. रॉजर्स इतक्यात आले. त्यांची व मॅक्लीयनची ओळख करून दिली.

मंगळवार ता. २३ सपटंबर १९३०
कॅथोलिक उपासनेला गेलो होतो. शनिवारी मिळालेली मच्छरदाणी लावण्याची सोय आज झाली. मि. व्हीलर Mr. Wheeler नावाचा यूरोपियन वॉर्डर भिंतीत खिळे मारून देण्याकरिता आला. हा फार आनंदी, गुलहौशी, बोलका आहे. खिळे मारता मारता "रघुपटि राघव राजाराम ! पटीट पावन शीटाराम ।" हे भजन गुणगुणू लागला ! मी म्हटले "अरे तुझा ख्राईष्ट आणि पाद्री रागावतील ना ?" तो म्हणतो. "Damn that Padri. I am my own Padri !! मेला तो पाद्री, मीच माझा पाद्री !" चार खिळे मारून आठ आणे लाव म्हणून हात पुढे केला.! मी म्हटले येवढी उधारी राहू दे जा ! हासत खिदळत स्वारी चालती झाली !

सोमवार ता. २९ सपटंबर १९३०
आज आमच्या "ब" वर्गातल्या कैद्यांपैकी जवळ जवळ २२ कैदी मित्र ह्या तुरुंगातून नाशिक येथील तुरुंगात पाठविण्याचा हुकूम झाल ! निळ्या आकाशातून एकदम मेघवृष्टीची मुसळधार लागावी तितका आचंबा आम्हाला झाला. लागलीच आपल्या नुसत्या खासगी सामानासकट आमच्या अंधारी वार्ड नं. २ मधून चौघांना बाहेर काढले. ह्यात नवीन आलेले दोन विद्यार्थी आणि नानासो. देवचके आणि नगीनदास हे चौघे होते. नंबर १ मधून खाडीलकर, रामभाऊ हिरे व दोन विद्यार्थी इतके मिळून आठ होते. पैकी नानासाहेब व रामभाऊंचा व माझा फार जिव्हाळा जमला होता. ते दोघेही गहीवरून माझा निरोप घेण्यासाठी माझेकडे आले. माझ्या पायावर डोके ठेविले. नानासाहेबांना उचलून कडकडीत आलींगन दिले.

पण संध्याकाळी त्यांची गाडी चुकली म्हणून ते सर्व पुनः परत आले ! पाच वाजल्यावर नियमाप्रमाणे आम्हाला कोंडल्यावर माझे एक पार्सल आले आहे. म्हणून मला ऑफिसातून बोलावणे आले. गेल्यावर "कर्मवीर विद्यार्थी" हे. रा. कृष्णराव बाबरने लिहिलेले माझे चरित्राचे पुस्तक प्रतापाने पाठविलेले मला जेलर मि. क्वीननी दिले. त्यांना मराठी थोडे येते. ते वाचण्याची त्यांची इच्छा दिसली. पण समजेना. तेव्हा नुसता माझा फोटो तेवढा पाहून तेवढ्यावरच तृप्त होऊन पुस्तक मला दिले. 
काय योगायोग ! हे पुस्तक मी नानासो. साठीच मागविले होते. त्यांची आजच बदली व्हावी ! त्यांची गाडी चुकावी ! आणि ता. २४ ला मागविलेले पुस्तकही मला आजच मिळावे. माझे चरित्र व लेख वाचण्याची नानासाहेबांची तीव्र आणि मनःपूर्वक इच्छा अशी फळास आली !!

मंगळवार ता. ३० सपटंबर १९३०
आज सकाळी कॅथॉलिक मासला गेलो. १ वाजता "ब" वर्गातील सुमारे ३० कैदी नाशिकला गेले. अंधारी १ व २ वॉर्डमध्ये आम्ही ६ जणच उरलो. त्यात हरिभाऊ तुळपुळे,२४ बाळूकाका कानीटकर, व मी तिघेच मराठे !