प्रकरण १०. विविध प्रयत्न (2)

१९०३ सालच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्यें मी विलायतेहून परत आल्याबरोबर महाराजसाहेबांनीं मला आपणांस भेटावयास बोलाविलें, आणि बडोदें शहरांतील चार शाळा तपासण्यास सांगितल्या वगैरे मजकूर मागें आलाच आहे. एकंदरींत ह्या थोर पुरुषाच्या अंतःकरणांत ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता; हें माझ्या ध्यानांत तेव्हांच येऊन चुकलें. इतकेंच नव्हे तर ह्या महत्वाच्या विषयासंबंधीं माझ्या स्वतःच्या विचाराला नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्म समाजाच्या अखिल भारतांतील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळया प्रांतांतील स्थिति स्वतः डोळयांनीं नीट निरखून अजमाविण्याची मलाहि प्रेरणा झाली. १९०४ सालीं मुंबई येथें राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाबरोबर सामाजिक परिषदेचें अधिवेशन झालें. त्यावेळी एकेश्वरी परिषद भरून राममोहन आश्रमांत श्रीमंत महाराजांनीं प्रीतिभोजनांत भाग घेऊन आमच्याशीं सहकार्य केलें, हें मागें सांगितलें आहे. या सामाजिक परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषतः पुण्यांतील कार्यकारी पुढा-यांवर जसा शुभ परिणाम झाला तसाच महाराजांच्या उत्साहशक्तिवरहि झालेला दिसतो. लगेच दोन तीन वर्षांत पुणें, मुंबई येथें सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हिस लीग, सेवासदन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणा-या संस्थांचा उद्भव झाला. उलट पक्षीं याच सुमारास श्रीमंत महाराजांनींहि आपल्या राज्यांत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करून राष्ट्रीय शिक्षणाचा धडा इतर लहान मोठया संस्थानांसच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासहि घालून दिला. बडोद्याच्या इतिहासांत हें साल सोन्याच्या अक्षरांत लिहिलें जाईल. बडोद्यांत सक्तीच्या शिक्षणाचें प्रस्थान मांडल्यावर उसळीसरशी अंत्यज शाळांची संख्या १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या २००० ची ९२६९ झाली. बंद केलेल्या वसतिगृहांची पुन्हा गरज भासूं लागली. लौकरच अंत्यजांच्या सुदैवानें आर्यसमाजी पं. आत्माराम ह्या तरबेज आणि वाहूक घेतलेल्या कार्यवाहकाची जोड मिळाली. १९०७-८ च्या सुमारास हल्लींचें नांवाजलेलें बडोद्याचें अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यांत आलें. पंडितजींना त्याचे सुपरिंटेंडेंट व बडोदें राज्यांतील अंत्यजांच्या शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यांत आले. याच सुमारास महाराजांनीं मला बडोद्यास पुन्हा बोलाविलें. न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यांत एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून महाराजांनीं स्वतःच्या अध्यक्षत्वाखालीं माझें “अस्पृश्योद्वार” ह्या विषयावर व्याख्यान करविलें. हेंच व्याख्यान मला पुरें लिहून काढावयास सांगून ‘बहिष्कृत भारत’ या नांवानें तें प्रसिध्द झाल्यावर त्याच्या १०००
प्रती बडोदें दरबारनें विकत घेतल्या. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्याच्या कार्यावर होऊन पंडित आत्मारामांच्या देखरेखीखालीं त्याला मोठा जोर आला.

डॉ. आंबेडकर ह्या अस्पृश्य वर्गाच्या प्रसिध्द पुढा-याला महाराजांचा मोठा आश्रय होता. बडोदा कॉलेजांतून ते बी. ए. झाल्यावर महाराजांनीं त्यांना अमेरिकेंत दरबारच्या खर्चानें कित्येक वर्षें ठेवून पीएच्. डी. करवून आणले. बडोदें शहरांतील चार वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊनच न थांबता त्यांच्या धार्मिक शिक्षणाचीहि उत्तम सोय करण्यांत आली आहे. गुजराथेंतील अंत्यज वर्ग आपापलीं धार्मिक गृहकृत्यें आपल्याच जातीच्या पुरोहिताकडून करवून घेत असतात. यांना गरोडा म्हणतात. या गरोडयाकडून धर्मकृत्यें योग्य रीतीनें व्हावींत म्हणून त्यांच्यासाठीं एक संस्कृत शाळा काढण्यांत आली आहे. आणि त्यांत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा ८ रुपये शिष्यवृत्या देऊन तयार करण्यांत आलें. वसतिगृहांतील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रासह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यांत येतें. शिवाय त्यांचीं दोन बालवीर पथकें आहेत.

पुढें दुमदुमत राहिलेल्या मंदिरप्रवेशाच्या दंगलींतहि ह्या पतितपावन महाराजांनीं आघाडी मारून सरशी मिळविली आहे. मंदिरप्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच महाराजांनीं आपलें खंडेराव मंदिर अस्पृश्यांस खुलें केलें आणि ही चळवळ सुरू झाल्यावर १९३२ च्या ऑक्टोबर महिन्यांत सर्व हिंदुधर्मियांस जातगोत मनांत न आणतां सरकारी देवळांत प्रवेश करूं द्यावा व तसें करण्यास खाजगी देवळांच्या मालकांचीं मनें वळवावीं, अशा आशयाचा महाराजांनीं युरोपांतील लोझानहून तारेनें हुकूम पाठविला. संकटें हीं कार्यसिध्दीचीं मापेंच होत अशी खूणगांठ मनांत बांधून समाजधुरीणांनीं सतत वागलें पाहिजे. महाराजांनीं असें केलें म्हणूनच त्यांना अपूर्व यश लाभले.

कर्नल ऑल्कॉट, थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष, यांनीं अस्पृश्यता निवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरीं आपली पहिली शाळा १८९४ सालीं एका झोंपडींत काढली. दुसरी १८९८ त व तिसरी १८९९ त उघडली. या सर्व शाळांतून मिळून ३८४ मुलगे व १५० मुली आणि १६ शिक्षक होते. चवथ्या इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब, व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविण्यांत येत. त्यांच्या धर्मांत मुळींच हात घालण्यांत येत नसे. १९०३ सालीं मीं स्वतः मद्रास शहरीं सोसायटीच्या ४ शाळा पाहिल्या. तेथें किंडरगार्टन पध्दतीचें नमुनेदार शिक्षण मीं पाहिलें. एक तज्ज्ञ स्विस बाई फारस कळकळीनें देखरेखीचें काम खुशीनें करीत होती.

मद्रास इलाख्यांत विशेषतः पश्चिम किना-यावर मलाबारांत अस्पृश्यांचे हाल कल्पनातीत आहेत. अस्पृश्यतेची गोष्ट राहोच पण वरिष्ठ जातींच्या व्याक्तिंपासून ६०-७० फुटाच्या अंतरावर येण्यास अद्यापि मनाई आहे. म्हणून ह्या प्रांतीं सर्वांच्या मागून ह्या कामास सुरुवात झाली. मंगळूर ब्राह्मसमाजाचे चिटणीस रा. सा. के. रंगराव यांनीं मंगळूर येथें आपली पहिली शाळा १८९७ सालीं काढली. त्यापूर्वीं लोकमत तयार करण्यासाठीं “पंचम लोकांची गा-हाणीं” (Wrongs of The Panchamas) ही लहानशी चोपडी इंग्रजींत त्यांनीं प्रसिध्द केली. तींत त्यांनीं ह्या लोकांचीं हृदयद्रावक दुःखे वर्णिलीं आहेत. ह्या कामीं रंगरावांना आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून अनन्वित छळ सोसावा लागला. रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे असून त्यांच्या कुटुंबाला कुटाळ लोक “पंचमती” असें उल्लेखित. ह्या छळाला न जुमानतां १० वर्षांत त्यांनीं बरीच प्रगति केली. सरकारच्या मदतीनें त्यांना ह्या अवधींत ह्या संस्थेसाठीं विस्तीर्ण जागा व इमारत, उद्योग शाळा आणि वसाहतीसाठीं सुमारें २० एकर शेतकीची जागा इतकी सामुग्री संपादन करतां आली. १९०७ च्या सुमारास मी मंगळुरास ब्राह्म समाजाच्या कामासाठीं गेलों तेव्हां मीं ही मंगळुरची संस्था आमच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळींत शाखा म्हणून संलग्न करून घेतली. तेव्हांपासून पुढें तिची बरीच भरभराट आणि विशेष प्रसिध्दि झाली.

ब्रिटिश सरकार व ख्रिस्ती मिशनें यांनीं अस्पृश्यांची स्थिति सुधारण्यासाठीं जे कांहीं प्रयत्न केले ते प्रसिध्दच आहेत. यांच्या मार्गांत अडथळा काय तो नोकरशाहीची नबाबी पध्दति आणि मिशन-यांचें धर्मांतराचें वेड एवढाच होता. बाकीं साधनें भरपूर होतीं. हे अडथळे नसते तर दोघांच्या हातून निदान हिंदुस्थान सरकारच्या एकाच्या हातून तरी हा अस्पृश्यतेचा प्रश्न लवकर सुटला असता. मद्रासेकडील ख्रिस्ती मिशनांच्या विशेषतः रोमन कॅथॉलिक पंथांच्या पध्दतींत तर उघड उघड अक्षम्य दोष मला दिसले. ते हे कीं, जातिभेदाचें निर्मूलन करण्याचें त्यांचें धर्मांत सांगितलें असूनहि केवळ आपली संख्या वाढावी ह्या कावेबाज हेतूनें त्या लोकांना ख्रिश्चन धर्मांत घेऊन पुन्हां त्यांना अति नीच अवस्थेंतच ठेवण्यांत आलें आहे. त्यामुळें त्यांना हिंदु धर्मास पारखे होऊन जातिभेदाचें व अस्पृश्यतेचें दुस्सह्य जुलूम सोसावे लागतात. ब्राह्मण ख्रिस्ती लोकांशीं मिसळून वागतां येत नाहीं. उपासनेसाठीं ख्रिस्ती देवळांतहि जाण्यास त्यांना मज्जाव आहे. मेरी माता, ख्रिस्त इत्यादि मूर्तीची पूजा अस्पृश्य वाडयांत सर्रास चालू आहे. त्याचे पुरावे मीं स्वतः दक्षिण देशीं त्रिचनापल्ली वगैरे ठिकाणीं हिंडत असतां पाहिले. ख्रिस्ती लोकांत हल्लीं जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे ती कायम राहिली आणि हिंदुमहासभेसारखी चळवळ शब्दापलिकडे जाऊन कृतींत उतरली तर लवकरच हे ख्रिस्ती अस्पृश्य पुन्हां धर्मांतर करून हिंदु धर्मांत येतील असें वाटतें.

इंग्रज सरकारनें सक्तीचें शिक्षण देऊन शिकलेल्यांना मोठमोठया जागा देऊन ह्या लोकांना वर आणण्यांत आजवर जी अक्षम्य ढिलाई केली आहे ती केली नसती तर अस्पृश्यतेला ताबडतोब ओहोटी लागली असती. तथापि अशा बाबतींत परकीय नोकरशाही आणि परधर्मी कावेबाजी यांना पोकळ नांवें ठेवण्यापेक्षां सर्व दोन स्वकीयांनींच पत्करावा हें योग्य आहे.

आर्य समाज, ब्राह्म समाज, हिंदु समाज ह्यांतील कित्येक उदार गृहस्थांनीं अस्पृश्यता निवारण्याचे लहानमोठया ब-याच संस्था काढून ह्या कामीं पुष्कळ स्तुत्य प्रयत्न केले. म्हैसूर, निजाम, हैद्राबाद आणि इंदूर वगैरे मोठमोठया संस्थानांनीं आपल्या विद्याखात्यामार्फत अस्पृश्य वर्गाची शिक्षणविषयक तरतूद पुष्कळ केली. पण हे सर्व प्रयत्न भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा बोलबाला झाल्यानंतर जी सहानुभूतीची व जागृतीची लाट देशावर पसरली, तिच्यामुळें झाले म्हणून त्यांचे उल्लेख पुढें योग्य स्थळीं करणें बरें.

प्रकरण १०. विविध प्रयत्न

अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानांत तरी आर्यन लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे. चांडाल हा शब्द वैदिक वाङमयांत आणि बौध्द वाङमयांतून आढळतो. बुध्दाच्या वेळेच्यापूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर राष्ट्रें अस्पृश्य गणलीं जात होतीं, असे उल्लेख आढळतात. इराणांतील झरतुष्ट्रपंथी आर्य व हिंदुस्थानांतील देवयज्ञी आर्यांनाहि अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असें पारशी लोकांच्या जुन्या व नव्या ग्रंथांत पुरावे मिळतात. आर्यांचा हिंदुस्थानांत कायमचा जम बसल्यावर त्यांनीं येथील दस्यु ऊर्फ शूद्र नांवाच्या जित राष्ट्रांना आपल्या वस्तीजवळच पण बाहेर राहावयास लावून त्यांच्या व आपल्या संस्कृतींत भेसळ होऊं नये म्हणून त्यांना अस्पृश्य ठरविलें. ज्याअर्थी जपानांत हैटा व हीना नांवाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत; त्याअर्थी अस्पृश्य जात ही संस्था आर्यांनींच निर्माण केली नसून तिचा प्रादुर्भाव पूर्वी मोंगल लोकांतहि होता हें सिध्द होतें. हैटा किंवा ऐटा ही जात फिलिपाईन बेटांतून जपानांत गेली असावी. अथ्रवण (ब्राह्मण), रथेष्ट्र (राजन्य), वष्ट्रय (वैश्य) आणि हुइटि (शूद्र) असे झरतुष्ट्रच्या वेळीं इरणांत चार भेद होते. वेदांत शूद्र हा भेद फारसा आढळत नाहीं. पण महाभारतांत अभीर आणि शूद्र यांचा उल्लेख असून सिंधू नदीच्या मुखाजवळील भागांत त्यांची वस्ती असावी असें दिसतें. ॠग्वेदांत पुरुष सूक्तांत शूद्र शब्द आला आहे व शुल्क यजुर्वेदांत आठ वेळां हा शब्द आला आहे. Castes of India ह्या पुस्तकांत विल्सननें म्हटलें आहे कीं, कंदाहार प्रांतात शूद्रोई नांवाचें प्राचीन राष्ट्र होतें आणि सिंधू नदीवर शूद्रोस नांवचें शहर होतें. इराणांतील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलीपाईन बेटांतील हैटा या जातींचा संबंध असल्याचें सिध्द करतां आल्यास अस्पृश्यतेच्या प्राचीन उत्पत्तीवर आणि प्रसारावर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे. इंग्रजी शिक्षणामुळें हिंदुस्थानांत जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ति झाली तिच्यामुळें वरील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ जे ठिकठिकाणीं प्रयत्न झाले त्यांचा आतां विचार करूं.

बंगाल्यांत १८२८ सालीं राजा राममोहन राय यानें ब्राह्मसमाज स्थापन करून आद्यप्रगतीची ध्वजा उभारली. तरी अस्पृश्यनिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रासच मिळाला. विशेषतः तो मान महात्मा ज्योतिबा फुलें यांच्यामुळेंच प्राप्त झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणें येथें फुलमाळी समाजांत झाला. १८४८ पर्यंत यांचें मराठी व इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेंत झालें होतें. १८५२ सालीं मुंबई सरकारनें ज्योतिसाब २०० रुपयांची शाल, मोठी जाहीर सभा भरवून, नजर केली. त्याचें कारण १८४८ सालीं ज्योतिबानें मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि १८५२ सालच्या आरंभीं महारमांगाच्या मुलांसाठीं पहिली शाळा स्थापन केली. ही शाळा मुंबई इलाख्यांतच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासांत अस्पृश्यांसाठीं हिंदु लोकांनीं उघडलेली पहिली शाळा होय. सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेबांनीं ह्या शाळेची पहिली परीक्षा २१ मार्च १८५२ रोजीं शुक्रवार पेठेंतील शाळेंत घेतली असें त्या दिवशीं प्रसिध्द झालेल्या ज्ञानप्रकाशच्या अंकांत नमूद झालेलें आहे. ह्यावेळेस शुध्द लिहिणें व वाचणें वगैरे गोष्टींत ह्या शाळेंतील मुलांनीं विश्रामबागेंतील (वरिष्ठ वर्गाच्या) कित्येक मुलांपेक्षांहि उत्तम परीक्षा दिली असें मेजरसाहेबांनीं म्हणून दाखविलें. एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ घातली त्या कालावधींत व पुढेंहि फुले यांस त्यांच्या जातीकडून फार त्रास सोसावा लागला. त्यांस शेवटीं त्यांच्या तीर्थरूपांनीं त्याच कारणावरून घरांतून बाहेर काढलें. आपल्या नीच मानलेल्या बंधुजनांस अज्ञानसागरांतून काढून ज्ञानामृताचें सेवन करण्याकरतां त्यांनीं संकटें भोगलीं हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे. ह्या शाळेंत चांभाराच्या मुलींना ज्योतिबा स्वतः व त्यांची पत्नी फार कळकळीनें शिकवीत असत. यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, आणि सखाराम यशवंत परांजपे, यांची ज्योतिबांना बरीच मदत असे. महारामांगाच्या शाळांत बरीच गर्दी होत असे. ह्या लोकांस त्यांनीं आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती.

भारतीय निराश्रित साह्याकरी मंडळीनें नानाच्या पेठेंत पुणें म्युनिसिपालिटीकडून सन १९१४ ता. १८ माहे जून रोजीं भोकरवाडी जवळील ७ एकर जागा आपल्या प्रशस्त 
इमारतीकरतां नव्याण्णव वर्षांच्या करारानें घेतली आहे. हीच ती ज्योतिबाची मिळकत होय. सरकाराकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली ती देखील हल्लीं या मंडळीच्या शाळांतच सामील झाली आहे.

बंगाल्यांत अस्पृश्यता निवारणाचा प्रथम मानबाबू शशिपाद बंदोपाध्यायजी (बानर्जी) या गृहस्थांकडेच आहे. हे कलकत्त्याकडील बारानगर गांवीं सन १८४० त कुलीन ब्राह्मण जातींत जन्मले. सन १८६६ सालीं त्यांनीं ब्राह्म समाजाची दीक्षा घेतली. तेव्हांपासूनच ते खालच्या जातीशीं मिळून मिसळून जेवूंखाऊं लागले. १८६५ सालच्या नोव्हेंबरच्या १ ल्या तारखेस बारानगरच्या गिरणी मजुरांची त्यांनीं एक सभा भरविली. त्यांत ठराव होऊन त्यांनीं मजुरांकरितां रात्रींच्या व दिवसाच्या शाळा काढल्या. असा अनाचार टवाळ लोकांस न खपून त्यांनीं त्या शाळा उठविल्या. पण बाबूजींनीं स्वतःच्या खर्चानें इमारती बांधून त्या कायम केल्या. महाराष्ट्रांतील चोखामेळयाप्रमाणें बंगाल्यांतील कर्ताभजापंथी चांडाळ वर्ग भजनाचा शोकी आहे. त्यांचा बिहालपारा गांवीं एक उत्तम सारंगी तयार करण्याचा कारखाना आहे. तेथें बाबूजी जाऊन चांडाळेंचें कीर्तन ऐकत. १८७० सालच्या ऑगस्ट महिन्यांत त्यांनीं अशा मजूर वर्गाचा एक संघ काढला. त्याच्या द्वारा त्यांना वाचनाची गोडी लागली आणि मद्यपानादि दुष्ट चाली सोडविल्या. वेडींवाकडीं अभद्र गाणीं सोडून ही मंडळी सात्त्विक कीर्तनें करूं लागली. १८७१ त जेव्हां बाबूजी विलायतेस निघाले तेव्हां ह्या गरीब मजुरांनीं त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिलें. या दीनांच्या सेवेंबद्दलचा बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरीं एका मिशनरी संस्थेनें मोठें मानपत्र देऊन केला. परत आल्यावर शशिपाद बाबूंनीं गरिबांसाठीं एक पैसा किंमतीचें एक मासिक पत्र काढलें. दर महिन्यास त्याच्या १५००० प्रती खपूं लागल्या. त्यांत पं. शिवनाथ सारख्यांनीं लेख लिहिले. श्रीमंत वर्गाचीही त्यांस चांगलीच मदत असे. ‘बारानगर समाचार’नांवाचें साप्ताहिकहि त्यांनीं काढलें. ते चांडाळाबरोबर जेवीत. मेहेतरांच्या मुलांची शुश्रूषा करीत. सरकारनें नुकत्याच उघडलेल्या सोव्हिंग्ज बँकेंत त्यांचे पैसे ठेवून त्यांना काटकसर शिकविली. बारानगरास पुढें ब्राह्म समाज स्थापन झाल्यावर बरेंच काम होऊं लागलें. कलकत्ता येथें ब्राह्म समाजाचा माघोत्सव होतो त्यावेळीं मोठया थाटानें नगरसंकीर्तन निघतें. त्यांत बारानगरच्या मजुरांची एक दिंडी येऊन भजनांत भाग घेते. हल्लीं बंगाल्यांत जें Backward Classes Mission आहे त्याचें मूळ महाराष्ट्रांतील Depressed Classes Mission हें आहे.

मुंबई शहरांत १८५५ सालीं एक मंडळी स्थापून तिच्या विद्यमानें कांहीं शाळा अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी स्थापल्या होत्या; पण त्यावेळीं काल अनुकूल नसल्यामुळें व चिकाटी धरून काम न झाल्यानें त्या शाळा बंद पडल्या. १८७० सालीं ब्रह्मानंद केशवचंद्र सेन विलायतेहून परत आले व त्यांनीं धोबी तलावावर फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूटमध्यें जें व्याख्यान दिलें त्यांत त्यांनीं खालच्या जातींच्या उन्नतीसाठीं मुंबई प्रार्थना समाजानें कांहीं कार्य करावें अशी सूचना केली. ह्या सूचनेस अनुसरून समाजानें रात्रींच्या कांहीं शाळा स्थापल्या. त्यांपैकीं दोन शाळा फक्त अस्पृश्य मानलेल्या जातींसाठीं होत्या. १८९१ सालीं समाजाचे एक सभासद जे पुढें उपाध्यक्ष होते त्या शेठ दामोदारदास सुखडवाला या उदार गृहस्थांनीं भायखळा येथें स्वखर्चानें अस्पृश्यांसाठीं शाळा चालविण्यासाठीं मदत केली. सर नारायणराव चंदावरकर यांनीं १९१० सालीं असें म्हटलें आहे कीं, अस्पृश्योध्दाराच्या एकंदर चळवळीचा त्यावेळपर्यंतचा इतिहास अवलोकन केला व आज अस्पृश्योद्वारार्थ चालू असलेलें कार्य ध्यानांत घेतलें तर बरेंचसें श्रेय ख्रिस्ती मिशनरी, ब्राह्म समाज, कर्नल अलकॉट व इतर थिऑसफिस्ट, स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज यांकडे जातें यांत कांहीं संशय नाहीं.

भारतीय अस्पृश्यता ही एक स्वतंत्र संस्थाच आहे. बौध्द, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव धर्मपंथीयांनीं व इतर साधुसंतांनीं प्राचीन व मध्ययुगीन काळीं अस्पृश्यांच्या आत्मिक उध्दारासाठीं प्रयत्न केले आहेत. पण ते सर्व वैयक्तिक स्वरूपाचे होते. सामुदायिक अस्पृश्यता मुळांतच नष्ट करण्याचें, आधुनिक अर्थानें निवारणाचें व त्या पुढचें भौतिक उध्दाराचें काम या पंथांनीं किंवा कुणी संतांनीं केलेलें इतिहासांत नमूद नाहीं. ह्या बाबतींतील चालू प्रयत्न म्हणजे आधुनिक युगाचेंच एक विशिष्ट लक्षण आहे. पाश्चात्यांची संस्कृति या पुरणप्रिय देशांत अंमल गाजवूं लागल्यावर १९ व्या शतकाच्या मध्यापासून अशा प्रयत्नांस सुरुवात झाली. केवळ कालानुक्रमाप्रमाणें पाहिल्यास श्रीमंत महाराज सरकार गायकवाडांचा नंबर तिसरा लागतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रयत्न १८५२ सालीं, बाबू बानर्जी यांचा प्रयत्न १८६५ सालीं व श्रीमंत सर सयाजीराव महाराजांचा प्रयत्न १८८३ सालीं म्हणजे त्यांना राज्याधिकार मिळाल्याबरोबरच दुस-या तिस-या वर्षी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. या दृष्टीनें पाहतां श्रीमंत महाराज म्हणजे एका मोठया संस्थानचे मोठे अधिपति म्हणूनच नव्हे तर अखिल भारतांतील लोकमताचे नेते, समाजसुधारक, राजकारण कुशल मुत्सद्दी इतकेंच नव्हे तर आपल्या दोस्त इंग्रज सरकारालाहि पदोपदीं धडे शिकविणारे अनुभवी सत्ताधारी म्हणून जगापुढें झळकत आहेत. १८८२ सालीं ह्या कामास हात घालतांना महाराजांचें वय अवघें वीस वर्षांचेंहि नव्हतें. इतर संस्थानांतून जीं थोडीं बहुत अशीं अपूर्व कृत्यें होतात त्यांचें श्रेय एकाद्या प्रागतिक दिवाणाकडेच असतें. १९१८ सालीं आमच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची मुंबईस एक खास अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद भरली होती. तिचें अध्यक्षीय भाषणांत महाराज म्हणाले,  “मला या कामीं अनेक अडचणींशीं झगडावें लागलें. कितीहि मोठया पगाराचें आमिष दाखविलें तरी कित्येक वर्षी हिंदु शिक्षकच मिळेनात. मुसलमानाकडून व नंतर आर्य समाजिस्टांकडून हें काम करवून घ्यावें लागलें.” ह्या कठीण कार्याबद्दल १९२१ सालीं “परोपकारी सभा”या नांवाच्या सभेनें महाराजांना ‘पतितपावन’अशी पदवी दिली. त्यावेळीं महाराज म्हणाले, “या पदवीला मी पात्र आहें असें मला तरी वाटत नाहीं. राज्याच्या काळजीमुळें व परिस्थितीमुळें ह्या कामीं मला जितकें करावयाचें होतें तितकें घडलें नाही. माझे अधिकारी मला जें सांगतात त्यावरच मला निमुटपणें अवलंबून रहावें लागतें. आणि ते जें करतात त्यावरच तृप्त रहावें लागतें. मानवी प्रयत्नाला मर्यादा असतात. विशेषतः हिंदुस्थानांतील राजे लोकांना ते सर्वाधिकारी असूनहि ह्या मर्यादा अधिकच भोंवतात”

१८८१-९२ सालीं बडोदें, अमरेली, पाटण आणि नवसारी येथें प्रत्येक ठिकाणीं अस्पृश्य मुलांसाठीं व मुलींसाठीं स्वतंत्र वसतिगृहें काढून त्यांच्या जेवण्याची व राहण्याची सोय केली. कपडेलत्ते, पाटया, पेन्सिली वगैरेहि पुरविलीं. ह्यानंतर कित्येक वर्षें ह्या प्रयोगाला दुष्काळ व प्लेगचीं विघ्नें आलीं. मुलांना शाळेंत पाठविण्याला या कंगाल लोकांना त्राण उरेना. हिंदु अधिका-यांच्या सहानुभूतीच्या अभावाचीहि त्यांत भर पडली. शेवटीं ह्यांतील कांहीं वसतिगृहें बंद ठेवावीं लागलीं. तरी देखील महाराजांनीं खर्चांत बचत न करतां बडोदें भागांत रु. ४० च्या व इतर भागांत रु. २५ च्या शिष्यवृत्या ठेवल्या व कसेंहि करून १९०० सालापासून पुढें कांहीं वर्षें शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या १००० पासून १५०० पर्यंत राहील असें केलें.